हिमाली मुदखेडकर
कोणते नाते म्हणू हे, ना टाळणे ना गुंतणे
का तरी माझे तुझे हे, सोबतीने चालणे…
इयत्ता सहावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही दोघी पहिल्यांदा भेटलो. तिच्याच घरी तिच्या घराची वास्तुशांत होती. मी आजीसोबत गेले होते. माझ्यापेक्षा दोनच वर्षानी मोठी होती ती… पण घरातील सगळी कामे अशी काही चटाचट करत होती की, मी पाहातच राहिले! स्वयंपाकघरापासून ते आला-गेला पाहुण्याचे आगतस्वागत… पूजेची तयारी… कुणाला काही हवे नको… सगळे एक हाती सांभाळले होते तिने.
“रजनीSSS…हे कुठे ठेवलंय…?”
“रजे… त्या अमुक माणसाला किती पैसे द्यायचे?”
“रजनी डाळ कोणत्या डब्यातून घ्यायची?”
“पूजेची पान-सुपारी कुठे ठेवली आहे?”
“पंचपाळे भरून ठेवले का?”
“दाराला तोरण लावले का?”
प्रत्येकाच्या तोंडी हिचेच नाव…!
एवढ्या लहान वयात इतक्या सराईतपणे सगळे हाताळणारी रजनी माझ्या बालवयात खरंच खूप आवडून गेली… सावळ्या रंगाची सडपातळ बांध्याची सरळ तेज नाक असणारी रजनी, तेव्हापासून कशी, कधी आणि किती माझी होत गेली… हे सांगताच येणार नाही.
हेही वाचा – सुलू… हवी मायेची गुंतवणूक!
कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील ती होती. त्यामुळे सामान्यतः असणारी आर्थिक चणचणीची झळ तिला लहान वयातच जाणवली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत शिवणकाम करून आलेल्या पैशातून कुणाची तरी जुनी पुस्तके ती विकत घेत असे, शाळेच्या अभ्यासासाठी… ट्यूशन क्लास वगैरेची चैन तिला परवडणारी नव्हती!
शाळेत शिकलेल्या आणि स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर ती दरवर्षी फर्स्टक्लास मिळवत असे. अतिशय मेहनती आणि कष्टाला मागे न हटणारी रजनी खूप स्वाभिमानी आणि मनाने निर्व्याज होती…
तिच्या वयाच्या इतर मुलींकडे असणार्या उंची वस्तूंचा किंवा समृद्धीचा तिला कधी हेवा वाटला नाही. घरातील सर्वात थोरली असल्याने पाठच्या बहीण, भावांचे संगोपन ओघानेच तिच्याकडे आलेले. पण, म्हणून कसलीही ताईगिरी किवा दरारा नव्हता. सतत आपल्या माणसांसाठी झटत राहण्याची मात्र वृत्ती होती.
कष्टाळू रजनीने मेहनतीच्या जोरावर सरकारी शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली आणि आता तिच्या आयुष्याला स्थैर्य अन् सांपत्तिक सुबत्ता लाभू लागली. मुळातच समाधानी वृत्ती असणार्या रजनीचे या काळातील रूप फारच आश्वासक आणि आधार देणारे वाटायचे मला! तिचा सल्ला नेहमी वास्तववादी आणि संयत असायचा आणि सांगणेही फारसे ठासून किंवा जाचक नसे… अतिशय सौम्य शब्दांत पण प्रभावी पणे ती सांगे!
आम्ही दोघी एकमेकींच्या आयुष्यात खूप जास्त लुडबूडही नव्हतो करत आणि अगदीच अलिप्तही नव्हतो… प्रत्येक अडीअडचणीला, गरजेला न सांगता ती माझ्या पाठीशी उभी होती, मला हवा असणारा मानसिक आधार तिने कायम दिला…
हेही वाचा – भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान
तिचं असणं म्हणजे पिठात मिसळून जाणार्या मीठासारखं होतं. जे आपलं असणं फार दाखवत नाही, पण नसले की पदार्थ बेचव होतो!
गेली किती तरी वर्षे आम्ही एकमेकींकडे जात-येत होतो… भेटत होतो… मागील वर्षी सुद्धा आमची नेहमीप्रमाणे भेट झाली… आणि का कुणास ठाऊक मी तिला म्हणाले, “मला तुला एक छान साडी घ्यायची आहे. तुझ्या पसंतीने…” तिने हसून उडवून लावले माझे म्हणणे… म्हणाली,
“कशासाठी?.. आता ना काही कार्य ना प्रसंग?”
पण मी हट्टाने घेऊनच गेले तिला… आणि घेतली तिच्यासाठी छान पिस्ता कलरची शिफॉन साडी! मला मनापासून समाधान वाटले… माझ्या सखीला सोबत नेऊन तिचे लाड करण्याची मला नव्हतीच मिळाली कधी संधी आजवर…
ती ही खूश… मीही!
पण मला अजिबात कल्पना नव्हती… ही साडी आणि ही भेट अखेरची असेल याची. आनंदी हसतमुख रजनी लपंडावातील भिडू सापडूच नये तशी अचानक गायब झाली! ध्यानीमनी नसताना 29 नोव्हेंबर 2024 रोजी ती गेल्याची बातमी आली… हार्ट अटॅकचे निमित्त… आणि निर्मोही रजनी जवळच्या माणसांचे आयुष्य अळणी करून निघून गेली!
‘आत्ता होती…’ म्हणे तोवर ‘आत्ता नाहीशी झाली’!
वर्ष उलटून गेले आज तरी माझे मन मानत नाही… असे वाटत राहते की, आत्ता येईल कुठून तरी आणि बसेल शेजारी… विचारेल मला, “बरी आहेस ना माय…?”


