शोभा भडके
भाग – 3
“अगं आरू, कुठे होतीस तू? मी किती वेळ वाट पाहतेय इथे!” आत्याने समोरून येणाऱ्या आराधनाला विचारलं.
आरू आत्यासोबत मंदिरात आली होती. मंदिरातील पुजारी बाबांशी आत्या बोलत असताना ती मंदिराचा परिसर पाहात होती… आणि तेव्हाच तिची नजर पायऱ्यांवरून खाली जाणाऱ्या एका कुत्र्याच्या पिल्लावर पडली. ते पिल्लू रस्त्याच्या दिशेने जात होतं… ‘ते पिल्लू रस्त्यावर गेलं आणि चुकून जर एखाद्या गाडीसमोर आलं तर!’ या विचारानेच ती घाबरली… आणि ती त्याच्या मागे गेली… पण तिला त्याच्यापर्यंत पोहचायला थोडा उशीर झालाच! ते पिल्लू गाडीसमोर गेलं होतं. पण ड्रायव्हरने पटकन ब्रेक मारल्यामुळे ते पिल्लू थोडक्यात वाचलं होतं… पण त्याच्या पायाला थोड लागलंच!
तिने पटकन पुढे येऊन त्याला उचलून घेतलं आणि त्याला चेक करू लागली की, त्याला कुठे जास्त लागलं तर नाही ना? त्याच्या पायातून थोड रक्त येत होतं, ते पाहून तिलाच कसतरी वाटत होतं….
तोवर जीवन गाडीतून खाली उतरून तिच्याकडे आला होता… होय, ती गाडी शिवचीच होती!
“सॉरी मॅडम, ते… ते अचानक समोर आल्यामुळे… ते सॉरी…” जीवन कावराबावरा झाला होता.
“अहो तुम्ही सॉरी नका म्हणू…” आरु त्या पिल्लाला हाताने गोंजारतच म्हणाली. तिचं सगळं लक्ष त्या पिल्लावरच होतं.
“हे बघा याच्या पायाला थोड लागलंय, तुम्ही याला दवाखान्यात घेऊन जा…” आता ती जीवनकडे पाहत म्हणाली.
“मी? मी… मी कसं घेऊन जाऊ? हे बघा यात तशीही माझी चूक नाहीच… तरीही मी सॉरी म्हणतोय… तसं ते कुत्र्याचं पिल्लू आहे आणि त्याला जास्त काही लागलेलं नाही. माझे बॉस घाईत आहेत, तुम्ही रस्त्यातून बाजूला व्हा,” जीवन तिला जरा मोठ्यानेच म्हणाला.
“ओ, तुमची चूक नाहीये तर मग त्याची चूक आहे, असं म्हणायचंय का तुम्हाला? हे बघा, तुम्ही याला घेऊन डॉक्टरकडे जा… याला त्रास होतोय…” तिनेही रागावत आपला आवाज वाढवला. त्या पिल्लाला पाहून तिला ही त्रास होत होता… तोच तिच्या आवाजातून जाणवत होता…
त्यांचा हा वाद पाहून आजूबाजूला माणसं पण जमा झाले होते. ती एका रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्ल्यासाठी असा वाद घालतेय, ते पाहून काहीजण तिच्यावर हसतही होते… पण तिला जणू या सर्वांची परवाच नव्हती! तिचं बोलणं ऐकून जीवन वैतागला होता… त्यात आपला बॉस शिव याची भीती वेगळीच… ती काही तिचा मुद्दा सोडायला तयार नव्हती.
तेव्हाच शिव डोळ्यांवर ब्लॅक गॉगल घालून खाली उतरला आणि त्याने जीवनला आवाज दिला. जीवन मागे वळून शिवकडे येतच होता, तेवढ्यात आरुची नजर त्याच्यावर गेली आणि ती जीवनला मागे सारून त्याच्यासमोर आली आणि मागचा पुढचा विचार न करता ते पिल्लू त्याच्या हातात देऊन आणि त्याला ऑर्डर देऊन वाऱ्यासारखी निघून गेली होती.
