अस्मिता हवालदार
प्रभाकर पेंढारकर यांची ‘रारंग ढांग’ ही लहानशी कादंबरी मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचली होती. एका बैठकीत वाचता येईल अशी! याला दोन कारणं आहेत, एकतर ही कादंबरी लहान आहे आणि कादंबरीला खूप वेग आहे. हिमालयात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये रस्ते बांधण्याच्या लष्करी कामासाठी विश्वनाथ मेहेंदळेला नोकरी मिळते. इंजिनीअर झालेला हा तरुण मुंबईतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून नव्या साहसिक नोकरीसाठी, कामासाठी उत्सुक असतो. त्याचे वडील खेड्यात शिक्षक असतात. ते विश्वनाथला लिहितात की, “हिमालयात तुला स्वतःशी बोलायला वेळ मिळेल. स्वतःचा शोध घेण्यासाठी वेळ वापर.”
लष्करातली शिस्त, कायदे यांची ओळख हळूहळू विश्वनाथला होत असते. कधी मनावर ओरखडे उठत राहतात तर, कधी डोळ्यात कौतुक…! ही दुनिया विश्वनाथसाठी नवी असते. हिमालयात रस्ते बांधण्याचं काम जिकिरीचं आणि आव्हानाचं असते. मृत्यू हातात हात घालून चालत असतो. ढांग म्हणजे सरळसोट कडा. विश्वनाथ रस्ता बांधण्यासाठी मातीचा नमूना तपासतो, त्यावेळी ती जागा रस्त्यासाठी त्याला अयोग्य वाटते. तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवतो; पण आता काही होऊ शकत नाही, असे सांगून त्याला टाळले जाते.
या कथानकात लेखक जीवन क्षणभंगूर आहे, हे पटवून देतो. इथे कोणाला एक दिवस सुट्टी द्यायची झाली तर, अशक्य! पण तोच माणूस मेला तरी पुन्हा सगळं सुरळीत सुरू रहातं, असं विश्वनाथ म्हणतो. माणूस मेल्यावर उरते काय? असा प्रश्न त्याचा ड्रायव्हर त्याला विचारतो. रस्ता बांधताना जवानांची स्मारके तो पाहतो आणि निश्चय करतो की, मी असे होऊ देणार नाही. लष्करातली शिस्त आणि माणसाचे जीवन यात श्रेष्ठ काय, असा प्रश्न विश्वनाथ वारंवार विचारतो; वाचकाला सुद्धा विचारतो. वरिष्ठांसमोर बोलायचे नाही, ही शिस्त तो मोडतो, ते केवळ सैनिकांचे जीव वाचवण्यासाठी!
हेही वाचा – वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’
कॅप्टन बहल, मेजर बंबा, ग्यानचंद, कॅप्टन नायर, लेफ्टनंट अमर, कॅप्टन मिनू खंबाटा, सर्जेराव गायकवाड अशी काही मुख्य पात्र कादंबरीत आहेत. विश्वनाथचे न ऐकता रस्ता बांधायचे काम सुरू राहते आणि रस्ता कोसळतो. त्यात सर्जेराव, बहादूर वगैरे साथी गाडले जातात. विश्वनाथ मनातून तुटून जातो. मेलेल्या साथीदारांच्या स्मृतीसाठी आठ खांब उभारतो. अर्थात, सैन्याची शिस्त मोडल्याने कोर्ट मार्शल होते.
नोकरीसाठी जाण्यापूर्वी तो एक पेंटिंग प्रदर्शन पहायला जातो, तेव्हा उमा नावाच्या मुलीचं पेंटिंग तो विकत घेतो. त्यांची ओळख होते आणि पत्रव्यवहार सुरू होतो. एक वरिष्ठ अधिकारी त्याला ‘पुरणपोळी करून देतोस का?’ असे विचारतो तेव्हा विश्वनाथ म्हणतो, त्यापेक्षा या ढांगात रस्ता बांधणे सोपे आहे. विश्वनाथ म्हणतो, ‘आपल्याला देशात माणसाचा वेळ स्वस्त आहे आणि सर्वात स्वस्त माणसाचा जीव आहे.’ यातली अशी काही वाक्य मनात रुतून राहतात.
हिमालयाचे सतत बदलणारे हवामान, दरड कोसळणे, वादळ, पाऊस या परिस्थितही आनंदी राहण्याचा मार्ग काढणारे गुरखे, सैनिक, लष्कराचे जीवन, सिव्हिलियन्सकडे पाहण्याची उपहासात्मक दृष्टी, we are paid for it हे वाक्य सतत कानावर पडल्यामुळे चिडलेला विश्वनाथ, त्यातच उमाबरोबर फुलणारे नाते… या सर्वांचा गोफ फार सुरेख विणला गेला आहे.
हेही वाचा – माचीवरला बुधा : एकटेपण हाच कादंबरीचा गाभा
पेंटिंगचे वर्णन वाचताना ते डोळ्यासमोर उभे राहते. कापूस बाहेर येणारे कार्डिगन घालणारे गुरखे, अहोरात्र कष्ट करून रस्ते बांधणारे जवान दिसू लागतात. कादंबरीचा विषय अगदी वेगळा असल्याने अधिक आकर्षक वाटतो. लेखकाची साधी सरळ सोपी भाषा आहे, त्यामुळे समजून उमजून घेता येते. कठीण शब्दांचा अडथळा नसल्यामुळे आशय मनापर्यंत पोहोचतो. शिस्त माणसासाठी असावी. त्या शिस्तीच्या नावाखाली माणूस भरडून त्याचे मशीन न व्हावे, अशी विचारसरणी असलेला विश्वनाथ सैन्यात टिकू शकणार नव्हताच. या जगात ‘सर्वसुखी माणसा’सारखा ‘स्वतंत्र माणूस’ दुर्मीळ आहे का? असा प्रश्न विश्वनाथने विचारला आहे. दुर्दैवाने याचे उत्तर आजही नकारात्मक आहे.
कादंबरीचा विषय, प्रासादिक अभिजात भाषा आणि सशक्त कथानक हे तिन्ही गुण मला भावले. कादंबरी सर्वांना आवडेल अशी आहे.