चंद्रकांत पाटील
आज भाऊंचा सत्कार समारंभ होता. सकाळपासून भाऊंच्या बंगल्यावर माणसांची वर्दळ वाढली होती… पै-पाव्हणे, मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार सर्व जण जमले होते… भाऊंना आज 80 वर्षं पूर्ण होऊन 81वे वर्षे लागले होते. शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता… हारतुर्याचे ढीग लागले होते.
भाऊ निवांत स्थितप्रज्ञासारखे आराम-खुर्चीत बसले होते, फार काही बोलत नव्हते, सर्वजण भाऊंना तब्येतीचे रहस्य काय? कोणता आहार घेता? काय व्यायाम करता? असले प्रश्न विचारत होते, तरीपण भाऊ शांतच होते. पण प्रश्न थांबत नव्हते. शेवटी लोक ऐकतच नाहीत म्हटल्यावर भाऊ म्हणाले, “मित्रहो, जरा धीर धरा… तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या भाषणात देईन”
भाऊंनी गावात बऱ्यापैकी समाजकार्य केलेले, गावासह आसपासच्या परिसराचा विकास करण्यामध्ये भाऊंचा मोठा वाटा होता, त्यामुळे भाऊ सामाजिक कार्यकर्ते म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. लोकांच्या अडीअडचणीला भाऊंची मदत होत असे. गावातील कुठलेही शुभ कार्य असो वा मृतकाचे… भाऊ तिथे हजर नाहीत, असे होत नसे. त्यामुळे गाव त्यांच्यावर फिदा होता आणि म्हणूनच गावाने आज वाढदिवसानिमित्त भाऊंचा सत्कार करण्याचे ठरवले.
राम-कृष्ण हॉल गर्दीने खचाखच भरलेला होता. पंचक्रोशीतील लहानथोर मंडळी, पत्रकार, सभापती, मंत्री पाटील साहेब सर्वजण आले होते. सत्कार सोहळा सुरू झाला… सरपंचांनी सर्वांचे स्वागत केले आणि भाऊंच्या कार्यामुळे गाव कसा सुधारला, ते तपशीलवार मांडले. भाऊंच्या कामामुळे गावाचे नांव कसे तालुक्यात झाले हे सभापतींनी सांगितले. मंत्री पाटील साहेब भाषणाला उभे राहिले… त्यांनी भाऊंच्या कार्याचा गौरव केला आणि शेवटी ते म्हणाले, “भाऊंना बघितल्यावर कोणी सुद्धा म्हणणार नाही की, भाऊंनी ऐंशी पार केलीय… त्यांना उदंड आयुष्य लाभो!” गावाने जमा केलेली 1 लाख 11 हजार रुपयांची थैली आणि मानपत्र देऊन त्यांनी भाऊंचा सत्कार केला. शेवटी भाऊनां उत्तरादाखल बोलण्याची विनंती केली…
टाळ्यांच्या कडकडात भाऊ भाषणाच्या जागेपर्यंत पोहोचले… लोकांना शांत करत भाऊ म्हणाले, “या कार्यक्रमासाठी खास आलेले मंत्री पाटील साहेब, माननीय सभापती, पंचायत सदस्य आणि माझ्या प्रेमापोटी जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो… आज माझा एवढा मोठा सत्कार आणि अभिष्टचिंतन केल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. मी आज बाकीच्या विषयांवर काही बोलणार नाही; परंतु सकाळपासून माझे मित्र, स्नेही, पत्रकार सारखे विचारतायत की, तुमच्या तब्येतीचे रहस्य काय आहे? काय खाता? कोणता व्यायाम करता?… त्याबद्दल थोडं बोलणार आहे.”
“मी इंजिनियर झाल्यावर पुण्यातील नामांकित कंपनीत नोकरीला लागलो. दिलेले काम फत्ते करण्याच्या स्वभावामुळे मी थोड्या अवधीतच मॅनेजमेंटचा लाडका झालो, भराभर प्रमोशन मिळत गेली, दहाच वर्षांत मी कंपनीत मॅनेजर झालो; पण पुढे मॅनेजमेंटच्या अपेक्षा वाढल्या त्याचबरोबर कामगारांचा कामचुकारपणाही वाढला, अपेक्षेप्रमाणे काम होईना असे झाले… त्याचे प्रेशर यायला लागले. परिणामी, एके दिवशी माझ्या छातीत दुखायला लागले आणि मग कंपनीला सांगावे लागले की, हे काम मला जमणार नाही, काम बदलून द्या.”
“कंपनीकडे एक चांगला इंजिनीअर म्हणून माझी महती असल्याने दुसरे काम मिळाले. परंतु, कामाचा ट्रॅक सुटल्यामुळे सर्व बढत्यांचे चान्स निघून गेले. मध्यंतरीच्या काळामध्ये सर्व तपासण्या केल्या, पण रिपोर्ट नॉर्मल यायचे! म्हणून मग त्यासाठी मोठ्या दवाखान्यात दाखविले, आयुर्वेदिक औषधे झाली पण परिणाम शून्य. जरा औषधे घेतली की, तात्पुरते बरे वाटे… पण पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी बरीच वर्षे काढली. पुढे कंपनीत स्वेच्छानिवृत्ती स्कीम आल्यानंतर नोकरी सोडून दिली. पुढे काही दिवस घरातच थांबलो. परंतु आपण काय होतो आणि काय झालो, आतापर्यत मोठ्या पदावर गेलो असतो… या विचाराने मन अस्वस्थ होई. त्यामुळे डिप्रेशन वाढले.”
हेही वाचा – आयुष्याचा नवा अर्थ…
“नंतर दारूचे व्यसन लागले, दिवसेंदिवस तब्येत खंगत चालली. माझा कॉन्फिडन्स जवळजवळ गेला. डॉक्टरने सांगितलं, यांचं डिप्रेशन वाढलंय, त्यामुळे बायकोने निर्णय घेतला आणि गावाकडे आलो… थोडक्यात मरायला गावात आलो!”
“गावात भावकीतली माणसं दररोजच भेटायला येत होती, हळहळत होती, अशातच एक दिवस आमचा जुना मित्र हनमा आला… मला म्हणाला, “भावड्या काय रं करून घेतलंयस? लोक शेहरात जाऊन सुधारत्यात आणि तुझं काय झालंया म्हणायचं?” त्याने माझी स्टोरी ऐकून घेतली आणि म्हणाला, “आपण येक काम करूया आमचं आबामहाराज आज कीर्तनाला येणार हाईत, त्यांना एकदा भेटून बघू! तू येणार का?” मी म्हटलं, “मला तसलं आवडत नाही,” तरी पण त्यानं गळ घातली म्हणून गेलो कीर्तनाला. कीर्तन संपल्यावर येताना हनमा आबांच्या पाया पडायला मला घेऊन गेला आबांना थोडक्यात माझ्याबद्दल सांगितले, आबा म्हटले, ‘उद्या आश्रमात या निवांत बोलू.’”
“मग आम्ही दुसऱ्या दिवशी आश्रमात पोहोचलो, आबांना नमस्कार केला. हनमाने सर्व स्टोरी कथन केली, शेवटी आबा म्हणाले, ‘आता काय होतंय तुम्हाला?’ मी म्हटले, “जगण्याची इच्छा राहिलेला नाही. मला केव्हाही हार्ट अटॅक येईल आणि मरेन, असं वाटतंय.” आबा म्हणाले, ‘मग मरा की, आता काय राहिलयं तुमचं?’ मी जरा चरकलोच. पण नंतर म्हणाले की, ‘भाऊ, तुमची व्यथा मला समजली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की, मी तुम्हाला यातून बाहेर काढू शकेन… पण त्यासाठी तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास पाहिजे आणि तो असेल तर उद्या संध्याकाळी आश्रमात या!’”
“मला महाराजांचं काहीही पटलं नव्हतं, पण हनमा म्हणाला, ‘महाराज जरा बोलायला फटकळ असलं तरी, त्यांना त्यांच्या भक्तांची तळमळ असते, असा माझा अनुभव आहे. तेव्हा नाही म्हणायचं नाही, उद्या आपण आश्रमात जाऊया. काही तरी चांगलच होईल.’ मी म्हटलं, ‘ठीक आहे जाऊन तरी बघूया… कारण माझ्या हातात आता दुसरा काही उपाय नव्हता…”
“तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही आश्रमात पोहोचलो. आबा प्रवचन घेत होते विषय होता – ‘जे झाले ते चांगले झाले, जे चालले आहे ते उत्तम आहे आणि जे होणार आहे ते उत्तमच उत्तम आहे…’ प्रवचन संपल्यावर आबांनी आम्हाला जवळ बोलावलं आणि विचारलं, “काय झाली का मनाची तयारी?” आम्ही “हो” म्हणालो. हनमा म्हणाला, “आबा याच्या गळ्यात माळ घाला, म्हणजे पांडुरंगच याला सरळ करेल.” आबा म्हणाले, ‘हनमंतराव, मी तेच करणार आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल.’”
“आबांच्या सान्निध्यात आल्यावर रोजच कीर्तन-प्रवचन, ध्यान, टाळांचा गजर याचा चांगलाच परिणाम झाला, अध्यात्मिक बेस तयार व्हायला लागला… कर्ता-करविता कोणीतरी वेगळाच आहे… परमात्म्याची आपण सर्व मुले आहोत, त्यांनी आपणाला सर्व शक्ती दिलेल्या आहेत, या सुप्त अवस्थेत असतात… त्या जाग्या करणे गरजेचे आहे, त्यासाठी मीपणा विसरला पाहिजे. हे तुझेच आहे, हे मनात भरले पाहिजे… सृष्टी एक नाटकाचा मंच आहे आणि मी नाटकातला एक ऍक्टर आहे… प्रत्येकाला त्याचा त्याचा रोल वाटून दिला आहे. त्यामुळे जो तो डायरेक्टरच्या इशार्याप्रमाणे काम करतो. नाटकाचे स्क्रिप्ट आधीच लिहिलेले आहे, त्यात बदल होत नाही… अशा विचारांचा प्रभाव माझ्या मनावर वाढला, मीपणा निघून गेला… मी एक ट्रस्टी आहे आणि जे आहे ते सर्व परमात्म्याचे आहे… मी एक निमित्त आहे, अशी भावना निर्माण झाली.”
हेही वाचा – परोपकार
पुढे आबानी ध्यानाचे प्रात्यक्षिक वाढवले आणि नंतर चार महिन्यांनी मला माळ घातली! माळ घालताना सांगितले, “भाऊ, माळेचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?” मी “नाही” म्हटले. मग ते म्हणाले… “माळ तुळशीची आहे आणि ती तुमच्या देहावर ठेवली आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या देहावरचा हक्क आजपासून सोडला आहे. म्हणजेच, ‘तुळशीपत्र’ ठेवले आहे. थोडक्यात, देहापासून तुम्ही वेगळे आहात. जिवंत असून मेलेले आहोत… अशी वाटचाल करा.”
“सुरवातीला हे जरा कठीण गेले; पण नंतर तुम्हाला सांगतो, हळूहळू जशीजशी भावना तयार व्हायला लागली तसे तसे शरीराचे सर्व आजार निघून गेले. छान गाढ झोप लागली, जेवण जाऊ लागले, सकाळी उठले की फ्रेश वाटू लागले… काळजी निघून गेली. मीपणा राहिला नाही. थोडक्यात आनंदी झालो… मग समाजाची कामे करू लागलो, ते आजतागायत थांबलो नाही हेच माझ्या जीवनाचे रहस्य आहे!”
“आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आबांना मी दिले आहे, परंतु ते कार्यक्रमासाठी परगावी गेल्याने येऊ शकले नाहीत, तरी पण शेवटी का होईना येऊन जातो, असे म्हणाले आहेत. मला दिलेल्या पैशांची थैली एक लाख अकरा हजार त्यात तितकीच रक्कम घालून मी माननीय आबांच्या आश्रमासाठी देत आहे…”
“माझ्या जीवनाचे रहस्य ऐकून तुमच्या जीवनामध्ये बदल घडो आणि तुम्हालाही सुख, शांती आणि निरामय आयुष्य लाभो ही परमेश्वराजवळ इच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय राम कृष्ण हरी!”
तेवढ्यात ह.भ.प. आबांचे हॉलमध्ये आगमन झाले. त्यांना कोणीतरी स्टेजवर घेऊन आले. मग सर्व मान्यवरांना तुळशीचे रोप देऊन कार्यक्रमाची सांगता झाली…!
मोबाइल – 9881307856