रश्मी परांजपे
भाग – 2
मागील लेखात आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, याविषयी काही निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण सदर विषयावरील आणखीन काही मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत.
मुलाची शाळेतील उपस्थिती
शाळा सुरू झाल्यानंतर सबळ कारण असल्याशिवाय मुलाला गैरहजर ठेऊ नये. तथापि, मुलाला गैरहजर ठेवण्याची गरज वाटल्यास शिक्षिकेला पूर्व-कल्पना द्यावी. मुलाच्या आजारपणात साहजिकच शाळेत जायला जमणार नाही. अशा परिस्थितीत मुलाला औषधोपचार तसेच विश्रांतीची गरज असते. महत्त्वाची बाब म्हणजे, मुलाला पूर्ण बरे वाटल्याशिवाय शाळेत पाठवू नये.
तसेच ठोस कारण असल्याशिवाय मुलाला शाळा सुटण्यापूर्वी शाळेतून घरी नेऊ नये.
मुलाला स्वच्छतेची सवय
आपल्या मुलाला शाळेत शी-शू लागल्यावर सांगण्याची सवय लावावी. तसेच, जरुर पडल्यास उपयोगी पडावा म्हणून एखादा जादाचा ड्रेस मुलाच्या दप्तरात अवश्य ठेवावा आणि मुलाला याबाबत आवर्जून सांगावे.
हेही वाचा – Mission Admission : पूर्व-प्राथमिक शालेय प्रवेशाची पूर्व-तयारी
मुलाला ने-आण करण्याबाबतच्या नोंदी
मुलाला शाळेत येण्या-जाण्यासाठी शाळा-बस (School Bus) किंवा ठराविक रिक्षा किंवा व्हॅनची सोय केली जाते. याबाबत पालकांनी वाहन नंबर, चालकाचे नाव, पत्ता आणि फोन नंबर इत्यादी तपशील अवश्य ठेवावेत. (मी शाळेत कार्यरत असताना, असे तपशील पालकांनी ठेवावेत याबाबत मला सतत आग्रही रहावं लागायचं.)
शालेय सूचनांचे पालन
शाळेतून वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांचे पालकांनी काटेकोर पालन करावे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध कार्यांचे वेळोवेळी नियोजन करावे लागते. यात मुलांचे दैनंदिन कार्यक्रम, सुटट्या, वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा किंवा नोंदवली जाणारी निरीक्षणे, विविध उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धा, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो. या आणि अशा तत्सम कार्यांसाठी शाळा खूप मेहनत घेत असतात. यांचे नियोजन करताना बारीक सारीक गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. शाळेचे नियोजित कार्यक्रम तथा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात अर्थातच पालकांकडून सहभाग तसेच सहकार्य नितांत गरजेचे असते. हे सर्व करण्यासाठी शाळा सूचनांच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधत असते. अशा सूचनांचे यथायोग्य पालन करणे पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे.
तथापि, काही बाबतीत, विशेषतः मुलाच्या आईची जबाबदारी अधिक असते. वानगीदाखल काही उदाहरणे – मुलाला डब्यात काय द्यावे, सणवार साजरे करण्याच्या कार्यक्रमात मुलांची विशेष वेशभूषा कशी असावी याबाबतच्या सूचना मुलाच्या आईने सतत डोळ्यासमोर राहतील, अशी व्यवस्था काळजी घेऊन करावी.
महत्त्वाचे म्हणजे, पालकांनी शाळेच्या पालकसभा सूचना आवर्जून लक्षात ठेवून पालकसभेला अवश्य उपस्थित रहावे. या निमित्ताने शाळेतील शिक्षकांशी जरूर संवाद साधावा. तसेच शाळेच्या पालकसभेत दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
हेही वाचा – शाळा प्रवेशोत्तर पालकांची जबाबदारी
आर्थिक बाबींची पूर्तता
शालेय शुल्क तसेच सहल, स्नेहसंमेलन, गणवेश, विविध उपक्रम आणि कार्यक्रम इत्यादींसाठी द्यावे लागणारे शुल्क वेळेवर देणे ही पालकांचे आद्य कर्तव्य आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.
या विषयासंबंधीत आणखीन काही मुद्दे आपण पुढील लेखात पाहुया.
क्रमश:
(लेखिका पूर्व-प्राथमिक शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून 32 वर्षे कार्यरत राहून निवृत्त झाल्या. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनमोल योगदान केले. तसेच लेखिका योग अभ्यासक असून त्या नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. शिवाय, निरामय आरोग्य संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. संकल्पनेच्या सविस्तर तपशीलासाठी त्यांना वैयक्तिक संपर्क करावा.)
मोबाइल – 9881943593