नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…
असे म्हणतात की, यश मिळायला लागलं की त्याची नशा चढायला लागते… अधून-मधून मलाही झिंग येतेच. पण नशिबाने मीच स्वतःला समजावते की, ‘बाळ हर्षा, उडण्यासाठी मोठ आकाश जरी असलं तरी, चालण्यासाठी जमीनच लागते…’ आणि माझी मीच धरतीवर येते किंवा कोणीतरी मला माझी मस्ती उतरवणार भेटतच!
काही वर्षांपूर्वी माझे क्राइम पेट्रोलचे काम जोरात चालू होत. कुठेही गेले तरी कौतुक व्हायला लागलेलं. देशाबाहेरील लोक सुद्धा आवर्जून कुठेही भेटले तरी, कौतुक करायचे. नाही म्हटलं तरी थोडी हवा जातेच ना डोक्यात!
एके दिवशी गोरेगावमध्ये होते, रस्ताने चालताना एक राजस्थानी मुलगी समोर आली. 20-21 वर्षांची असेल… टिपिकल ड्रेस, दागिने ल्यालेली हसमुख मुलगी… छान हिंदीमध्ये बोलायला लागली… “आम्ही तुम्हाला क्राइम पेट्रोलमध्ये बघतो. छान काम करता. आवडतं आम्हाला…” मी सुखावले, “थॅन्क्स” म्हणाले. तेवढ्यात तिने फूटपाथकडे बोट केलं आणि म्हणाली, “आम्हा सगळ्यांना तुम्ही आवडता…” जवळ जवळ 15-17 जणी होत्या वेगवेगळ्या वयाच्या… पेहराव सेम!
हेही वाचा – एका लाडवाची गोष्ट!
मनात आलं, ‘अरे बापरे, एवढी गँग आलीय बायकांची! चोर-बीर तर नसतील ना? किंवा मुले पळवणारी टोळी?…’ मी जराशी घाबरले.
तेवढ्यात ती मुलगी बोलायला लागली… “आम्ही राजस्थानहून आलोय. घरातल्या सगळ्या बायकांना वर्षातून एकदा 15 दिवसांची सुट्टी मिळते. सगळ्या बायका, मुली सतत कामात असतात. म्हणून मग आम्हाला वर्षातून एकदा ही सुट्टी मिळते आणि ते 15 दिवस आम्हाला पिकनिकला पाठवलं जातं… खूप मोठं कुटुंब आहे आमचं… वेगवेगळ्या घरांत राहतो, शेजारी शेजारी! पण आमचं स्वयंपाकघर, गोठा, शेत आणि भला मोठा टीव्ही एकच आहे…”
“आमची स्वतःची एसी बस आहे आणि दोन ड्रायव्हर सोबतीला देऊन घरचे पाठवतात आम्हाला… यावर्षी आम्ही मुंबईत आलो. सुलभ शौचालयमध्ये आंघोळ, टॉयलेट आवरतो. बाहेरच चहा, जेवण सगळं काही…! 15 दिवस कपडे न धुता जमा करतो आणि मग घरी जाऊन धुतो. रात्री आम्ही आमच्या बसमध्येच झोपतो. अगदी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहू शकतो तरीही ते 15 दिवस आम्ही फक्त मज्जा करतो… फिरतो… छान छान जागी जातो… जेवतो, खातो… शॉपिंग करतो… पैशाची फिकीर नसते. बजेट नसतं. फक्त मज्जा! संपूर्ण वर्षभरासाठी एनर्जी घेऊन जातो…”
हेही वाचा – माझ्या सेकंड इनिंगचा कौतुक सोहळा!
कसलं भारी वाटल मला! अशाही मतांची माणसं या जगात आहेत!!
ते लोक आपल्या घरातल्या स्त्रियांना थोडे दिवस का होईना, त्यांच्या मर्जीप्रमाणे वागायची मुभा देतात. त्या स्त्रिया सुद्धा कसलाही गैरफायदा न घेता आपल्या पारंपरिक वेशात बिनदिक्कत फिरतात… अशा बायकांना बघून मी लगेच धरतीवर आले…
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.