Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeललितअम्माकडचा तृप्त करणारा प्रसाद...

अम्माकडचा तृप्त करणारा प्रसाद…

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते.

एका माहितीपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने विरार पूर्वेला एका वस्तीत गेले होते. तिथे मला त्या वस्तीची 90 वर्षीय मालकीण सायरा अम्मा भेटली. तिथे राहणाऱ्या तृतीयपंथीयांची ती ‘गुरुमाय’ होती. तीन-चार दिवसांत मी सायरा अम्माची मुलगी झाली होते आणि तिथे राहणाऱ्या तरुण तृतीयपंथीयांची मम्मी! अम्माचे मला नियमितपणे कॉल यायचे. माझी चौकशी करण्यासाठी… किती ते प्रेम! मी जमेल तशी वस्तीत जायची. माहेरवाशिणीला तिची आई वानोळा देते ना, तशी अम्मा मला पिशव्या भरून कांदे, बटाटे, भाज्या, ड्राय फिश अगदी भरभरून द्यायची.

सायरा अम्माकडे दरवर्षी ‘नियाज़’ केला जायचा. 100 किलो तांदूळ, 100 किलो मटण अशी बिर्याणी बनायची. शाकाहारी लोकांसाठी 100 किलो रव्याचा शिरा बनवला जायचा. नियाज़चा प्रसाद जेवायला खूप माणसे तिच्याकडे यायची. पण अम्माकडच्या प्रसादाचं सत्व असं होतं की, शेवटची व्यक्ती जेवेपर्यंत अन्न कधीच संपलं नाही!

बरं, तिच्याकडे येणारी माणसे सर्व थरातील असायची. गरिबीतली गरीब आणि श्रीमंत व्यक्तीसुद्धा एकमेकांच्या शेजारी बसून नियाज़चा प्रसाद जेवायची. सर्व किन्नरांसाठी तो मोठा उत्सवच असायचा. भरजरी साड्या, दागिने, फुले, मेक-अप… अन् सळसळता उत्साह. मी तिथे नियमितपणे जायचे.

पहिल्यावेळची आठवण…

मी, माझी मुलगी लक्ष्मी आणि माझे मोठे मामा, बापूमामा (नालासोपाऱ्याला राहायचे) होते. मी एकटी जाऊ नये म्हणून बापूमामा माझ्या सोबत आले होते. खरंतर, मी एकटीच तिथे जात असे. पण त्यावेळी हे दोघेही होते. त्याच रेल्वेमार्गालगत आम्ही रिक्षामधून उतरलो. दुर्गा बारच्या बाजूने सायरा अम्माच्या वस्तीत जाण्यासाठी चालायला सुरुवात केली. वस्तीमध्ये अंधार होता… मोबाइलचे लाइट सुरू केले आणि ना पडता, ना धडपडता वस्तीपर्यंत पोहोचलो… अन् अचानक लाइट आले. फुल्ल लाइट्स, माळा, तोरणे… सुंदर डेकोरेशन केलेले सायरा अम्माचे घर… जल्लोष, आरडाओरड… मम्मी आली, मम्मी आली… सगळ्याजणी माझ्याकडे धावल्या.

अम्माही आली. मी तिला वाकून नमस्कार केला. माझ्या मुलीची आणि मामाची ओळख करून दिली. मी तिथे येताच लाइट आले, तशी अम्मा जरा जास्तच खूश झाली होती. मानाचे पान मला वाढले गेले. तो दिवस मंगळवार होता. बापूमामा सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार काटेकोरपणे शाकाहारी जेवणच करायचे. त्या मामांनी मंगळवार मोडला. ते खूपच भारावून गेले होते. अम्माकडचं प्रसादाचं जेवण जेवून आम्ही निघालो… तृप्त मनाने, आनंदाने, अम्माचा आशीर्वाद घेऊन.

(समाप्त)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!