Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeललित…अन् अंकूसोबत नव्याने संसार सुरू केला!

…अन् अंकूसोबत नव्याने संसार सुरू केला!

डॉ. विवेक वैद्य

ऑफिसला निघालो होतो. गावाबाहेर असलेल्या महादेवाच्या मंदिरात गेलो होतो. सध्या आयुष्यात काहीच ठीक चालले नव्हते… अशावेळी बरोबर देवाची आठवण येते. दुसऱ्या रस्त्याने गावात आलो तर, रस्त्याच्या एका बाजूला बायकांची भली मोठी रांग. अगदी अर्धा किलोमीटर तरी असेल! प्रथम लक्षातच आले नाही, ही कसली रांग? मग समजले सरकारतर्फे गरीब कष्टकरी महिलांना मोफत भांडेवाटप होते, त्याची ती रांग होती. अचानक रांगेत एक ओळखीचा पंजाबी ड्रेस दिसला. पुन्हा वळून पाहिले पण एवढ्या गर्दीत काही दिसेना, मोटरसायकल वळवून पुन्हा 100-150 फूट मागे गेलो. पुन्हा तोच ड्रेस दिसला. ड्रेस घातलेली तरुणी माझ्यापासून चेहरा लपवत होती. मी मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला लावली आणि शांतपणे तिच्याकडे गेलो. रांगेतील बाया काहीशा आश्चर्याने माझ्याकडे पाहात होत्या.

“अंकिता? तू इथे रांगेत?”

ती दोन क्षण काहीच बोलली नाही. मला वाटले, ती मला उडवून लावेल किंवा रागाने म्हणेल, “तुझा काय संबंध?”

पण ती कसनुसं हसून म्हणाली, “वहिनीचे नाव आहे, मी नंबर लावून उभी आहे. वहिनी येतेय मागून.”

“येते माझ्याबरोबर? चहा घेऊ…”

“नको, नंबर जाईल माझा, पहाटेची येऊन उभी आहे.”

“पहाटेची?” माझ्या ह्रदयात कालवाकालव झाली.

तेवढ्यात शेजारच्या बायांची कुजबूज ऐकली…

“कोण शे व माय हौ?”

“तिना नवरा शे ना व? पण राहतंस नै संगे?”

“नवरा शे त जाऊन यू दे तिले. आपण सांभाळसू जागा”

“अंकू, जाऊन ये तू. आम्ही तुझी जागा ठेवू.” तिच्या मागची बाई बोलली. दोन मिनिटे ‘हो, नाही’ करत अंकिता माझ्याबरोबर यायला तयार झाली.

अंकिता माझी बायको, आमचा प्रेमाविवाह. तिची आर्थिक परिस्थिती बेतास बात तर मी खाऊनपिऊन सुखी दोघांचेही वडील वारलेले… दोघांच्याही घरून विरोध. पण कॉलेज संपल्या संपल्या मला सरकारी नोकरी मिळाली आणि अंकिताच्या घरच्यांचा विरोध मावळला. पण माझ्या आईचा कायम होता. पण मी अंकिताशीच लग्न करेन यावर ठाम राहिल्याने आईचा नाईलाज झाला. पण नंतर तिने अंकिताला कधी धड राहू दिले नाही. सतत कामात चुका काढणे, घालूनपाडून बोलणे सुरू केले. आता नवीन आलेली मुलगी सर्वगुणसंपन्न कशी असेल? सुरुवातीला सासूला घाबरून राहणारी अंकिता, मग उलट उत्तरं देऊ लागली… मग आईने तर राईचा पर्वतच केला.

हेही वाचा – गोष्ट कैकेयी आणि मंथराची… अमोल आणि सुशीलाची सुद्धा!

दुर्दैवाने, मीही फारशी शहानिशा न करता आईचीच बाजू घेऊ लागलो. शेवटी कंटाळून अंकिता माहेरी निघून गेली. आता दोन महिन्यांपूर्वी आईही आमच्या गावी गेली. तिथे काही प्रॉपर्टीचे हिस्से करायचे होते. त्यांनंतर मला एकेक गोष्टी कळू लागल्या. आईला तिच्या एका नातेवाईकाची मुलगी सून म्हणून आणायची होती, पण तसे न झाल्याने तिने तो राग अंकितावर काढला. आमच्या गावाकडच्या काकाकडून अनेक गोष्टी कळल्या. आईचा स्वभाव पहिल्यापासून एककल्ली, हेकट. पण माझ्या लक्षात आले नाही. वडील गेल्यावर आईनेच मोठे केल्याने आई म्हणेल, ते खरं असे वाटायचे. काही सारासार विचार करायचो नाही. तेवढं वय नव्हते, परिपक्वता नव्हती. आता घर खायला उठले होते. अंकितावर अन्याय केला हे समजत होते, पण तरीही तिनेच माफी मागून यावे, अशी पुरुषी मानसिकता होतीच. पण आज तिला पाहाताच तो गर्व, अहंकार गळून पडला.

मोटरसायकलवर माझ्यामागे पुरेसे अंतर ठेवून ती बसली. मी पाच मिनिटांच्या आंतरावर असलेल्या सत्यदीप हॉटेलकडे गाडी घेतली. एका कोपऱ्यात बसलो. फारशी गर्दी नव्हतीच.

मी अंकिताकडे नजर टाकली. ज्या ड्रेसमुळे मी तिला ओळखले, तो अगदी जुनाट झाला होता. लग्नाअगोदर मीच तिला घेऊन दिला होता. एकेकाळी प्रफुल्लित असलेला चेहरा कोमेजलेला होता. उन्हात फिरून रापलेली, कृष झालेली अंकिता हीच का? हा मला प्रश्न पडला.

“कशी आहेस?” मी विचारलं.

“तुझ्यासमोर आहे.”

“खूप खराब झालीस.”

“आठ महिने झालेत माहेरी आहे…”

“पण म्हणून?….”

“तुला काय कळणार नवऱ्याने सोडलेल्या बाईचे दुःख!”

“पण तू एवढे ताणून का धरले?”

“ताणून? माझे मामा दोनदा जाऊन आले… पण सासूबाईंनी अक्षरशः हाकलून लावले. कसा फोन करणार?”

“मला माहीतच नाही. कमीतकमी मला कॉन्टॅक्ट करायचा.”

“तू तर आमच्यकडचे कोणी दिसलं तर, तोंड फिरवून घ्यायचा.”

“सॉरी अंकू, खरंच माझ्याकडून चूक झाली.”

“तुझ्या आणि सासूबाईंच्या अशा वागण्यामुळे तू मला घटस्फोट देणार, असेच वाटू लागले  होते आम्हाला!”

“…आणि अंकू एकदम भांड्याच्या लायनीत वगैरे.”

“नवऱ्याला सोडून माहेरी आलेली मुलगी सगळ्यांना जड होते. आईच माझ्याबाजूने होती. भाऊ वहिनींना ही कायमची माहेरी राहते का ही चिंता… त्यात आमच्या गल्लीत तर सगळेच लोक मलाच दोष द्यायचे. माझी परिस्थिती तर…” तिने घाईघाईने रुमालाने डोळे पुसले. मला एकदम भरून आले. मी तिचा हात हातात घेतला. माझ्यासोबत असताना मऊ, मुलायम असलेला तिचा हात खरखरीत झाला होता. मी म्हणालो,

“अंकू? येते घरी?”

“कशाला? पुन्हा सासूबाईंनी हाकलून द्यायला?”

“ती गेलीय गावाकडे. दोन-चार महिने येणार नाही अजून… दहा मिनिटे बस. तुझ्या हातून चहा पाज पुन्हा. प्रॉमिस करतो.. वेडेवाकडे काहीच करणार नाही.”

“चल,” अंकिता नाही म्हणेल, आढेवेढे घेईल असे वाटले, पण ती लगेच तयार झाली.

मी घरी पोहचलो. कुलूप उघडून आत गेलो. दरवाजा लावला आणि अंकिताशी काही बोलणार तोच तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. बऱ्याच वेळ ती रडत होती, मी तिच्या पाठीवरून हात फिरवीत तिला शांत करत होतो. रडण्याचा जोर ओसरल्यावर मी तिला सोफ्यावर बसवले, तिला फ्रीजमधून पाण्याची बाटली आणून दिली.

“माहेरी माझी परिस्थिती विचित्र आहे, आई सांभाळून घेते, पण वहिनी सतत काम सांगत राहते. बोलताही येतं नाही. इथल्यापेक्षा दुप्पट काम. पण काय करणार? परतीचे रस्ते मीच बंद केले. मीच सुरुवातीला भांडून घर सोडून गेले…”

“नाही अंकू, तू घर सोडून गेली नाही, तुला भाग पाडले माझ्या आईने! सतत बोलून बोलून  तुझा अपमान करून…”

“म्हणजे, तुला…”

“हो, मला सगळं समजलं आहे. माझीही चूक होती की, मी तुला काही विचारले नाही. दुसरी बाजू विचारात घेतली नाही.”

“जाऊदे, आता काय उपयोग?”

“उपयोग कसा नाही? आजपासून आत्तापासून तू या घरात राहायचे. मालकीण म्हणून, माझी अर्धांगिनी म्हणून. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर…”

“विश्वास नसता तर, एवढे जीव तोडून प्रेम केले असते का? पण तू असा मला रांगेतून घेऊन आला. वहिनीला काय वाटेल? आईला काय वाटेल?  पुढे काही झाले तर माहेरचं दारही कायमसाठी बंद होईल…”

“बरं… तू चहा ठेव मी आलो पाच मिनिटांत.”

पाच मिनिटांत मी आलो तेव्हा माझ्याबरोबर आणखीही काही लोक होते.

“अंकू… हे बघ कोण आलेत, तू सगळ्यांना ओळखते. हे शेजारचे देशपांडेकाका, हे पाटीलकाका आणि काकू, या संत मॅडम, या महाजनमावशी… या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो अंकू की, तुला फुलासारखे जपेन, कुठलाही त्रास होऊ देणार नाही. आजपासून आपला नवीन संसार सुरू झाला असे समज.”

“ते सगळे कबूल पण सासूबाईंचे काय? माझ्या वाहिनीचे काय?”

मी फोन हातात घेतला. तिच्या वहिनीला फोन लावला…

“हॅलो, ताई, मी बोलतोय सक्षम. मी अंकिताला माझ्या घरी घेऊन आलो आहे कायमचा. आता आम्ही दोघे आणि शेजारचे चारपाच लोक उपनगर पोलीस स्टेशनला जात आहोत, तिथे मी सगळयांसमोर स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहे की, अंकिताला सासरी कोणताही त्रास झाल्यास त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर राहील. तर, तुम्ही, आई आणि अंकिताचा दादा तिथे सगळे या सह्या करा आणि एक कॉपी तुमच्याजवळ ठेवा… काय म्हणता?… चालेल चालेल.”

हेही वाचा – होप फॉर द बेस्ट!

“अरे, एकदम पोलीस स्टेशन कशाला? तू किंवा आईंनी मला कधी मारहाण केली नाही. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही काही केस केली नाही तुझ्याविरुद्ध!”

“अगं, ते सांगण्यासाठी. मी पोलिसांचे नाव सांगितले नसते तर, तुझ्या वाहिनीने कदाचित थयथयाट केला असता. चल, आता सगळ्यांसाठी गोड चहा बनव आणि त्यांचे तोंड गोड कर.”

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी येऊन घरीच स्टॅम्प पेपर बनवून त्यावर सह्या करायचे कबूल केले, ते माझ्या आईला घाबरवण्यासाठी. कारण अंकूची काहीही चूक नसताना ती तिला त्रास देत होती. त्यातही पोलिसांचा उल्लेख करण्याचे ठरवले!

आम्ही सगळ्यांच्या पाया पडलो. सगळे गेल्यावर मी अंकिताला म्हणालो…

“चल तयार हो. अशीही ऑफिसला दांडी झालीच आहे, तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणि साड्या घेऊन येऊ.”

“अरे, आहेत ना? माहेरी पडलेत कपडे. सुटकेसही आणावी लागेल.”

“सोड ते जुने कपडे. नवीन कपडे घेऊ आणि नव्याने संसार सुरू करू… आणि एक भांड्यांचा सेटही घेऊ.”

“भांड्यांचा सेट कशाला? घरी भरपूर भांडी आहेत.”

“तुझ्या वहिनीला द्यायला नको! तू भांड्यांची रांग सोडून माझ्यासोबत पळून आली म्हणून…”

“पळून नाही आली… तू गोड बोलून माझे अपहरण केले,” माझ्या खांद्यावर लटकी चापट मारत अंकिता म्हणाली.

अंकिता आणि मी बाहेर निघालो, तेव्हा तळपते ऊन असूनही मला चांदणे पडल्यासारखे वाटतं होते आणि माझी मोटरसायकल रस्त्याच्या सहा इंच वरती ‘उडत’ होती, कारण अंकू मला घट्ट धरून बसली होती. त्या स्पर्शात माझ्याबद्दलचे प्रेम आणि विश्वास होता!

आमचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!