(एक संवेदनशील समस्या… कच्चे प्रेम – भाग 2)
अर्चना कुलकर्णी
डिसेंबर हा साधारणपणे शाळा, कॉलेजमधील विविध कार्यक्रमांचा महिना. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात दुपारी बारा वाजता नृत्य स्पर्धा पार पडली. त्यानंतर मी कार्यालयीन कामात मग्न असताना दुपारी चारच्या सुमारास एक वयस्कर गृहस्थ तावातावाने थेट माझ्या केबिनमध्ये आले. ते जवळच्याच सर्वोदय हाऊसिंग सोसायटीचे सेक्रेटरी नाडकर होते. ‘तुमच्या ज्युनियर कॉलेजची मुलं-मुली आमच्या सोसायटीच्या बागेत दुपारी आले होते. चक्क जोडी-जोडीने झाडाखालच्या बाकावर बसून प्रेमाचे चाळे करत होते,’ अशी त्यांची तक्रार होती. जाता जाता चार आयकार्ड नाडकरांनी माझ्या टेबलावर भिरकावली.
दुसऱ्या दिवशी सकाळी शिस्तपालन समिती प्रमुखांकडे नाडकरांनी दिलेली चार ओळखपत्रे दिली. शिक्षकांनी त्यावरून त्यांना आणि त्यांच्या बरोबरीच्या इतर मुला-मुलींना शोधले. त्या सगळ्यांची नावे मला आणून दिली. शिस्तपालन समितीचे शिक्षक या प्रसंगामुळे खूपच संतापले होते. संबंधित विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या पालकांना बोलवावे आणि त्यांच्या पाल्यांचे पराक्रम सांगावे, असे काही जणांचे म्हणणे होते. सर्वांच्या लक्षात राहील अशी कठोर शिक्षा करावी, असे काहींचे म्हणणे होते. मी त्या सर्वांना शांत केले.
अशी घटना आपल्याकडे पहिल्यांदाच घडली आहे किंवा आपल्याला प्रथमच समजली आहे, त्यावेळी मी त्या सर्व मुला-मुलींशी बोलावे. त्याचा परिणाम चांगला झाला तर ठीक अन्यथा पुढे काय शिक्षा करायची ते आपण ठरवूच, यावर सगळ्यांचे एक मत झाले.
हेही वाचा – एक संवेदनशील समस्या… कच्चे प्रेम
त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना आम्ही एका वर्गात बोलावले. मी एकटीच त्यांच्याशी बोलायला वर्गात गेले. मी वर्गाचा दरवाजा बंद केला आणि स्टेजवरील खुर्चीत बसले. एक मिनिट काहीच बोलले नाही. सर्वजण जरा घाबरलेले भांबावलेले होते. मी प्रत्येकाकडे पाहिले आणि बोलायला सुरुवात केली,
“आपण सर्वजण येथे का जमलो आहोत, हे सगळ्यांना माहित आहे ना?”
सगळ्यांनी हलकेच मान हलवून होकार दिला.
“मी प्राचार्य होऊन पाच वर्षे झाली. या काळात विद्यार्थ्यांच्या बाबतीत खूप चांगले अनुभव मला आले. त्यामुळे मला खूप आनंद झाला. काम करण्याचा उत्साह द्विगुणीत झाला. काही वाईट अनुभवही आले. त्यामुळे मला तसे दुःखही झाले. पण अंतर्मुख होऊन विचार केला. भविष्यात असे प्रसंग टाळता येतील याबाबत मी आणि माझे सहकारी शिक्षक काही नियम तयार करतो, नियोजन करतो आणि त्याची कार्यवाही देखील करतो.
परंतु काल जो प्रसंग घडला, तो मात्र कमालीचे दुःख देणार होता. कारण, त्यात माझ्या विद्यार्थ्यांचा, माझा, माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचा, सर्वात जास्त म्हणजे माझ्या संस्थेचा अपमान झाला आहे. ते माझ्या फार जिव्हारी लागलंय. तुम्हाला त्याची कितपत जाणीव आहे, मला माहीत नाही.”
एवढं बोलल्यावर मी काही सेकंद थांबले आणि म्हणाले, “खरंतर कालच्या प्रसंगानंतर मी तुमच्या पालकांना बोलवून तुमच्यासमोर त्यांना सर्व हकीकत सांगू शकले असते. तुम्हाला शिक्षाही करू शकले असते. दंड करू शकले असते. तुमच्या हातात लिव्हिंग सर्टिफिकेट देऊन तुम्हाला बाहेरचा रस्ताही दाखवू शकले असते… तथापि यापैकी काहीही न करता मी आज तुमच्याशी बोलणार आहे.”
“माझ्या बोलण्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला काही सांगायचे असेल, काही विचाराचे असेल, तुमचे मत मांडायचं असेल तर निसंकोचपणे बोला… तुम्ही सर्वजण 16 ते 19 वर्षे वयोगटातले आहात. या वयात प्रेमभावना नुकतीच समजायला लागलेली आहे. साहजिकच तुम्हाला या भावनेचे खूप कुतूहल असणार. मुलाला मुलींचे आणि मुलीला मुलांचे विशेष आकर्षण असणार हे अगदी नैसर्गिक आहे. त्यात गैर काहीच नाही. आम्ही देखील या स्थितीतून गेलोय. तुमच्या पिढीला तर, याबाबत फारच तारेवरची कसरत करावी लागते; कारण हल्ली प्रसार माध्यमांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात आहे. प्रेम भावनेला त्यामुळे खतपाणीच मिळते. हे देखील तितकेच खरे आहे की, याच प्रसार माध्यमांमुळे तुम्हाला वयाच्या मानाने जास्त प्रगल्भताही आलेली आहे.”
“आपण मनुष्यप्राणी सामाजिक बांधिलकी पाळणारे आहोत. त्यात सामाजिक अलिखित नियम, बंधने पाळणे आवश्यक असते. प्रसार माध्यमातून हे देखील आपल्याला कळते, कळायला हवे; नव्हे कळलेच पाहिजे. एक यशस्वी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी हे सामाजिक अलिखित नियम आहेत. त्यासाठी प्रेमभावनेच्या आहारी जाऊन वाहवत जाण्याऐवजी संयम राखणे, हे या वयात जास्त महत्त्वाचे आहे.”
“आज आपलं काय कर्तव्य आहे? काय कार्य आहे? हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या शारीरिक वाढीकडे लक्ष द्यायला हवे. अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे. भविष्यासाठी ते जरुरीचे आहे. घरकाम, आर्थिक व्यवहार करणे, वाचन करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. थोडक्यात काय तर, भविष्यात आपले स्वतःचे जग, नोकरी, व्यवसाय, संसार उभा करताना आवश्यक असणाऱ्या सर्व प्राथमिक तसेच अत्यावश्यक गोष्टी शिकणे याला आपण प्राधान्य दिले पाहिजे. ही पायरी यशस्वीपणे पार केल्यानंतरच प्रेमभावनेचा विचार करण्याची वेळ येते. हा देखील सामाजिक जीवनातला एक अलिखित नियम आहे आणि तो सर्वांनी पाळलाच पाहिजे,” असे मी म्हणाले.
“तारुण्य सुलभ प्रेम ही अत्यंत सुंदर आणि पवित्र भावना आहे. ती केव्हाही आणि कुठेही व्यक्त करून तिचा अपमान करू नये. योग्य वेळेची वाट पहा, मग बघा तिच्या पवित्र्याने तुमचे जीवन उजळेल. त्यासाठी संयमाकडे सर्व सूत्र सोपवा. तुम्ही सगळी चांगली मुलं आहात. तुमचं सगळ्यांचं भविष्य खूप चांगल आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर आहेत…”
एवढे बोलून मी थांबले. थोडा वेळ शांतता होती. त्यांच्यातला एक जण उठून म्हणाला, “सॉरी मॅडम, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. यापुढे आम्ही कधीच चुकीचे वागणार नाही. प्रॉमिस.”
हेही वाचा – गोष्ट ‘जर’ आणि ‘तर’ची!
“हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही केलेल्या चुकीमुळे तुम्हाला शिक्षा देण्याऐवजी आज मी तुम्हाला समजावले आहे. हे फक्त एकदाच! यापुढे तुमचे वागणे संयमितच असले पाहिजे, अन्यथा तुम्हाला फार मोठ्या शिक्षेला सामोरे जावं लागेल, याची जाणीव ठेवा. शिस्तपालन विभाग तसेच सर्व शिक्षकांचे तुमच्याकडे यापुढे जास्त बारकाईने लक्ष असेल, हेही लक्षात ठेवा.”
एवढं बोलून मी वर्गाबाहेर पडले. माझ्या मुद्द्यांचा भावनांचा थोडा तरी परिणाम मुला-मुलींवर झाला असावा, असे मला वाटले. हेही नक्की की, या विषयावर बोलण्याची तयारी करणे, प्रत्यक्ष बोलण्याचे धाडस करणे याचा खूप मोठा ताण माझ्या मनावर पडला होता. या वयातील मुलांना तसेच मुलींना प्रेमभावना, प्रणय याबाबत समर्पक आणि प्रभावी समुपदेशन, मार्गदर्शन करणारी स्वतंत्र व्यवस्था प्रत्येक शिक्षण संस्थेत असलीच पाहिजे, असे मला वाटते. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी मुलांना समुपदेशन करावे. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. याबाबत समुपदेशन करण्याची एक सक्षम यंत्रणा असावी, असे मला माझ्या अनुभवावरून वाटते. प्रत्येक चुकीला शिक्षा हा मार्ग नक्कीच नाही