संगीता भिडे (कमल महाबळ)
साधारण 40-50 वर्षांपूर्वी माझे वडील यशवन्त जनार्दन महाबळ यांचा ‘Whom to call Daddy’ या शीर्षकाचा Mirror नावाच्या एका सुप्रसिद्ध इंग्रजी मासिकांत लेख आला होता. त्याचे स्वैर नाट्य रूपांतर करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
साधारण वयाच्या पाचव्या वर्षापासून अनेक प्रश्नांचं कुतुहल लहान मुलांच्या मनांत उभं राहतं. नानाविध प्रश्न विचारून आई-वडिलांसह अनेकांना भंडावून सोडतात. उत्तरे फारच अल्पांशाने मिळतात. मग ती अन्यत्र मित्र-मैत्रीणीकडे उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करतात. पालकांकडून बहुतांशी ‘गप्प बस’ एवढंच उत्तर दिलं जात. त्याचाच हा मासला.
(सकाळी 8-8.30ची वेळ. बाबा आरामखुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत आहेत. जवळच सोनाली (वय अंदाजे 5 ते 9 वर्षे) भातुकली खेळण्यात दंग आहे. खेळता-खेळता एकदम उठते आणि बाबांजवळ येऊन विचारते)
सोनाली – बाबा, बाबा, इकडे बघा नं जरा…
बाबा – बेटा, मी पेपर वाचतोय नं, त्रास नको देऊस मला.
सोनाली – बाबा, प्लीssज, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल मला? सांगा नं बाबा.
बाबा – हं बोला, काय प्रश्न आहे आमच्या सोनूचा?
सोनाली – बाबा, प्रत्येक लग्नात एक मुलगा आणि एक मुलगी असं का असतं? मुलगा-मुलगा किंवा मुलगी-मुलगी असं का नसतं? काल आपण एका लग्नाला गेलो, तर तिथे पण तसंच! असं का हो बाबा?
बाबा (चिडून) – मूर्ख आहेस बघ! काहीही प्रश्न विचारून भंडावतेस. मला पेपर वाचू दे. तुझी ती भातुकली का काय? खेळत बस शांतपणे.
(सोनाली नाराज होऊन तिथून उठते, पण कुतुहल शमलेलं नाही. म्हणून स्वयंपाकघरात कामात असलेल्या आईला हाका मारते.)
सोनाली – ए आई, आई. जरा बाहेर ये नं.
आई (स्वयंपाकघरातून) – हे बघ, मी आत्ता कामात आहे. उगाच तीन-तीनदा हाका मारू नकोस.
सोनाली (लाडाने) – ए आई, ये नं. माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याशी. येनं!
(आई हात पुसत नाखुशीनेच आई बाहेर येते)
आई – हं बोला? काय काम आहे एवढं महत्त्वाचं?
सोनाली – आई, माझ्या एका प्रभाचं उत्तर देशील?
आई – हे तुझं महत्त्वाचं काम? ही काय प्रश्न विचारायची वेळ आहे? हे बघ, मला जाऊ दे माझ्या कामाला, नंतर विचार काय विचारायचं ते.
हेही वाचा – Local train : डोंबिवली ते कसारा प्रवासातील ‘ते’ नातं
सोनाली – आई प्लीssजनं (लाडांत येऊन) आत्ता सांग न गं!
आई – सोन्या, पटकन विचार काय ते. कामं आहेत खूप.
सोनाली – आई, प्रत्येक लग्नात, एक मुलगा- एक मुलगी असं का असतं गं? मुलगा-मुलगा किंवा मुलगी-मुलगी असं का नसतं?
आई (क्षणभर चक्रावते) – अरे देवा! सोन्या, काय एकेक नसते प्रश्न विचारत असतेस गं! तू मोठी झालीस की समजेल तुला आपोआप.
सोनाली – आई, म्हणजे किती गं मोठी?
आई – ज्ञा बघू जरा अंगणात खेळायला. कठीण आहे या पोरीचं?
सोनाली – खरंच जाऊ आई? रुपालीकडे जाऊ?
आई – हो, जा, खुशाल जा. डोक्याला नसता ताप!
(आई सुटकेचा नि:श्वास टाकते.)
(सोनाली अंगणात येते आणि समोरच राहणाऱ्या रुपालीला जोरजोरात हाका मारते.
सोनाली – रुssपा, ए रुssपा! येतेस का खेळायला?
रुपाली – किती जोरात ओरडतेस? डोकं दुखलं माझं?
(रुपालीचे वय अंदाजे 9 ते 10 वर्षे)
हेही वाचा – पोटभर आशीर्वाद
सोनाली – अगं, मग लगेच ये नं. माझं तुझ्याशी खूप महत्त्वाचं काम आहे.
रुपाली – आले लगेच ! फक्त 2 मिनिटं दे।
(रुपाली धापा टाकत धावत-धावत येते)
रुपाली – काय आहे गं काम? पटकन सांग.
सोनाली – मला एका प्रभाचं उत्तर सांगशील? मला कोणीच नीट सांगत नाही. आई पण नाही, आणि बाबा पण नाही. तू तरी सांगनं!
रुपाली – पटकन सांग प्रश्न. नाहीतर उशीर झाला म्हणून आई मलाच रागावेल.
सोनाली – ऐक हं! प्रत्येक लग्नात एक मुलगा आणि मुलगी असते किनई? पण मुलगा-मुलगा किंवा मुलगी-मुलगी असं का नसतं?
रुपाली (जरा वेळ विचार करत) – अगदी सोप्पं आहे. एवढं पण समजत नाही तुला? समज, मुलगा-मुलगा असं लग्न झालं तर त्यांना बाळ कसं होणार? बाळ कधी बाबांना होते का? बाळ तर नेहमी आईलाच होतं ना?
सोनाली – हंsss! आत्ता समजलं, पण मग दोन्ही मुलींनीच लग्न केलं तर? एकदा हिला तर एकदा तिला बाळ होईल, कित्ती मजा नं।
ए, तुला एक गंमत सांगू? आपण दोघी मैत्रिणी किनई? मग आपणच लग्न केलं तर? रुपाली – (खुश होत) अय्या! किती कित्ती मज्जा!
पण… (विचार करत) मला आवडेल गं, पण…(चेहरा प्रश्नचिन्हांकित) समज, आपल्याला बाळ झालं तर ते ‘बाबा’ कोणाला म्हणणार?
सोनाली – अय्या! खरंच की! माझ्या लक्षातच आलं नाही गं! पण आता मात्र नीssट लक्षात आले हं! प्रत्येक लग्नात मुलगा-मुलगी का असतात ते. मुलगा – मुलगा असं लग्न केले तर त्यांना बाळ होणार नाही, आणि मुलगी-मुलगी असं लग्न केलं तर त्यांचं बाळ ‘बाबा’ कोणाला म्हणणार? अशी सगळी गंमत असते, लग्न म्हणजे!
रुपाली – पण मग इतकी सोपी उत्तरं आपल्या आई-बाबांना का नाही येत? मला तर काही समजतच नाही यांचं!
सोनाली – जाऊ दे गं. (दोघीही सापडलेल्या उत्तरानं खूष होतात आणि नाचत-बागडत खेळू लागतात…
(पडदा पडतो)