मागील लेखांतून आपण नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताना शाळेच्या जबाबदाऱ्या या विषयांतर्गत विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेतील तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसंबंधित आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता याबाबत महत्त्वाची माहिती घेतली. आता या लेखात आपण शाळेची तसेच वर्गाची सजावट याविषयी माहिती घेऊयात.
- शाळेचे प्रवेशद्वार भक्कम आणि सुरक्षित असावे, हे आपण मागील लेखात पाहिले आहे. प्रवेशद्वार मनमोहक रंगाने रंगवलेले असावे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वार फुले व फुगे यांनी सुशोभित करावे.
- शाळेत प्रवेश केल्यावर दिसणार्या भिंतीवर शाळेचे नाव सुवाच्य अक्षरात आकर्षक पद्धतीने लिहिलेले असावे.
- मुलांचे स्वागत नेहमीच हसतमुखाने तसेच गोड शब्दांत, आवाजात करावे. आपण ‘नमस्ते’ म्हणावे आणि मुलांना देखील ‘नमस्ते’ म्हणण्यास शिकवावे.
- वर्गाबाहेरील परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबर शक्य असल्यास भिंतीच्या कडेने छोटी रोपे लावावीत अथवा रंगीबेरंगी फुलांच्या छोट्या प्लास्टिकच्या कुंड्या, परिसर सुंदर दिसेल अशा पद्धतीने ठेवाव्यात. (मुलांच्या सुरक्षिततेची काळजी मात्र अवश्य घ्यावी.)
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : मुलांची सुरक्षितता
- शाळा म्हटली की, शाळेच्या भिंती या बोलक्याच हव्यात, ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार भिंती विविध चित्रे, संदेश, सुविचार तसेच शिक्षणास समर्पक बाबींनी सुशोभित कराव्यात.
- मुलांचा वयोगटानुसार वर्गात भिंतींच्या कडेने विविध खेळणी ठेवावीत, उदाहरणार्थ बॅट, बॉल, वेगवेगळ्या आकाराच्या छोट्या गाड्या, चौकोनी गोल मनोरे (प्लास्टिकचे अथवा लाकडी असल्यास वजनाने हलके), कोरे कागद, तेलकट खडू, पाटी पेन्सिल इत्यादी. याशिवाय शिक्षिका, मुख्याध्यापिका आपापल्या कल्पनेनुसार आणखी खेळण्यांची व्यवस्था करू शकतात.
- वर्गाच्या दोन भिंती खालच्या बाजूस साधारण एक ते दीड फूट काळ्या रंगाने रंगविल्यास त्यांचा उपयोग फळ्यासारखा करता येतो. मुलांना त्यावर रेघोट्या मारण्यास, चित्रे काढण्यास हमखास आवडते. मुलांना शाळेत रमविण्यासाठी ही योजना नक्कीच उपयुक्त ठरते.
- वर्गाच्या भिंतींवर विविध शैक्षणिक तक्ते, निरनिराळ्या आकाराच्या रंगीबेरंगी पताका वर्गसजावटीत खचितच भर टाकतात.
- वर्गातील फळ्यावर सुंदर फुले, फळे, मुलांच्या आवडीची कार्टून्स अशी वेगवेगळी चित्रे काढल्यास वर्गसजावट अधिक आकर्षक दिसते.
- वर्ग सजावट करताना बाहेरून विकत घेतलेली शैक्षणिक साधने वापरण्याऐवजी शिक्षकांनी सेविकांच्या मदतीने केलेली शैक्षणिक साधने निश्चितच आकर्षक ठरतात.
- वर्ग चालू करताना मुलांच्या आवडीची गाणी / बालगीते लावल्यास मुलांच्या आनंदाला पारावार रहात नाही.
हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा तसेच मुलांची स्वच्छता
थोडक्यात, शाळेतील भिंती, परिसर आणि वर्ग सर्व काही बोलके, मुलांचे लक्ष वेधून घेणारे, मुलांना छान वाटेल आणि आवडेल असे असल्यास मुलांना शाळा नक्कीच हवीहवीशी वाटेल.
शाळेची आणि वर्गाची सजावट मनमोहक, प्रसन्नदायक तसेच मुलांच्या शिक्षणास पूरक असावी म्हणजे मुलांच्या शैक्षणिक वाटचालीची सुरुवात खचितच सुकर होईल.
क्रमश:


