Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितपरतवून लावलेला दरोडा

परतवून लावलेला दरोडा

चंद्रशेखर माधव

मी पुण्यात पर्वती परिसरात रहातो. आमच्या इमारतीच्या मागेच पर्वती टेकडी आहे. एकूण परिसर हवेशीर आणि निसर्गरम्य आहे. पण परिसर तसा मोकळा असल्याने पहिल्यापासूनच भुरटे चोर वगैरे येण्याचे प्रमाण जरा जास्त आहे.

साधारणपणे 15-16 वर्षांपूर्वीची, म्हणजे 2007-2008मधील घटना असेल. मध्यरात्री पावणेबाराचा सुमार होता. माझ्या घराच्या मागच्या खोलीमध्ये बाहेर जाण्याचा अजून एक दरवाजा आहे. त्या दरवाजाला कडी लावली आहे की नाही, हे पहात असताना माझ्या असं लक्षात आलं की, बाहेरील लोखंडी दरवाज्याला एक माणूस कडी लावत आहे. लक्षात आल्यानंतर मी हळूच पत्नीला खूण करून शांत राहण्याला सांगितलं आणि तिला खुणेनेच सांगितलं की, बाहेर कुणीतरी आहे आणि मी मुख्य दरवाजाने बाहेर जाऊन त्याला धरतो. माझा मुलगा त्यावेळी लहान होता आणि झोपलेला होता. मी काठी घेतली आणि हळूच मुख्य दरवाजा उघडला. बाहेर जाऊन मागून त्याला धरायचं, असा माझा मानस होता.

काठी घेऊन बाहेर आलो आणि वळून इमारतीच्या पुढच्या बाजूला यायला लागलो. अचानक माझं समोरच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे लक्ष गेलं. तिथे सुमारे पाच ते सहा जण तोंडाला रुमाल बांधलेले, टी-शर्ट आणि हाफ चड्डी घातलेले, उभे होते. मला पाहता क्षणीच त्यांनी त्यांच्याजवळ असलेले दगड खिशातून काढले आणि भराभर माझ्या दिशेने भिरकावले. सुमारे पाच ते सहा दगड अचानक माझ्या दिशेने आले. असं काही होईल याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. जसे दगड माझ्या दिशेने आले तसे मी परत घराकडे पळालो आणि मुख्य दरवाजा लावून घेतला. फोनकडे धावलो आणि इमारतीतल्या तसेच आजूबाजूच्या दोन-तीन जणांना फोन केले.

हेही वाचा – ब्लेझर आणि 45 दिवस

एव्हाना बाहेर असलेले दरोडेखोरांची टोळी कुठे गेली, याची मला काहीही कल्पना येणं अशक्य होतं. फोन केल्यानंतर दोन-तीन जणांना सर्व प्रसंग कथन केला. हळूहळू एक एक दरवाजा उघडू लागला. दिवे लागले आणि इमारतीच्या वरच्या मजल्यावर लोक गोळा झाले. आजूबाजूला चाहूल येऊ लागल्यावर मी परत काठी घेऊन बाहेर आलो. बाहेर पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे दरोडेखोरांचा काहीही मागमूस नव्हता. इमारतीतल्या कोणीतरी पोलिसांना फोन केला. सुमारे दहाच मिनिटांत पोलिसांची एक जीप दोन-तीन हत्यारबंद पोलिसांसह दाखल झाली.

पोलिसांची गाडी दाखल झाल्यानंतर गाडीजवळ गेलो आणि त्यांना सर्व वृत्तांत कथन केला. पोलीस पटापट खाली उतरले. आम्ही बिल्डिंगच्या आजूबाजूच्या परिसरात थोडा शोध घेतला. त्यानंतर एकूण परिसर पाहून पोलिसांचं असं मत झालं ते दरोडेखोर बहुदा मागच्या डोंगरावर पळाले असावेत. म्हणून आम्ही मागच्या रस्त्याने पर्वतीच्या डोंगराकडे जीपमधूनच गेलो.

जीप चालवणारा पोलीस सुमारे 50 ते 51 वर्षाचा असावा. त्याही वेळी त्या वळणावळणाच्या सुमारे एक ते सव्वा किलोमीटर रस्त्यावर त्या अनुभवी ड्रायव्हरने ज्या पद्धतीने अत्यंत कौशल्याने आणि चपळाईने ती जीप तातडीने मागच्या डोंगरावर नेली ते वाखाणण्यासारखं होतं.

हेही वाचा – …आणि मी “डॉक्टर” झालो!

डोंगरावर आजूबाजूच्या सर्व परिसरात शोधाशोध केली पण दरोडेखोर सापडले नाही. ते केव्हाच पळून गेले असणार, असं एव्हाना आमच्या लक्षात आलं. साधारण अर्ध्या तासाने आम्ही इमारतीपाशी परतलो. थोडा वेळ पोलिसांशी गप्पा वगैरे झाल्यानंतर पोलीस जायला निघाले. ते जसे जायला निघाले, तसं साधारण 200 मीटर अंतरावर एका इमारतीच्या मागून सर्व दरोडेखोर अचानक बाहेर आले आणि समोरच्या मोकळ्या मैदानाच्या दिशेने धावत सुटले. मधे तारेचे कुंपण होतं. दरोडेखोरांनी तारेच्या कुंपणावरनं उड्या मारल्या आणि पळून गेले. हा सर्व घटनाक्रम आमच्या डोळ्यासमोर घडत होता, पण आम्ही काहीही करू शकलो नाही. फक्त हताशपणे पाहत राहणे एवढेच आमच्या हातात होते.

दुसऱ्या दिवशी सर्व परिसरात हा चर्चेचा विषय झाला. संध्याकाळच्या वेळी जेव्हा मी घरी पोहोचलो, तेव्हा इमारतीच्या बाहेर काही लोक गप्पा मारत होते. त्यामध्ये, दोन इमारत पलीकडे राहणारी, एक मध्यमवयीन महिला उभी होती. बोलता बोलता ती सहज बोलून गेली “हो, दरोडेखोर आमच्या इथेच उभे होते. मी बघितलं, सुमारे 30 ते 35 मिनिटं तिथेच होते.”

हे वाक्य ऐकल्यानंतर मी अत्यंत उद्वेगाने आणि संतापाने एकदा त्या महिलेकडे बघितलं. पण माझी काहीही बोलण्याची इच्छा झाली नाही. मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला आणि तिथून चालता झालो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!