माधवी जोशी माहुलकर
मनाचिये गुंती गुंफियेला शेला
बाप रखमादेवीवरु विठ्ठले अर्पिला
मोगरा फुलला, मोगरा फुलला…
ज्ञानेश्वरांनी रचलेल्या या ओळी मला नेहमीच भुरळ पाडतात. म्हणजे, मन नावाच्या मागावर असंख्य भावभावनांच्या, विचारांच्या द्वैत-अद्वैताच्या सुंदर रंगीत धाग्यांनी विणलेला कवितारुपी शेला जगदीश्वर विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला. किती अद्भुत कल्पना… ती सामान्य माणसाला सुचणं शक्यच नाही… आपल्या बुद्धीपलीकडचे आहे किंवा ज्ञानेश्वरांइतकी बौद्धिक, वैचारिक उंची गाठणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही!
मानवाला देवाने मन आणि बुद्धी यांची अचाट देणगी बहाल केली आहे, जी इतर कुठल्याही प्राण्यात आढळणार नाही. मानवी बुद्धीने मनाला साथ देत अनेक अनाकलनीय गोष्टींचा शोध लावला आहे. मानवी मनामध्ये विचारांचा एवढा गुंता असतो की, तो सोडवायला त्याला संपूर्ण आयुष्य अपुरं पडतं. एक गाठ उकलत नाही, तोच दुसरी तयार होते! सोडवता सुटत नाही, कारण मनाचा वारू चौफेर धावत असतो; पण या वारूला जर बुद्धीचं सारथ्य लाभलं तर लगाम घालता येतो; नाहीतर, ‘बुद्धीविना मती गेली’ अशी काहीशी अवस्था होते. म्हणून यांना समांतर ठेवणे आवश्यक असते. मनातल्या विचारांना जर प्रत्यक्षात उतरावायचे असेल तर, मन आणि बुद्धी यांची सांगड घालावीच लागते. त्याशिवाय नवनिर्मिती होऊ शकत नाही, आणि हे ज्याला उमगलं, त्याला त्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही.
मानवी मनातील संकल्पनांचा वारू एकदा का कल्पनेच्या आणि विचारांच्या विश्वात दौडायला लागला की, त्याला बुद्धीरुपी सारथी लाभतो आणि मग काय त्यातून ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, तुकारामांचे अभंग, रामदासांचे दासबोध अशा एकाहून एक सरस ज्ञानसंपदा त्या अजब रसायनातून बाहेर पडते! एवढेच नव्हे तर, आपल्या बुद्धीच्या आणि मनोबलाच्या शक्तीवर स्वराज्य उभारणारे शिवबा सुद्धा तयार होतात… इतके अफाट सामर्थ्य या मन आणि बुद्धी या दोन देणग्यांच्या ठायी असतं.
असे अगणित लोक असतील की, ज्यांच्या मनात काहीतरी धेय्य असते, पण ते प्रत्यक्ष सफल होत नाहीत; कारण तिथे त्यांची बुद्धी त्यांना साथ देत नाही किंवा मनातील विचारच इतके नकारात्मक असतात की, तिथे बुद्धीला चालनाच मिळत नाही. पर्यायाने नशिबाला दोष देण्यापलीकडे मनुष्य काहीच करत नाही. पण सकारात्मक विचार करून जर त्याला बुद्धीची जोड दिली तर, मनातील गुंता सुटायला वेळ लागत नाही. त्याकरिता प्रयत्न, परिश्रम आवश्यक असतात.
आपलं मन नेहमी अस्थिर असतं. एखाद्या गोष्टीवर लवकर एकाग्र होत नाही. सारखी सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची देवाणघेवाण सुरू असते आणि मन प्रत्येक ठिकाणी शंकित असते. जिथे शंका आली तिथे नकारात्मक विचार वरचढ ठरतात, नकारात्मक विचार आणि शंका तुमच्या मनातील गुंता वाढवतात. साशंक आणि नकारात्मक मनाने घेतलेला निर्णय फारसा लाभदायक नसतो, पण शंका न घेता जर सकारात्मक विचारांना बुद्धीची जोड दिली तर, त्यात एक ऊर्जा, नवचैतन्य निर्माण होते आणि सृजनशील कार्य पार पडत.
मानवी मन खरंच खूपच अनाकलनीय आहे, याच्या खोलीचा अंदाज घेणे तर सर्वसामान्यांना अशक्यच आहे. मनुष्य मनातील सकारात्मक आणि नकारात्मक विचारांच्या गुंत्यात सतत अडकलेला असतो. मनातील या गुंत्यातून सकारात्मक आणि बुद्धीला चालना देणारे विचार निवडता आले पाहिजेत, तरच मानसिक, शारीरिक, भावनिक, आंतरिक उत्कर्ष होतो.
