पराग गोडबोले
काल बायको गेली तिच्या सख्यांबरोबर जिवाचं अलिबाग करायला आणि रविवारी सकाळी मी आणि लेक दोघेच घरात! ‘धुडगूस घालू नका, पसारे करू नका, मोलकरीण येईल तिच्याकडून काम करून घ्या, अंथरूणांच्या घड्या घाला, मशीन लावून कपडे नीट वाळत घाला…’ अशा असंख्य सूचनांचा भडिमार करत एकदाची ती गेली. शनिवारी तिला तिच्या मैत्रिणींच्या ताब्यात दिलं, डोंबिवली स्टेशनवर आणि मी सुटकेचा निश्वास सोडला, अर्थात तिच्या नकळत!
पूर्वी फोन नव्हते, तेव्हा एक बरं होतं. एकदा दृष्टीआड झाली की, परत येईपर्यंत छान मोकळीक असायची, डोक्याला फार ताप नसायचा… हल्ली सतत, केव्हा फोन वाजेल किंवा व्हिडीओ कॉल येऊन कपडे कसे वाळत घातलेत ते दाखव, ओटा आवरलाय का बघू, अशा आज्ञा येतील, याची भीती वाटत रहाते. पण असं धाकात असण्यात पण एक सुख असतं आणि तेही अनुभवायचं असतं याची खूणगाठ मी बांधून ठेवली आहे हल्ली मनाशी!
जाताना लेकीलाही बजावून गेली. पोहे काढून ठेवलेत ओट्यावर, रविवारी सकाळी खायला कर. आजी पोळ्या देईल. भाजी कर आणि वरण-भाताचा कुकर लाव, वगैरे, वगैरे, वगैरे. कानाला बुचं लावून बसलेल्या लेकीच्या डोक्यात किती शिरलं, ते तिलाच ठाऊक!
हेही वाचा – कोंड्याचा मांडा… लेकीने खास बाबासाठी केलेला!
रविवारी सकाळी मी नेहेमीप्रमाणे उठलो. रविवारी चहा करायचं दायित्व माझं असतं. ते मी आजही निभावलं. न्याहारीचं काय करावं, याचा विचार करत होतो. अशा प्रसंगात, हाकेच्या अंतरावर असलेला इडलीवाला हाच आधार असतो! मी निघतच होतो, पण तेवढ्यात लेक ‘भल्या पहाटे साडेनऊ’ला उठली. चहा घेतला आणि म्हणाली, ‘जाताच आहात खाली, तर इडल्या नका आणू. अंडी आणि ब्रेड घेऊन या…’
मला वाटलं, आता अंड्याचं धिरडं येणार समोर… आवडतं तेही मला. म्हणून चार अंडी आणि अर्धा ब्रेड घेऊन आलो.
“तुम्ही बाहेर बसा आता, इथे लुडबूड करू नका हो बाबा!!”
आईच्या पावलावर पाऊल अगदी! मी मुकाट्याने बाहेर जाऊन, पेपर हाती घेतला अन् जाहिराती सोडून उरलेला मजकूर वाचू लागलो… पाचच मिनिटांत मस्त दरवळ सुटला…
“काय करतेयस काय?” असा प्रश्न विचारला मी पण, “झाल्यावर सांगते,” म्हणून परत माझी बोळवण झाली आणि मी मुकाट बाहेर येऊन बसलो. जीव राहवेना… पण तेवढ्यात ती आली बाहेर… वाफाळती ताटली घेऊन. लसणीचा दर्प ल्यालेली…
मी विचारलं, “काय आहे हे? नवीन काहीतरी पदार्थ दिसतोय.”
“आधी खाऊन तर बघा!”
मस्त भाजलेला पाव आणि त्यासोबत ते जे काही होतं, ते तोंडात टाकलं आणि आवडूनच गेलं एकदम!
“मस्त लागतंय गं,” माझी एकमुखी दाद!
“अहो, याला ‘Butter Garlic Scrambled Eggs’ म्हणतात.”
थोडंसं अंडा भुर्जीसारखं, पण वेगळी चव… अंडी, लसूण, अमूल बटर, ओरेगानो, काळी मिरी, चिली फ्लेक्स वगैरेंचं ते चवदार मिश्रण मी पहिल्यांदाच चाखत होतो. ते ही लेकीने केलेलं! आडवा हात अपेक्षितच होता. भरपेट न्याहारी करून सुस्तावलो आणि सुखावलो.
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
लेकीला म्हटलं, “रविवारीय पोहे आणि अण्णाची इडली यापेक्षा वेगळं काहीतरी खायला घालून आजचा रविवार साजरा केलास तू.”
माझं खाऊन होईस्तोवर, ही मेजवानी रीलच्या रूपात इन्स्टावर अवतरली सुद्धा आणि लगोलग बायकोचा फोन… “कसं होतं चवीला?” तिचा उत्सुक प्रश्न!
“तुझा आहेच वरदहस्त तिच्या डोक्यावर, मग उत्तम आणि अप्रतिम याशिवाय दुसरं काय होणार?“
“पुरे, मोडेल हो, हरभऱ्याचं झाड,” म्हणत कृतककोपाने हसली ती आणि आम्ही मग उरलंसुरलं निपटून, ओटा आवरून, रविवारच्या पुढच्या कार्यक्रमांकडे वळलो. आता जेवायला नवीन काय पानात येणार, याची उत्सुकता लागून राहिलीच मला… विचारलं असतं तर, ‘आधी हे तर जिरू द्या ना हो बाबा,’ अशी कोपरखळी आली असती हे निश्चित, म्हणून मौन धारण करणं सयुक्तिक समजलं मी.
असा मस्त रविवार उगवला आणि आता मावळत पण आला… उद्याच्या सोमवारची नकोशी चाहूल घेऊन!


