शोभा भडके
भाग – 6
“आई आरुला काय झालं… ती रडत होती,” भावनाने डायनिंग टेबलजवळ बसत विचारलं.
“काय, सकाळी सकाळी आरु रडत होती? आता काय केलंस पवन?” प्रकाशराव चेअरवर बसत पवनला रागवत म्हणाले.
“बाबा मी काही नाही केलं…” पवन.
“कसं तू काही नाही केलं? तूच तिला सारखं चिडवत असतोस…” नाश्त्याला सुरुवात करत भावना म्हणाली.
“तू गप्प गं! …काय खायला सुरू केलंस लगेच? जा तिला घेऊन ये नाश्ता करायला… आणि हा दादा कुठे राहिला?” – पवन.
“मी का जाऊ? तू रडवलंस, तू जा… मला लेट होतोय कॉलेजला जायला…” ती नाश्ता संपवत म्हणाली. या दोघांचा वाढता वाद पाहून आत्या मधे पडत म्हणाली,
“तुम्ही दोघे तुमचा नाश्ता करून जा आपापल्या कामाला… मी बघते तिला…”
“हो, …आणि पवन तू नीट लक्ष देऊन ऐक, आरु आता काही दिवस इथे राहणार आहे तर, तिची जबाबदारी आपल्यावर आहे… तू तुझ्या खोड्या कमी कर!” प्रकाशराव त्याला समजावत म्हणाले.
त्याने बारीक तोंड करून मान हलवली. आरू म्हणजेच आराधना रडल्यामुळे त्याला पण वाईट वाटलं होतं. खरंतर, तिच्या स्वभावाचा नेमका अंदाज त्यालाही नव्हता. कधी तरी गावी जायचा तो आणि मामाची मुलगी या नात्याने तिला चिडवायचा, खोड्या काढायचा. तीही लटका राग दाखवत त्याला चिडवायची. पण ती रडली कधीच नव्हती…
पण रात्री त्याने असंच चिडवत तिला म्हणाला की, “तुला फक्त भाजी-भाकरीच बनवता येते. नुडल्स वगैरे तुला नाही जमणार!” त्यावर “मी बनवूनच दाखवेन,” असं म्हणून ती रागात निघून गेली होती आणि सकाळी लवकर उठून किचनमध्ये तिच्या दादाच्या मोबाईलवर व्हिडीओ पाहून नुडल्स बनवण्याचा प्रयत्न करत होती… आणि हा सगळा राडा झाला!
त्यामुळे त्याला वाईट वाटलं होतं… आणि मानत काहीतरी ठरवलंही होतं तिला मनवण्यासाठी, पण ते रात्री! कारण त्याला आत्ता ऑफिसला जाणं गरजेचं होतं.
“हे पवन तू का तोंड पाडून घेतलं आहेस? थोड्या वेळातच सगळं विसरून बाहेर येईल ती…” राम येऊन त्याच्या शेजारी बसत त्याच्या पाठीवर थाप देत म्हणाला.
“हो, सॉरी दादा…”
“दादाला नाही आरुला सॉरी म्हण, रात्री आल्यावर, आणि चल आता मला कॉलेजला सोड,” भावना उठून तिची सोफ्यावरची बॅग घेत म्हणाली.
आणि दोघे निघून गेले…
“बरं आत्या मी रात्री गावी जाईन. भाऊंचा फोन होता वरच्या मळ्यातली पाइपलाइन फुटली आहे, त्यामुळे बघावं लागेल म्हणून…” – राम.
“अरे देवा, कशी काय रे फुटली?” – आत्या.
“काय माहीत नाही, पण गेल्यावर कळेल,” राम.
“दादा मग तू गेल्यावर मला उद्या कॉलेजला कोण सोडील?” आरूने रूममधून बाहेर येत चेहरा रडका करून विचारलं.
“अगं बाळा मी आहे, पवन आहे, कोणीही सोडील ना! तू कशाला काळजी करते?” प्रकाशराव तिला समजावत म्हणाले.
“हं… बरं…” असं ती म्हणाली खरं, पण पण मनातून उदास झाली होती… तिच्या दादाशिवाय तिने आजपर्यंत काहीच केल नव्हतं आणि त्याच्यापासून दूरही कधी राहिली नव्हती. पण आता तो परत जाणार म्हणून तिला वाईट वाटत होतं.
सगळ्यांचा नाश्ता झाला प्रकाशरावही आपल्या कामाला निघून गेले. रामचं शेतीविषयक काम होतं, ते करण्यासाठी बाहेर गेला. मग राहिल्या घरी आरू आणि आत्या. मग त्यांनी सगळी कामे आवरून टीव्ही बघत बसायचं ठरवलं. आरू आता नॉर्मल झाली होती.
धाडकन दरवाजा उघडून आकाशच्या केबिनमध्ये येत शिवने विचारलं, “काय झालं आकाश? तुझा कॉन्टॅक्ट झाला नाही का राम शिंदेसोबत?”
हेही वाचा – सिया आणि रामची भेट घडविण्याचा शिवचा निर्धार!
त्याच्या आवाजाने आकाश दचकून जागेवरच उभा राहिला… त्याच्या हातातली फाइलही खाली पडली… छातीवर हात ठेऊन डोळे मोठे करत म्हणाला, “अरे ए, असं घाबरवून मारतो का मला? अरे, लग्न व्हायचंय अजून माझं…”
“इथं माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि तुला तुझ्या लग्नाचं पडलंय?” शिव चिडून म्हणाला.
शिवचं वाक्य ऐकून आकाशला विषय गंभीर आहे, हे कळायला वेळ नाही लागला. त्याने स्वत:ला नॉर्मल करत, शांतपणे चेअरवर बसायला सांगितलं.
“तू सांगणार आहेस का मला?… जाऊदे सोड, मीच बघतो काय करायचं ते…”
“शिव, तू शांत हो बरं आधी… आणि मी केला होता फोन सकाळी तुझ्यासमोर दोन वेळा, पण कट झाला… नंतर लावला तर बिझी होता आणि दुपारी केला तेव्हा बंद सांगत होता… मी पुन्हा ट्राय केला, पण बंदच येत आहे,” आकाश.
“मग, मी तुला त्याच्या घरी जायला सांगितलं होतं ना?” शिव.
“हो, मी पाठवलं होतं एका माणसाला, पण घराला लॉक होतं. शेजारी विचारलं तर गावी गेल्याच कळलं.”
“आता तूच सांग काय करायचं?” आकाश.
“गावी जायचं त्यांच्या…”शिव.
“शिव, मला सांगशील का हा राम शिंदे कोण आहे? आणि सिया दिदी सोबत याचा काय संबंध आहे?”
“सिया दिदीचं प्रेम आहे त्यांच्यावर…” असं म्हणून शिवने सिया दिदीसोबत झालेलं सगळं बोलणं आकाशला सांगितलं.
“पण शिव…” आकाश बोलतच होता की, शिवने त्याला मधेच थांबवलं, “मला माहीत आहे, तुला काय म्हणायचंय? आणि मलाही कळतं ते… पण तरीही प्रयत्न करून बघायचेत मला!”
“ओके, आपण उद्या निघूया.”
मग असंच थोडा वेळ कामाचं बोलून दोघे घरी निघून गेले.
बाहेर जाताना अचानक गावावरून रामला फोन आला… फोनवरचं बोलणं ऐकून रामने कानाला लावलेला फोन गळून पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले… तो जागीच शॉक लागल्यासारखा उभा होता… हात-पाय लटपट कापत होते त्याचे… त्याच्यामागे काही तरी सांगायला आलेली आरू त्याला असं पाहून धावत त्याच्याजवळ आली. “दादा… दादा काय झालं? दादा बोल ना…” तो काहीच बोलत नाही, हे पाहून आरू पण घाबरली.
“दादा… आत्याSS आत्याSS” आरूने आत्याला आवाज दिला.
“काय झालं आरू? राम… काय झालं याला?”
“माहीत नाही आत्या, दादा काहीच बोलत नाही…” आरू.
“राम… ए बाळा, काय झालं? तू असा काय करतोयस?” आत्याने त्याला गदागदा हलवलं.
“हं… हां.. ते… काही नाही… काही नाही झालं… ते सगळं खोटंय मला माहीत आहे! मला माझ्या आरूवर पूर्ण विश्वास आहे…” राम काय बोलत होता, त्याचं त्यालाही कळत नव्हतं… पण आरू आणि आत्या खूप घाबरून गेल्या होत्या!
“दादा, तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाही… काय झालं? कोणाचा फोन होता?”
“हं… हां ते आरू आपल्याला गावी जावं लागेल परत!” तो आता थोडं सावरला होता. जे काही झालं, खरं खोटं, जे काही असेल ते त्याला सावरावं लागणार होतं… तो असा खचून जाऊ शकत नव्हता…
“गावी? पण दादा का? काय झालय सांग की!” आरू पण आता काळजीत पडली होती. तिलाही कळलं होत काही तरी गंभीर असं घडलं आहे.
“आरू… गेल्यावर कळेलच… आत्ता काही नको विचारू! …आत्या आम्ही निघतो, ताबडतोब जाणं गरजेचं आहे,” राम म्हणाला.
“हं… मी पण येणार, आणि मी पवनला कॉल करते तो गाडी घेऊन येईल… आता या वेळेला बस नाही मिळणार… आत चला आधी पवन आला की निघू आपण!” आत्या म्हणाली. रामने सुद्धा मान हलवत होकार दिला आणि आत्याच्या मागे ते दोघे आत आले.
थोड्याच वेळात पवनही आला. तो मित्राची कार घेऊन आला होता… आणि मग ते चौघे मिळून गावी निघाले…
ते निघून गेल्यावर थोड्या वेळात आकाशचा माणूस रामची चौकशी करायला आला होता, पण त्याला दारावर लॉक दिसलं आणि तो आल्या पावली परत गेला होता.
इकडे पहाटे चार-पाच वाजताच शिव आणि आकाश रामच्या गावी जायला निघाले. त्याला कसंही करून लवकरात लवकर रामची भेट घ्यायची होती.
“शिव जरा हळू ड्रायव्हिंग कर ना!” शहरातून बाहेर गावाच्या दिशेने जाताना खड्ड्यांमुळे गाडीत धक्के बसत होते आणि त्यात शिव फास्ट ड्राइव्ह करत होता. त्यामुळे आकाश पुरता वैतागून गेला होता.
“तू गप रे! माहीत नाही का, पण मला अस्वस्थ वाटतंय… असं वाटतंय की, तिथं लवकरात लवकर पोहोचणं गरजेचं आहे माझं…” शिव म्हणाला.
“अरे पण…” आकाश बोलत होता, पण शिवच सगळं लक्ष समोर होतं… त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच बेचैनी दिसत होती… म्हणून मग आकाशने शांत राहणं पसंत केले.
इकडे आरूच्या घरी सकाळीच महाभारत सुरू झालं होतं. तिची आई तोंडाला पदर लावून रडत होती… आरु आत्याला धरुन उभी होती… सोबत भीती आणि रडणं सुरूच होतं… कारण सामोर तिचे बाबा तिच्याकडे रागाने पाहात होते… राम कदाचित कुठे तरी बाहेर गेला असावा.
हेही वाचा – शिवने दिलेली फाइल पाहून आकाश गोंधळला…
“बोल की पोरी… काय हे सगळं? कधीपासून चालू हे… बोल की… उचकट की हे तुझं थोबाड…” सखाराम तिच्यावर धावून जात म्हणाले.
त्यांचं असं अंगावर धावून येण्याने ती दचकून मागे झाली आणि तिचा तोल गेला… तेव्हढ्यात मागून येऊन रामने तिला धरलं आणि ती पडता पडता वाचली. ती मागे वळून त्याच्या गळ्यात पडली आणि रडू लागली…
“दा… दादा, मी काहीच केलं नाही. मला नाही माहीत हे कसं झालं! तू… तू सांग ना यांना. दादा, मी खरंच काही नाही केलं…” ती रडत रडत बोलत होती.
“शSS शांत हो, मला माहीत आहे, तू काही नाही केलंय. तू रडू नको, मी आहे ना!” रामने तिला धीर दिला.
“काय नाही केलं… साऱ्या गावासमोर मान खाली घालावी लागते हिच्यामुळे… आणि तू म्हणतोय काय नाही केलं?” भाऊ त्याच्यावरही ओरडले.
“आरू तू आत जा…” राम तिला शांतपणे म्हणाला.
“पण दादा…” आरू आत जायला तयार नव्हती.
“जा म्हणालो ना, तर जा…” रामने तिला थोडंसं दमात घेऊनच सांगितलं. तसं ती गुपचूप आता गेली. पण, आत जाऊन दाराआडून बाहेर काय सुरू आहे, ते पाहू लागली…
आता राम भाऊंकडे वळून म्हणाला, “बाबा ते फोटो खोटे आहेत. मोबाइलवर एडिट करून तयार केलेले! दोन वेगवेगळे फोटो एकत्र करून ते असे मोबाइल वर टाकलेत… खरंच अरूचा त्या मुलासोबत काहीही संबंध नाही!” रामने त्यांना समजेल अशा शब्दांत त्यांना सांगितलं. पण तरीही आई आणि भाऊंचा राग काही कमी झाला नव्हता.
रामला त्याच्या गावातील मित्राचा फोन आला होता आणि त्यानेच सांगितल की, आरूचे एका मुलासोबताचे क्लोज फोटो गावातील व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकले गेलेत… अर्थात, हे काम कोणी केलं, हे त्या नंबरवरून लगेच लक्षात आल होतं. ज्याने हे फोटो टाकले होते, तो गावातला अतिशय वाया गेलेला मुलगा होता… फोटोत आरूसोबत असलेला मुलगा कोण आहे, हे मात्र कळलं नव्हतं!
ते सगळं ऐकून रामला खूप मोठा धक्का बसला होता… गावाकडे एखाद्या मुलीचे असे फोटो व्हायरल होणं म्हणजे खूप मोठी बदनामीची गोष्ट होती! साधं एखाद्या मुलीने मुलाकडे पाहून हसलं तरी, त्यांच्याबद्दल वाईट विचार केले जातात… तर इथे आरुचे फोटो होते त्या मुलासोबत! त्यातच ते सगळ्या गावात पसरले होते. म्हणून राम तातडीने आरूला घेऊन गावी आला होता. घरी काय वातावरण असेल याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याला शांतपणे सगळं हॅण्डल करावं लागणार होतं… भाऊ आणि आई तिच्यावर खूप रागावणार, हे त्याला माहीत होतं. भाऊ तर मारायला पण कमी करणार नाहीत… म्हणून वाटेत त्याने आरूला काहीच सांगितलं नाही… आत्ताच तिला टेन्शन द्यायचं नव्हतं.
महत्त्वाचं म्हणजे, हे सगळं कसं झालं, ते पण शोधायचं होतं. ते सगळे मध्यरात्रीच पोहचले होते… त्यामुळे भाऊ शेतावर होते. त्याने आईला दम देऊन सकाळी बोलू, असं सांगितलं. तोवर आरुला काही बोलू नको, असं सांगून तो बाहेर निघून गेला. आरूला कळत नव्हतं नेमक काय झालंय! आई काही बोलली नाही, पण तिच्यावर रागाचा कटाक्ष टाकत आत्याला आत घेऊन गेली… आरू दारातच उभी होती, विचार करत… तितक्यात राम परत आला आणि तिच्य खांद्यावर हात ठेऊन म्हणाला,
“जाऊन झोप आरू, सकाळी कळेल. जास्त विचार करू नको… मी येतोच.”
“पण दादा, तू कुठं चालला एवढ्या रात्री? काय झालं?”
“म्हटलं ना सकाळी कळेल…” तो म्हणाला आणि निघून गेला… तो आत्ता घरी आला होता.
आरू तर पूर्ण गोंधळून गेली होती. कारण, सकाळी सकाळी भाऊ घरी दारू पिऊन आले होते. तिला जोरात आवाज दिला होता… खूप काही बोलत होते… ती नुसती रडत होती… तिच्यापुढे त्यांनी मोबाइल धरला होता आणि विचारत होते, “कोण आहे तो?”
ती तर चक्रावून गेली होती, ते फोटो पाहून! तिला कळत नव्हतं, काय हे सगळं… त्यात तिला बोलायला मिळतच नव्हते… कारण भाऊ होतेच तितके रागात. ती नुसती मुसमुसत रडत होती. त्यांनी तिला मारायला हात उगारला तेवढ्यात राम आला आणि त्याने तिला आत जायला सांगितलं.
क्रमशः


