मंदार अनंत पाटील
साधारण जानेवारी 2024च्या पहिल्या आठवड्यात आईने प्रथमच आपणहून विचारणा केली गेली की, माझा व्हिसा कधी करशील? व्हिसा तयार झाल्यावर आमच्या बिल्डिंगमध्ये राहणारे प्रकाश बापट आणि मिसेस अश्विनी बापट यांची लंडन ट्रिप ठरली आणि आम्ही सुटकेचा श्वास टाकला. कारण, आई अगदी घरच्या लोकांबरोबर अगदी डोअर टू डोअर येणार होती. मग क्षणाचाही विलंब न करता तिचे विमानाचे तिकीट बुक केले.
भाग – 2
आता एकदाची यायची तारीख दिवस आणि वेळ नक्की झाली. आता माझे आणि पल्लवीचे विचारमंथन जोरात सुरू झाले. अगदी बारीक-सारीक गोष्टींचा सखोल आढावा घेऊ लागलो. आई येणार तेव्हाचे लंडनमधील तपमान, आईची तब्येत आणि पथ्य, तिचे रूटिन आणि आहार याचाही तपशील जाणून घेतला. ती शाकाहारी असल्याने बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. मग वेळोवेळी फोनवर बोलून तिला पण इकडची माहिती देण्यास सुरुवात केली. ती पण उत्साहाने प्रतिसाद देत होती आणि आमचा आनंद वाढत होता. हळूहळू तिच्या कानावर घातलेच की, पल्लवी 18 ऑक्टोबर 2024ला भारत भेटीस जाणार आहे आणि मग तू तिच्याबरोबर जाऊ शकशील… थोडक्यात 15 दिवसांची ट्रिप तीन महिने लांबविली गेली आणि त्यात आणखी पण प्रलोभन दाखवले की, आल्यावर 10 ते 15 दिवस इथे रुळायला लागतील. मग दर वीक-एंडला लंडनभ्रमण करता येईल; त्यात साधारणत: एक महिना लागेल. मग युरोप टूरचे प्लॅनिंग आहे. ही टूर साधारण 4-6 दिवसांची असेल आणि तू येतेच आहेस तर, गणपती पण इथेच साजरा करूया… अशी एक ना अनेक कारणं गळी उतरवत शेवटी तीन महिने राहायला तयार केलेच.
एकदा ते नक्की झाले तेव्हा मग मी आणि पल्लवी आणखी जोमाने कामाला लागलो. पल्लवी तर रोजच नवीन नवीन कल्पना माझ्याबरोबर शेअर करत होती … नवनवीन टुरिस्ट आकर्षण शोधत होती आणि माझ्या डोक्यावर बसून बरेच बुकिंग करून ठेवले, जेणेकरुन ऐनवेळी त्रास आणि वेळ वाचेल. पहिली गोष्ट केली, ती म्हणजे आईचा ‘Travel Insurance’, जो अतिशय महत्त्वाचा होता. सगळे प्लॅनिंग फक्त डोक्यात न ठेवता पल्लवीने ते डायरीत अगदी पद्धतशीरपणे तारखेनुसार लिहून ठेवले… मी त्याबाबतीत तसा निष्काळजीच!
युरोप टूरची सगळी माहिती आणि तारखा काढल्या, पण युरो 2024 आणि पॅरीस ऑलिम्पिक यामुळे व्हिसासाठीची तारीख 24 ऑगस्ट 2024नंतरचीच होती, त्यामुळे तो प्लॅन रद्द करावा लागला… असो! काहीतरी पुढच्या भेटीत पाहिजेच!! पण मग लगेचच लंडन आणि आसपासच्या टूर्स बघितल्या आणि एक चार दिवसांची स्कॉटलंडची सहल मिळाली, जी आईला नक्की आवडेल.
आईला सर्व तयारींचा तपशील वरचेवर कळवत होतो आणि ती पण तितक्याच उत्साहाने प्रतिसाद देत होती. भाऊ मनोज, वृंदा माई, माणिक ताई, संदीप आणि मीनल ताई यांनाही कल्पना दिली होती आणि त्यांचीसुद्धा कौतुकाची थाप मिळत होती. पल्लवी तर रोज मला आठवण करून द्यायची की, हे बुकिंग केलेस का? आईचे लोकल डॉक्टरकडे नाव नोंदवलेस का? माझ्यापेक्षा जास्तच उत्साह तिला आहे. आईकरिता वेगवेगळे पदार्थ बनवून खायला द्यायची वाट बघते आहे.
आई येणार म्हणून घराची रंगरंगोटी करून घेतली आणि आईला आम्ही कामावर गेल्यावर कंटाळा येऊ नये म्हणून पुस्तक आणि मराठी चॅनलही लावून घेतली. थोडक्यात काय तर, स्टेज सेट आहे… वेळ जवळ येत आहे… आणि दोन्ही बाजूला तयारी जोरात सुरू आहे….
क्रमश: