परिणिता रिसबूड
खेळ
खरे तर खेळ तू सुरू केलास
मी पण मग ठरवले, मनापासून खेळायचे
शक्यतो सगळे नियम पाळायचे
नियम आणि अटी तूच बनवल्या आहेस
कसे खेळा, नका खेळू सांगितले पण आहेस
पण खेळता खेळता मी ही रंगून जाते
खरे की आभास काय सगळेच विसरून जाते
मनच नाही भरत आणि खेळात जाते गुंतत
सगळेच वाटते हवेसे
नाही वाटत सोडावेसे
खेळाची मग नशा चढते
वास्तवाचे भानच सुटते
आता खेळ तुझा नाहीच राहिलाय
मी पण तो जिद्दीने खेळलाय
माहीत आहे मला तूच आहेस सूत्रधार
एक दिवस खेळ तुला माझ्यासकट परत करायचाय साभार
तरी पण
मी ठरवले आहे
मनापासून खेळायचे
शक्यतो सगळे नियम पाळायचे
ठसे
गोकुळीच्या वाटेवरती
उभ्या गोपिका करूनी दाटी
मनी असुसल्या श्री कृष्णाच्या भेटी
मनमोहन, श्यामसुंदर
कृष्ण सावळा मुरलीधर
प्रत्येकीच्या मनात कृष्ण
वेगवेगळी नयनी चित्रं
कुणास स्मरते निळे मोरपीस
माथी रुळती, कुरळे केस
कमल नयन कुणास भावती
मंद स्मित अन् अधरावरती
मुरलीचा गं नाद मनोहर
दंग होतसे एक गौळण
गळ्यात शोभे वैजयंती माला
म्हणे मधेच एक ब्रिजबाला
कौतुक ऐकत होती राधिका
तिला विचारती मग गोपिका
मनातला तुझ्या गिरीधर
कसा आहे आम्हा सांग तर
राधा हसली मंद जराशी
म्हणे हरीची तुलना कशाशी
मला न आठवे हरीचे रूप
पण हरीची पाऊले निळी
तरळतात माझ्या नयनी
माझ्या हृदयी त्यांचे ठसे
उमटले आहेत जसेच्या तसे
हेही वाचा – Poetry : आभाळ, लव्ह बर्ड, पावसाची पहिली सर
वसा
असशील तू भव्य दिव्य
निराकार निर्गुण अपार
त्यात अस्तित्व माझे कणभर
प्रकट होऊन साकार
मला प्रिय हे असणे माझे
असले जरी क्षणभंगुर
तुझीच सृष्टी मोहविते मज
जगण्यासाठी करते अनावर
शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श
अनुभवण्यास व्याकुळ श्वास
विदेही पणाची नकोच मुक्ती
पुन्हा पुन्हा मज जन्माचा ध्यास
आहेसच तू भव्य, दिव्य,
निराकार, निर्गुण, अपार
तरीही बहुविध होण्यासाठी
तुलाही लागलीच ना ओढ
तू माझ्यात अन् मी तुझ्यात
बघण्यास हवाच देहाचा आरसा
असाच स्वरूप न्याहाळण्याचा
पुन्हा पुन्हा मिळू दे वसा
(कवितासंग्रह – कवयित्री)
हेही वाचा – Panchang : आजचे पंचांग, राशीभविष्य आणि दिनविशेष, 29 ऑगस्ट 2025