यावर्षीचा गणपती सदूकाकाशिवाय साजरा होणार, हे मानायला मन अजूनही तयार नाही. पण काही गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं. सदूकाकाचं जाणं असंच चटका लावणारं होतं. गेल्या वर्षी नुकताच पाऊस सुरू झाला होता कोकणात. आकाश फाटल्यागत तो कोसळत होता. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. घरी परतणाऱ्या सुनीलने सदूकाकाच्या दरवाजावर हाताच्या केविलवाण्या पडत असलेल्या थापा ऐकल्या… त्याने ताबडतोब त्याची बाईक काकाच्या घरासमोर लावून तो दरवाजाच्या जवळ आला… काकांना हाक मारून दार उघडायला सांगितलं, काकाने कसंबसं दार उघडलं… पण तो दारातच कोसळला. सुनीलने लगेच आम्हाला फोन करून बोलावून घेतले. धावत-पळत पुढच्या पाच मिनिटात आम्ही सगळे पोहोचलो. पण तोवर सगळं संपलं होतं. सुनीलच्या मांडीवरच काकाने शेवटचा श्वास सोडला होता…
पूर्वी जसजसा गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस जवळ यायला लागायचा तसतशी आमच्या सदूकाकाची पावलं एसटी डेपोकडे वळायला सुरवात व्हायची. दरवर्षी तितक्याच उत्सुकतेने आणि मोठ्या आशेने काका तिथे वाट बघत उभा असायचा त्याच्या मुंबईहून येणाऱ्या मुलांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची! आता त्या निराशेची सवय झाली होती म्हणा काकाला… पण घराकडे परतताना मात्र तो आळीत येणाऱ्या मुंबईकर चाकरमान्याचे सामान रितसर घरी आणून पोहोचतं करायचा.
हेही वाचा – मायेचा रहाट…
आण्णा म्हणजे आमचे वडील. त्यांच्याकडून कैकदा मी सदूकाकाच्या घरच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी ऐकल्या आहेत. इथल्या लाल मातीशी बेईमान झालेले आणि मुंबईत टोलेजंग इमारतीमध्ये रहाणारे काकांची मुले कित्येक वर्ष कोकणाला विसरून गेले आहेत… गाडी सुटल्यावर मागे पडणाऱ्या स्टेशनप्रमाणे.
“जीवात जीव आहे तोवर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना मी करणारच. तो बाप्पा माझ्याकडून झालेली त्याची सेवा आजवर गोड मानून घेत आला आहे. त्याला सगळं समजतं. पण पोटच्या पोरांनी मात्र मला आणि इथल्या मातीला वाळीत टाकलं आहे, याचं खूप दुःख होतं मला…” असं म्हणत धोतराच्या सोग्याने डोळे पुसणारा काका आठवला की, मन बेचैन होतं माझं. काकाने गेल्यावर्षी पंच्याहत्तरी ओलांडली होती, पण तरीसुद्धा एकट्याने घर, गोठा आणि शेती सांभाळली त्याने पोटच्या पोरांप्रमाणे.
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
आम्ही आळीतील मोठ्या मुलांनी मात्र गेली काही वर्षे एक परंपरा जपली होती. आपापल्या घरातील गणपतीचा मखर सजवून आरास करून झाली की, आमचा मोर्चा वळायचा सदूकाकाच्या घरी. रात्रभर जागून काकाचा मखर आम्ही मुलं सजवून द्यायचो. मानाचा गणपती, काकाकडे पहिल्यांदा विराजमान व्हायचा. आख्ख्या आळीतील माणसं या आगमन सोहळ्यात सहभागी व्हायची. तेव्हा काकाचे भरून पावणारे डोळे आमचा उत्साह दुपटीने वाढवायचे. काकाकडे बाप्पा विराजमान झाले की, मागे आळीतील घरात एकामागोमाग एक बाप्पा यायला सुरुवात व्हायची.
आळीत घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्याची लगबग सुरू असताना अचानक सदुकाकाची आठवण झाली मला… यंदा मानाच्या गणपतीशिवाय उत्सव साजरा होणार, हे कटू सत्य पचवायची ताकद तूच दे रे गणराया…!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


