भाग – 1
“गुड मॉर्निंग सर!”
“गुड मॉर्निंग! या पाटणकर. कुठल्या गावाहून आलात?”
“कोकिजरे, तालुका वैभववाडी!”
“हां. म्हणजे सह्याद्री पट्टा… शिक्षण कोठे झाल?”
“शाळा कोकिजरे, बी.एससी कणकवली कॉलेज, एम.एससी, कोल्हापूर, बी.एड. गारगोटी.”
“ठीक. म्हणजे शिवाजी विद्यापीठ, तुमचा एम.एससीला फिजिक्स विषय होता ना?”
“हो सर.”
“नाही, विचारण्याचं कारण म्हणजे आमच्या शाळेत फिजिक्सची व्हेकन्सी आहे आणि तुम्ही केमेस्ट्री नायतर बायोलॉजीमध्ये एम.एससी केलं असेल.”
“नाही सर! मी फिजिक्समध्ये एम.एससी केलंय”
“शिकवण्याचा काही अनुभव?” तेथे उपस्थित असलेल्या साळगांवकर मॅडमने विचारले.
“मॅडम, मी दोन वर्षे कणकवलीत एका क्लासमध्ये शिकवत होतो.”
“मग तेथला जॉब का सोडला?”
“पैसे फार मिळत नव्हते म्हणून,” पाटणकर हळूच म्हणाले.
“आमच्याकडे सुद्धा शिक्षण सेवक म्हणूनच जागा आहे, बरं का. सरकारी ग्रॅण्ट नाही. त्यामुळे… काय तो विचार करा.”
“पण पुढे मागे सरकारी ग्रॅण्ड मिळेल ना मॅडम!”
“हो, आमचे प्रयत्न सुरूच असतात. पण सरकारचे नियम दिवसाला बदलतात. ग्रॅण्ट मिळाली तर तुमचा फायदा होईल.”
“हो सर.”
“अकरावी-बारावी फिजिक्सबरोबर प्रॅक्टिकल पण घ्यावी लागतील. शिवाय, खेडेगावातील शाळा आहे. इथे प्रायव्हेट क्लास वगैरे नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी तसेच सुट्टीत जादा तास घ्यावे लागतील.”
“हो सर. माझी तयारी आहे.”
“मग ठीक आहे. मुख्याध्यापक जोंधळे आहेत. त्यांना भेटा. तुमची सर्टिफिकेट्स जमा करा आणि 10 जूनपासून वर्ग सुरू होतील, तेव्हा हजर व्हा.”
“पण सर, पगार किती मिळेल?”
“ते तुम्हाला, कोळंबकर नावाचे क्लार्क आहेत, ते सांगतील.”
अशा रीतीने पाटणकरांचा इंटरव्ह्यू पार पडला. एम.एससी झाल्यानंतर दोन वर्षे नोकरीसाठी शोधाशोध करून शेवटी या गावातील शाळेत अकरावी-बारावीसाठी फिजिक्स शिक्षकाची जागा खाली आहे, हे पेपरमध्ये वाचल्यानंतर पाटणकरांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली.
चेअरमनच्या ऑफिसमधून बाहेर पडून पाटणकर मुख्याध्यापक जोंधळे सरांना शोधायला निघाले. जोंधळे सर त्यांच्या ऑफिसमध्ये मोबाइलमध्ये रंगात आले होते. दोन मिनिटे त्यांचे आपल्याकडे लक्ष जाते काय, हे पाटणकर पाहात राहिले. पण जोंधळे कसलासा सिनेमा पाहण्यात दंग होते. शेवटी पाटणकर त्यांच्या टेबलासमोर उभे राहिले…
“सर, नमस्कार! मी नारायण पाटणकर.”
जोंधळे दचकले, मग सावरत म्हणाले, “बरं मग, मी काय करू?”
“सर, मी हायर-सेकंडरीमध्ये फिजिक्स विषयासाठी अर्ज केला होता. आताच चेअरमन साहेबांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितलं.”
“असं होय. इंटरव्ह्यू दिला काय आणि न्हाई दिला काय… तुम्हीच शिलेट होणार! का सांगा?”
“का?”
“कारण, या खेडेगावात सहा हजार रुपड्यात यांना कोण मास्तर भेटणार?”
“किती? सहा हजार फक्त?”
“मग, सहा लाख वाटले की काय? हा आता मला दीड लाख पगार हाय. सातवा आयोग बरं का!”
“पण, चेअरमननी तुम्हाला भेटायला सांगितलंय.”
“हां, भेटलात म्हणून सांगा. त्यो कोलंबकर क्लार्क हाय का बघा. त्याचेकडं सर्टिफिकेट जमा करा आणि नऊ तारखेला या. कारण आदल्या दिवशी मीटिंग असते, मॅनेजमेंट आणि शिक्षक यांची.”
पाटणकर बाहेर पडले आणि क्लार्क कोळंबकरला शोधू लागले. कोळंबकर मोबाइलमध्ये रमी लावत बसला होता. पाटणकर त्याच्यासमोर उभे राहिले…
“कोळंबकर, मी पाटणकर.”
कोळंबकर रमीत व्यत्यय आला म्हणून वैतागला. त्याने चिडून विचारले, “काय काम आहे?”
“इथं, या शाळेत फिजिक्स शिकवण्यासाठी मी 10 तारखेपासून येणार आहे. मुख्याध्यापकांनी तुम्हाला भेटायला सांगितले.”
“होय काय! बरा बरा… हेंका नवीन नवीन बकरो बरो गावता!”
“बकरो?”
“नायतर काय. सहा हजारांत या खेडेगावात कोण येतलो? बरा ता जावंदे. तुमची सर्टिफिकेटा घेवन येवा.”
पाटणकर नोकरीस हजर होण्याआधीच हैराण झाला. बायकोला काय सांगणार? तिला काल म्हटले, फिजिक्सच्या शिक्षकाची नोकरी आहे. ती खूश… ती शिक्षकांचे हल्ली लाखात पगार ऐकून होती. तिला शिक्षण सेवक हा मधला प्रकार माहीत नव्हता.
मोडक्या एम एटीवर बसून फूर फूर करत पाटणकर आपल्या गावी निघाला. या गावाहून आपले गाव चाळीस किलोमीटर म्हणजे याच गावात बिर्हाड करावे लागणार. बिर्हाड केले की, खर्च वाढणार. गावी चार माणसांत दोन माणसे खपून जात होती. आता खोलीचे भाडे, इलेक्ट्रिसिटी, मुलासाठी दूध… आणि हे सर्व सहा हजार रुपयात भागवायचे कसे?
शाळेतून बाहेर पडल्यावर काही अंतरावर त्यांना लहानशी बाजारपेठ दिसली. पाटणकरांनी फटफटी थांबविली. एक किराणा दुकान, एक लहानसे चहाचे हॉटेल, एक पानपट्टी आणि एक लाकडी खुर्चीचे सलून… सलून पाहताच पाटणकर पुढे गेले. खरंतर, हा आपला पारंपरिक धंदा. आजोबा, काका, वडिलांनी हाच व्यवसाय केला. पण वडिलांनी एकतरी मुलगा शिकावा म्हणून पोटाला चिमटा घेऊन आपल्याला कोल्हापूरात शिकायला पाठवले. आपला मुलगा डबल ग्रॅज्युएट झाला म्हणून वडिलांना कृतकृत्य वाटले. ज्याला त्याला मुलाची हुशारी सांगत सुटले. त्यांना वाटलं ‘आपलो झील कॉलेजात शिकवतोलो. फाड फाड इंग्रजी बोलतोलो. चार चाकी गाडीतून फिरतोलो.’ पण आपण झालो शिक्षण सेवक!
हेही वाचा – …अन् वन्स मोअरने अर्जुनचं भाग्यच पालटलं!
पाटणकर त्यातल्या त्यात मोठ्या असलेल्या किराणा दुकानदाराकडे गेला. हा नवीनच माणूस दिसतोय म्हणून किराणा दुकानदाराने चौकशी सुरू केली…
“खयसुन ईलात?”
“मी पाटणकर. गाव कोकिसरे. या शाळेत शिक्षक म्हणून ईलय.”
“खयचो विषय?”
“फिजिक्स. अकरावी-बारावीसाठी.”
“अरे बापरे! म्हणजे तुम्ही डबल ग्रॅज्युएट शिकला असतालात आणि हय शिक्षण सेवक? सहा-सात हजारात गुंडाळतले.”
“काय करतले. नोकरी खय गावता?”
“चेअरमन भेटलो की नाय? आणि दुसरा ता बायलमाणूस… साळगावकरीन. तेची मैत्रिण ती.”
“असेल… चेअरमन होते आणि त्या बाई पण होत्या.”
“…आणि हेडमास्तर जोंधळो जागो होतो का, झोपलेला?”
“होते ना.”
“एक नंबर चिकट माणूस. पाच रुपये खर्च करुचो नाय. लाखाच्या वर पगार घेता. सगळो पैसो गावात धाडता. तिकडे लातूर काय, उस्मानाबाद तिकडचो आसा तो. तिकडे बंगलो बांधल्यान… शेती घेतल्यान… पण आमच्या दुकानाची उधारी देना नाय. पण तुम्ही कोकिसर्यातून जावन येवन करतालात? खूप लांब पडताला.”
“हय रवाचाच लागताला ओ! क्लास वगैरे पण घेवक हवे, असा चेअरमनांनी सांगितल्यानी.”
“सहा हजार रुपयांत दिवसभर शिकवायचा आणि शनिवारी, रविवारी क्लास घ्यायचे. अरे मेल्यानू, ह्या मास्तरांका 25 हजार पगार तरी देवा! तुम्ही रात्रीच्या पार्टेक आठ-दहा हजार घालवतात… बरा मास्तर, जागा खय बघितलास काय?”
“नाय, ओ. ताच विचारुक ईल्लय…”
“ह्या बघा आमचो मांगर आसा. बंद असता. तुमका जमला तर रवा.”
“पण भाडा?”
“ह्या पगारात भाडा काय देतालात ओ? भाडा नको. फक्त माझो झील आसा आठवीत तेच्या अभ्यासार लक्ष ठेवा.”
“हो. हो. निश्चित. पण पाण्याची सोय वगैरे?”
“विहीर आसा. भरपूर पाणी. मांगरात एक मोरी आसा… विठू, मास्तरांका मांगर उघडून दाखव.”
दुकानदार मिराशीचा नोकर विठू पुढे चालू लागला, तसे मास्तर त्याच्या मागून गेले. पाटणकरांनी मांगर पाहिला. जागा बरी होती. बाहेर एक खोली आत एक. त्याखोलीत मोरी. मांगराला मागचे दार होते. थोड्या अंतरावर विहीर होती. विहीरीवरून बायका पाणी नेत होत्या. म्हणजे बायकोला वनिताला सोबतीण मिळणार. पाटणकरांना जागा बरी वाटली. त्यांनी दुकानदार मिराशींना सांगून टाकले. रविवारी सामान घेऊन येतो.
मिराशी म्हणाले, “भाडा नको. पण लाईट बिल तेवढा भरा.”
पाटणकर घरी जायला निघाले. त्यांचे लक्ष परत त्या छोट्याशा सलूनकडे गेले. आता सलूनमध्ये कुणीतरी दाढी करायला बसला होता. या व्यवसायामुळे आपली भावंडे, आई-वडील दोन घास जेवतात. या सलूनाचा पाटणकरांना आधार वाटला!
रविवारी सकाळी पाटणकरांची बायको वनिता आपल्या दोन वर्षाच्या मुलासह एसटीने आली. त्याच्या आधी पाटणकर येऊन पोहोचले होते. मिराशींच्या दुकानातील झाडूने त्यांनी मांगर स्वच्छ केला आणि सोबत आणलेल्या कळशीने दोन बादली पाणी भरून ठेवले. मिराशींच्या बायकोने चूल पेटवायला म्हणून सोडणे, झावळ्या, थोडी लाकडे दिली. वनिताने सोबत आणलेल्या तांदळाची पेज आणि मिराशींच्या वाट्यावर चटणी वाटली. मिराशींच्या दुभत्या म्हशी होत्या, त्यामुळे दुधाचा प्रश्न मिटला… आणि पाटणकरांचा संसार या नवीन गावात सुरू झाला.
हेही वाचा – बुवा आणि अर्जुन साठे… गुरू-शिष्याचे अतूट नाते!
दुसर्या दिवशी पाटणकर शाळेत हजर झाले. अकरावीसाठी फिजिक्स शिकवायला वर्गात गेले. मुला-मुलींची ओळख करून घेताना त्यांच्या लक्षात आले की, मुलं त्या मानाने मोठी आहेत. बहुतेकजण अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाची होती. चौकशी करताना समजले, हुशार मुलं दुसरीकडे शिकायला गेली आणि ज्या मुलांना पुढे शिकायचं नव्हतं ती मुलं या शाळेत येत होती. पाटणकरांनी फिजिक्समधलं सरफेस टेंशन हा धडा शिकवायला सुरुवात केली. त्यांनी फळ्यावर डायग्राम काढून थोड इंग्रजीत, थोड मराठीत शिकवायला सुरुवात केली. काही वेळानंतर शिकवलेल्या अभ्यासाच्या नोटस् लिहायला घातल्या. सहजच, ते खाली उतरून विद्यार्थ्यांच्या वह्या बघायला गेले तर, त्यांना आश्चर्य वाटले. बहुतेक मुलांनी वहीत काहीही लिहिले नव्हते. मुलांचे म्हणणे त्यांना इंग्रजी लिपी व्यवस्थित येत नाही. त्यांनी एका मुलीला उठविले…
“अगं, मी घातलेले तू का लिहित नाहीस?”
“सर, आमका इंग्रजी येना नाय. मराठी येता. मराठीत अभ्यास घाला.”
“अगं, पण परीक्षा इंग्रजीत असते. सर्व सायन्स इंग्रजीत शिकावे लागते.”
“पण आमका इंग्रजीची भीती वाटता.”
“मग दहावीत पास कसे झालात तुम्ही?”
एक मुलगा मागून ओरडला, “कॉपी करून.”
“म्हणजे?”
“आमचे इंग्रजीचे शिक्षक चाळीस मार्कांचा पेपर सगळ्यांका सांगत. म्हणून आम्ही पास झालो.”
“मग तुम्ही सायन्सला का अॅडमिशन घेतलीत?”
“आमका पुढे नर्सिंग करूचा आसा… बारावी सायन्स झालव की नर्सिंगमध्ये अॅडमिशन गावतली.”
“मग बारावी पास व्हायला लागेल ना?”
“दहावी पास झालव, तसे बारावी पास होतोलव.”
पाटणकरांनी डोक्याला हात लावला. लेक्चर संपल्यानंतर त्यांना केमिस्ट्री शिकवणारे सावंत सर भेटले. सावंत सर, गेली दहा वर्षे म्हणजे सुरुवातीपासून येथे केमिस्ट्री शिकवत होते.
“सावंत सर, मी आता अकरावीवर फिजिक्स शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मुलांना साधं एबीसीडी येत नाही. त्यामुळे मी नोट्स घालत होतो, ती कोणी लिहून पण घेतली नाहीत.”
“त्यात नवीन ते काय? मी गेली दहा वर्षे इथे शिकवतोय. अशीच मुले आहेत या ठिकाणी.”
“मग, ती बारावी पास कशी होणार?”
“नाही होईनात. आपल्याला पगार मिळण्याशी मतलब. मी परमनंट शिक्षक आहे. माझं कोणी काही करू शकत नाही आणि मॅनेजमेंटने जास्त गडबड केली तर, आमची युनियन आहे. मी घाबरत नाही कोणाला. तुझं काय ते बघ कारण तू शिक्षण सेवक…’
“होय ना, सावंत सर. मी शिक्षण सेवक आहे. मला मॅनेजमेंट विचारत राहणार.”
“हे बघ पाटणकर, तुला इथे टिकायचे असेल तर सांगतो, तू शिकवण्याचे काम कर, प्रॅक्टिकल्स घे… सर्व चाचणी परीक्षेत मुलांना पास कर… अकरावीत सर्वांना पास कर, कारण ते तुझ्या हातात आहे. बारावीत बघू, त्यांच्या काय नशिबात असेल ते. दोन वर्षांनी दुसरीकडे नोकरी बघ.”
पाटणकर गप्प झाले. शांतपणे फिजिक्स शिकवू लागले. प्रॅक्टिकल्स घेऊ लागले. चाचणी परीक्षेत मुलांना पास करू लागले…
क्रमश:
मोबाइल – 9307521152 / 9422381299


