Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeललित...कनेक्टिंग दी पीपल!

…कनेक्टिंग दी पीपल!

मनोज जोशी

विरार ते दादर (ऑफिस) असो किंवा दादर ते विरार (घर) असो, मी शक्यतो स्टॅण्डिंग प्रवास करावा लागणार नाही, हे पाहतो. मग भलेही घरातून लवकर निघावं लागलं तरी बेहत्तर किंवा दादरहून चर्चगेटला जावं लागलं तरी, तसं मी करतो. वृत्तपत्रात काम करताना हा प्रश्न फारसा भेडसावत नसे. कारण दुपारची गाडी पकडायची… तीही शक्यतो दादर आणि येताना रात्री 12.20 किंवा 12.40 गाडी पकडली की, बसायला मिळत होते. तरीही जरा लवकर गेलो तर, एखादी बोरिवली किंवा भाईंदर लोकल पकडायची आणि कांदिवलीला उतरायचे. त्यानंतर येणारी विरार लोकल पकडायची. जेणेकरून दादर ते कांदिवलीचा प्रवास छान बसून व्हायचा आणि विरार ट्रेनमध्ये बहुतांश वेळा बोरिवलीला बसायला जागा मिळायची. असं सर्व गणित असायचं.

जून 2022मध्ये मी आपलं महानगर, ऑनलाइन जॉइन केलं. तेव्हा मला दोन शिफ्ट असायच्या. (आता एकच फिक्स आहे – सकाळी 10 ते सायंकाळी 6.30) मग रात्री सव्वाअकरा – साडेअकराला ऑफिसमधून बाहेर पडल्यावर अधून-मधून भाईंदर किंवा बोरिवलीने कांदिवलीपर्यंत जात होतो. एकदा रात्री विरार ट्रेनची वाट पाहात कांदिवली स्थानकावर उभा होतो. थोडासा खोकला झाल्यामुळे मास्क लावला होता. त्यावेळी एकजण माझ्याकडे बघत बघत पुढे निघून गेला. त्याच्या कपड्यावरून तो खाद्यपदार्थ्यांच्या कोणत्यातरी स्टॉलवर काम करणारा होता, हे लक्षात आले. पण तो असा बघत गेल्याने मी चिडलो. काही वेळातच तो परत आला आणि पुन्हा माझ्याकडे बघत बघत जाऊ लागला. तोंडावरचा मास्क काढून मी त्याला अडवून विचारलं, ‘काय रे, काय बघतोस?’ उलट त्यानंच मला हसत विचारलं, ‘क्या साहब, आपने मुझे पहचाना नहीं?’

हेही वाचा – मन ‘वडा’य ‘वडा’य…

मी नकारार्थी मान हलवली. तो पुन्हा हसला आणि म्हणाला, ‘आपने मास्क लगाया था, इसलिए मैं अंदाजा ले रहा था कि, आप वही हैं क्या? आप बांदरा में बोरिवली साइड के ब्रीज के पास जो स्टॉल हैं वहाँ हमेशा बटाटावडा खाने के लिए आते थे और मैं ही आपको गरमागरम वडा तय्यार करके देता था!’ तेव्हा माझी ट्युब पेटली. मी त्याला विचारलं, ‘अभी आप यहाँ कहाँ?’

‘बोरिवली की तरफ का वह दुसरा स्टॉल दिख रहा हैं, वह मैं सँभालता हूं. आप कभी आईये वहाँ पर वडा खाने के लिए…’ तो म्हणाला. मी एवढंच म्हणालो, ‘जरूर…’

त्याच्या पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा कांदिवलीला गेलो. हातात वेळ होता. त्या स्टॉलवर मी गेलो. तो तिथे नव्हता. म्हणून वडे पार्सल घेऊन मी निघणार होतो, तेवढ्यात मला बघून तो धावत आला.

‘क्या साहब कैसे हैं? वडा खायेंगे ना?’ असं विचारताच मी म्हणालो, ‘इसीलिए तो आया हूं…’

त्याने लगेच आपल्या सहकाऱ्याला चार-पाच वडे तळायला सांगितलं, सोबतच मला विचारलं, ‘आप को टाइम है ना?’

‘जी, हैं..’ मी.

मला दोन वडे खायला दिले. ते खाऊन झाल्यावर मी पैसे द्यायला गेलो तर, त्याने घेतले नाहीत. आपल्या खिशातून त्या वड्याचे पैसे गल्ल्यात टाकले – ‘आप पहली बार मेरे स्टॉल पर आये हैं, मैं आप से पैसा नहीं लूंगा…’

आमचं असं बोलणं सुरू असतानाच त्या स्टॉलला लागूनच असलेल्या बिस्किट, वेफर्सच्या स्टॉलवर उभा असलेला माझ्याकडे बघत होता. माझं त्याच्याकडे लक्ष गेल्यावर तो हसला आणि म्हणाला, ‘साहब, पहचाना क्या?’

‘अरे, आप यहाँ कहाँ?’ मी विचारलं.

‘कोरोना के वक्त सब बंद था. लेकिन काम तो कहीं ना कहीं तो करना ही था. यहाँ मिल गया तो यहाँ आ गया…’

हेही वाचा – 1993चा तणाव!

तो दादरच्या पाच नंबर प्लॅटफॉर्मवर नवीन पुलाजवळील स्टॉलवर असायचा. मी विरारहून दादर ट्रेन पकडत असे. त्या ट्रेनमधून मी उतरत असे आणि तो त्या ट्रेनमध्ये वडे आणि वडापाव विकायला जात असे. मला येताना बघितल्यावर तो आपल्या हातातील ट्रेमधील दोन-चार गरम-गरम वडे माझ्यासाठी बाजूला काढत असे आणि उरलेले विकायला घेऊन जात असे. त्या स्टॉलवरील सर्वच जण ओळखायचे. त्यामुळे यात खंड पडला नाही.

दादरप्रमाणेच आणखी असे चार स्टॉल होते की, तिथे माझी खास बडदास्त ठेवली जायची. त्यातला एक होता वडाळ्याचा. 2006 ते 2009 या काळात मी दररोज विरार ते सानपाडा असा प्रवास केला. सानपाड्याला माझं ऑफिस होतं. वांद्रेहून वडाळ्याला जात असे. त्यावेळी वडाळ्याला प्लॅटफॉर्म नंबर दोनवर एकच स्टॉल होता. त्या स्टॉलवर वडा खाऊनच पुढे जात असे. माझी स्टॉलवर यायची वेळ झाली की, गरम वडे तयार करण्याची सज्जता करून ठेवलेली असायची. मला येताना पाहिल्यावर गरम तेलात वडे सोडले जायचे. दुसरा एकजण सरबतासाठी असलेला काचेचा ग्लास व्यवस्थित धुऊन पाण्याने भरून माझ्यासमोर ठेवला जायचा. खाऊन, पैसे देऊन सर्वांना हात करून मी सानपाड्याला जाणारी गाडी पकडत असे.

तसाच प्रकार वांद्रे स्टेशनवरील दोन स्थानकांवर पाहायला मिळायचा. तिथे चार आणि पाच प्लॅटफॉर्मवर पुलाच्या जिन्याजवळ असलेल्या स्टॉलवर मला गरम-गरम वडे दिले जायचे. (कांदिवलीला भेटलेला त्याच स्टॉलवर होता) त्यावेळी मी ‘प्रहार’ पेपरमध्ये होतो. तर, आपलं महानगरच्या वेबसाइटसाठी जॉइन झाल्यावर त्याच प्लॅटफॉर्मवरच्या पुलाखालील स्टॉलवर वडे खात होतो. तिथेही मला बघितल्यावर लगेच वड्याची प्लेट तयार केली जायची.

हेही वाचा – नवी पिढी, ब्रॅण्डेड पिढी

वडाळा असो, दादर असो की वांद्रे… तिथं गेल्यावर माझ्यासाठी वेगळी ट्रीटमेन्ट असायची. थोडा वेळ थांबायला लावून गरम-गरम वडे दिले जायचे. रात्री उशिरा दादर स्टेशनच्या मेनगेटसमोर लागणाऱ्या वडापावच्या स्टॉलच्या बाबतीतही असाच अनुभव होता. जिभेचे चोचले पुरवायला मी वेगवेगळ्या स्टॉलवर जात होतो आणि माणसे जोडली जात होती. वडा हे केवळ आपली आवड पूर्ण करणारा नव्हे तर, लोकांना कनेक्ट करण्याचेही साधन बनले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!