भाग – 11
सर्व टीम गावात पोहचली होती. गावकरीही त्यांची आतुरतेने वाट बघत होते… आजच्या अनुभवानंतर कार्याच्या घडामोडींना वेग आला होता. डॉक्टर देवदत्त यांनी फॉरेन्सिक टीमशी संपर्क साधून मानवी देहाच्या अवशेषांबद्दल माहिती दिली… आता ती टीमही उद्याच चंदन नगरमध्ये दाखल होणार होती…
जमिनीखाली काम करताना उजेडाची आवश्यकता होती. त्यामुळे गावकऱ्यांनी जनरेटरची सोय करून दिली… आजच्या अनुभवानंतर सगळ्यांचाच उत्साह दुणावला होता, त्यामुळे अजून काही लोकांची टीममध्ये भर पडली… डॉक्टर आणि विश्वासरावांनी पुरातत्व खात्याकडून अजून काही कुमक मिळेल का? यावर विचारविनिमय केला… पण तूर्तास ही सर्व माहिती मीडियासमोर येऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. पुढे काय होईल, याचा नक्की अंदाज येणं कठीण आहे, असं दोघांचं मत पडलं.
एकीकडे मोठ्यांची चर्चा सुरू होती तर, दुसरीकडे मुलांची… श्लोक आणि शौनक दोघेही शाल्मलीचे आभार मानत होते… ‘त्यादिवशी तू वाचवले नसते तर आज आम्हीही कदाचित जिवंत नसतो…’
“हे बघा झालं ते झालं, पण यापुढे मात्र जास्त सतर्क राहावं लागणार आहे. श्लोक उद्या समोर कितीही संपत्ती दिसली तरी, तिच्याकडे ओढले न जाता कामावरच लक्ष केंद्रित करावं लागेल. आपण डॉक्टर देवदत्त यांना तसं वचन दिलंय आणि ते पाळणं आपलं कर्तव्य आहे… मला तर त्या मूर्ती शोधायच्या आहेत… नक्कीच त्यांचं काहीतरी कनेक्शन आहे…” शाल्मलीचे या कार्यातील समरसत्व पाहून दोघेही अचंबित झाले होते.
सगळे झपटल्यागत कामाला लागले होते… पहाट होताच सगळेच वाळवंटाच्या दिशेने निघाले… खाली भुयारात उतरून कालच्या ज्या ठिकाणावरून परतले होते, त्या ठिकाणापुढे जात असता बागसदृश्य जागा त्यांना दिसली… त्या जागेत जाताच शाल्मलीला कसलीशी जाणीव होऊ लागली… “इथे काहीतरी असावं. सर, मला काही वेगळं जाणवतंय इथे…” ती म्हणाली.
‘शौनक, शाल्मली सोबत राहा अन् जरा तिला मदत कर…” डॉक्टरांनी शौनकला सांगितलं.
थोडं पुढे जाताच एक मूर्ती दिसली, जी जमिनीवर आडवी पडली होती… इतर माणसांच्या मदतीने ती नीट उभी केली, तेव्हा शाल्मलीला तिची ओळख पटली… त्या चार मूर्तींपैकी ही एक मूर्ती असल्याचं तिने डॉक्टरांना सांगितलं. तेवढ्यात दोघातिघांनी येऊन सांगितलं की, अशाप्रकारे दिसणाऱ्या अजून दोन मूर्ती तिथे आढळल्या आहेत… त्या मूर्तींची खात्री करण्याकरिता ते पुढे गेले… शाल्मली पाहते तो, खरंच त्या मूर्तीही तिच्या स्वप्नात दिसणाऱ्या मूर्तींपैकी होत्या!
शाल्मली डॉक्टरांना म्हणाली, “सर, चार मूर्तींपैकी 3 मूर्ती तर मिळाल्या आहेत, चौथी शोधायला हवी… तीही नक्कीच जवळपास असेल… पण सर यापाठी काही रहस्य असेल ते आपल्याला कस कळणार?”
“हे बघ शाल्मली, तीन मूर्ती मिळाल्या आहेत म्हणजे चौथी सुद्धा असणारच, आधी ती शोधू… आपण आत्तापर्यंत काहीच माहीत नसताना सुद्धा इथवर आलोय, मग विश्वास ठेव पुढचा मार्गही आपल्याला असाच सापडेल… शाल्मली, आपल्याला पुढे जायला हवं…” डॉक्टरांनी कमी शब्दांत सर्वांना धीर दिला आणि पुढे निघण्याविषयी सुचवलं. ते पुढे झाले आणि त्यांचा पाय घसरला…
“सर…” म्हणत शाल्मलीने पटकन त्यांना हात दिला, अन् शौनकने त्यांना सावरलं…
“अरे, पायाखाली काहीतरी आलं त्यावरूनच पाय घसरला माझा…” डॉक्टर बोलत होते. त्यांनी अन् श्लोकने प्रकाशाचा झोत खाली टाकला… थोडी माती झटकून टाकली… तर ते एक ताम्रपत्र होतं, त्यावर काही कोरलेलं असल्याचं दिसलं… डॉक्टरांनी ते आपल्या पाठीवरच्या सॅकमध्ये टाकलं आणि ते पुढे जाऊ लागले…
जाताना पुढ्यात पायऱ्या उतराव्या लागणार होत्या असं दिसून आलं. सगळेच एकमेकांच्या सोबतीने हळूहळू एक एक करत पायऱ्या उतरून खाली गेले…
तो एक प्रचंड मोठा हॉल होता… प्रकाशाचा एक झोत सभोवार टाकला… एक अस्वस्थ करणाऱ्या लहरी तिथे जाणवत होत्या. डॉक्टरांनी सगळ्यांना इथेच थांबा म्हणून सुचवलं… “तुम्ही सोबत येण्यापेक्षा इथूनच आमच्याकरिता उजेड द्या,” असं त्यांनी सांगितलं…
डॉक्टर, शाल्मली आणि शौनक पुढे निघाले… लांबवर प्रकाश टाकला असता नखशिखान्त अलंकारीत असलेल्या एक स्त्रीची मूर्ती दृष्टीस पडली… अत्यंत सुबक कारागिरीचा उत्तम नमुना होता… डॉक्टरांनी शाल्मलीकडे पाहिलं, तिचे श्वास जलदगतीने सुरू होते, डोळ्यांत राग, द्वेष सगळंच उफाळून आल होतं… तेवढ्यात शौनक म्हणाला, “डॉक्टर अशीच हुबेहूब स्त्री त्यादिवशी पहिली होती…” तोही अचंबित झाला होता. डॉक्टर समजून गेले, ती मूर्ती अहंकाराची होती… एका जिवंत स्त्रीचं मूर्तिमंत रूप होतं, पण पाषाण झालेलं…!
डॉक्टरांनी काही फोटो घेतले आजूबाजूचे आणि हाताच्या घड्याळावर नजर टाकली. “आज इतकंच ठीक… अजून पुढे जायचं म्हटलं तर पुन्हा उशीर नको…” डॉक्टरांनी सर्वांना परतायला लावलं… सगळे बाहेर पडलेत याची पुनश्च खात्री त्यांनी करून घेतली.
सगळे वाड्यावर परतले फ्रेश होऊन डॉक्टर आपल्या नोंदी करू लागले. ती त्यांची सवयच होती… इतक्यात त्यांना त्या ताम्रपत्राची आठवण झाली… त्यांनी सॅकमधून ते ताम्रपत्र काढून नीट न्याहाळले… काळजीपूर्वक त्यांनी ते संपूर्ण स्वच्छ केले… त्यावर जे काही कोरले होते ते त्यांनी शांतपणे वाचायचा प्रयत्न केला. एक एक करत त्यावरील शब्दांचा अर्थ कळू लागला होता. डॉक्टरांनी शाल्मलीला जवळ बोलावलं… त्यांनी तिला स्वप्नात जे पाहिलं होतं त्याची पुन्हा उजळणी करायला सांगितलं… विशेषकरून त्या विशिष्ट खोलीबाबत… तिच्या सांगण्याप्रमाणे ती खोली निश्चितच संघमित्राची असावी, यात शंकाच नव्हती आणि त्या तसबिरीखाली रेशमी वस्त्रात जे काही गुंडाळलेलं दिसत होतं, ते नक्कीच अहंकाराच्या मृत्यू वा नाशासंबंधित असणार यात दुमत नव्हतं… डॉक्टरांसमोर आता चित्र स्पष्ट होत होतं…
डॉक्टरांना इतक्या विचारात गढलेलं पाहून विश्वासराव, शौनक आणि श्लोक त्यांच्याजवळ आले. देवदत्त यांना नक्कीच काहीतरी महत्त्वपूर्ण हाती लागलं असावं, हे विश्वासरावांना कळून चुकलं.
हेही वाचा – सुजलाम सुफलाम चंदन नगरचं वाळवंट कसं झालं?
“विश्वास आणि मुलांनो उद्याचा दिवस आपल्याला भुयारात बाकी काही शोधण्यात वेळ न घालवता संघमित्राची खोली शोधण्यात पहिला वेळ घालवावा लागेल. संपूर्ण प्रवासात ती खोलीच आपल्याला मुख्य मार्गापर्यंत घेऊन जाईल, असं मला वाटतंय. आपल्या हातात केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण मोहिमेची सुरुवात आणि कारण फक्त मोजक्या माणसांना माहीत आहे म्हणून आपण सर्व उद्या फक्त ती खोली शोधायची, एवढंच काम करणं गरजेचं आहे…” डॉक्टर बोलले.
“डॉक्टर हे ताम्रपत्र?” विश्वासरावांनी विचारलं.
“विश्वास, हे ताम्रपत्र राजा राजवर्धनचे आचार्य विष्णू वामन यांचं आहे… यानुसार महाराणी संघमित्रा यांनी अहंकाराला शाप दिला, ज्या योगे ती एका दगडी मूर्तीत रूपांतरित झाली… मात्र पौर्णिमेच्या दिवशी ती पुन्हा मानवी रुपात येऊ शकते आणि त्यावेळेस तिच्यातील अमानवीय शक्तीचं दर्शन घडतं. तिच्या समूळ नाशाची भविष्यवाणीही लिहून ठेवली आहे… मात्र ती योग्य त्याच व्यक्तीच्या हाती लागेल… त्या व्यक्तीला स्वप्न दृष्टांताने ते स्थान आणि ती भविष्यवाणी कुठे आहे ते कळू शकेल…”
“शौनक, श्लोक जरा मि. उमेश आणि पाटीला यांना बोलावून आणता का?” डॉक्टर म्हणाले.
ते गेलेले पाहून डॉक्टर शाल्मलीला म्हणाले… “मी मुद्दाम त्या दोघांना बाजूला पाठवले, कारण स्वप्न दृष्टांताने, ती भविष्यवाणी नेमकी कुठे आहे, हे तुला दिसलंय अन् ते तू आम्हा दोघांनाही सांगितलं आहेस. पण अजून कोणाच्या कानापर्यंत हे पोहोचून याची वाच्यता व्हायला नको. आचार्य विष्णू वामन यांच्यानुसार तूच ती योग्य व्यक्ती आहेस… तू मनापासून महाराणी संघमित्रांना शरण जा… त्याच तुला पुढील कार्याबाबत सूचना देतील आणि सहाय्यभूत होतील…”
तितक्यात मि. उमेश आणि पाटील हे शौनक आणि श्लोकसह येऊन पोहचलेच…
“तुम्ही बोलवलत डॉक्टर?” मि. उमेश यांनी विचारलं.
“हो… भुयारात शोध करायला उद्याचा दिवस हातात आहे. परवा पौर्णिमा आहे, त्यादिवशी तरी काही करता येणं कदाचित शक्य होईल न होईल… उगाच कोणाच्या जीवाशी खेळ नको म्हणून चिंता वाटतेय… गावकऱ्यांनाही आराम करायचा असल्यास करू द्या…” डॉक्टर देवदत्त म्हणाले.
“पुरातत्व खात्याकडून काही माणसं येणार होती… पौर्णिमेनंतरच त्यांना आता तिथे नेऊ… म्हणजे तिथे उत्खनन करणं सुरू करता येईल… त्या भागात गावकऱ्यांची काहीच मदत शक्य होणार नाही…” डॉक्टरांनी सांगितलं.
आत्तापर्यंत खाली भुयारात काय आणि कसं दिसतंय, याची पुन्हा उजळणी केली… पाहण्यासारखं बरंच काही होतं, पण तूर्तास तरी त्या रहास्यापासून मुक्ती जास्त महत्त्वाची होती.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे शाल्मलीने त्या खोलीवर अन् त्या रेशमी वस्त्रात असलेल्या त्या दुव्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं. त्या खोलीचं अस्तित्व कुठे अन् कसं होतं? त्याच्या आजूबाजूच्या खुणा लक्षात आणायचा तिने आटोकाट प्रयत्न केला. पण तिने त्या खोलीपर्यंत जाण्यापेक्षा त्या खोलीनेच तिला ओढून नेलं होतं… आजूबाजूचं अस्तित्व जणू लोप पावलं होतं… बैचेन झालं होतं तिचं मन… ‘खरंच मला ते रहस्य मिळू शकेल? खरंच माझ्या मदतीने लोकांचा त्रास कमी होईल? खरंच महाराणी संघमित्रा मला मदत करतील? मी तर एक सामान्य मुलगी आहे. स्वतःच्या आयुष्यातही मी सामान्यच आहे. विशेष कर्तृत्व असं काही गाजवलंच नाही मी… आणि आता प्रथमच मला काही करायची संधी चालून आलीय, पण त्या दिवशी जे काही पाहिलं ते नीट दिसूही नये, अशी वेळ आलीय. डॉक्टरांना माझ्याकडून खूपच अपेक्षा आहेत. मी पूर्ण करेन की नाही, याची मलाच खात्री वाटत नाहीये…’ शाल्मली नाराज झाली होती स्वतःवरच…
“थांब शाल्मली…” अचानक आलेल्या आवाजाने शाल्मली आपल्या तंद्रीतून बाहेर आली. समोर पाहतोय तर… तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता! महाराणी संघमित्रा तिच्यासमोर उभ्या होत्या आणि तिच्याकडे पाहून हसत होत्या…
हेही वाचा – शाल्मलीला स्वप्नातला तो राजवाडा समोर दिसला अन्…
“अगं, किती विचारात पळशील जरा थांब… दम खा… त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर प्रेमळ भावही दिसून येत होते… तू घाबरू नकोस, प्रत्येक क्षण मी तुझ्यासोबत आहे… एका योग्यवेळी जी ती गोष्ट घडणं क्रमप्राप्त असतं… ते रहस्य फक्त अन् फक्त तुझ्याच हाती लागणार आहे, अन्य कोणाला ते मिळणारही नाही… तुझ्याकरवी डॉक्टर देवदत्तला ते समजेल आणि तो तुला त्याकरिता मार्गदर्शनही करेल… फक्त तू तुझा विश्वास कायम राख… अगदी योग्यवेळी मी तुला सहाय्यभूत होईन… अगं तूच काय मी ही तळमळतेय हजारो वर्षे या दृष्ट स्त्रीच्या नाशाकरिता… खूप वाट पाहिली आहे मी तुझी… नको घाई करूस अन् नको भांबावून जाऊस… मला माहीत आहे, माझ्याबाबतही तुला अनेक प्रश्न असतीलच… मी त्या सर्वांची उत्तरं नक्कीच देणार आणि हे रहस्य तूच जगासमोर आणणार माझ्यावर विश्वास असू दे… आता राहिला प्रश्न माझ्या खोलीचा तर एक लक्षात ठेव अहंकारा माझ्यासमोर कधीही येत नाही…” असं बोलून महाराणी संघमित्रा लुप्त झाल्या.
‘हे काय महाराणी संघमित्राही माझी परीक्षा घेत आहेत तर! त्यांनी अर्धवटच मार्ग दाखविला… काही हरकत नाही… मी स्वतः उत्तर शोधेन…’ शाल्मलीने खूणगाठ बांधली…
क्रमशः


