प्रणाली वैद्य
भाग – 4
शौनकच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पाटील झोपायला निघून गेले… मुलांनी तर मस्त कॅम्प फायर सुरू केलं… गाणी काय, डान्स काय, जोक काय मस्त धुडगूस चालला होता… गप्पांना तर ऊत आला होता…!
इतक्यात कोणीतरी सकाळचा विषय छेडला आणि वातावरण एकदम पालटलं… पार्टी, पिकनिक मूडमध्ये असलेली मंडळी एकदम शांत झाली. मुलींमधून कोणी तरी ओरडलेच नको ना आता तो विषय! पण विषय संपला कुठे होता… भविष्य काय असेल कोणालाच ठाऊक नव्हते…
आता किती प्रयत्न केले तरी,, वातावरण पहिल्यासारखे होत नव्हते… एक विचित्रसा दबदबा निर्माण झाला होता… कोणी विषय काढला? सगळे एकमेकांकडे पहायला लागले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह सारखेच होते…
“कसले रे घाबरता तुम्ही? असे डोक्यात काहीही विषय आले की, तसे भास व्हायला लागतात…” श्लोक म्हणाला.
“म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? सकाळी जो अनुभव आला तोही एक भास होता का?” सचिनने विचारलं.
“म्हंटल तर हो, नाहीतर निव्वळ योगायोग असेल…,” श्लोक म्हणाला.
“श्लोक तू नीट सांगू शकशील, तुला काय म्हणायचं आहे ते?” महेशने जरा गुश्शातच विचारले.
“हे पहा मित्रांनो, मला जेव्हा या गावाबद्दल समजले होते… मी याची माहिती मिळवत गेलो… कुठेच काही विचित्र दिसत नव्हतं… मनात विचार आला आपण ट्रेकच्या नावाने इथे येऊन इथला अभ्यास करू… उगाच ज्या काही अफवा आहेत, त्यांचं आपण निराकरण करू…”
हेही वाचा – पाटलासह ज्येष्ठ गावकऱ्यांनी केलं सावध…
थोडासा थांबून श्लोक म्हणाला, “आता सकाळी जो अनुभव आला त्यातही मला वाटतं… सगळ्यांच्या मनात आधीच भीती असावी म्हणून तसे घडले असेल किंवा निव्वळ योगायोग असू शकतो भूकंप होण्याचा! …आणि तसंही वाळू ही नेहमीच सरकत असतेच… मग त्यावर इतकं घाबरायचं काहीच कारण नाही, असं मला वाटतं…” श्लोक म्हणाला.
श्लोकचं बोलणं ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले. श्लोकचा अंदाज खरा असू शकतो… आपण उगीच घाबरतोय, असं ज्याला-त्याला वाटू लागलं आणि मग मात्र वातावरण बदलू लागलं… मुलांची भीड आता चेपली… या बदलाचा शौनक आणि शाल्मली शांततेने अभ्यास करत होते…
रात्र चढू लागली आणि हवेत गारवा अजून वाढला… हवेत गारव्यासरशी एक मंद सुगंध दरवळू लागला… त्या सुगंधानं जणू प्रत्येकावर आपलं गारुड करायला सुरुवात केली… अन् एक एक करत बरेच जण झोपी गेले… शाल्मली जागीच होती म्हणून शौनकही जागाच होता…
मात्र श्लोकच्या हालचाली काही वेगळ्याच भासत होत्या… शाल्मलीही त्याला सतत न्याहाळत होती अन् एका क्षणी तो तडक दरवाजाच्या दिशेने चालू लागला… संमोहित झाला होता तो जणू…!
त्याने दरवाजा उघडला आणि जागीच थिजला… घामाने पूर्ण भिजला होता… इतक्या गारव्यात असा घाम… असं समोर काही पाहिलं होतं त्याने…! पाय उचलून तो दरवाजा ओलांडणार तोच त्याचा डावा हात कोणी तरी गच्च धरला आणि त्याला पाठी खेचलं…
हिसका इतका जोरात बसला की, तो वाड्याच्या आत जोरात पडला… आवाज झाला तसा शौनक जो पेंगुळाला होता, तो दचकून जागा झाला. श्लोक असा जमिनीवर पडलेला… घामाने निथळत असणारा… आणि दरवाजात शाल्मली उभी… जी नजर रोखून बाहेर पाहात होती… जणू समोर जे कोण होतं त्याच्या नजरेला नजर देत होती… त्या नजरेत राग दिसत होता!
“शाल्मलीss,” शौनकने जोरात हाक दिली… पण ती तिला ऐकूच गेली नाही…
हेही वाचा – वाळवंटातले हादरे…
शौनक तिच्याजवळ गेला… ती स्थिर निश्चल उभी होती! ती जिथे पाहतेय तिथे त्याने पाहिलं तर… त्याच्या तोंडाचा ‘आ’ वासला गेला… आणि नकळत तोही त्या दिशेने ओढला जाऊ लागला… पण शाल्मलीने मधे हात घालत त्याला अटकाव केला… तिच्या हाताचा स्पर्श होताच तोही वाड्यात जवळ जवळ फेकलाच गेला….
शाल्मलीत इतकी ताकद… तो तर हैराण झाला. एरवी नाजूक भासणारी ती, आज अचानक ही ताकद तिच्यात आली कुठून? तो हैराण होऊन तिच्याकडे पeहात होता….
“अजून भूक क्षमली नाही तुझी? अजून किती वर्षे अशीच लोकांना त्रास देत राहणार तू? बस कर आता…,” शाल्मली रागातच बोलत होती…
शौनकने हळूच जाऊन दरवाजा लावला… तशी शाल्मली बेशुद्ध होऊन खाली पडली. तिला उचलून आणून तिच्या जागेवर झोपवलं… श्लोक अजून थरथरत होता, त्याला ताप भरू लागला होता… फर्स्ट-एड बॉक्समधील पॅरासिटेमॉल श्लोकला देऊन त्याच्या अंगावर पांघरूण घालून त्याला झोपवलं…
सचिनला उठवून त्याला श्लोकवर लक्ष ठेवायला सांगितलं आणि तो शाल्मलीजवळ जाऊन बसला… तिच्या चेहऱ्यावरून तो हात फिरवू लागला… तिला असं निपचित पडलेलं पाहून त्याचा जीव वर-खाली होत होता… कुठून आपल्याला इथे येण्याची दुर्बुद्धी सुचली, माझ्यामुळेच तुझी ही हालत झाली… तिच्या या अवस्थेकरिता तो स्वतःलाच दोष देत होता… शाल्मली शांत झोपली होती…
दिवस उजाडायला अजूनही तीन तास शिल्लक होते… कसेबसे तळमळत त्याने हे तीन तास काढले… पहाट होताच त्याने सर्वांना एकत्र केले आणि आपापली आवराआवरी करून घेण्याच्या सूचना केल्या…
पाटीलही उठून आले होते… रात्रीचा घडला प्रकार त्याने पाटलांच्या कानावर घातला. पाटील आणि इतर मुलं हा प्रकार ऐकून धास्तावले होते… पाटलांच्या स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात असा काही प्रकार त्यांच्या ऐकिवात नव्हता, ना कोणी अनुभवला होता… त्यामुळे त्यांना त्या पाठची पार्श्वभूमीही ठाऊक नव्हती…!
पाटलांच्या नोकरामार्फत गावात रात्री काहीबाही घडल्याचं समजलं होतं. त्यामुळे एक एक करत गावकरी वाड्यावर जमू लागले. आता मात्र वाड्यावर गप्पांना ऊत आला… पण काही जणांच्या मते पौर्णिमेला ठराविक वेळानंतर रात्री हवेत एक सुगंध जाणवतो… पण तो नक्की कुठून, कसा येतो हे कुणालाच काहीच माहीत नव्हतं…
शौनकने मात्र गावातील काही वयोवृद्ध व्यक्ती आणि पाटलांशी एकांतात बोलण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि त्यांनीही त्याला मान्यता दिली…
क्रमशः