हेही वाचा – शिव आणि आराधना… एक अनोखी प्रेम कहाणी
“अगं आत्या इथंच होते, मंदिर बघत होते… लई भारी हे मंदिर…” तिने आत्याला सांगितलं. बाकी सर्व सांगितलं असतं तर आत्याचा ओरडा खावा लागला असता! पण आत्या पण काही कमी नव्हती, आपल्या भाचीला चांगलीच ओळखून होती. त्यामुळे तिचं बोलणं ऐकल्यावर आत्याने तिच्याकडे डोळे बारीक करून पाहिलं… त्यावर ती आत्याकडे पाहून डोळे मिचकावत हसली… त्यावर आत्या पण हसली आणि दोघी मंदिराच्या बाहेर आल्या.
समोरच राम त्यांची वाट पाहत उभा होता. त्याने रिक्षा थांबवली होती. मग ते तिघे मिळून घरी निघून गेले. राम शांत आणि उदास झाला होता आणि ही गोष्ट आरूच्या नजरेतून सुटली नाही. ‘घरी गेल्यावर विचारू,’ अस तिनं मनात ठरवलं.
इकडे शिव घरी पोहचला होता. त्याने गाडी पार्क केली आणि घरात गेला. हॉलमध्ये सगळीकडे शांतता होती… त्याला कल्पना होती सगळे कुठे असतील! तोही पायऱ्या चढून वरती सियाच्या रुमच्या दिशेने गेला. तो रूममध्ये गेला तेव्हा त्याची मॉम हातात ताट घेऊन उभी होती. सिया खिडकीपाशी बाहेर बघत उभी होती आजी शिवकडे रागात पाहत होती.
पूर्वी आणि समर त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होते. नाही म्हटलं तरी त्या भावंडांमध्ये खूप प्रेम होतं. एक जरी उदास असला तरी, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू मावळायचं! त्यात त्यांच्या लाडक्या सिया दिदीसोबत जे काही झालं, त्यामुळे घरातील वातावरण गंभीर झालं होतं. कुठे तरी त्यांचं हसणं, बागडणं कमी झालं होतं. त्यात शिवचा रागीट स्वभाव! तो कधीच यांच्या धिंगण्यात सामील झाला नव्हता. तसंही तो जास्त काळ बाहेरच होता. त्यात घरी आल्यावर सियासोबत जे झाल ते कळल्यावर त्याचा राग जास्तच बाहेर पडू लागला.
सगळ्यांकडे दुर्लक्ष करत तो सियाजवळ येऊन उभा राहिला… ती तशीच खिडकीबाहेर पाहात उभी होती.
“दिदी हा काय मूर्खपणा आहे?” शिव.
ती गप्पच बाहेर पाहात राहिली.
“तिचा मूर्खपणा… तर तुझं काय चालूय?” शिववर रागाचा कटाक्ष टाकत आजीने विचारलं.
त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
“जेवून घे दिदी…” तो कोरडेपणाने म्हणाला.
तिने एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि परत खिडकीबाहेर पाहू लागली.
त्याने एक सुस्कारा सोडत डोळे बंद केले… राग शांत करण्याचा त्याने प्रयत्न केला, पण आता बोलल्याशिवाय गत्यंतर नाही, हे समजून गेला… कारण त्याला माहीत होतं आपली दिदी कधीच हट्ट करत नाही, पण जर कधी ती हट्टाला पेटली तर तो पुरावल्याशिवाय मागे सरत नाही!
आज त्याच्यामुळे ती असा मूर्खासारखा हट्ट धरून बसली होती आणि जोपर्यंत तो आपल्याला माफ करून आपल्याशी बोलणार नाही, तोपर्यंत अन्नपाणी त्याग करायचा…! खंरतर, हेच तिचं शेवटचं अस्त्र होतं!! आतापर्यंत सगळे प्रयत्न करून झाले होते.
त्याने तिला हाताला धरून बेडवर आणून बसवलं आणि तो तिच्या शेजारी बसला. मॉमच्या हातातलं ताट स्वतःकडे घेऊन आणि त्यातून पराठ्याचा तुकडा मोडून तो त्याने तिच्या तोंडासमोर धरला.
पण तिने ‘नाही’ म्हणून मान हलवली आणि तोंड फिरवून घेतलं…
” दिदीSSS” त्याने तो घास हातात तसाच धरून तिला म्हटलं आणि तिने झटक्यात वळून त्याच्याकडे पाहिलं… डोळे पाण्याने गच्च भरले होते…
त्याने तसंच खुणावत खायला सांगितलं… तिने डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू घेऊनच तो घास खाल्ला… तिनेही त्याला भरवलं. अशा प्रकारे त्या दोघांनी ताटातलं सगळं संपवून टाकलं…
त्याने ताट तिथेच बाजूच्या टेबलवर ठेवलं आणि तिच्याकडे वळला… पण तो काही बोलणार त्या आधीच सियाने त्याच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली…
“सॉरी… सॉरी… खरंच सॉरी… मी… मी परत कधीच काहीही तुझ्यापासून लपवणार नाही… शप्पथ… पण तू असा अबोला धरू नकोस… नाहीतर मी.. मी मरून जाईन…” ती त्याच्या मिठीत हमसून हमसून रडत होती. शिवचीही काही वेगळी अवस्था नव्हती… बाकी सगळ्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा लागल्या होत्या…
पण तिने मरणाची भाषा केली आणि शिवने तिला झटक्यात बाजूला केलं… अतिशय रागात ओरडून तिला म्हणाला, “खबरदार जर पुन्हा अशी मरणाची भाषा केली तर! खरंच, कायमचा दूर निघून जाईन मी तुमच्यापासून” संतापाने त्याचा चेहरा लाल झाला होता.
त्याचा राग बघून सिया घाबरून थरथरू लागली… समर, पूर्वी हेही घाबरले.
“शिव, अरे शांत हो रे, रागराग करून काय होणाराय? जे झालं ते आपण बदलू शकत नाही…!” आजी त्याला समजावत म्हणाली.
“पण जे झालं ते होऊच का दिलं आजी? बाबांनी त्या फडतूस डीलसाठी माझ्या दिदीचं आयुष्य बरबाद केलं… तिला इतका त्रास झाला… आणि तीही कोणाला काहीही न सांगता सगळं सहन करत बसली… हे सगळं तुम्ही सर्वांनी माझ्यापासून लपवलंत आणि तू म्हणतेस मी शांत राहू! कसं? कसं राहू शांत, सांगना?”
“मग काय करायला हव होतं मी? तिचं ऐकून त्या गावाकडे राहणाऱ्या गरीब भिकऱ्या मुलासोबत तिचं लग्न लावून द्यायला हवं होत का? मान्य मला माझी चूक झाली, मी तुला यातलं काही सांगितलं नाही आणि घाईतच तिचं लग्न लावून दिलं… पण सगळं काही आपल्या तोलामोलाचंच पाहिलं होत सगळं! शिवाय, बिझनेसमध्येही फायदा होत होता… पण म्हणून मला तिची काळजी नाही, असं होत नाही! मला माहीत नव्हतं, तो असा वाईट वृत्तीचा निघेल. सियानेही मला काही सांगितलं नाही. पण जेव्हा कळलं तेव्हा ताबडतोब तिला मी घेऊन आलोय घरी! त्याचबरोबर त्याचाही बंदोबस्त केलाय मी…” शिवचं बोलणं ऐकून दारात उभे दिनकरराव आत येत उसळून म्हणाले.
हेही वाचा – कोपिष्ट शिवला ऑर्डर देऊन आराधना निघून गेली अन्…
आता हे सगळं ऐकून शिवला जास्तच राग आला, कारण आज अजून एक गोष्ट नव्यानेच कळत होती की त्याच्या दिदीला दुसरा मुलगा आवडत होता… आणि तेही आपल्याला माहीत नाही! या क्षणी त्याला असं वाटंत होत की, आपण शिक्षणासाठी बाहेर जायलाच नको होतं…
पण आता तो काहीही न बोलता परत एकदा ताडताड पावले टाकत बाहेर निघून गेला… आणि सगळे परत काळजीत पडले… सियाला परत टेन्शन आलं आपल्या भावाच्या अबोल्याचं! आता काही तो आपल्याला माफ करत नाही… म्हणून ती जास्तच रडायला लागली. सुधा तिच्याजवळ बसत, तिला कुशीत घेऊन शांत करू लागल्या…
क्रमश:


