प्रणाली वैद्य
‘रॉकेर्स ग्रुप’ चा आज ट्रेकला जाण्याचा दिवस होता..,. वर्षभर आधीच कॅलेंडर पाहून ट्रेकचे दिवस नक्की केले होते. बहुत करून सलग तीन-चार दिवस येणाऱ्या सुट्ट्या पाहून ठिकाण निश्चित केलं जायचं… आजही तसाच योग होता… अगदी चार दिवस लागून सुट्ट्या होत्या…
आजवर रॉकेर्स ग्रुपने बरेचसे किल्ले आणि शिखरं पादाक्रांत केली होती, म्हणून यावेळेस जरा वेगळे काही पहावे अस सर्वसंमतीने ठरले होते. शौनक या ग्रुपचा म्होरक्या! सर्वांचा लाडकाच काय, ग्रुपच्या गळ्यातला ताईतच. पण ग्रुप वगळताही त्याच वागणं-बोलणं, त्याचं व्यक्तिमत्त्व सगळ्यांना भुरळ घालायचं… सावळा वर्ण 5’11 उंची, व्यायामाने कमावलेलं शरीर, हास्य इतकं मोकळं की, पाहणाऱ्याच्याही चेहऱ्यावर एक हास्य झळके. श्रीमंत घरातून असला तरी आपल्या मित्रांत त्याचं वागणं सर्वसामान्य होत. कुठेही आपल्या श्रीमंतीचा बडेजाव नाही, का माज नाही!
शौनकला फिरण्याचं वेड होतं. त्यामुळे आपल्यासारख्याच फिरण्याचं वेड असलेल्या मुलामुलींचा ‘रॉकेर्स’ हा ग्रुप त्याने निर्माण केला होता. एखाद्याला ट्रेकला यायला अडचण असेल तर, त्याचं कॉन्ट्रिब्युशनही तो द्यायचा. असा हा शौनक आणि शौनकला साजेशी अशी शाल्मली… लहानपणापासूनची मैत्री पुढे प्रेमात परावर्तित झालेली… दोन्हीकडच्या कुटुंबानी त्यांच्या या नात्यास आनंदाने स्वीकारलेलं!
सण-समारंभात तर शाल्मलीशिवाय शौनकच्या कुटुंबाचं पान हलत नसे. शाल्मली होतीच तशी गोड… जशी दिसायला तशीच स्वभावाला! हसून-खेळून कोणालाही आपलंस करणारी एकुलती एक लाडाची असली तरी, सर्वांमध्ये मिळूनमिसळून वागणारी…
आपल्या लाडक्या शौनकचं भटकंतीचं वेड कमी होऊन आपला बिझनेस त्याने सांभाळावा, असं महेशरावांचं आणि संध्याताईचं स्वप्न. या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी शाल्मलीची मदत घेतली खरी, परंतु शौनकने तिलाच आपल्या वेडात सामील करून घेतले…
वर्षातले सुट्ट्यांचे काही दिवस शौनक, शाल्मली आपल्या ग्रुपला देत तर बाकी दिवस आपल्या आईवडिलांच्या इच्छेनुसार व्यतीत करत.
हेही वाचा – स्वाभिमानी की हेकेखोर?
शौनक, शाल्मली वगळता या ग्रुपमध्ये अजूनही काही जण होते, त्यापैकी 10 जण सुरुवातीपासूनच शौनकसोबत संलग्न होते… तर काही जण काळानुसार वाढत आणि कमी होत असत. या 10 जणांत रुपेश, निलेश, सचिन, मुकुंद, श्लोक हे शौनकचे कॉलेज फ्रेंड्स आणि रॉकेर्सचे संस्थापक होते. तर शाल्मलीबरोबर तिच्या मैत्रिणी नयना, स्वाती, श्रद्धा, नीता आणि कांचन या होत्या.
यावेळच्या ट्रेकसाठी जवळपास 36 जण तयार होते. आधीच सांगितल्याप्रमाणे यावेळेस काही वेगळाच ट्रेक करावा, अशी शौनकची कल्पना होती आणि त्याला इतरांनीही दुजोरा दिला होता. त्याप्रमाणे सर्वच्या सर्व 36 जण चार महिने कामाला लागले होते. प्रत्येकाने वेगवेगळी ठिकाणं शोधून काढली होती आणि तिथल्या वैशिष्ट्यांची माहिती, पोहोचायला लागणारा वेळ, राहण्याकरिता उपलब्ध असणारी सोय या सर्वांचाच अभ्यास प्रत्येकाने केला होता.
मीटिंगच्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणाचा शोध सर्वांसमोर मांडला. पण त्यात श्लोकने सादर केलेला प्रस्ताव अगदीच वेगळा होता; चंदन नगर नावाचं गाव… काही कारणाने त्या गावाची दोन भागांत वाटणी झाली होती… गावाचा एक भाग सुजलाम सुफलाम होता आणि त्या गावाची मनुष्यवस्ती शेतीच्या आसपास होती… त्या भागातल्या शेतात एखादं पीक लावण्याची खोटी, अगदी भरभरून पीक येत होतं… संपूर्ण गाव तसा उत्तम होता… लोकं धनधान्य संपन्न होती! मात्र दुसरा भाग रखरखीत… कोणीही काहीही करू शकत नव्हतं… ना कोणतं पीक, ना काही! पूर्वापार आलेल्या अनुभवामुळे आता तो भाग दुर्लक्षित झाला होता. ना कोणाचं येणं-जाणं, ना काही संबंध…
पण काही वेगळेपणा मात्र जाणवायचा. जणू काही त्या भागाची ही अवस्था होण्यामागे काही कारणे असावी… आजवर कित्येक लोकांचे प्रयत्न तिथे हरले होते… ना पाणी, ना वीज, ना मनुष्यवस्ती, ना शेत… फक्त उजाड रानमाळ! आणि या रानमाळात काही दगडी अवशेष दृष्टीस पडत… जणू जमिनीतून वर येऊन आपलं अस्तित्व नोंदवत… अगदी पूर्ण पावसाळ्याच्या दिवसांतही हा भाग कोरडा ठाकच असे!
मात्र पौर्णिमेच्या रात्री तेथे आसमंतात एक सुगंध भरून राहात असे… कुठून? कसा? आजवर त्याचं गुपित मात्र कुणालाच कळलं नव्हतं… बरेच जणांनी त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कोणालाच आजवर त्यात यश आलं नव्हतं. फार फार तर, त्या दगडी शिलालेखांपर्यंत लोकांचा प्रवास होत होता, मात्र तिथे पोहोचल्यावर अनेकांना जमिनीत हादरे बसल्याचे अनुभव आले होते.
हेही वाचा – शोध कळणाच्या भाकरीचा!
श्लोकने आपण शोधलेल्या ठिकाणची इतकी माहिती दिली… काही फोटो दाखवले… मग त्याने आपली नजर सर्वांवरून फिरवली. एक अनामिक शांतता आणि नजरेत कुतुहल दिसत होते.
न राहून शौनक म्हणाला… काय म्हणता मुलांनो? काय करायचं? जायचं का चंदन नगरला?
सगळे एकमुखाने ‘Yess’ म्हणून ओरडले!
शौनकला खूपच इंटरेस्टिंग वाटत होतं हे ठिकाण. पण शाल्मलीला मात्र मनातून अस्वस्थ वाटू लागलं होतं. शौनकला नाही म्हणावं तर, तो ऐकण्यातला नव्हता आणि का कोणास ठाऊक आपल्याशिवाय त्याने तिथे जाऊ नये असंच तिला वाटत होतं… नाराजीनेच का होईना, तिने या ट्रेकला मान्यता दिली होती…
क्रमशः