ॲड. कृष्णा पाटील
एखाद्या माणसानं हेकेखोर म्हणजे किती हेकेखोर असावं? त्याला काही मर्यादा? आपण कुठला हेका धरतोय… हिशोब कसला करतोय… कुणाबरोबर काय बोलतोय… याचे काही भान? चुकीचं गणित मांडण्याने काय होईल याचा विचार? यापैकी कशाचेही भान न ठेवता बेजबाबदार, एककल्ली वागणारी कितीतरी शहाणीसुरती माणसे आपल्याला दिसतात. आता विलास गंडे सरांचंच उदाहरण घ्या.
गंडे सर ‘डायनॅमिक’ या इंग्रजी हायस्कूलवर शिक्षक आहेत. पाच अंकी म्हणजे लाखाच्या वर पगार आहे. त्यांची पत्नी समिधा प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. तिलाही कमी-जास्त तेवढाच पगार आहे. दोन्ही मुले एमबीए शिकताहेत. खाऊनपिऊन सुखी परिवार आहे. पण म्हणतात काही जण कुऱ्हाड पाहून त्यावर पाय मारतात, त्यापैकीच एक गंडे सर!
गंडे सरांच्या गावाकडे जाणारा रस्ता नुसता कच्चा, मुरमाड नाही तर वळणा-वळणाचा आहे. दहा-बारा मैलांचे अंतर… परंतु तेवढ्यासाठी तासभर लागतो. त्यात भरीत भर म्हणजे बारीक चिरचिर पाऊस. बारक्या पोराच्या नाकातून शेंबूड गळावा तसा नुकताच टिपकत आहे. दोन-तीन प्लास्टिकच्या पिशव्यांच्या आत पैशांचं बंडल गुंडाळून त्या पिशव्यांचं पुडकं नंदूने प्लास्टिकच्या पावसाळी कोटाच्या आत ठेवलेलं आहे. गाडीवर बसताना आई म्हणाली होती, “हळूहळू जा. संगतीला कोणतरी दोस्त घे. पैसे नीट सांभाळून ठेव. इथून निघाला की, वाटेत कुठे थांबू नको. लघवी लागली तरी पण थेट आक्काच्या घरी जा.” त्यामुळे नंदू कुठेही न थांबता भुरभूर पावसात भिजत भिजत गाडी चालवत आहे.
“एवढ्या पावसात जायाची काय गरज आहे का? पैसे कुठे पळून जातात का, दाजी कुठे पळून जाणारायत? तुझं आणि तुझ्या आईचं काहीतरीच असतंय बाबा.” गाडीवर नंदूच्या पाठीमागे बसलेला दत्ता म्हणाला.
“आमचा दाजी म्हणजे काय आसामी आहे ते तुला नाही कळायचं दत्ता. अडचण म्हणून आम्ही त्यांच्याकडून उसनवार पैसे घेतले होते. पण दोन दिवसाआड फोन येतोय. सारखी घाई लावलीय. म्हणून जोडणा झाल्या झाल्या आई म्हणाली, पटकन पहिल्यांदा त्यांचे पैसे परत देऊन ये जा.”
हेही वाचा – Land deal : गावातल्या जमिनीसाठी…
अंगणात गाडीचा आवाज ऐकून आक्काने दार उघडले. पाठीमागे बसलेला दत्ता गाडीवरून उतरला. नंदूने गाडी स्टॅंडला लावली. दोघे येऊन दारातच उभा राहिले. अंगावरचे भिजलेले प्लास्टिकचे पावसाळी कोट त्यांनी काढून बाहेर खिळ्याला लटकवले. हॉलमध्ये येऊन ते लाकडी खुर्च्यांवर बसले. पाण्याचा तांब्या नंदूच्या हातात देत आक्का म्हणाली, “पाऊस उघडल्यावर आला असता तरी चाललं असतं की… एवढी काय गडबड होती?”
थोड्यावेळाने आक्का चहाचे कप घेऊन आली. चहा घेता घेता नंदू म्हणाला, “कधी येणार आहेत दाजी?”
“येतील आता एवढ्यातच. आज त्यांच्या शाळेत इन्स्पेक्शन होते. त्यामुळे लवकरच येणार आहेत ते.”
एवढ्यातच दारावरची बेल वाजली. आक्का म्हणाली, “आले बहुतेक.”
आत प्रवेश करताच गंडे सरांनी नंदू आणि दत्ताकडे तिरक्या नजरेने पाहिले. बघून न बघितल्यासारखे करून ते आत निघून गेले. बॅग आत ठेवून ते बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून बाहेर आले.
“नमस्कार दाजी!” नंदूच्या नमस्काराकडे त्यांनी दुर्लक्ष केले. कोरड्या आवाजात म्हणाले, “कधी आलास?”
“अर्धा-एक तास झाला असेल. सकाळीच येणार होतो. पण पावसामुळे उशीर झाला…”
“हे कोण?” दत्ताकडे पाहून त्यांनी प्रश्न विचारला.
“हा माझा दोस्त आहे दत्ता. एवढी मोठी रक्कम घेऊन जायची म्हणजे कोणतरी जोडीला पाहिजे, असं आई म्हणाली.”
बोलता बोलता नंदूने पैशांची बंडल असलेली प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली. ती दाजींच्या समोर ठेवण्याअगोदरच गंडे सर म्हणाले, “थांब. किती आणलेत, अगोदर कळू दे मला?”
“जेवढे नेले होते तेवढे सगळे आणले आहेत. अर्धे वगैरे आणलेले नाहीत. पुरे एक लाख आहेत दाजी. मोजून घ्या.”
विस्फारलेल्या डोळ्यांनी गंडे सरांनी नंदूकडे पाहिले आणि ताडकन् म्हणाले, “ते पैशांचं बंडल उचल आणि चालता हो. सहा महिन्यांसाठी घेऊन गेला होता पैसे. एक वर्ष झालं तरी, परत द्यायचे झाले नाहीत. सहा महिन्यांचे व्याज किती होते, माहिती आहे का? व्याजासहित पैसे हवे आहेत मला. तेही लवकरात लवकर!”
गंडे सर उठले आणि ताडताड आत निघून गेले. नंदूला बोलायला त्यांनी अवकाश ठेवला नाही. घाबरलेली आक्का गंडे सरांच्या पाठोपाठ आत गेली. परंतु थोड्याच वेळात ती हिरमुसून बाहेर आली. खाली मान घालून नंदूला म्हणाली, “ते ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. तू आपला परत निघून जा. नंतर पाहू या पैशांचं.”
नंदूने रागातच गाडीला किक् मारली. गाडी टर्न घेऊन रस्त्याला लावली. पाऊस झिरपतच होता. दत्ता म्हणाला, “अरे दाजी पिसाळल्यागत का कराय लागलाय? कशाला त्याच्याकडून पैसे आणले होते?”
“गेल्यावर्षी बापूंच्या दवाखान्याला कमी पडायला लागले म्हणून आणले होते. सासर्याला कॅन्सर झालाय म्हटल्यानंतर एखाद्या जावयाने काहीतरी मदत केली असती. आम्हाला मदतही नको आहे कुणाची. पण आता हे उसन्या पैशाचे व्याज मागायला लागलेत…” नंदू कापऱ्या आवाजात म्हणाला.
नंदूच्या खांद्यावर हात ठेवून दत्ता म्हणाला, “काय एक एक माणसं? आपली बहीण तिथं दिली आहे. त्यामुळे थोडं सांभाळूनच वागावं लागेल.”
नंदू आला तसा घरातून अपमानित होऊन निघून गेला. समिधाच्या डोक्यामध्ये तिडीक बसली. ती विचार करत होती – मी सुद्धा पैसे कमवते आहे. ते हायस्कूलवर शिक्षक असले तरी, मीही प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आहे. त्यांना एक लाख रुपये पगार आहे तर, मलाही पासष्ट हजार रुपये पगार आहे. मी माझा येणारा सगळा पैसा त्यांच्याच हातात देत असते. माझ्या वडिलांना कॅन्सर झाला म्हटल्यानंतर माझंही काहीतरी कर्तव्य आहे. तरीही पैसे देताना मी विचारले, “अहो नंदूचा फोन आला होता. बापूंची तब्येत फारच खालावली आहे. त्यांना दवाखान्यात दाखल केलं आहे. नंदूला एक लाख रुपयची गरज आहे. देऊ का?”
“परत किती दिवसांनी देणार आहे? त्याला फिक्स तारीख सांग म्हणावं?”
“सहा महिने तरी लागतील असं तो बोलला आहे.”
“सहा महिन्याच्या वर एक दिवस जाता कामा नये, असे त्याला खडसावून सांग.”
बॅग आणि छत्री घेऊन ते शाळेला निघून गेले. सासरा आजारी आहे म्हणून विचारपूस नाही. चेहऱ्यावर कसले दुःख नाही की, कसली चिंता नाही. कसला हा दगडाच्या काळजाचा माणूस? रात्री जेवणाची वेळ झाली तरी ती स्वत:च्या विचारातच होती.
हेही वाचा – Trap of Deception : जमिनीचा सौदा… अन् नोटरी
ताटात एक चपाती आणि शेवग्याची भाजी घालून समिधाने गंडे सरांच्या पुढे ताट सारले.
“तू जेवत नाहीस का?”
“मी नंतर माझं मी जेवते.”
रात्री झोपते वेळी गंडे सर समिधाला म्हणाले, “मी लै स्वाभिमानी माणूस आहे. मला शब्द फिरवलेला अजिबात आवडत नाही.”
समिधाच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. तरीही संयम ठेवून ती म्हणाली, “कुणाबद्दल बोलताय? नंदूने काय शब्द फिरवला? तुमचे सगळे पैसे तो प्रामाणिकपणे घेऊन आला होता. चार दिवस उशीर झाला हा काय त्याचा गुन्हा आहे काय? बापू गेल्यावर घराचं मेडकं तुटलं. सगळीकडूनच अंधारून आलं. शेतीही तोट्यात गेली. त्याचा व्यवसाय बंद पडला. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात दोन-तीन वर्षं कुठे जातात समजतही नाही. तरीही तुमचे पैसे त्याने प्रामाणिकपणे आणले होते. त्यासाठी आईने तिचे डोरले मोडले. नंदूने थोडी सोसायटी काढली. थोडं तरी समजदार असायला पाहिजे माणसानं.”
“मला लय शहाणपण शिकवू नकोस. पैसे घेताना समजत नव्हतं का? सहा महिन्यांच्या ऐवजी एक वर्ष सांगितलं असतं तर पैसे द्यायचे की नाही, याचा मी विचार केला असता.”
“अहो, पण ते माझे वडील आहेत. मीही पैसे कमावते. माझा त्या पैशावर काय अधिकार आहे की नाही? वडिलांच्या आजारामध्ये पैसे देण्याचे माझे कर्तव्य आहे की नाही? मी माझ्या पायावर उभी असूनही कधी असा गर्व केला नाही.”
“तुला नोकरी मिळाली आहे ती माझ्यामुळे. लग्न झाल्यानंतर तुला डीएड करायला मी मदत केली आहे. तुझ्या बापाची परिस्थिती असती तर, तू तिकडूनच डीएड होऊन आली असतीस. परंतु ते सर्व मला करावं लागलं. त्यामुळे त्या पगारावर संपूर्ण अधिकार माझा आहे. मी सासरवाडीतल्या तुमच्या जमिनीची काही अपेक्षा केली नाही. परंतु माझ्या घरातला एक रुपया सुद्धा मी कुणाला देणार नाही… आणि जास्त बोलायचं कारण नाही. तुझ्या ‘बा’ला जो जावई मिळाला आहे, त्याच्या इतका स्वाभिमानी जावई सात जन्मात ही मिळाला नसता.”
“गेलेल्या माणसाबद्दल चांगलं बोला. ते माझे वडील आहेत. पुन्हा माझ्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले तर सांगितलं नाही म्हणशीला.”
गंडे सर तिरीमिरीतच उठले. त्यांचं माथं भडकलं होतं. अहंकार दुखावला होता. पाठमोरी बसलेल्या समिधाला त्यांनी पाठीमागून कचकन् लाथ घातली. समिधा तशीच कोलमडत कोपऱ्यातल्या भिंतीवर आदळली. तिच्या डोक्याला जखम झाली. भळभळून रक्त वाहू लागले. निष्ठुरपणे गंडे सर दुसऱ्या खोलीत जाऊन निवांत झोपले.
जखमेला हळद लावून ती तशीच पडून राहिली. रात्रभर तळमळ चालू होती. डोक्यात रागाच्या चिळकांड्या उडत राहिल्या. आत्ताच उठावं आणि दोन्ही मुलांना घेऊन कुठेतरी निघून जावं, असं तिला वाटत होतं. परंतु तिने संयम ठेवला. नुसता विचार करत राहिली. काय समजतो हा स्वतःला? स्त्री म्हणजे मालकीची वस्तू आहे का? की फक्त पैसे कमवून आणणारी मशीन? की मुलं जन्माला घालणारी मादी? स्त्रीबाबत याची विचार करण्याची प्रवृत्तीच हलकट आहे. स्त्री म्हणजे काडीची किंमत नसणारी घरात वापरायची एक वस्तू आहे, असा त्याचा दृष्टिकोन आहे. आता याच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. दोन मुलांना निरोप द्यायचा आणि दूर कुठेतरी निघून जायचं, असा तिने विचार केला. रात्रभर ती तंद्रीतच या कुशीवरून त्या कुशीवर तडफडत होती.
दारावरची बेल वाजली म्हणून ती ताडकन उठली. सकाळचे सात वाजले होते. बाहेर फटफटीत झालं होतं. पलीकडच्या पावरलूमचा कारखाना कधीच सुरू झाला होता. मंदिरावरच्या स्पिकरवर सकाळची भावगीते सुरू होती.
तिने दार उघडले तर नंदू त्याच्या दोन मित्रांना घेऊन आलेला. “एवढ्या लवकर?”
“आलो होतो दाजींना समजावून सांगायला आणि त्यांचे पैसेही द्यायला. हे कपाळावर काय झालंय?”
ती काहीच बोलली नाही. आत जाऊन पाणी घेऊन आली. नंदूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो तसाच लाकडी खुर्चीवर बसला. दोघे मित्र दुसऱ्या खुर्च्यांवर बसले. झोपेतून उठून गंडे सर त्यांच्या खोलीतून बाहेर आले.
“का आलास? का हिने फोन करून एकाचे दोन करून सांगितले?”
“नाही. मला कुणाचा फोन आला नाही. काल तुम्ही रागात होता म्हणून आई म्हणाली, आज जा. आता ते शांत झाले असतील आणि त्यांचे पैसे तेवढे देऊन ये. तुमचे जे काही व्याज होणार आहे, तेही आम्ही द्यायला तयार आहोत. फक्त त्याला थोडी मुदत द्या. आता व्याज देण्यासारखी परिस्थिती नाही.”
“मुदत द्यायला मी काय व्याजाचा धंदा काढलाय काय? तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे होत्या. किती दिवस माझे पैसे वापरले?”
“दाजी डोकं थोडं शांत करा. सासऱ्यांना कॅन्सर झालेला तुम्हाला सगळं माहिती आहे. तुमचं देणं लांबवायचं म्हणून आम्ही उगीचच काहीतरी बहाना…” त्याला मधेच तोडत गंडे सर तांबारलेल्या डोळ्यांनी उठून उभे राहिले अन् म्हणाले, “तू मला शिकवू नको. तुझ्या ‘बा’ला विचार जावई कसा मिळाला आहे ते. त्याच्या पोरगीला इथं आणल्यानंतर मी डीएड केली. तुझा बाप एवढा हिम्मतवान असता तर, त्यानं तिकडूनच डीएड करून पाठवली असती. पण बाप पडला दरिद्री…”
मेलेल्या बापाबद्दल अभद्र शब्द ऐकताच नंदूची तळपायाची आग मस्तकाला गेली. अगोदरच समिधाच्या कपाळावरची जखम बघून तो चक्रावला होता. काही समजायच्या आतच नंदूने दाजीच्या खाडकन् मुस्काटात दिली. वादळात मोठं झाड उन्मळून पडावं तसा दाजी धापकन् जमिनीवर उताणा पडला. नंदूचा रुद्रावतार पाहून त्यांची बोबडीच वळली.
“पुन्हा बापाचं नाव काढशीला तर सांगितलं नाही म्हणशीला. मर्यादा मर्यादा म्हणून पाळायची किती?”
नंदूबरोबर आलेल्या दोघा मित्रांनी नंदूला ओढून बाहेर काढलं. नंदू समिधाला म्हणाला, “तुझं आवर पटकन. आता इथं राहीलीस तर तुझी राख करायला हा माणूस कमी करायचा नाही.”
तिने रागातच बॅग भरली. चार साड्या आणि थोडं सामान पिशवीत टाकले. गंडे सरांच्याकडे पहिले सुद्धा नाही. ती ताडताड घराबाहेर येऊन नंदूच्या गाडीवर पाठीमागे बसली.
सकाळचे चपचपीत ऊन बिनधास्त पसरले होते. बाजारपेठेतील दुकाने उघडू लागली होती. नंदू पुढे आणि त्याचे मित्र पाठीमागे अशा दोन गाड्या रस्त्याने धावत होत्या. समिधा नंदूला म्हणाली, “आता ते पोलीस स्टेशनला केस करतील. कारण त्यांचा स्वभाव तक्रारखोर आहे. एकदा एक हेका धरला की एकच.”
“तू आपलं आता तुझ्या मुलांचं बघ. घरी गेल्या गेल्या आपण दोघांनाही फोन करू. तुला भरपूर पगार आहे. शहरामध्ये चांगला फ्लॅट घे. दोन्ही मुलांना शिकव. आता त्यांच्या नादालाही लागू नकोस… आणि माझ्याविरुद्ध तक्रार करू दे नाहीतर काहीही करू दे. आता मी खंबीर आहे. तू काळजी करू नको.”
बाहेर नंदूच्या गाडीचा आवाज ऐकून आईने दरवाजा उघडला. नंदूसोबत समिधाला आलेली पाहून ती घाबरली. नक्कीच काहीतरी काळबेरं झालेलं असणार, त्याशिवाय समिधा अशी अचानक यायची नाही. समिधा गाडीवरून उतरली आणि आईला तिचे कपाळ दिसले. “कपाळाला काय करून घेतलंस?”
समिधा म्हणाली, “आत चल. सगळं सांगते.”
जेवणाची वेळ होईपर्यंत समिधा तिची परवड सांगत होती. रात्री जेवण झाल्यावर आई म्हणाली, “तुझ्या पायावर तू उभी आहेस. का म्हणून अशी कुजत पडली होतीस. आता तिकडं जायाचं नाव काढू नकोस.”
समिधा म्हणाली, “त्यासाठीच मी निघून आलेय.”
समिधाला आईकडे येऊन पंधरा दिवस झाले होते. दोन्ही मुले पुण्यालाच होती. दोनच दिवसांपूर्वी मुलांना गावी बोलवून सर्व हकीकत सांगितली होती. मयूर म्हणाला, “पप्पांचा स्वभावच तसा हट्टी आहे. आम्ही दोघेही बाहेर आहोत म्हणून वाचलो. नाही तर आम्हाला पण खूप त्रास झाला असता. तू आता तुझी तब्येत आणि नोकरी सांभाळ. बाकी काही काळजी करू नको.”
दोन्ही मुले पुन्हा पुण्याला निघून गेली. समिधा रोज शाळेत जाऊ लागली.
एके दिवशी सकाळचे दहा वाजले होते. समिधाची शाळेत जाण्याची वेळ झाली होती. एवढ्यातच अंगणात पांढरी विजार, पांढरा सदरा घातलेला एक इसम आला. “मी बेलिफ आहे. कोर्टातून आलो आहे. ही तुमची नोटीस घ्या.”
समिधाने पुढे जाऊन नोटीस घेतली. ती आत आली. नोटिशीमधली सर्व कागदपत्रे तिने पाहिली. गंडे सरांनी तिच्या विरोधात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. तिला धक्का वगैरे बसला नाही. दोन दिवसांनी तारीख होती. हे असेच घडणार तिला माहीत होते. दोन दिवसांनी कोर्टात जायचे, असा निश्चिय करून ती रोजच्या कामाला लागली.
तारखे दिवशी ती लवकरच कोर्टात हजर राहिली. दोघेही सुशिक्षित आणि नोकरदार आहेत, हे पाहून न्यायाधीशांनी प्रकरण तडजोडीसाठी पाठवले. परंतु गंडे सरांनी त्यांच्या वकिलांना सांगितले, “तडजोड करणं माझ्या आयुष्यात माहिती नाही. मी कष्टाने इथपर्यंत आलो आहे. मी भयंकर स्वाभिमानी आहे. तुम्हाला केस लढायची होत नसेल तर मी दुसरा वकील पाहतो.”
कोर्टापुढे केसमध्ये तडजोड झाली नाही. केस पुन्हा सुरू झाली.
आता गंडे सर प्रत्येक तारखेला कोर्टात येतात. घरी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खातात. दोन्ही मुलं आणि बायको गेली चार वर्षे वेगळे राहत आहेत. जाणा-येणाऱ्याला गंडे सर सांगत राहतात, “आपण भयंकर मानी स्वभावचे आहोत. माझ्या इतका स्वाभिमानी तुम्हाला दुसरा कोणी दिसणार नाही. सगळेजण मिंधे होऊन जगत आहेत. आयुष्यात मी मरण पत्करीन परंतु तडजोड कधीही स्वीकारणार नाही. आता मला दुप्पट व्याजासहित पैसे दिले तरी मी ते स्वीकारणार नाही. मी माझ्या मेहुण्याला सळ्या मोजायला तुरुंगात पाठवणार. घटस्फोट घेऊन बायकोला पण धडा शिकवणार.”
विलास गंडे नावाचा, हायस्कूलचा आदर्श शिक्षक प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये येऊन लिंबाच्या झाडाखाली बसलेला असतो. त्यांचा हट्टी स्वभाव कोर्ट आवारातील त्या जुन्या झाडालाही आता परिचयाचा झालेला असतो…!!!