Tuesday, July 1, 2025
Homeफिल्मीएक असंही वाचन...

एक असंही वाचन…

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. आणखी एक आठवण सांगायला तुमच्या भेटीला.

साधारणपणे 1984पासून मी नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. अर्थात, सुरुवात बालनाट्यापासून झाली. पण आतापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक नाटकाची वेगळी आठवण आहे…

मी एका विनोदी नाटकात काम केलंय, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ हे नाटक! त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, राजा गावडे आणि खूप सारे दिग्गज होते अन् मी एकटीच मुलगी. (तेव्हा 16-17 वर्षांची मुलगीच होते.) विनोदी नाटक आणि सोबत हे रथीमहारथी म्हणून मला धडकीच भरली होती. त्यात विनोदी नाटक करणं खूप कठीण असतं. कारण, त्यात टायमिंग खूप महत्त्वाचं असतं. बरं, मी तशी नवखीच आणि समोर लक्ष्यादादा आणि राजाभाऊ… केव्हा काय addition घेतील आणि त्या addition मुळे मला जर स्टेजवरच हसायला आलं तर? म्हणूनच मी खूप बावरलेली असायची.

आमची टीम खूप छान होती. सगळे को-ऑपरेट करायचे. एकदा वेळ असल्याने लक्षादादा माझ्याशी गप्पा मारत बसले होते, “टेन्शन नाही घ्यायचं. शांत डोक्यानं काम कर. तू एक चांगली कलाकार आहेस. नीटपणे वावरलीस तर खूप पुढे जाशील. खूप मोठी अभिनेत्री बनशील. पण…”

हेही वाचा – सदाफुली, माईफुली अन् राजूफुली…

ते क्षणभर थांबले… “पण एक काम कर, कितीही मोठी झालीस तरी ट्रेनच्या सेकंड क्लासने प्रवास करणं सोडू नकोस. आयुष्यभर पुरतील एवढी कॅरेक्टर्स तुला ट्रेनच्या सेकंड क्लास कंपार्टमेन्टमध्ये सापडतील. ऑब्झर्व्हेशन महत्त्वाचं… म्हणजे तुला कधीही टेन्शन येणार नाही. कॉमेडी रोलही तू सहजपणे करून जाशील…”

किती खरंय!

प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात, ‘पुस्तकांपेक्षा माणसं वाचली की ज्ञान होतं. पुस्तकं माहिती पुरवतात. चालती बोलती माणसं माहिती पल्याड खूप काही देतात.’

जवळपास 41 वर्षं झाली मला एन्टरटेन्मेन्ट इंडस्ट्रीमध्ये. मी आजही शेजारची बाई, रिक्षावाले, कंडक्टर, हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक, सफाईवाले, फेरीवाले… सगळेच जण म्हणजे माझं अभ्यासाचं पुस्तकच असतं. हा असा अभ्यास करायला मज्जा वाटते. या अभ्यासाचा बाहेर काय परिणाम होतो, माहीत नाही; पण मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखांसाठी नक्कीच होतो.

तुम्ही आठवून बघा, तुम्हालाही कुठे ना कुठे असे नमुने भेटले असतीलच…!

जमल्यास कळवा.

हेही वाचा – मॉन्टेसरीतच माझा स्मार्टनेस दाबला गेला…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!