सुनील पानसरे
भाग – 1
माझ्या एक्स्टेंशनची रिंग वाजली. पण ती रिंग नेहेमीची नव्हती. कदाचित बाहेरचा कॉल असावा, असं म्हणत मी तो उचलला. सरदेसाई सर? लँडलाईनवरून? मी विचार करत होतो की, त्यांना का बरं मला लँडलाईनवर कॉल करावा लागला असेल! सर, माझे पूर्वाश्रमीचे सहकारी आहेत. फोनवर बोलताना ते गंभीर वाटत होते, त्यामुळे मी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली. त्यांच्या एका वृद्ध मित्राचा, श्री. स्वामी यांचा, मागील चार दिवसांपासून काहीच मागमूस नव्हता. त्यांचा फोन पण वाजून वाजून बंद झाला होता बहुतेक त्याच दुपारी.
सरदेसाई सरांना वाटलं की, कदाचित स्वामी यांचं घर माझ्या जुन्या घराजवळच असावं (मला नंतर समजलं की, त्यांचं घर माझ्या सध्याच्या घरापासून फार लांब नव्हतं). स्वामी एकटेच राहतात म्हणून त्यांना भेटून मी त्यांची विचारपूस करावी, अशी विनंती सरदेसाई सर करत होते. पण सरांना फक्त तो भाग कोणता ते माहिती होतं… ना फ्लॅटचा नंबर माहिती होता, ना बिल्डिंगच नाव! मात्र त्यांच्याकडे एक फोटो होता, तो त्यांनी पाठवला. सोबतच स्वामी यांचा मोबाइल नंबरपण दिला. त्यांच्या आवाजातली काळजी मला चांगलीच जाणवली होती.
त्यांनी पुन्हा एकदा मला त्यांचा शोध घ्यायला सांगितलं. ते मला म्हणाले की, “मला ताप आला आहे, नाहीतर मी स्वतःच आलो असतो, पुण्याहून स्वामींना शोधायला.” सरांची चिंता दूर करण्यासाठी मी म्हणालो, “सगळं व्यवस्थित होईल.” पण हे म्हणताना मला स्वत:ला किती खात्री होतो, हे माहीत नाही, तरीपण मी तसं म्हटलं खरं!
थोड्याच वेळात मी स्वामींचा शोध घ्यायला निघालो. त्या भागात मी आधी अनेक वेळा गेलो होतो, पण आज परिस्थिती थोडी वेगळी होती. मी जर इथे एका वयोवृद्ध व्यक्तीबद्दल चौकशी करू लागलो तर इथल्या लोकांना ते पचनी पडेल की नाही, याची मला कल्पना नव्हती. मी मनातल्या मनात प्रार्थना केली की, लोकांनी गैरसमज करून घेऊ नये.
प्रश्न होता, शोधायला सुरुवात करायची कशी? मला काहीच सुचत नव्हतं! सुरुवातीला मी त्या भागातल्या पाणीपुरी विक्रेत्याला फोटो दाखवला, पण त्याला माहीत नव्हतं. तिथे जवळच काही वयस्कर व्यक्ती गप्पा मारत बसल्या होत्या. मी त्यांच्याकडे जाऊन फोटो दाखवला खरा, पण अजून एक नकारच!
मला आता हा प्रयत्न निरर्थक वाटू लागला होता. मग म्हटलं अजून एखादा शेवटचा प्रयत्न करून बघूया. त्या भागात एक किराणा आणि भाजीपाला एकत्र, असं एक दुकान होतं. तिथल्या विक्रेत्याला मी फोटो दाखवला, पण त्याने माझ्याकडे संशयाने बघितलं आणि म्हणाला, “तुम्ही काय म्हणून शोधताय यांना?” इतक्यात दुकानाच्या मालकीणबाई तिथे आल्या. मी त्याना सर्व परिस्थिती सांगितली आणि मदतीची विनंती केली. मला जाणवलं की फोटो पाहिल्यावर त्यासुद्धा काळजीत पडल्या आहेत. कारण मागील तीन-चार दिवसांत स्वामी त्यांना दिसलेच नव्हते आणि आज माझ्यासारखा तिऱ्हाईत त्यांची अशी चौकशी करतोय…!
स्वामी बहुतेक रोजच आमच्या दुकानात येत होते, असं त्या बाईनं मला सांगितलं. आता माझ्या हृदयाची धडधड जास्तच वाढली. डायरीमध्ये बघून त्या बाईंनी मला स्वामींच्या बिल्डिंगचं नाव आणि फ्लॅट नंबर सांगितला. अगदी जवळचा होता पत्ता. मी तातडीने तिथे गेलो.
क्रमश: