Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » पश्चात्तापदग्ध राजयोगिनी कुंती…
    अवांतर

    पश्चात्तापदग्ध राजयोगिनी कुंती…

    Team AvaantarBy Team AvaantarNovember 7, 2025No Comments9 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, कुंती, राजयोगिनी कुंती, सूर्यपुत्र, कर्ण अर्जुन, पांडव, कुंती शाप, कुंती कर्ण भेट, महाभारत युद्ध, पाच पांडव,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    भाग – 2

    पंडू महाराजांनी काही दिवसांनी मद्र देशची राजकन्या ‘माद्री’शी दुसरा विवाह केला. मला आता माझे सुख-दुःख सांगायला एक सखी मिळाली होती.

    काळ झपाट्याने पुढे सरकत होता… पंडू राजांना शिकारीचा अतिशय नाद होता. त्याकरिता ते सारखे वनात जात असत. एकदा असेच मला आणि माद्रीला सोबत घेऊन ते शिकारीला गेले असताना किदंब ऋषी हरीणाच्या रुपात आपल्या पत्नीसोबत रतीक्रीडेत मग्न असताना पंडू महाराजांनी त्या जोडप्यावर बाण सोडला, त्यामुळे ते दोघेही घायाळ झाले आणि त्यांनी महाराजांना शाप देत प्राण सोडला. त्या शापानुसार महाराजांनासुद्धा आपल्या पत्नीसोबत कामक्रीडा केली तर मरण येणार होते… या घटनेमुळे पंडू महाराज अत्यंत दुःखी झाले. ते वैराग्यासारखे वागू लागले. हस्तिनापुराला आता आपला वारस मिळणार नाही, या विचाराने खंगत चालले होते. मला त्यावेळी एकदम त्या दिव्य वशीकरण मंत्राची आठवण झाली…

    महाराजांची अनुमती घेऊन मी यमराजांपासून युधिष्ठीर, पवनकुमारांपासून भीम आणि इंद्रदेवांपासून अर्जुन तसेच माद्रीलाही हा वशीकरण मंत्र सांगून अश्विनीकुमारांपासून दोन जुळे पुत्र, नकुल आणि सहदेव, प्राप्त केले. यावेळी मला त्या सूर्यपुत्राची आठवण झाली; पण लगेच तो विचार मी झटकून टाकला. आता मला खऱ्या अर्थाने कळले होते की, दुर्वास मुनींनी मला हा मंत्र का सांगितला होता!

    काही दिवसांनी पंडू महाराजांचे निधन होऊन माद्री त्यांच्यासोबत सती गेली. पाचही पुत्रांची जबाबदारी आता माझ्यावर होती. मी हस्तिनापुरला परत गेले; पण माझ्या मुलांना राजगादीवर त्यांचा हक्क मिळणार नव्हता. कारण धृतराष्ट्र महाराज त्यावेळी हस्तिनापूर नरेश होते आणि त्यांची लालसा ते आपल्या पुत्राला राजा बनवून पूर्ण करू पाहात होते. त्याकरिता आम्हाला लाक्षागृहात जाळुन मारण्याचा कट शिजला, पण विदूर महाराजांमुळे आम्ही वाचलो. आम्ही राज्याचा अर्धा हिस्सा मागितला तर, आम्हाला खांडववन दिले जिथे फक्त वैराण भूमीशिवाय काहीच नव्हते… पण माझ्या पाचही पुत्रांनी त्यावर मात करून कृष्णाच्या मदतीने इंद्रप्रस्थ नावाची सुंदर नगरी वसवली. पण तेही दुर्योधनाला पाहवले गेले नाही.

    द्रौपदी स्वयंवराचा पण दुर्योधन जिंकू शकला नव्हता… युधिष्ठीराला ज्येष्ठ पंडूपुत्र म्हणून वारसाहक्कने राजगादी मिळणार होती, त्यामुळे त्याच्या मनात राग होता. म्हणून त्याने आपल्या मामाला शकुनीला हाताशी धरून द्युतक्रीडेचे आयोजन केले. त्यामध्ये त्याला त्याचा मित्र अंगराज कर्णाने साथ दिली. या कर्णाबद्दल मी जेव्हा ऐकले की, तो जन्मतःच कवचकुंडलधारी आहे, तेव्हा माझे मन भूतकाळात घडलेल्या त्या घटनेचा मागोवा घेऊ लागले… कवचकुंडलधारी कर्ण म्हणजे मी जे बाळ पाण्यात सोडले होते, तेच तर नव्हे? अशा अनेक शंका माझ्या मनात येऊ लागल्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला लवकरच मिळणार होती.

    द्युतामध्ये पांडव आपले सर्वस्व हरले, द्रौपदी दावावर लावण्यात आली… मी ऐकून सुन्न झाले. युधिष्ठीरासारखा धर्मराज खेळात इतका लयाला कसा गेला? दुर्योधनाने तिचा अपमान करून दु:शासनास तिचे वस्त्रहरण करायला सांगावे? आणि तेही भर राजसभेत? सगळया वीर पुरुषांच्या उपस्थितीत? मी किंवा महाराणी गांधारीने तेव्हा हा अनर्थ का थांबवला नाही? यानंतर परिस्थिती खूपच विकोपाला गेली आणि त्याचे पर्यावसान महायुद्धात झाले.

    हेही वाचा – राजयोगिनी कुंती अन् दुर्वास ऋषी

    युद्धभूमीवरच्या रोजच्या बातम्या ऐकून मन विषण्ण व्हायचे! एकाच घरातील भावंडे आपापल्या हक्कासाठी आपापसात युद्धाला तयार झाले होते. रीतिरिवाजांचा, नातेसंबंधांचा गळा रोज घोटला जात होता.

    युद्ध सुरू होऊन पंधरा दिवस झाले होते, मला आता माझ्या पुत्रांची काळजी वाटू लागली होती. त्यासोबतच नकळत माझे मन त्या कवचकुंडलधारी कर्णाबद्दलही चिंतीत झाले. मला रात्रभर झोप लागेनाशी झाली… हृदय चिंता आणि काळजीने पोखरले जाऊ लागले. मी तशाच बेचैन अवस्थेत श्रीकृष्णाकडे धाव घेतली. जो माझा भाचा होता आणि आमचा हितचिंतकही! नेहमी सत्य आणि धर्माच्या बाजुने लढणारा… मी त्याला माझी समस्या सांगितली तर, तो गूढ हसला. मला आपल्याजवळ बसवून सांगू लागला की, तुझे ‘कोणतेही’ पाच पुत्र या युद्धात वाचतील. ‘कोणतेही’ म्हटल्यावर माझे कान टवकारले… त्याच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही; तो म्हणाला, “आत्या, तू ऐकले ते बरोबरच आहे. पांडव हे नेहमी पाचच राहतील, ते सहा असूच शकत नाहीत.”

    मी गोंधळले… तसा तो पुढे म्हणाला, “होय, तुझी शंका खरी आहे. कवचकुंडलधारी कर्ण तुझाच पुत्र आहे. ज्याला तू नदीत सोडून दिले होते. या युद्धात एकतर अर्जुन राहील किंवा कर्ण! पण कौरवांना पराजित करण्याकरिता तू यावेळेस कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगून तू त्याची मदत घेऊ शकते.” मला काय बोलावे ते सुचत नव्हते, इतक्या वर्षांनी माझी जखम भळभळा वाहात होती, कोणत्या तोंडाने मी त्याच्याकडे जाणार होते? पण इथेही त्याच्याबाबतीत माझी अनास्थाच आडवी आली! माझ्या औरस पुत्रांकरता मी एकदा परत माझ्या या अनौरस पुत्रास जीवनातून उठवणार होते. मी त्याची जन्मापासूनच हाडवैरीण ठरवले होते. समस्त स्त्री जातीकरिता कलंक होते, पण मी परिस्थितीपुढे लाचार होते…

    नियतीने माझ्या नशीबी अजून कोणकोणते भोग निर्माण करून ठेवले होते, हे त्या विधात्यालाच माहिती होते. संसारात असूनही मी संन्यस्त जीवन जगले होते. राजपाट पदरी असतानाही एखाद्या योगिनीसारखे सगळे समर्पित करत गेले. दुर्वासांच्या वरदानाचे गर्भितार्थ एकामागून एक उलगडत गेले… सूर्यदेवांनी म्हटल्याप्रमाणे मी अबाधित राहून आपले कर्तव्य पार पाडले होते. नियतीने माझी क्षणोक्षणी कठोर परीक्षा पाहिली होती… आताही मला तिने एका अशाच कठीण वळणावर आणून सोडले होते. माझी कर्णासमोर जायची हिंमत होत नव्हती… तरीपण मला नाईलाजाने त्या दानवीर कर्णाकडे माझ्या वंशाला वाचवण्यासाठी जावेच लागणार होते. त्याला मरणाच्या दारात लोटून माझ्या पुत्रांकरिता अभयदान मागावे लागणार होते. माझी मलाच लाज वाटत होती, पण तरीही मी कर्णाकडे जाण्यास स्वतःस तयार केले.

    मी मोठ्या हिमतीने कुरुक्षेत्री दाखल झाले, तिथले दृष्य पाहून मी घाबरून अस्वस्थ झाले… कर्णाच्या शिबिरासमोर येऊन उभे राहिले. कर्ण माझा पुत्र… दुःखाने व्याकुळ होऊन मी माघारी फिरणार, तोच त्याचा धीरगंभीर आवाज कानावर पडला, “राजमाता कुंतीदेवी? आपण या क्षणी इथे माझ्या शिबिरात कशासाठी आल्या आहात? आणि आल्याच आहात तर माघारी का फिरलात? माझ्याकडे आपले काही काम होते का? की चुकून आपण येथे आल्या आहात?” मला आता राहवले गेले नाही… मी त्याच्याजवळ जाऊन त्याला आलिंगन दिले, माझ्या डोळ्यांतून अश्रूंचा पुर वाहु लागला. तो भांबावला, त्याला काहीच समजत नव्हते, त्याने मला अलगद स्वतःपासून दूर केले आणि मला शांत करत मंचकावर बसवले. मला त्याला पाहून कुठलेच दान मागायची इच्छा उरली नाही… मला आता माझ्या कर्णासकट सहाही पांडव हवे होते!

    हळूहळू मी स्थिर झाले, सारे बळ एकवटून मी त्याला म्हणाले, “हे दानवीरा आज एक आई तुझ्याकडे आपल्या पुत्रांचे जीवनदान मागायला आली आहे. तू अधर्मी दुर्योधनाची संगत सोडून धर्माच्या बाजूने, पांडवांच्या बाजूने या संग्रामात भाग घे. मी तुला हे आता तुझी आई म्हणून सांगते आहे. इतकी वर्षे मी तुला दूर सारले, पण आता मला हे सगळे असह्य होत आहे… मला माझे पाच पांडव आणि सहावा तू ज्येष्ठ कुंतीपुत्र कर्ण हवे आहेत. मी तुला जन्मतःच जलाशयात सोडून अक्षम्य चूक केली आहे, मी तुझी अपराधी आहे, हे सूर्यपुत्रा… तू सूर्यापासून उत्पन्न झालेला कौंतेय आहेस! मला क्षमा कर, पण आता माझ्यापासून दूर जाऊ नकोस…”

    मी एका श्वासात त्याला माझ्या आणि त्याच्या नात्यातील वीण उलगडून दाखवली. तो अवाक् होऊन माझ्याकडे पाहात होता… एकटक. आम्ही दोघेही निःशब्द होऊन एकमेकांना न्याहाळत होतो, दोघांचीही द्विधा मनःस्थिती होती. पण त्याला सगळे सांगितल्यामुळे माझ्या मनावरचा इतक्या वर्षांचा ताण कमी झाला होता, आता परिणामांची पर्वा न करता मी सगळया जगाला ओरडून सांगितले असते की, ‘हो, हा कर्ण सूतपुत्र नसून ज्येष्ठ पांडव कौंतेय आहे.’ पण तो स्तब्ध होता, माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात मला म्हणाला, “आपण माझ्याकडे दान मागायला आल्या आहात आणि तेही रणांगणावर, माझ्या पराक्रमाची आपल्याला एवढी भीती वाटली का? की, या अटीतटीच्या क्षणी तुम्ही मला माझ्या जन्माचे रहस्य सांगून मला कमकुवत करण्यासाठी इथे आल्या आहात?” अशी प्रश्नांची सरबत्ती त्याने केली.

    “मला पांडवांच्या बाजूने लढायला सांगून माझ्या आणि दुर्योधनाच्या मैत्रीमध्ये विष कालवू पाहता आहात? मला आता कौंतेय म्हणून आपला स्वार्थ साधण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर, ते शक्य नाही. जिने माझे पालनपोषण करून मला आईचे प्रेम दिले, तिच्याशी माझे अतूट नाते आहे… तुम्ही मला जलात सोडून दिले, पण तिने मला जीवनदान दिले, मी तिचा पुत्र नाही, हे तिने कधी मला जाणवूच दिले नाही… तिच्याशी मी प्रतारणा करू म्हणता? नाही, नाही, ते शक्य नाही! मी कौंतेय नाही, राधेयच आहे… माझ्या अधिरथ बाबांचा!, मी जरी आपणास माझी आई मानण्यास तयार नसलो तरी, आपण माझ्या दारात दान मागायला आल्या आहात. मी कोणालाही आजपर्यंत विन्मुख पाठवलेले नाही. त्यामुळे मी अंगराज कर्ण आपल्याला वचन देतो की, तुमचे पाचही पुत्र जिवंत राहतील. माझ्या हातून अर्जुनाशिवाय कोणाचाही वध होणार नाही. या युद्धात आपल्या पुत्रांपैकी एक तर कर्ण जिवंत राहील किंवा अर्जुन! या आपण…” तो घडाघडा बोलत होता मी नुसती ऐकत होते, माझे शब्द खुंटले होते.

    पायात त्राण नसल्यासारखी चालत मी त्याच्या शिबिरातून बाहेर पडले, निघताना त्याचे ते तेजस्वी रूप डोळ्यात साठवून घेतले, पण त्याचे निलवर्णी कवचकुंडले मात्र त्याच्या शरीरावर मला या वेळेस दिसली नाहीत. ते पाहून माझे मन थोडे धास्तावले होते…

    कौरव आणि पांडवांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले होते. लाखो जीव युद्धात कामी आले होते, गुरुवर्य द्रोण, सात्यकी, शाल्वनरेश, सिंधुनरेश जयद्रथ, माझा लाडका अभिमन्यू असे एकामागून एक महावीर धाराशयी पडत होते. अभिमन्यूला तर द्रोण, कृपाचार्य, दुर्योधन, शकुनी, कर्ण, जयद्रथ यांनी चक्रव्यूहात घेरून अत्यंत क्रूरतेने आणि कपटाने मारले होते. याचाच सूड घेण्यासाठी पांडव पुढे सरसावले होते, अर्जुनाच्या बाणाने या सर्वांचा वेध घ्यायला सुरुवात केली… सारथ्य अर्थातच श्रीकृष्ण करत होता. आता कौरवांच्या बाजूने कर्ण आणि पांडवांच्या बाजूने अर्जुन समोरासमोर होते… दोघेही श्रेष्ठ वीर होते, आपले अमोघ अस्त्र चालवण्यात निपुण होते. कोणीच मागे हटायला तयार नव्हते. पण घात झाला, कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत फसले, तो रथावरून खाली उतरला, तो नि:शस्त्र होता! युद्धात नि:शस्त्र वीरावर बाण चालवायचा नसतो, हा नियम होता. अर्जुनानेही क्षणभर विश्रांती घेतली, पण श्रीकृष्णाने त्याला लगेच त्याच्या अभिमन्यूची आठवण करून दिली अन् तो अर्जुनाला म्हणाला, ‘हीच योग्य वेळ आहे कर्णाला मारण्याची! अन्यथा, त्याला हरवणे तुला कठीण जाईल. तो तुझ्या कंठाचा वेध घेईल…’ शेवटी अर्जुनाने कर्णाचा वेध घेतला…

    माझा कर्ण धारातिर्थी पडला… मी रणांगणावर कर्णाच्या शवाजवळ बसून विलाप करू लागले, ते पश्चात्तापाचे अश्रू होते… मला विलाप करताना पाहून युधिष्ठीर, अर्जुन यांना आश्चर्य वाटले! कर्णासाठी आपली आई का रडते आहे, हेच त्यांना कळत नव्हते. मग मीच उकल केली, ‘कर्ण हा तुमचा मोठा भाऊ होता,’ हे सांगितले. कृष्णाने त्यामागील सविस्तर कथा त्या दोघांना सांगितली, ते ऐकून धर्मराजाच्या रागाचा पारा चढला आणि मी अजून एका शापाला बळी पडले. त्याने माझ्यासोबत समस्त स्त्री जातीकरिता शाप उच्चारला की, या घटनेनंतर ‘जगातील कोणतीही स्त्री आपल्या पोटात गुपित दडवू शकणार नाही…’ मी माझ्या कृत्याने सर्व स्त्री जातीला शापित केले होते.

    हेही वाचा – नागपूरची प्रसिद्ध काळी पिवळी मारबत!

    आज खऱ्या अर्थाने मी संन्यस्त झाले होते… मला आता कशाचीच आसक्ती उरली नव्हती. माझ्या एका कृत्याने मी अपमानीत झाले होते आणि ते स्वाभाविकच होते… माझ्याबद्दल कोणाच्या मनात काय शंका उपस्थित होत असतील देव जाणे! पण असे जगणे कोणत्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये. यथावकाश मी पण धृतराष्ट्र महाराज आणि देवी गांधारीसोबत वानप्रस्थाश्रमाचा मार्ग स्वीकारला, कारण आता तोच एकमेव मार्ग माझ्याजवळ उरला होता, माझ्या पश्चात्तापदग्ध आयुष्याला तिथेच विरामचिन्ह लागणार होते… एक दिवस वनामधे आग लागून त्याच तेजोनिधीच्या ज्वाळांनी मला आपलेसे केले… ज्यांच्यामुळे माझ्या आई असण्यावर, तिच्या ममतेवर प्रश्नचिन्ह लागले होते! मी मुक्त झाले होते, आगीतून निर्माण झालेल्या त्या तेजोवलयात विलीन झाले होते… अबाधित झाले होते…

    समाप्त

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    आनंदी जगायला काय लागतं?

    March 23, 2026 अवांतर

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026 अवांतर

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026 अवांतर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    अवांतर

    आनंदी जगायला काय लागतं?

    By सुधीर करंदीकरMarch 23, 2026

    जागतिक आनंद दिन (International Day of Happiness) दरवर्षी 20 मार्चला जगभर साजरा केला जातो. लोकांना…

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Waterloo Teeth… मानवतेला एक तडा!

    March 11, 2026

    डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!

    March 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn