नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…!
मराठी भाषा… आपली मायबोली, मातृभाषा. तसं तर बऱ्याच लोकांना कमीत कमी चार भाषा तर येतातच. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती किंवा अजून एखाद-दुसरी किंवा दुसऱ्या अनेक भाषा येतात. हे चांगलं आहे. भाषा मग ती कोणतीही असो, ती शिकणं चांगलंच आहे. पण दुःख होतं की, आपली स्वतःची भाषा मात्र आपण खूप चुकीची, अशुद्ध बोलत असतो. ‘जागा भेटली’, ‘बस भेटली’, ‘पट्टी सांडली’, ‘पेन पडला’, ‘वहिनी मिळाली होती काल बाजारात’, ‘साडी घातली’… एक उदाहरण आहे का?
एक मराठी सीरियल करत होते दिग्दर्शक होते कांचन नायक सर. अत्यंत हुशार आणि शिस्तप्रिय माणूस. त्यांनी एकदा सीन कसा हवा हे तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही जर म्हणालात की, “नाही कळलं”, तर ते तुम्हाला तो सीन कितीतरी वेळा समजावून सांगतील. पण एकदा “कळलं”, असे म्हणालात की, तुम्हाला तो सीन चोख करता आला पाहिजे… असे ते एकदम कडक सर होते. भाषेला घेऊन तर ते खूपच कडक!
हेही वाचा – सैनिक हो, तुमच्यासाठी…
तर, मी त्यांची एक मराठी सीरियल करत होते. माझी मुलगी झालेली कलाकार मला आता आठवत नाही कोण होती, पण तिचं एक वाक्य होतं… “आई, वहिनी आली.” पण ती वारंवार आपली “वहिणी आली” असंच म्हणायची! मी तिला पाच-सहा वेळा सांगितलं की, “तू चुकीचे बोलतेयस. ‘नी’ बोल ‘णी’ नाही…” तर ती मलाच म्हणे, “मी ‘नी’ बोलतेय.” शेवटी कांचन सर म्हणाले, “हर्षा नको रक्त आटवूस.” मी give up केलं. सर खूप बदलले होते. काही काळानंतर ते गेले. राहिल्या त्या आठवणी…!
अशीच एकदा मी डॉक्टरांकडे गेले होते. एक बाई होती तिथे, ती म्हणाली, “अरे बघ पेन पडला…” मी पटकन मोठ्याने रिॲक्ट झाले. “पेन पडला?” ती बाई मला विचारती झाली. “मग काय पेन पडली?” मी हसून म्हणाले की, “नाही हो, ‘पेन पडलं’ असं म्हणतात. पेन नपुंसकलिंगी! Pencil पडली, ती स्त्रीलिंगी आणि खडू पडला, तो पुल्लिंगी.”
हेही वाचा – बोलीभाषेतली नाती अन् मी!
त्या बाईंनी काही कानावर, मनावर घेतलं नाही. सोबत माझी मुलगी होती. तिला भारी राग आला, माझा. म्हणाली, “काय गरज आहे गं तुला लोकांना अक्कल शिकवायची? जे स्वतःला अक्कलवान समजतात, त्यांचे ते बघून घेतील!”
पण, माझा जीव राहात नाही. चुकीचं काही ऐकवत नाही.
बाबा गोखले म्हणजे चंद्रकांत गोखले हे ‘पर्याय’ नाटकाच्या वेळी मला नेहमी म्हणायचे, आपली भाषा स्वच्छ असावी. तशीच आपण इतरांची भाषा सुद्धा स्वच्छ होईल, याकडे लक्ष द्यावे. माझा कोणत्याही गावरान भाषेला आक्षेप नाही. गावरान भाषा कानाला केव्हाही गोडच लागते. पण जेव्हा तुम्ही ‘शुद्ध मराठी’ असे म्हणता ना, तेव्हा ती ‘शुद्धच’ असेल, याकडे नीट लक्ष द्या.


