1984 साली क्राऊन कंपनीचा ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही आमच्या घरी आला, तोही माझ्या आजीच्या आग्रहाखातर! त्या सालात भारताच्या आयर्न लेडी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, त्याच्या तीन-चार महिनेआधी हा टीव्ही आमच्या घरी आला होता. त्या सालात जसा या टीव्हीने आमच्या घरात प्रवेश केला, तसा चोवीस तास घरात वाजणारा रेडिओ मान टाकून हिरमुसला होऊन खुंटीवर जाऊन लटकला. त्या काळात त्याच्याकडे जरा दुर्लक्षचं झालं… तेव्हा घराघरातून सतत रेडिओचा आवाज ऐकायला मिळायचा.
सकाळी सहा वाजता त्याच्या विशिष्ट ट्युनने रेडिओ सगळ्या लोकांची सकाळ प्रसन्न करायचा. त्यानंतर भक्तीगीतांच्या स्वरांनी सर्व घर न्हाऊन निघायचं. महाराष्ट्रात सकाळी बरोबर सात वाजता मराठी बातम्या देणाऱ्या सुधा नरवणेंचा खणखणीत आणि सुस्पष्ट उच्चार असलेला आवाज घराघरात घुमायचा. या प्रादेशिक बातम्या संपल्या की, राष्ट्रीय प्रसारणात हिंदी बातम्या आणि नंतर इंग्रजी बातम्या झाल्या की, सिलोनवर हिंदी गाण्यांचा कार्यक्रम एक तासभर तरी चालायचा. दुपारच्या वेळेस कधी शास्त्रीय गायनांचा आस्वाद घ्यायला वृद्ध तसेच शास्त्रीय संगीताचे दर्दी रेडिओ लावून बसायचे, यामध्ये मराठी नाट्यगीतांचा पण एक दिवस कार्यक्रम असायचा. त्या काळात रेडिओ म्हणजे सर्वांच्या आवडीचा एक अविभाज्य घटक असायचा. आठवडाभर बालविहार, जयमाला, एक शाम सैनिकों के नाम, वनिता विश्व, आपली आवड, शेतीविषयक मार्गदर्शन, बिनाका गीतमाला, हिंदी, मराठी, इंग्रजी बातम्या… अशा विविध कार्यक्रमांची आठवडाभर रेलचेल असायची.
कपिल देवच्या कॅप्टनशिपखाली भारतीय क्रिकेट टीमने जेव्हा पहिला वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा त्या मॅचची कॉमेन्ट्री आम्ही रात्री उशिरापर्यंत घोळक्याने एकाच रेडिओभोवती कोंडाळे करून ऐकल्याचं अजूनही आठवतं! ती आठवण तर मनातून कधीच जाणारच नाही! अशा कितीतरी सुखद आठवणी या रेडिओने आमच्या आयुष्यात निर्माण करून ठेवल्या, ज्यांनी आमचे बालपणीचे आणि तरुणपणाचे भावविश्व समृद्ध केले. उन्हाळ्यात रात्री अंगणात खाटेवर झोपताना आकाशातील तारे पाहात रेडिओवरील हिंदी गाणी ऐकण्याची मजा काही औरच होती! माझी मावशी उन्हाळ्यात आमच्या घरी आली की, ती आणि मी अंगणात खाटेवर झोपताना माझ्या वडिलांच्या धाकामुळे आधीच ट्रान्झिस्टर चादरीत लपवून ठेवायचो आणि रात्री उशिरापर्यंत अगदी कमी आवाजात रेडिओवरील कार्यक्रम ऐकायचो. तिला आणि मला हिंदी तसेच मराठी चित्रपट पहायला आणि त्यातील गाणी ऐकायला खूप आवडायचे, त्यामुळे याबाबतीत आमचे मस्त जमून यायचे.
हेही वाचा – दहा पैशाला एक ‘सिंगल’!
एकेकाळी रेडिओ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानला जात होता. माहिती, संवाद आणि ज्ञानाचे प्रभावी तसेच सर्वात प्रमुख माध्यम रेडिओ होते. मनोरंजनाचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून रेडिओकडे पाहायले जायचे. मात्र, आज सर्वत्र नवनवीन माध्यमे आली आणि रेडिओचा वापर कमी झाला.
रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण 13 फेब्रुवारी 1945 रोजी झाले होते. त्यामुळे हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र याची अधिकृत घोषणा अगदी अलीकडे म्हणजेच 2013मध्ये झाली. भारतातील पहिले रेडिओ प्रसारण जून 1923मध्ये रेडिओ क्लब ऑफ बॉम्बेने सुरू केले. 1930पर्यंत भारत सरकारने स्वतःची रेडिओसेवा सुरू केली, जी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस (ISBS) म्हणून ओळखली जात होती, जी नंतर १९३६मध्ये ऑल इंडिया रेडिओ (AIR) बनली.
हेही वाचा – अंतिम सत्य मात्र एकच!
गेल्या जवळपास शंभर एक वर्षांत रेडिओनं अनेक स्थित्यंतरं अनुभवली. त्याच्या स्वरुपात, तंत्रज्ञानात बदल झाले. सादरीकरणाची शैली, कार्यक्रमांच्या संकल्पना बदलल्या. रेडिओची भाषा बदलली. निवेदकांऐवजी ‘RJ’ आले. शांत, संयमी भाषेला सुपरफास्ट, इंग्रजी, हिंदी, मराठी संमिश्र भाषा जोडली गेली. नव्या युगाचे श्रोते एनकेन प्रकारे रेडिओशी जोडले जात आहेत. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजासाठी सरकारनं कम्युनिटी रेडिओची संकल्पाना सुरू केली आहे. सध्या सोशल मीडियावर तर माहितीचा धुमाकूळ माजलेला असतो. मात्र रेडिओ किंवा आकाशवाणीकडे लोक अजूनही विश्वासार्ह माध्यम म्हणूनच पाहतात. त्यामुळेच तंत्रज्ञानाने माहितीचे लाखो स्रोत आणले तरीही रेडिओचं स्थान कुणीही घेऊ शकत नाही, हेच यातून सिद्ध होतं.
रेडिओ तुमचा, आमचा… सर्वांचा!


