शोभा भडके
भाग – 4
“हां आई… अगं कुठे आहेस तू? मी केव्हाची घरी आलेय, दाराला कुलूप आहे…” भावना दारातच फेऱ्या मारत फोनवर बोलत होती. तोच मागून येत आरूने (आराधना) तिचे डोळे झाकले… त्यामुळे भावना थोडी दचकली; पण लगेच नॉर्मल झाली आणि गालात हसली… तिच्या डोळ्यांवरच्या हातांना चाचपडत म्हणाली…
“आरूSS”
“काय गं ताई… नेहमीच कशी गं ओळखतेस तू?” आरू बाजूला होत लटक्या रागात म्हणाली.
“अरे देवा, माझ्या आरूला राग आला का? पण मी तरी काय करणार? तुझ्याशिवाय दुसरं कोणी माझे असे डोळेच झाकत नाही तर मला कसं नाही कळणार!” भावनाने तिला मागून मिठी मारत, तिच्या गालावर किस करत म्हणाली.
मग तिनेही राग सोडून, मागे वळून मिठी मारली…
“काय ताई, तू कुठे गेली होतीस? तुला माहितीय मी सकाळीच आले…” – आरू.
या दोघी दारातच बोलत उभ्या राहिल्या आणि आत्या मान हलवतच दार उघडून आत निघून गेली.
“अगं, आमच्या कॉलेजच्या ट्रिपला गेले होते… आणि रामदादा कसायस तू?” आरूशी बोलून झाल्यावर ती रामकडे गेली.
“आता दिसलो का मी? तुम्ही बहिणी भेटला की, बिचाऱ्या भावांना विसरून जाता!” तिच्या डोक्यावर टपली मारत राम म्हणाला.
“असं काही नाही दादा… तू तर आमचा लाडका दादा आहेस… हो ना गं!” भावना त्याच्या कुशीत शिरत आरूकडे पाहात म्हणाली.
“हो तर! माझा तर सगळयात लाडका दादा आहेस तू…” असं म्हणत आरू त्या दोघांजवळ आली आणि एका बाजूने त्याच्या मिठीत शिरली.
सियामुळे त्याचं अस्वस्थ झालेलं मन या दोघींमुळे शांत झालं…
“बरं चला आता आत…” राम म्हणाला आणि मग तिघेही आत निघून गेले.
भावना तिची बॅग घेऊन रूममध्ये गेली. आरू आत्याकडे किचनमध्ये गेली तर, राम पण पवनच्या रूममध्ये गेला, फ्रेश होण्यासाठी…
“अगं तू इथे काय करतेयस? तू पण फ्रेश होऊन ये, तोवर मी चहा टाकते आपल्या सगळ्यांसाठी…” असं म्हणत आत्याने गॅस सुरू करून त्यावर चहाचं आधण ठेवलं.
“अगं आत्या, काय फ्रेश व्हायचं त्यात? हात, पाय धुवून तोंडावर पाणी मारायचं… पाय आता मी धुत नाही… हात धुवून तोंडावर पाणी मारते इथेच…” असं म्हणत तिने तिथेच किचनमधल्या सिंकमधील नळ सुरू करून हात धुवत चेहऱ्यावर पाणी मारून घेतलं… नंतर आत्याच्या पदराने तोंड पुसलं… आणि आत्याने पुन्हा एकदा मान हलवत चहात बाकीचं साहित्य टाकलं.
चहा कपामध्ये ओतून आत्या बाहेर हॉलमध्ये आली… भावना आणि राम फ्रेश होऊन आले होते. मग सगळे चहा घेत गप्पा मारत बसले… आत्या गावाकडच्या सगळ्यांची चौकशी करत होती.. राम आणि आरू पण सगळे कसे खुशाल आहेत, ते सांगत होते. आरूची आत्याकडे आईची तक्रार करून झाली… भाऊंच्या दारूमुळे तिचे आणि भाऊंचे कसे वाद होतात, तेही तिने आत्याला सांगितलं.
बराच वेळ गप्पा मारून झाल्यावर आत्या रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेली. भावना देवासमोर दिवा लावण्यासाठी गेली… कॉल आल्याने राम बोलत टेरेसवर गेला… तर, टीव्ही सुरू करून आरू पाहात बसली… त्या अगोदर तिने आत्याला काही मदत हवी आहे का, ते विचारलं होतं. त्यावर आत्याने “तू आजच आलीयस तर, आजचा दिवस आराम कर. उद्यापासून तुला ही घरातली कामे करायला सांगणार आहे. मला वहिनीने सांगितलं आहे, तू कशी काम चुकारपणा करतेस ते…!” असं म्हणून तिला बाहेर पाठवलं होत.
मग संध्याकाळी मामा आणि पवन घरी आल्यावर सगळ्यांनी मिळून रात्रीचं जेवण एकत्र केलं आणि मग सगळे झोपायला निघून गेले…
“अगं, आता या वेळेला कुठे चाललीस? सकाळी लवकर उठायचंय तुला… माहितेय ना तुझ्या कॉलेजमध्ये जायचंय….” बेडवर झोपलेली भावना आरूला उठून जात असल्याचे पाहून म्हणाली!
“आले गं ताई आत्ता लगेच…” म्हणतच आरू बाहेर निघून गेली.
“दादा, झोपलास का?” आरू रूममध्ये येत म्हणाली.
“नाही, ‘नकटी व्यक्ती झोपायच्या वेळेला डिस्टर्ब करायला येतं आहे…’ अशी आकाशवाणी झाली होती आत्ताच थोड्या वेळापूर्वी… तर, तिचीच वाट पाहात जागे होतो आम्ही आणि तुझं आगमन झालं…” पवन तिला चिडवत म्हणाला.
“ओ दाजी मला नकटी म्हणायचं नाही हं…” आरु त्याच्याकडे बोट करून रागात म्हणाली.
“मी नकटीच म्हणणार काय करायचं ते कर!” तो पण तिला चिडवत म्हणाला.
असा दोघांचा वाद सुरू झाला… दोघे उंदीर मांजरासारखे असे सतत भांडायचे. वेळकाळ पण कळायचा नाही! आताही ती कशासाठी आली होती ते विसरून पवन सोबत वाद घालत होती.
“ए चूप… एकदम चूप… काय चाललं तुमचं? वेळ काय आणि तुम्ही करताय काय? ही वेळ आहे का भांडायची?” राम मोठ्याने ओरडत म्हणाला.
तसे दोघे एकदम चूप झाले.
“आरू, काय झालं? तुझं काही काम होतं का? असले तरी आपण सकाळी बघू… आता जाऊन झोप. सकाळी लवकर उठायचं आहे, उद्या तुझं ॲडमिशन करायचंय…” राम आरूला म्हणाला.
पवनमुळे तिचा पण मूड गेला होता, आता आपण यावर नंतर बोलू, असं ठरवून तिने होकारार्थी मान हलवली आणि गुड नाईट बोलून निघून गेली.
इकडे शिव त्याच्या रूममध्ये गॅलरीत बसून सियाचा विचार करत होता… अचानक दार उघडण्याचा आवाज आला आणि त्याने डोकावून पाहिलं तर सिया आत येताना दिसली. तसं त्याने परत मान फिरवून घेतली आणि बाहेर पाहू लागला. सिया त्याच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसली… तरीही त्याने तिच्याकडे पाहिलं नाही.
तिने सुस्कारा सोडत विचार केला…, “आता मलाच बोलावं लागेल, जे होईल ते होईल!”
“शिव, मला माहीत आहे, मी तुला खूप हर्ट केलंय… आणि त्यासाठी मी खूपवेळा तुझी माफी पण मागितली आहे. तू तिकडे शिकत होता रे आणि माझ्यामुळे मला तुला त्रास नव्हता द्यायचा… तुझं नुकसान नव्हतं करायचं… कारण मला माहीत होतं, तू सगळं सोडून निघून आला असता…!” सिया डोळ्यात पाणी आणून म्हणाली.
त्याने तिच्याकडे पाहिलं… त्यालाही कळत होतं सगळं! पण तरीही त्याला सहनच होत नव्हतं, जे काही झालं ते.
“तो मुलगा कोण होता?” त्याने त्याच्या मनातला प्रश्न विचारला… ज्याचा तो आत्तापर्यंत विचार करत होता.
सिया त्याचा प्रश्न ऐकून थोडावेळ गडबडून गेली. त्याच्या सोबतच्या आठवणींनी तिला गलबलून आलं आणि नकळत तिचे डोळे बंद झाले… क्षणात त्याचा चेहरा डोळ्यांसमोर आला…. आपसूकच तिच्या तोंडून नाव बाहेर निघाले, “रामSSS”
शिव तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता… त्या निरागस चेहऱ्यावर त्याचं नाव घेताच जो आनंद दिसत होता… तोच आनंद त्याने आल्यापासून मिस् केला होता… आणि त्याला समजून गेलं, आपल्या ताईचं त्याच्यावर किती प्रेम आहे!
ती रामच्या आठवणीत हरवून गेली होती… तोच शिवने तिला आवाज दिला…
“ताईSSS”
“हं…” त्याचा आवाज ऐकून ती भानावर आली
“ताई, मी त्यांना तुझ्या आयुष्यात परत घेऊन येईन!” तो तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला.
त्याचं वाक्य ऐकून तिने डोळेच विस्फारले!!
“क… काय? काय बोलतोयस तू? वेडा आहेस का! तू असं काही करणार नाही… कळलं तुला!” ती अडखळत म्हणाली. त्याचबरोबर टेन्शनही आलं… कारण तिला माहीत होतं त्याने जर का काही ठरवलं तर ते तो करूनच राहणार… आणि तिला तेच नको होत!
जे तो म्हणाला ते शक्य नव्हतं. त्याने तिला दूर केलं होतं… तेही तिच्या बाबांच्या बोलण्यामुळे. ती जाणून होती त्याचं प्रेम… ती जाणून होती त्याच्या नकारामागचं कारण! पण आज परिस्थिती वेगळी होती. ती घटस्फोटित होती… आणि आपल्या समाजात, आजही खेडो-पाडी लोक घटस्फोटित स्त्रियांना स्वीकारत नाहीत. मग… मग तो स्वीकारेल का? हाच प्रश्न तिच्या मनात आला… त्याचा नकार पचवण्याची आता तिच्यात हिम्मत नव्हती!
आणि म्हणूनच तिने शिवला असं काही करण्यासाठी मना केलं…
“ताई, मी तुझ्या सुखासाठी काहीही करू शकतो आणि तुझं सुख जर त्यांच्यासोबत असेल तर त्यांना तुझ्या आयुष्यात आणण्यासाठी काहीही करेन…” तो तिच्यासमोर येत निर्धाराने म्हणाला.
“शिव, अरे पण…” ती बोलतच होती की, त्याने मधेच अडवलं.
“ताई, खूप उशीर झाला आहे… तू जाऊन झोप!” तो तिला खांद्याला धरून गॅलरीतून आत येत म्हणाला.
“अरे, पण…” सिया.
“चल… नको टेन्शन घेऊ. मी आहे ना!”
तो तिला रूममध्ये सोडून आपल्या रूममध्ये परत आला. रूममध्ये आल्यावर त्याने कोणाला तरी फोन लावला आणि रामची माहिती काढायला सांगितली. मग थोडावेळ ऑफिसमधल्या उद्याच्या मीटिंगचं काम करून त्याने बेडवर पाठ टेकली.
लाइट ऑफ करून त्याने डोळे बंद केले आणि सकाळपासूनच्या गोष्टींचा विचार करू लागला… एका क्षणाला त्याने खाडकन डोळे उघडले…
“तो बेडवर उठून बसला आणि शेजारी टेबलवर ठेवलेला मोबाइल हातात घेऊन जीवनला कॉल केला.
“हां, जीवन ते पिल्लू कसं आहे आता?”
“हं, कोणतं?” एक क्षण जीवन गोंधळाला. त्याला कळलंच नाही आपला बॉस कशाबद्दल बोलतोय ते! कारण रात्रीचे बारा वाजले होते आणि फोन येण्यापूर्वी जीवन गाढ झोपेत होता.
“दुपारी आपल्या गाडीसमोर आलेल्या कुत्र्याच्या पिल्लाबद्दल बोलतोय मी! लक्षात आलं की, तिथे येऊन लक्षात आणून देऊ?” शिव थोडा आवाज चढवून म्हणाला.
हेही वाचा – कोपिष्ट शिवला ऑर्डर देऊन आराधना निघून गेली अन्…
“यस् यस् सर आलं लक्षात… हो, ते… ते ठीक आहे. त्याची ट्रीटमेंट पण केली आणि आत्ता त्याला बंगल्यातील गार्डनमध्ये एक छोटंसं घर बनवून तिथेच ठेवलंय. गार्डला सांगितलं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला…” त्याने एका दमात सगळं सांगितलं.
“गुड… आता झोप!” असं म्हणत लगेच कॉल कट केला. फोन बाजूला ठेऊन तो झोपला..
हेही वाचा – सियाबद्दलची ‘ती’ माहिती कळताच, शिव आणखी भडकला
त्याला परत ती आठवली. तिचा तो गोड आणि नाजूक आवाज… तिचं ते त्या पिल्ल्यासाठी ड्रायव्हरसोबत भांडणं…. तिचं त्या पिल्लाला दवाखान्यात न्यायला सांगणं… आणि ‘अशा कुत्र्यांना जिथे ठेवतात त्याचं नाव मला माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर तिथे सोडा…’ तिचं हे वाक्य आठवलं आणि तो गालातल्या गालात हसला. किती निरागसपणे बोलून गेली ती…
दिसायला तर किती सुंदर होती! पिंक कलर तिच्यावर उठून दिसत होता. फेव्हरेट कलर आहे वाटतं तिचा… “पिंकिश”… पडल्या पडल्या तिचा विचार करत होता आणि याची जाणीवही त्याला नव्हती. त्याने डोळे बंद केले आणि तिचा आवाज आठवण्याचा प्रयत्न करू लागला… जणू तिचा आवाज त्याच्या कानात घुमत आहे… बराच वेळ तो तिचा विचार करत होता… अशातच कधीतरी त्याला झोप लागून गेली!
क्रमश:


