Saturday, August 30, 2025

banner 468x60

Homeअध्यात्मभगवान नरसिंहाना शांत करणारा, ‘शरभ’ अवतार…

भगवान नरसिंहाना शांत करणारा, ‘शरभ’ अवतार…

वेद बर्वे

अलीकडेच प्रदर्शित झालेला, ‘महावतार नरसिंह’ (Mahavatar Narsimha) हा चित्रपट, सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतो आहे. भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराची गोष्ट तर आपल्याला ज्ञात आहेच, मात्र बहुतांश जणांना या गोष्टीशी जोडलेल्या ‘शरभ’ अवताराविषयी फारशी कल्पना नसावी. हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी भगवान श्रीविष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि भक्त प्रल्हादाची सहाय्यता घेतली, पण मग यामध्ये ‘शरभ’ अवताराची नेमकी काय भूमिका होती… नक्की कुणी आणि का हा अवतार घेतला, जाणून घेऊया या लेखातून.

नरसिंह अवतार म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार, जो त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी घेतला होता. भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजे अर्धा मानव आणि अर्धा सिंह असे  रूप धारण करून, हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध केला. मात्र, हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर, अत्यंत क्रोधित आणि रौद्र रुपातील नरसिंह काही केल्या शांत होत नव्हते. आपण ऐकलेल्या पौराणिक कथांनुसार, काही देवतांनी नरसिंहाना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश येत नव्हते, त्यामुळे सर्वांनी त्यांच्या परम भक्ताला अर्थात प्रल्हादला विनंती केली.  प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता आणि त्याच्या संरक्षणासाठीच प्रभू नरसिंह प्रकट झाले होते. त्यामुळे प्रल्हादाने विनंती केल्यावर अखेर नरसिंह भगवान शांत झाले.

मात्र काही पौराणिक संदर्भानुसार, नरसिंहांचा महाभयंकर क्रोध शांत करण्यासाठी, भगवान शंकरांना ‘शरभ’ अवतार घ्यावा लागला होता. भगवान शिवांनी घेतलेला हा ‘शरभ’ अवतार हा सिंह आणि पक्ष्याचे (काही पौराणिक कथांनुसार- सिंह, पक्षी आणि मानवाचे) संयुक्त रूप होते. या अवताराविषयी फारशा प्रचलित कथा नाहीत, मात्र शिव पुराण, लिंग पुराण, शरभोपनिषद यासारख्या काही पुराण ग्रंथांमध्ये या अवताराचा उल्लेख आढळतो. विशेषत:, शैव परंपरेमध्ये, ‘शरभ’ अवताराचे वर्णन भगवान शिवांच्या पराक्रमाचे एक अत्युच्च उदाहरण म्हणून केले जाते.

हेही वाचा – Relation : ‘मेल इगो’… नातं बाप आणि मुलाचं

वैष्णव परंपरेनुसार, भगवान नरसिंहांना शांत करण्यासाठी, भक्त प्रल्हादाची निस्सिम भक्ती कामी आली… मात्र, शैव परंपरेनुसार प्रभू नरसिंहाचे रूप इतके उग्र होते की, ते शांत करण्यासाठी, शंकर भगवानांना ‘शरभ’ अवतार धारण करावा लागला. हा फरक पुराणांतील वैविध्यपूर्ण परंपरांचा भाग आहे.

पौराणिक ग्रंथांमध्ये, ‘शरभ’ अवताराचे वर्णन : अहंकाराचा संहार करणारा, रौद्रतेचा परिपाक, शक्ति आणि विवेकाचा संगम तसेच ब्रह्मांडात समतोल राखणारा, असे केले आहे.

शिव पुराणात (शट रुद्र संहिता) म्हटले आहे की – भगवान नरसिंहांच्या अनियंत्रित क्रोधामुळे सृष्टीचा नाश होण्याच्या धोका बळावला होता. त्यांना शांत करणे कुणालाच शक्य होत नव्हते. त्यामुळे देवतांनी भगवान शंकरांकडे धाव घेतली, त्यांची प्रार्थना केली. भगवान शंकरांनी सर्वप्रथम वीरभद्रांना नरसिंहांचा क्रोध शांत करण्यासाठी तिथे पाठवले; पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे अखेर शिव शंभूनीच ‘शरभ’ अवतार घेतला, जो नरसिंहांना शांत करण्यासाठी  सक्षम होता.

दुसरीकडे, भारतकोशमधील संदर्भानुसार, शिवपुराणात ‘शरभ’ अवताराचे वर्णन : शरीराचा अर्धा भाग सिंह, दोन पंख, चोच, सहस्रभुजा, जटा, चंद्राने सुशोभित मस्तक, तीक्ष्ण दात आणि नखे, असे केले आहे…. ज्याने नरसिंहांवर विजय मिळवला.

तर शरभ उपनिषदानुसार, शरभ आणि नरसिंह या दोन ‘महावतारां’मध्ये युद्ध झाले, ज्यामध्ये शरभ अवताराचा अखेर विजय झाला. शरभ उपनिषदातील (अथर्ववेद संलग्न उपनिषद) एका श्लोकात, भगवान शंकरांनी घेतलेल्या या अवताराचे वर्णन अशाप्रकारे केले आहे”

स एकः श्रेष्ठश्च सर्वशास्ता स एव वरिष्ठश्च |
यो घोरं वेषमास्थाय शरभाख्यं महेश्वरः |
नृसिंहं लोकहन्तारं संजघान महाबलः ||

अर्थात – त्या सर्वश्रेष्ठ शिव शंकरांनी, जे सर्वांचे अधिपती आहेत, सर्व विद्या आणि शास्त्रांचे ज्ञाता आहेत, जे अत्युच्च आणि आद्य आहेत, त्याच महेश्वराने, भयंकर ‘शरभ’ अवतार धारण करत, लोकसंहारक आणि बलशाली अशा नरसिंहाचा पराभव केला.

शिव महापुराण – शट रुद्र संहितेतील – अध्याय 11–12 मध्ये एक विस्तृत दृश्य आहे, ज्यात शरभ, संपूर्ण आकाश व्यापणाऱ्या एखाद्या महाकाय पक्षी आणि सिंह यांच्या एकत्रित रुपासारखा दिसतो, ज्याने नरसिंहाला त्याच्या नखांनी धरले आहे आणि जखमी अवस्थेतील नरसिंह त्यांच्याकडे आपल्या सुटकेची प्रार्थना करत आहेत. (संदर्भ – Exotic India Art.)

हेही वाचा – Memories : पत्र आणि पत्रपेटी… राहिल्या त्या आठवणी

एस्ट्रोवेद / हिंदू डिव्होशनल ब्लॉगमध्ये वर्णन आहे की, शरभाने अत्यंत उग्र रूप धारण करून नरसिंहाचा क्रोध शांत केला आणि नरसिंहाने शरभाला शरण जात त्यांचे गुणगान केले आणि शिवदर्शनामुळे अखेर ते शांत झाले (संदर्भ – AstroVedhindudevotionalblog.com.)

तर, स्कंद पुराणामध्ये अशी कथा आहे की: नरसिंहांनी युद्धादरम्यान, शरभावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा ते थकले, तेव्हा हार मानून त्यांनी भगवान शिवाला वंदन केले आणि त्यांच्या आशीर्वादाने ते आपल्या मूळ रूपात परतले. (संदर्भ – Hinduism Facts.)

कलिका पुराणातही शरभ अवताराच उल्लेख आढळतो. कालिका पुराणानुसार शरभाने नरसिंह आणि वराह (संभवतः पर्वारी रूप) अवतारांवर नियंत्रण मिळवले होते. (संदर्भ – Hinduism Facts.) मात्र याउलट, वैष्णव परंपरेतील वर्णनानुसार, शरभ आणि नरसिंहांच्या युद्धात, नरसिंह विजयी ठरले.

वामन पुराण, कूर्म पुराण, अग्नि पुराणात वर्णन केले आहे की, शरभाने नरसिंहावर आक्रमण केल्यावर, नरसिंहांनी “गंडभेरुंड” नावाचे अत्यंत भयंकर रूप धारण केले. गंडभेरुंड हे दोन डोके असलेले, विशाल, उडणारे पक्षीरूप होते, जे भगवान विष्णूंचेच एक शक्तिशाली रूप मानले जाते. गंडभेरुंडाने शरभावर आक्रमण करून त्याचा पराभव केला. काही ठिकाणी नरसिंहानी शरभाचा वध केल्याचा उल्लेख आहे.

अन्य एका पौराणिक कथेनुसार, शरभ अवतार आणि नरसिंहांमध्ये झालेल्या तुल्यबळ युद्धात, नरसिंग शरभ अवतारावर हावी झाले होते, त्यामुळे भगवान शंकरांनी त्यांना आपल्या मूळ शिव रुपाचे दर्शन दिले, जे पाहताच नरसिहांचा क्रोध शांत झाला आणि ते शिव-शकरांना शरण गेले.

अर्थात, जितक्या मान्यता, जितक्या धारणा, तितक्याच वेगवेगळा कथा आणि वैविध्यपूर्ण संदर्भ आपल्याला आढळून येतात.

कथेचे स्वरुप किंवा त्याचा संदर्भ कुठलीही असला, तरी अखेर असत्यावर – सत्याचा, अंहकारावर – विनयाचा, क्रोधावर – संयमाचा आणि दुष्ट प्रवृत्तींवर – सद्गुणाचा विजय होणे महत्त्वाचे ठरते.

वाचक मित्रहो, तुम्हाला ही आगळी-वेगळी माहिती कशी वाटली याविषयी तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा, आणि अशाप्रकारचे आणखी पौराणिक लेख तुम्हाला वाचायला आवडतील का, हे कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!