नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला!
बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो की, एक ॲक्टर म्हणून तुम्ही इमोशनल सीनमध्ये कसे काय रडता? होय, सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट… डोळ्यात ग्लिसरीन घातलं की, येतं डोळ्यात पाणी. माझा मात्र प्रॉब्लेम व्हायचा. डोळ्यात ग्लिसरीन घातलं की, डोळ्यांची खूप आग होऊन कितीतरी वेळ डोळे उघडायचेच नाहीत. खूप त्रास व्हायचा मला आणि माझ्यामुळे बाकीच्या लोकांना सुद्धा!
अशातच एका नाटकात काम करण्यासंबंधी माझ्याकडे विचारणा झाली. नाटकाचं नाव होतं, ‘मांगल्याचं लेणं’. त्या नाटकात फक्त खूप साऱ्या बायकाच होत्या. महाराष्ट्रामधले सण आणि संस्कृती हा विषय होता, त्या नाटकाचा. घरातली सगळ्यात मुख्य बाई, ‘आजी’ ही भूमिका मी करत होते. त्या आजीच्या सुना, लेकी, त्यांच्या लेकी-सुना, नातवंड… घरातल्या मोलकरणी त्यांच्या मुली अन् सोबत आजीची तरुणपणीची व्यक्तिरेखाही होती. असा सर्व गोतावळा सांभाळणारी, सावरणारी खंबीर कणखर आजी मी!
बरं, माझं तरुणपण माझ्या मोठ्या मुलीने केलं आणि धाकटी मुलगी माझ्या नातीची भूमिका करत होती. घरातल्या मोलकरणीच्या मुलीच्या लग्नसोहळ्याचा एक जबरदस्त सीन त्यात होता. आजी म्हणते, “ती मुलगी याच वाड्यात लहानाची मोठी झालीय. म्हणून तिचं लग्न आणि पाठवणी इथूनच होईल.”
हेही वाचा – Swami Samarth : स्वामी अन् मुंगळा…
हा सीन सुरू झाला. आता आली का पंचाईत… कारण इमोशनल सीन. मी आधीपासूनच स्टेजवर असल्यामुळे डोळ्यात ग्लिसरीन कसं घालायचं? हिने रडण्यासाठी डोळ्यात काहीतरी घातलं, हे लोकांना कळणार! आता कसं होणार माझं? खूप घाबरले होते मी. पण ती मुलगी वधूच्या वेशात समोर आली आणि बॅकग्राऊंडला गाणं सुरू झालं… ‘लाडके गं लेकी माझ्या ताटी जेवू नको… जाशील परघरी, फार माया लावू नको…’ त्यात आणखी एक ओळ होती, ‘मुलीच्या पित्याची गं धन्य ती छाती, कन्यादानावेळी लेक दिली दुज्या हाती…’
आता मात्र मनात कालवाकालव सरू झाली. त्या नाटकात माझ्या दोन्ही मुली होत्या. कधीतरी त्यासुद्धा लग्न होऊन जातील, हा विचार मनात आला मात्र, ग्लिसरीनविना डोळ्यांतून गंगा, यमुना वाहायला लागल्या… एवढ्या की माझं रडणं थांबेच ना!
हेही वाचा – Discipline : कडक शिस्त… आयुष्याला वळण लावणारी!
आता मात्र ग्लिसरीनशिवाय रडायची सवय लागली. इमोशनल सीनच्या वेळी आपल्या बाबतीत घडलेली एखादी दुर्घटना आठवली की, अगदी सहज रडू येतं. कोणी विचारलं की मी सांगते, “डोळ्यात ग्लिसरीन घालायची काहीच गरज नाही. मी अशीही रडू शकते… आणि त्यामुळे फक्त डोळे नाही गळत तर, नाक सुरसुरते आणि आपोआप गळ्यातून रडणं बाहेर येतं. ते डोळ्यात ग्लिसरीन घालून होत नाही.”
म्हणूनच, आता इमोशनल सीन पाहताना तुम्हालाही सहज कळेल की, कोणाचे अश्रू खरे आहेत की ग्लिसरीनचे!