सतीश बर्वे
भाग – 3
पाहुण्यांच्या खोलीत राजेशची वाट बघत मी आणि सौरभ बसलो होतो. तिथे पोहोचल्यावर आमच्यासमोर एका शाळकरी मुलीने अदबीने पाण्याचे ग्लास आणून ठेवले आणि स्वतःची ओळख करून दिली.
“नमस्कार मी ज्योत्स्ना. लांजेकरांची धाकटी मुलगी. बाबा येतीलच इतक्यात तुम्हाला भेटायला.” असं म्हणून समोरचा पडदा दूर सारून ती आतल्या खोलीत निघून गेली. त्या खोलीत लावलेली राजेशची पेंटिंग्ज मी बघत असताना अचानक पडद्याजवळ पावलं वाजली आणि तो एका बाजूला बांधला गेला.
…आणि ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण अगदी समीप आला. ज्योत्स्नाने राजेशला व्हील चेअरवर बसवून त्या खोलीत आणलं. त्याला त्या अवस्थेत बघून मी आणि सौरभ सोफ्यावरून उठून उभे राहिलो. राजेशने हातानेच आम्हाला परत बसायची खूण केली. ज्योत्स्नाने राजेशची व्हीलचेअर आमच्यासमोर असलेल्या एका टेबलाच्या मागे आणून ठेवली. आम्हाला परत नमस्कार करून ती आतल्या खोलीत निघून गेली.
राजेशने परत हात जोडले आणि तो मला म्हणाला, “कुसुम मला खरंच माफ कर. सकाळी तुझा चेहरा आणि आवाज दोन्हीही माझ्यासाठी अनोळखी होते. पण तुला निघून जायला सांगितलं आणि काय झालं माहीत नाही, पण सावंतवाडीचं काहीतरी आठवलं मला आणि तुझी ओळख पटली. नशिबाने तुझ्या मुलाने माझ्या माणसाला तुमच्या हॉटेलचे नाव सांगितलं होतं म्हणून मी त्याला लगोलग तिथे फोन करायला सांगून तुमच्यासाठी निरोप ठेवला. पण तु इथे गोव्यात कशी काय?”
हेही वाचा – रंग हरवलेलं पेंटिंग
कितीतरी वर्षांनी राजेशला अचानकपणे भेटायला मिळाले; पण त्याची अवस्था बघून मला धक्काच बसला होता आणि तोंडून शब्दही फुटेना.
मी जुन्या काळात जाऊन बसले अचानक. मी आणि राजेश एकाच शाळेत होतो. लहानपणापासूनच त्याची चित्रकला खूप चांगली होती. कुठल्याही वस्तूचं किंवा व्यक्तीचं तो हुबेहूब चित्र काढायचा. पण त्याच्या घरची परिस्थिती आमच्यापेक्षाही खराब होती. खाऊच्या पैशातून मी राजेशला कागद आणि रंग आणून द्यायचे. चित्रकलेच्या परीक्षेत त्याने शाळेचं नाव उज्ज्वल केले होते. एव्हाना आम्ही शाळा संपवून कॉलेजात दाखल झालो आणि राजेशचं चित्रकलेचं वेड आणखी वाढलं. पण बाबांची अचानकपणे बदली झाली आणि आम्ही सावंतवाडीहून कोल्हापुरात आलो. जायच्या आधी मी राजेशला लागेल ती मदत पाठवायचे कबूल केले होते. त्याने चित्रकलेचं आणखी शिक्षण घेऊन त्याच्या हातातील जादू सर्वदूर पसरावी, अशी माझी इच्छा होती. सुरुवातीला काही वर्षं मी जमतील तशी मदत करत गेले राजेशला, पण नंतर त्याचे बस्तान बऱ्यापैकी बसल्यावर त्याने मला पैसे न पाठवण्याची विनंती केली होती. हळूहळू संपर्क कमी होत गेला आणि माझ्या लग्नानंतर तो पूर्णपणे थांबला आणि आज अचानक तो समोर आला… या अशा अवस्थेत!
“अगं, तुला विचारतोय मी कुसुम…” राजेशच्या बोलण्याने भानावर येऊन मी स्वतःला सावरले. सौरभची ओळख करून दिली आणि मग मी इथे कशी आले, तेही सांगितले. “आपल्या भेटीची योजना बहुतेक परमेश्वराने योजली होती आणि म्हणूनच हॉटेलमध्ये चेक इन करतानाच तुझं पेंटिंग डोळ्यांसमोर आलं. पण तुझं हे आजारपण कधी सुरू झालं?”
मला राजेशला बोलकं करायचं होतं… आणि राजेश बोलायला लागला.
“कुठून सुरुवात करू, तेच कळत नाही! शाळेतील चित्रकला मला स्वस्थ बसू देत नव्हती. तेच पुढे शिकायचं होतं मला. तू तेव्हा मला आर्थिक मदत करत होतीस, त्यामुळे चित्रकलेचं सामान मी आणू शकलो. त्याबाबतीत मी खरंच तुझा शतशः ऋणी आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने कॉलेजात काही गेलो नाही, पण एका प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये चित्र काढायचं काम मिळालं. माझी चित्र बघून मालकाच्या मित्राने मला पेंटिंग बनवायची कल्पना दिली. गावातील सार्वजनिक कार्यक्रमात मी लोकांना समोर बसवून त्यांचे चित्र काढून द्यायला लागलो आणि माझं थोडंफार नाव झाले. नोकरी सांभाळून जमेल तेवढी चित्र मी काढत होतो. एका सरकारी कार्यक्रमात मोठे अधिकारी आले होते, त्यांनी त्यांच्या ओळखीने गोव्यातील एका हॉटेलच्या मालकाला भेटायला सांगितले आणि इथेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या हॉटेल मालकाला माझी पेंटिंग्ज इतकी आवडली की, त्याने आग्रहाने मला गोव्यात आणलं त्याच्या हॉटेलात नोकरी दिली. त्याची भारतभर हॉटेल्स होती. हळूहळू माझी पेंटिंग्ज त्याच्या प्रत्येक हॉटेलच्या भिंतीवर लावली गेली. त्या हॉटेल मालकानेच मग माझ्या पेंटिंग्जचं पहिलं प्रदर्शन गोव्यात भरवलं आणि माझ्या पेंटिंग्जने मला पैसे मिळवण्याचा रस्ता दाखवला. काही वर्षांपूर्वी मी हा बंगला विकत घेतला. गोव्यात एक आघाडीचा चित्रकार म्हणून मी नावारुपाला आलो. पण सगळंच चांगलं सुरू झालं की, कधी तरी आपल्या सुखाला वाईटाची नजर लागते. झालंही तसंच… गोव्यातील एका मोठ्या उद्योगपतीने आयोजित केलेल्या पेंटिंग्जच्या स्पर्धेत मी विजयी ठरलो. बक्षीस वितरण समारंभ गोव्यापासून जरा लांब होता. मी माझी पत्नी आणि दोन मुलं आम्ही आमच्या गाडीने तिथे गेलो होतो. कार्यक्रम खूप लांबला. परतीच्या प्रवासात माझ्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यात माझी पत्नी आणि मोठ्या मुलाला मी गमावून बसलो. क्रूर नियती एवढ्यावरच थांबली नाही, त्या अपघातात मी माझे दोन्ही पाय गुडघ्यापासून खाली गमावून बसलो. तेव्हापासून गुडघ्याखालचे पाय कायम झाकलेले असतात माझे. ही व्हीलचेअर आता माझी सोबती रहाणार आहे शेवटपर्यंत…”
हेही वाचा – रंग हरवलेले चित्र : बालपणीचा मित्र भेटला पण…
“व्हीलचेअरवरून बेडवर किंवा पेंटिंग्जच्या टेबलाजवळ माझी माणसं मला उचलून ठेवतात. त्या सगळ्यांची इथे बंगल्याच्या आवारात राहायची सोय केली आहे मी. धाकटी ज्योत्स्ना मात्र सहलीसलाम त्या अपघातातून आश्चर्यकारकरीत्या वाचली. माझं आयुष्य साफ उद्ध्वस्त झालं होतं. पुढे काही महिने मला या धक्क्यातून सावरायला गेले. सुदैवाने हातातली चित्रकला शाबूत राहिली. तेव्हापासून मी बाहेरच्या जगाशी कायमचा संबंध तोडून टाकला. माझी चित्रकला हेच माझे जग उरले,” आपली दुर्दैवी कहाणी तो सांगत होता.
“सुरुवातीला काही वर्षं ज्योत्स्ना सावंतवाडीला होती तिच्या आजोळी. गेल्या वर्षी ती इथे आली माझ्यासोबत रहायला. घरात चार-पाच माणसं आहेत माझ्या मदतीला. पेंटिंग्जमधून पुष्कळ पैसे मिळतात. ज्योत्स्नाला आणि मला पुरतील इतके पैसे बाजूला ठेवून उरलेले पैसे मी आता गरजू मुलांना शैक्षणिक मदत म्हणून देतो. फक्त आर्ट गॅलरीच्या माणसांना मला भेटायला परवानगी आहे. त्यांच्याव्यतिरिक्त तूच पहिली व्यक्ती आहेस, जिला मी समोरासमोर असं पहिल्यांदाच येऊन भेटलोय. माझ्या आयुष्याचे हे रंग हरवलेलं चित्र मला कोणालाच दाखवायची इच्छा अजूनही होत नाही!”
पुढे राजेश आणखी बरंच काही बोलून अखेर दमला. मी जागच्या जागी थिजून गेले होते, राजेशच्या तोंडून ते सगळं ऐकताना.
“कुसुम तुला हे ऐकून धक्काच बसला असणार, हे साहाजिकच आहे. पण सावर स्वतःला कारण असंच रहाणार आहे, माझं आयुष्य! ज्याचा मी केव्हाच स्वीकार केला आहे नाईलाजाने. तू देखील त्याचा तसाच स्वीकार करावा… परत कधी गोव्यात आलीस तर, नक्की मला भेटायला ये. मी जेवायचा आग्रह केला असता खरा तुम्हाला, पण माझा स्वयंपाकी नेमका रजेवर आहे आज. पण आपण बाहेरून मागवू या काहीतरी तुमच्या पसंतीचे. त्या निमित्ताने तुमच्यासोबत जेवायला मिळेल मला,” असं म्हणून राजेशने त्याचं नांव पत्ता आणि मोबाइल नंबर छापलेले कार्ड मला आणि सौरभला दिले.
राजेश देखील थकला होता हे जाणवत होते, त्यामुळे आमच्या भेटीचा समारोप करायला म्हणून सौरभने अखेर तोंड उघडले.
“काका तुमच्या तोंडून तुमची कहाणी ऐकून आईची आणि माझी एकच अवस्था झाली आहे. तुम्ही आजवर खूप काही सोसलं आहे. पण तरीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तुम्ही आयुष्याच्या झालेल्या राखेतून परत एकदा भरारी मारण्याचा प्रयत्न करत आहात, हे बघून आनंद वाटला. तुमच्या जिद्दीला खरोखरच सलाम आहे आमच्याकडून. तुम्ही जेवायचा आग्रह केला त्याबद्दल धन्यवाद. पण आज तुम्ही इतके थकलेले दिसता, त्यामुळे आज आम्ही जेवायला थांबत नाही. प्लीज रागावू नका. पुढच्या वर्षी मी आईला घेऊन परत येईन इकडे तुम्हाला भेटायला तेव्हा करू आपण आपल्या जेवण्याचा मस्त बेत. शिवाय, आमचा इथला मुक्काम संपवून आम्ही उद्या परत मुंबईला चाललो आहोत दुपारच्या फ्लाइटने.”
राजेशचा जड अंतःकरणाने निरोप घेऊन आम्ही निघालो. हॉटेलवर परतताना सौरभ गप्प होता. मी मात्र मनोमन ठरवले होते की, या रंग हरवलेल्या चित्रात आमच्या बालपणीच्या सुखद आठवणींचे रंग जमेल तसे भरायचे… राजेशला अधूनमधून फोन करून आणि सौरभ येईल तेव्हा त्याच्यासोबत गोव्याला येऊन त्याला प्रत्यक्ष भेटून…
समाप्त