Sunday, October 26, 2025

banner 468x60

Homeअवांतरमन तृप्त करणारं… रथीनम!

मन तृप्त करणारं… रथीनम!

पराग गोडबोले

माझा वाढदिवस झाला 30 सप्टेंबरला. खूप शुभेच्छा आल्या आणि मी भरून पावलो अगदी! हल्ली या शुभेच्छा देणं खूप सोप्पं झालंय, त्यामुळे अगदी पूर येतो त्यांचा आणि त्या सगळ्यांना उत्तरे देता देता श्रमतो जीव… तरीही छान वाटत राहतं दिवसभर.

कधी नव्हे ती सुट्टी घेतली होती. बायकोला आदल्या दिवशीच सांगून ठेवलं होतं, “घरी काही करत बसू नको… छान कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ.” अर्थात, सर्वसामान्य डोंबिवलीकराची झेप ‘मॉडर्न कॅफे’च्या पुढे जात नाही आणि तिथे जाऊन त्याच लाल, पिवळ्या, हिरव्या भाज्या, रोट्या, नान हे सगळं सदोदित आणि निरंतर खाऊनही जित्याची खोड काही जात नाही…!

“नको बाई, मी घरीच करते काहीतरी तुझ्या आवडीचं… उगाच नको बाहेर जायला,” असं ती म्हणून गेली आणि मला काय, बरंच झालं.

“काय करू सांग?” चेंडू माझ्याकडे आला.

इथे गाडी अडली ती सरकेच ना पुढे… खूप पर्याय सुचवले, पण छे, ‘वाढदिवसाला हे काय? काहीतरी छान सुचव,’ म्हणत सगळे पर्याय बाद झाले. शेवटी मी म्हणालो, “कढी, खिचडी, पापड आणि लोणचं, एवढंच कर. चालेल मला…!”

हेही वाचा – पुस्तकांमध्ये रमलेला माणूस

“तुझा वाढदिवस आहे. एवढं साधं केलं, तर आयुष्यभर गात बसशील,” म्हणत तो पर्याय पण बाद केला तिने.

“जाऊदे बाई, बाहेरच जाऊ आपण…” म्हणत, हरदासाची कथा मूळ पदावर आली आणि वर्तुळ पूर्ण झालं. “मॉडर्न कॅफे नको, दुसरं काहीतरी वेगळं खाऊया. बघ काही सुचतंय का?”  म्हणत आमची गहन चर्चा सुरू झाली.

“छान ‘South Indian’ खावंसं वाटतंय!”

च्यायला, हिला डोहाळे लागले का काय परत? असं मनाशीच म्हणत, मी हसलो गालातल्या गालात.

“काय झालं आता हसायला?” काहीतरी थातुरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती हेच खरं… नाहीतर आजही तोफेच्या तोंडी पडण्याची दाट शक्यता होती!

“Gharda Circle जवळ एक छान छोटंसं हॉटेल आहे, ‘रथीनम’ नावाचं. दाक्षिणात्य पदार्थ छान मिळतात म्हणे तिथे…” मी चाचरत चाचरत सुचवलं, “बघ पटतंय का!”

“चालेल. तुला आवडणार असेल तर जाऊया,” म्हणत तिने चक्क होकार दिला आणि सकाळपासून सुरू असलेली गहन चर्चा संपुष्टात आली.

दुपारचे साडेबारा झाले आणि आम्ही आवरायला लागलो. मी पटकन माझी shorts घातली, नेहमीचा टी शर्ट चढवला आणि म्हणालो, “मी तयार आहे.” मला आपादमस्तक न्याहाळलं तिने आणि म्हणाली, “धन्य आहे गड्या तुझी. बारसं असो की बारावं, तुला काही फरक पडत नाही. बदल ते कपडे आधी!”

हेही वाचा – तो डंख कुरवाळला अन्…

मी बघितलं स्वतःकडे, पण दोष काही सापडेना! “काय वाईट आहे यात?” म्हणत मी टाळाटाळ करायला लागलो. “उगाच आजच्या दिवशी भांडायला लावू नकोस, जरा अंगभर कपडे घाला” अशा कानपिचक्या आल्या.

मी मग जीन्स, त्यावर छानसा नवा टी शर्ट घालून तिच्या समोर उभा राहिलो. “खुंट वाढलेत, जरा दाढी केलीत तर बरं होईल…”

‘वाढदिवस नको, बायको आवर’ अशी हालत नुसती…

सटासट दाढी केली आणि परत हजेरी लावली. “मस्त, आता कसा छान दिसतोयस,” अशी प्रतिक्रिया आली आणि मी भरून पावलो. ती पण तयार झाली भरभर, म्हणजे अर्ध्या-पाऊण तासात. तोपर्यंत मी शुभेच्छांना उत्तरे देत बसलो निवांत… 

पिरपीर पाऊस होता, मग कार काढली आणि दहाव्या मिनिटाला पोहोचलो इच्छित स्थळी… कारण अवघ्या चार सहा किलोमीटरच्या परिघात वसलंय, आमचं ‘छोटंसं विश्व’, म्हणजे डोंबिवली!

मंगळवार होता, सगळं निवांत होतं. टेबलं मोकळी होती. आम्ही ऐसपैस बसलो. कार्ड समोर आलं. सगळे हवेहवेसे पदार्थ… डोसा, इडली, वडा, पोंगल, पोडी इडली, रवा डोसा, अवियल/पराठा आणि बरंच काही…

केळीच्या पानावर वाढलं जाणारं पूर्ण जेवणही होतं. तिथल्या माणसाला म्हणालो, “सगळंच खायची इच्छा होतेय, काय करू?”

आमचं ‘South Indian Platter’ घ्या सर, सगळं थोडं थोडं खाता येईल तुम्हाला त्यात. वाटलं तर आणखी मागवा. मला आवडली ही कल्पना. मी होकार भरला. बायको अजूनही काय घ्यावं याचा विचार करत होती. साडी घ्यायची असो वा काडी, तोच चिकित्सकपणा सगळीकडे. शेवटी, ‘कांदा टोमॅटो उत्तपम’ची निवड झाली आणि माझा भुकेलेला जीव केळीच्या पानात पडला एकदाचा.

माझं ताट आधी आलं. एक इडली, एक मेदू वडा, छोटा उत्तपम, सांबार, चटणी, उपमा, पोंगल, अननस शीरा, असा भरगच्च ऐवज होता. खाली एक छोटंसं, नाजूकसं केळीचं पान होतं. बघूनच जीव तृप्त झाला… दोनच मिनिटांत तिचा उत्तपमही आला आणि आम्ही चवीपरीने खायला सुरुवात केली. पोट कधी भरलं, हे कळलंच नाही. आणखी काही खायची इच्छाच उरली नाही.

“साहेब, आणखी काय खाणार?” या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे. “काही नको, पोट भरलं गच्च…” म्हणालो त्याला.

“सर, आमची filter coffee पिऊन बघा. आवडेल तुम्हाला.”

पितळी पेल्यात झकास कॉफी आली आणि ती कडवट चव घेत, आमच्या भोजन यज्ञाची सांगता झाली. वाढदिवस मस्त साजरा झाला होता!

निघता निघता, ‘रथीनम’ हे तामिळनाडूतलं एक आडनाव आहे, असं कळलं. रत्न या शब्दांत त्याची व्युत्पत्ती दडलेली आहे, हेही कळलं. हॉटेल चालवणाऱ्या युवकाचं अभिनंदन करून मगच  बाहेर पडलो.  

घरी गेल्यावर ‘पडी’ अत्यावश्यक होती. जाता जाता ही म्हणाली, “तरी मी काही केलं नाही तुझ्यासाठी. काहीतरीच वाटतंय… संध्याकाळी ‘रगडा पॅटीस’ करते मस्त, तुझ्या आवडीचा!” पोट गच्च असूनही मी वाट बघायला लागलो, संध्याकाळची…

संध्याकाळी मग आई आणि बायको, दोघींनी औक्षण केलं. दुपारी भरपेट खाऊन सुद्धा परत रगडा पॅटीसवर ताव मारला आणि वाढदिवसाची यशस्वी सांगता झाली…

आनंद साजरा करता करता, आयुष्यातलं एक वर्ष मागे पडलं याचीही जाणीव झाली. वाटली खंत थोडीशी, पण ती तेवढ्यापुरतीच… उद्या परत होतंच, ‘गाडीचं पायदान…’ पाचवीला पुजलेलं, जगण्याच्या संघर्षातलं!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!