स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स –
- गृहिणींना नॉनव्हेज किंवा रसभाजीसाठी कांद्याची पेस्ट लागते. त्यासाठी तीन-चार कांदे चिरून नंतर ते कढईत भाजून घ्यावे लागतात. भाजल्याने कांद्यातील रस आटतो आणि जीवनसत्त्वे नष्ट पावतात. तसेच चिरणे, भाजणे यात वेळ जातो आणि गॅसही वाया जातो. त्याऐवजी, आपण जेव्हा भातासाठी कूकर लावतो, तेव्हा भाताच्या ताटलीवर कांदे ठेवून द्यावेत. व्यवस्थित उकडले जातात. थंड झाल्यावर त्यांची मिक्सरमध्ये छान पेस्ट होते आणि जीवनसत्त्वेही टिकून राहतात. वेळेची, गॅसची बचत होते आणि रसभाजीला छान चवही येते.
- मीठ, ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले आणि लसूण हे सर्व साहित्य जास्त प्रमाणात वाटावे. यांचे वाटण बर्फाच्या ट्रेमध्ये घालून डीप फ्रीजमध्ये ठेवावे. दोन-चार तासांनी खुटखुटीत वड्या तयार होतील. त्या काढून घ्याव्यात आणि एका घट्ट झाकणाच्या प्लास्टिकच्या डब्यात फ्रीझरमध्येच ठेवाव्यात. महिनाभर टिकतात. कित्येक प्रकारच्या रश्शांना झणझणीतपणासाठी, स्वादासाठी अशा प्रकारचे वाटण घालावे लागते. ऐनवेळेला चिरणं, वाटण करायचा कंटाळा येतो. कित्येकदा एखादी वस्तू नेमकी घरात नसते. अशा वेळी अशा तयार वड्यांचा चांगलाच उपयोग होतो.
हेही वाचा – Kitchen Tips : कढीपत्त्याची चटणी, कोकम सार…
- खूप वेळा पदार्थांमध्ये खोबऱ्याचा किस बाजारातला आणून वापरा, असा उल्लेख असतो. प्रत्येक वेळेस आपल्याला तो बाजारातून आणणे जमतेच असे नाही. तेव्हा घरी तसे खोबरे करण्याची कृती अशी : ओल्या खोबऱ्याची वाटी फ्रीजमध्ये ठेवून सुकू द्यावी. (ती 5 ते 6 दिवसांत सुकते) नंतर ती बाहेर काढून किसावी. नंतर थोडीशी परतावी की, झालं खोबरं तयार. हे खोबरं पांढरं शुभ्र दिसतं. 4 ते 5 दिवस टिकतं.
- गूळ बाजारातून आणला, की मोठे खडे असतात. घाईच्या वेळी आमटीत टाकायला फोडायचा कंटाळा येतो. वेळ कमी असतो म्हणून एखाद्या रविवारी सगळा गूळ विळीवर चिरून ठेवावा, म्हणजे आयत्या वेळी गडबड होत नाही. शिवाय, आता तर, गुळाची पावडरही उपलब्ध आहेच. तसेच गूळ- नारळाचे सारण शिजवून ठेवावे. भाजी-आमटीत टाकता येते. हे मिश्रण फ्रीजशिवायही दहा ते बारा दिवस चांगले राहते.
हेही वाचा – Kitchen Tips : कायम तयार चिंचेचा कोळ, नारळाचे वाटण अन् पौष्टिक पोळ्या…
- बऱ्याच चिंचांचा कोळ करायचा असेल, तेव्हा चिंचोके काढून चिंच गरम पाण्यात भिजत घालावी आणि गार झाल्यावर मिक्सरमधून काढून गाळण्याने घोटावी. सर्वच्या सर्व कोळ निघतो. वाया जात नाही. यात थोडं मीठ टाकलं तर, हा कोळ आठ दिवससुद्धा फ्रीजमध्ये राहू शकतो आणि आपला नेहमीचा वेळ वाचतो. शिवाय, उरलेल्या चोथ्यामध्ये मीठ टाकून तो भांड्यांना वापरता येतो.