बरं, दुसरं असं की, या मनाला समाधान असं नसतेच मुळी! सारखं कशात ना कशात गुंतत असतं. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे,
तुका म्हणे उगी रहावे,
जे जे होईल ते ते पहावे,
चित्ती असू द्यावे समाधान…
असे किती लोक वागतात? फारच कमी… कारण तेच. कुठल्याही गोष्टीत समाधान नाही आणि त्यामुळे नेहमी अस्थिर, अशांत असे विचार मनात असतात. याचा परिणाम म्हणजे मानसिक त्रास, चिडचिड, आत्मक्लेश, नैराश्य या गोष्टींचा पकड मनावर लवकर बसते आणि बुद्धी भ्रष्ट होऊन अविचारी मनाने मनुष्य निर्णय घेतो, त्याचे परिणाम मनुष्याच्या उत्कर्षात होत नाही तर, तो विचार त्याच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरतो.
हेही वाचा – मी, लेक, बायको आणि कुकर!
बहिणाबाईंनी या मनाला एका ढोराची उपमा दिली आहे! किती समर्पक आहे ती. त्या म्हणतात,
मन वढाय वढाय उभ्या पिकांतल ढोर
किती हाकला हाकला फिरू येते पिकावर…
खरंच किती साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी मनाची अवस्था सांगितली आहे. बहिणाबाईंनी सहजपणे ही अवस्था समजून घेतली आणि सांगितली. त्यांच्या अवतीभवती घडणाऱ्या दैनंदिन घटनांमधून त्यांनी आपल्या बोलीभाषेत कितीतरी सकारात्मक विचार असलेल्या कविता लिहिल्या आहेत. फारसे शिक्षण नसताना, सकारात्मक विचारांना बुद्धीची चालना देऊन बहिणाबाईंनी केवढे मोठे जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे.
मनाच्या गाभाऱ्यात जर डोकावून पहाता आले तर, मानवी जीवनाला काय बहार येईल, ते कसे सांगावे? हे ज्यांना कळले आहे, ज्यांचा त्या निर्गुणाशी रोज संवाद चालत असे त्यांनाच हे माहीत! या मनाच्या भावसमाधीत असताना तुकाराम महाराज आपल्या अभंगातून खूप छान प्रकारे सुचवून गेले, ते म्हणतात,
कमोदिनी काय जाणी तो परिमळ
भ्रमर सकल भोगितसे…
हेही वाचा – स्वाभिमानी की हेकेखोर?
मानवी मन म्हणजे ते कमळ… त्या मानवी मनरूपी कमळलासुद्धा त्याच्या सुवासाची कल्पना नाही. त्याचा उपभोग मात्र हे भ्रमररुपी विचारच घेत आहेत, जे फक्त आणि फक्त आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणत आहेत. पण यातील जर सुवास सगळीकडे पसरवून वातावरण सुगंधित करायचे असेल तर, त्या भ्रमररुपी सकारात्मक विचारांना बुद्धीचातुर्याने कामी लावले पाहिजे.
मनाची अवस्था सांगताना ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की, सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचा हा भावनिक, रंगीबेरंगी शेला या असंख्य धाग्यांच्या गुंत्यातून विणून तो त्या निर्गुणाला अर्पण केला, त्याहीपुढे जाऊन ते म्हणतात –
मनाचा हा गुंता सोडविता सोडविता, जे सकारात्मक विचार हाताशी आले त्यातून एक ना अनेक प्रकारचे अनाकलनीय गूढ मला गवसले… नवचैतन्य निर्माण झाले, सृजनाची निर्मिती झाली, प्रचंड उर्जेचा स्रोत तयार झाला, एक विचार मांडत नाही तर लगेच दुसरा नवीन सकारात्मक विचार तयार व्हायचा… म्हणून तर ते म्हणतात की,
फुले वेचिता बहरू कळियासी आला,
मोगरा फुलला, मोगरा फुलला…
अशा प्रकारे सकारात्मक विचाराने बुद्धीला चालना देऊन जर मनाचा गुंता सोडवता आला तर जग किती सुंदर असेल, नाही? पण ते अवगत करणे वाटत तेवढे सोपे नाही.
ईये मनाचिये गुंती रंगोनी जाऊ रंगात, पाहण्या निर्गुण सगुण हरीरुप…