सतीश बर्वे
बाबांची तब्येत अचानक बिघडल्याची बातमी मी सुचेताला कळवली होती. ते ऐकून तिकडे अमेरिकेत तिच्या घरी काय परिस्थिती झाली असेल याची मला इथे मुंबईत राहून जाणीव होती. मला जास्त काळजी आजोबावेड्या केदारची होती. तीन आठवड्यांपूर्वी बाबांना हस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं कळल्यावर सुचेता एकटीच अगदी दोन-तीन दिवसांसाठी येऊन बाबांना भेटून गेली होती. केदारची पदव्युत्तर परीक्षा अगदीच तोंडावर असल्याने तो इच्छा असूनही तिच्यासोबत येऊ शकला नव्हता.
सुचेताशी काल रात्री फोनवर बोलताना केदारही माझ्याशी बोलला… बोलताना ढसाढसा रडत होता. “काका, आजोबांना माझा मेसेज वाचून दाखव प्लीज…” अशी विनवणीही त्यानं केली. त्याने लिहिले होते –
“तुम्हाला माझ्यासाठी थांबायचं आहे आजोबा! मला खात्री आहे की, देवबाप्पा माझं नक्की ऐकेल. आजपासून बरोबर 12 दिवसांनी माझी परीक्षा संपणार आहे… त्याच दिवशी रात्रीच्या फ्लाइटचं तिकीट मी काढलं आहे. त्यानंतर अवघ्या 15-16 तासांच्या प्रवासानंतर मी मुंबईत पोहोचेन. तिथून लगोलग तुम्हाला भेटायला येईन. आजोबा ऐकाल ना माझं? नाही, तुम्हाला ऐकावंच लागेल. तुमच्याच शब्दांत सांगायचं झालं तर ‘Don’t Surrender. Fight Out till end.’”
केदारची इच्छा म्हणून बेडवरील चादरीच्या पांढऱ्या शुभ्र समुद्रात शीड तुटलेल्या अवस्थेत आणि असंख्य नळ्यांच्या विळख्यात अडकलेल्या… आज का उद्या, या दोलायमान स्थितीत असलेल्या बाबांच्या कानाजवळ जाऊन मी केदारचा मेसेज वाचला. बाबांच्या अंतर्मनाने तो कितपत ऐकला असेल देव जाणे! पण त्यावेळी त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या बोटांची मात्र थोडी हालचाल केली, असं मला जाणवलं. त्यातून काय ईश्वरी संकेत मिळत होते देव जाणे… पण का कोण जाणे मला उगाचच त्यांच्या जगण्याबद्दल अधिक आशा त्या दिवशी वाटली.
पुढचा एकेक दिवस जायचा, तसं मी कॅलेंडरवर फुली मारायचो… 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि आज…
बाबांच्या स्पेशल रूम बाहेर अचानक गलका ऐकू आला आणि पुढच्याच क्षणी घाईघाईने दरवाजा उघडून केदार आत आला आणि व्याकुळ होऊन जोरात म्हणाला, “आजोबा मी आलोय….”
केदारचा आवाज ऐकून बाबांजवळ डोळे मिटून बसलेल्या माझी तंद्री भंग पावली. “काका,” असं म्हणून केदारने मला घट्ट मिठी मारली. ‘रडायचं नाही’ असं खूप ठरवून सुद्धा इतके दिवस जेमतेम थोपवून धरलेला भावनांचा बांध अखेर फुटलाच केदारच्या मिठीत…
पुढच्या क्षणी नळ्यांच्या विळख्यात अडकलेल्या बाबांना बघून केदारला रडू फुटलं. त्यांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवल्यावर केदारने त्यांच्या पायांना स्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला.
मी मनांतल्या मनांत देवाचे आभार मानले… त्या दोघांची अखेर भेट घडवून आणल्याबद्दल.
हेही वाचा – विचार, संस्कार अन् जीवनमूल्यांचं कुंपण…
थोड्या वेळाने भावनेचा पूर ओसरल्यावर केदार भानावर येऊन म्हणाला, “काका मला शंभर टक्के खात्री होती की, आमची भेट होईस्तोवर आजोबा नक्कीच श्वास रोखून धरतील. शेवटी मी त्यांचाच नातू. कितीही अडचणी आणि अडथळे आले तरी हरकत नाही, पण शेवटपर्यंत लढत राहून आपल्याला जे साध्य करायचे आहे ते मिळवायचं, ही त्यांचीच शिकवण. आयुष्यात सुखाने जगण्यासाठी कायम लक्षात ठेवण्याची ही गोष्ट आजोबांनी लहानपणापासूनच माझ्या मनावर बिंबवली होती. आमच्यात कायम मैत्रीचंच नातं होतं. आयुष्यात जगताना काय काय गोष्टींचं भान कायम ठेवायला लागतं, ते आजोबांनी मला शिकवले होतं… जे आज अमेरिकेत देखील मी कायम पाळत आलोय. त्याच शिकवणीच्या जोरावर त्यांच्या आणि माझ्या मधे उभ्या असलेल्या यमदेवाला जागचं हलू न देता मी आमची भेट घडवून आणली… फ्लाइटमध्ये सतत ‘आजोबा मी येतोय, तोपर्यंत वाट बघा माझी’ हेच शब्द माझ्या ओठांवर होते.”
हेही वाचा – कलियुगातील सावित्री
“त्यांचं प्रेम आणि शिकवण ही कवचकुंडले होती माझ्यासाठी जोपर्यंत मी मुंबईत होतो. पण बाबांची बदली अमेरिकेत झाली आणि नाईलाजाने मला आईबरोबर तिथे जावं लागलं. नंतर आजोबांशी खूप वेळा व्हिडीओ कॉलवर गप्पा मारायचो मी. दरवेळी माझी काळजी बोलून दाखवायचे…”
“ते खरंच Fighter आहेत. जोवर आमची भेट होत नाही, तोवर मृत्यूसोबत आमच्या नात्याच्या पावनखिंडीत ते सर्व शक्तिनिशी लढत राहिले. आज अखेर मी आमच्या भेटीचा गड जिंकलाय आणि त्याचा आनंदाचा जयजयकार थेट अमेरिकेत जाऊन पोहोचला आहे…”


