Thursday, February 26, 2026

banner 468x60

Homeललितआभासीपेक्षा वास्तवातलं जग खूप सुंदर…

आभासीपेक्षा वास्तवातलं जग खूप सुंदर…

दीपक तांबोळी

भाग – 2

रात्री संगीताने अनेक वेळा विनवणी करूनही शुभा न जेवताच झोपून गेली. रवी घरी परतल्यावर संगीताने त्याला सर्व हकीकत सांगितली. शुभाच्या वागण्याने तोही चिंतेत पडला. शुभा जिवाचं काही बरंवाईट करून घेईल, या विचाराने रात्रभर दोघांना झोप आली नाही. बरं तरी, शुभाच्या रूमच्या दरवाजाची कडी तुटली असल्यामुळे तिला दरवाजा आतून लावता आला नाही. नाहीतर, रात्रभर दोघांच्या जीवाला घोर लागून राहिला असता. तरीसुद्धा दोघंही आलटून पालटून शुभाच्या खोलीत जाऊन तिला पाहून येत होते.

रात्री लवकर झोपल्यामुळे शुभाला सकाळी सहा वाजताच जाग आली. अख्खा दिवस तिच्या समोर होता. टाइमपाससाठी आता मोबाइलही नव्हता, तो तर आईने तोडून टाकला होता आणि लॅपटॉपचा कीबोर्ड काम करत नाहीये, हे तिच्या लक्षात आलं. मनातल्या मनात तिने आईला शिव्यांची लाखोली वाहीली.

नाश्त्याच्या टेबलवर रवी तिला समजावू लागला. “बेटा तंत्रज्ञान हे माणसाच्या सोयीसाठी, सुखासाठी असतं. याचा अर्थ असा नव्हे की, आपण त्याच्या आहारी जावं. बघ, इंटरनेट हा ज्ञानाचा महासागर आहे. व्हॉट्सॲप, फेसबुकवर आपण आपल्याला माहीत असलेली माहीती पटकन शेअर करू शकतो. माणसांना, जगाला जवळ आणणारी ही माध्यमं आहेत. पण होतंय काय की, माणसं जवळ येण्याऐवजी दूर होत चालली आहेत. याला कारण आपलं या माध्यमांच्या आहारी जाणं…”

हेही वाचा – शाळेतील ज्युनिअर परमनंट झाले आणि संगीताचा राग अनावर झाला…

रवी बडबडत होता आणि शुभा कोणतीही प्रतिक्रिया न देता चहा पीत होती. अशी लेक्चर्स ती नेहमीच ऐकत आली होती आणि अशा फालतू उपदेशांचा तिला तिटकारा होता.

आईवडील दोघंही कामावर निघून गेल्यावर शुभाला काय करावं, ते कळेना. घरातला पसारा तिच्या पहिल्यांदाच लक्षात आला. ती उठली. पटापट सगळ्या रूममधला पसारा आवरला. भिंतींवरची जाळी काढली. कपाटं आवरली. पुस्तकांच्या कपाटातली धूळ साफ केली. इतक्या वर्षांत वडिलांनी जमवलेल्या या खजिन्याकडे तिचं लक्षच नव्हतं. एक पुस्तक तिने काढून पाहिलं. हिमालयाच्या प्रवासाचे वर्णन त्यात होतं. त्यातले फोटो पाहून आणि वर्णंन वाचून जग सुंदर असल्याची आणि आपण अशा जगापासून अनभिज्ञ असल्याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली. कामवालीचं काम झालं, तशी तिने भांडी जागेवर लावून ठेवली.

रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे दुपारी तिला झोप यायची. आज झोप येत नसल्यामुळे तिने एमपीएससीचं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, आज वाचण्यात तिचं मन लागलं. संध्याकाळी ती क्लासमध्येही गेली. तिथंही तिचं मन एकाग्र झालं. संगीता शाळेतून परतली आणि चकाचक घर पाहून आश्चर्यचकीतच झाली. आपल्या लेकीने हे केलंय, यावर तिचा विश्वासच बसेना. शुभाला बोलावून तिने तिचं कौतुक केलं. पण कोणतीही प्रतिक्रिया न देता ती निघून गेली.

शाळांना सुट्या लागल्या. संगीता घरी राहू लागली. पण दोघा मायलेकीत एकतर्फी संभाषण होतं. संगीता बोलायची पण शुभा ‘हो” “नाही” इतकंच उत्तर द्यायची. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक दिवस कामवाली आणि तिची मुलगी घरी आल्या. संगीताने त्यांच्या हातातला पेढ्याचा बॉक्स पाहूनच काय ते ओळखलं.

“काय गं, दहावीचा रिझल्ट लागला वाटतं! किती मार्क्स मिळाले?”

“93 टक्के,” मुलगी तिच्या पाया पडत म्हणाली. शुभा तिथंच बसली होती. ते ऐकून तिला आश्चर्याचा धक्काच बसला.

“ताई, तुम्ही तिला शिकवलं नसतं तर, ती पास सुद्धा झाली नसती. लई उपकार झाले ताई तुमचे आमच्यावर…” कामवालीच्या डोळ्यात अश्रू आले.

“अगं, खरी मेहनत तर तिचीच आहे. झोपडपट्टीत राहून, लोकांची धुणीभांडी करून, कोणतेही क्लासेस न लावता तिने हे यश मिळवलंय. तिचं कौतुक करावं तितकं कमीच आहे!” शुभाकडे नजर टाकत संगीता म्हणाली. तिने असं पहाताच शुभा आत निघून गेली.

चार-पाच दिवसांनी तिघं रात्री डायनिंग टेबलवर बसले असतांना रवी म्हणाला, “मी एक निर्णय घेतलाय. ॲडिशनल इन्कमसाठी मी एल.आय.सी.ची एजन्सी घ्यायचं ठरवलंय. सुपरशाँपची ड्युटी सांभाळून मला पाँलिसीज मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. यामुळे मी खूप बिझी होणार आहे. बाहेरची कामंही तुम्हालाच करावी लागतील. चालेल?”

हेही वाचा – थ्रिल… आयुष्याला कलाटणी देणारं!

“अहो, मी पण एक निर्णय घेतलाय…” संगीता सांगू लागली “या शाळेत मी परमनंट होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. मला एका नवीन शाळेतून ऑफर आलीये. ते सात हजार देणार आहेत. मी ती शाळा जॉइन करायचं म्हणतेय.”

“अगं, पण ती बिगर अनुदानित शाळा असणार. अशा शाळेत कधीच परमनंट करत नाहीत. म्हणजे आयुष्यभर तुला सरकारी पे-स्केल कधीच लागू होणार नाहीत. शिवाय, पिळवणूक होणार ते वेगळं!” रवी निराशेने म्हणाला.

“मी काय म्हणते बाबा, करू द्या आईला तिथे नोकरी,” शुभा मध्येच बोलू लागली, “आपल्या कामवालीच्या मुलीने आईची खूप पब्लिसिटी केलीय. आईच्या अनुपस्थितीत अनेक जण ट्युशनबद्दल चौकशी करुन गेलेत. मीही मग चारपाच कॉलनीत फिरले. चाळीस मुलं तयार आहेत आईकडे ट्युशन्स लावायला. मी त्यांना 500 रुपये महिना फी सांगितलीय. ते तयार आहेत. अशा रितीने महिन्याला वीस हजार आईला मिळत जातील. मला खात्री आहे विद्यार्थ्यांची संख्या जरुर वाढेल. मग आपण एखादी मोठी जागा भाड्याने घेऊ क्लाससाठी…”

ते ऐकून संगीता हसली.

“अहो मॅडम, अशी स्वप्नं रंगवणं ठीक आहे. पण मी क्लासमध्ये अडकल्यावर घरची, बाहेरची कामं कोण करणार?”

“मी आहे ना!” शुभा आत्मविश्वासाने म्हणाली.

“ती सगळी कामं तुम्ही माझ्यावर सोडून द्या.”

“अगं पण, मग तू एमपीएससीचा अभ्यास कसा आणि कधी करशील?” रवीने शंका उपस्थित केली.

“बाबा एक झोपडपट्टीतली मुलगी दहा ठिकाणी धुणीभांडी करुन 93 टक्के मिळवू शकते तर, मी घरातली कामं करुन एमपीएससी क्लीअर नाही करू शकत?”

तिचा आवेश पाहून रवी आश्चर्यचकीतच झाला.

“चला, आमची शुभा मॅच्युअर झाली म्हणायची! आता तुला नवीन मोबाइल घेऊन द्यायला हरकत नाही…”

“नाही बाबा, मी निर्णय घेतलाय, जोपर्यंत मी एमपीएससी क्लीअर करणार नाही, तोपर्यंत मोबाइल, लॅपटॉपला हात लावणार नाही. आतापर्यंत मी आभासी जगात वावरत होते. गेल्या काही दिवसांत मला वास्तव जग पाहायला मिळालं आणि हे वास्तवातलं जग आभासी जगापेक्षा खूप सुंदर आणि क्रियाशील बनवणारं आहे, हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी हा निर्णय घेतलाय.”

आपल्या मुलीचा समजुतदारपणा पाहून संगीताला गहिवरुन आलं. शुभाजवळ जाऊन तिने तिला जवळ घेतलं. शुभानेही तिला मिठी मारली. का कुणास ठाऊक तिला आईबद्दल प्रेम वाटू लागलं होतं…

समाप्त


मोबाइल – 9209763049

(ही कथा काल्पनिक असून माझ्या ‘हा खेळ भावनांचा’ या पुस्तकातील आहे. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!