आराधना जोशी
मित्र या शब्दापेक्षा मला ‘दोस्त’ हा शब्द जास्त आपुलकीचा वाटतो… आणि त्याहीपेक्षा हिंदी भाषेतील ‘यार’ हा शब्द जास्त जिव्हाळ्याचा वाटतो. ‘छोड दो यार’ या वाक्यात काही वेगळीच खुमारी आहे, असं प्रसिद्ध लेखक व. पु. काळे म्हणतात. खरंच, मैत्रीचं (Friendship) हे नातं अतूट असतं. आपले नातेवाईक कोण असावेत, हे आपण ठरवू शकत नाही, पण आपले मित्र कोण असावेत, हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे आपला असतो.
याच नातेसंबंधांचा उत्सव साजरा करणारा, ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे ‘मैत्री दिन’. महाविद्यालयांमधून एखाद्या सणासारखा साजरा होणारा हा दिवस. आपल्या मैत्रीला नव्याने उजाळा देण्याचा हा दिवस तरुणाई अगदी उत्साहाने साजरा करते. हल्ली तर एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांचे अत्यंत चांगले मित्र असू शकतात आणि त्यांच्या या मैत्रीबद्दल घरातल्या इतरांनाही काहीही आक्षेप नसतो. अशा या ‘जागतिक मैत्री दिना’ची सुरुवात मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीने झाली.
1930 साली अमेरिकेत शुभेच्छापत्रे बनवणाऱ्या एका कंपनीच्या मालकाने आपली शुभेच्छापत्रे विकली जावीत, या हेतूने 2 ऑगस्ट हा दिवस ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा करण्याचं जनतेला आवाहन केलं. त्याआधी 1920 साली ग्रिटिंग कार्ड नॅशनल असोसिएशनने ‘मैत्री दिवस’ साजरा करण्याचं ठरवलं होतं. मात्र, हा प्रस्ताव शुद्ध व्यावसायिक क्लृप्ती (बिझनेस गिमिक) असल्याचं सांगून अमेरिकन जनतेने याला विरोध केला. नंतर मात्र, ‘मैत्री दिन’ अनेक देशांमध्ये साजरा केला जाऊ लागला.
1998 साली संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोफी अन्नान यांच्या पत्नी नॅन अन्नान यांनी ‘विनी द पूह’ या कार्टून कॅरेक्टरला मैत्रीचे जागतिक राजदूत म्हणून घोषित केले. ‘जागतिक मैत्री दिन’ला या निमित्ताने एक वेगळे परिणाम लाभले.
खरं तर, कोणत्याही व्यावसायिकीकरणाला पाठिंबा न देताही ‘जागतिक मैत्री दिन’ साजरा करता येऊ शकतो, ही कल्पना नंतरच्या काळात डॉ. रॅमन आर्टेमियो ब्रॅचो यांनी 20 जुलै 1958 साली पॅराग्वे येथे जमलेल्या आपल्या सवंगड्यांसमोर मांडली आणि ती एकमताने संमत झाली. यातूनच ‘वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड’चा जन्म झाला. आज ही संघटना वंश, धर्म, रंग या पलीकडे जाऊन मानवामध्ये मैत्री व्हावी आणि ती कायमस्वरूपी टिकावी म्हणून प्रयत्नशील आहे. याचाच परिणाम म्हणून 30 जुलै हा दिवस पॅराग्वे येथे ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा केला जातो आणि इतरही अनेक देशांनी याचं अनुकरण करायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा – Mumbai flood : 26 जुलै 2005चा कहर
जागतिक मैत्री दिन साजरा करता यावा, यासाठी वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडने सातत्याने संयुक्त राष्ट्रांना (यूएन) आवाहन करण्यास सुरुवात केली होती. शेवटी 20 मे 2011 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण बैठकीत 30 जुलै हा ‘जागतिक मैत्री दिन’ साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांना त्यांच्या स्थानिक, राष्ट्रीय आणि प्रादेशिक समुदायांच्या संस्कृती आणि रीतिरिवाजांच्या आनुषंगाने शिक्षण आणि सार्वजनिक जागरूकता वाढविण्याच्या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय मैत्रीचा दिवस’ साजरा करण्याचे निर्देश दिले. मात्र, 30 जुलै या दिवसापेक्षा ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार यासाठी राखीव ठेवण्यात आला. सुट्टीचा दिवस असेल, तर अधिकाधिक लोकांना यात सहभागी होता येईल, हाच त्यामागचा उद्देश आहे.
हल्लीच्या काळात मोबाइल फोन, डिजिटल कम्युनिकेशन आणि सोशल मीडियाने ही प्रथा अधिक लोकप्रिय करण्यास हातभार लावला आहे. खरंतर, दोन दिवस आधीपासूनच याची तयारी सुरू होते. चॉकलेट्स, शुभेच्छापत्रे, फुले, भेटवस्तू यांनी बाजारपेठ अगदी फुलून गेलेली असते. त्यातही महत्त्व असतं ते फ्रेंडशिप बॅण्ड्ना. वेगवेगळ्या प्रकारच्या या बॅण्ड्च्या खरेदीत अवघी तरुणाई मग्न असते. विविध दुकानांमधून या निमित्ताने सेल जाहीर होतात. कोणी कोणाला बॅण्ड बांधले, नव्याने कोणाशी मैत्री केली, यावर चर्चा होते. बॅण्डबरोबरच संपूर्ण हात, टीशर्ट यावर आपलं नाव लिहिण्याची मित्रामित्रांमध्ये स्पर्धा सुरू होते, तर दुसरीकडे आम्हाला या सगळ्या दिखाव्यांची कशी गरज नाही, हे सुद्धा पटवून दिलं जातं.
आज जागतिक पातळीवर हा ‘मैत्री दिन’ साजरा होत असला तरी, खरी मैत्री काय असते किंवा कशी असते, हे आपल्याकडे पुरातन काळापासून अनेक उदाहरणांनी सिद्ध केलं आहे. मग ती कृष्ण – सुदाम्याची असो, कृष्ण – द्रौपदीची असो किंवा ‘शोले’ सिनेमातल्या वीरू – जयची असो. मात्र, गेल्या काही वर्षापासून कॉर्पोरेट संस्कृतीकडे आपण वळल्याने तेवढ्यापुरती मैत्री ठेवण्याचे प्रकार वाढत आहेत. अमेरिकेतील धनाढ्य हेन्री फोर्ड यांना एका पत्रकाराने विचारलं होतं की, तुमच्या या संपत्तीने जगातल्या सर्वोत्तम गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता.. त्या पत्रकाराला तिथेच थांबवून फोर्ड म्हणाले होते, ‘पण मी सच्ची मैत्री नाही विकत घेऊ शकलो; सच्चे मित्र नाही कमवू शकलो. जे मित्र आहेत, असं मी मानतो ते सगळे व्यावसायिक संबंधांपुरते आहेत.’ चांगले मित्र नसण्याची खंत आयुष्यभर फोर्ड यांना होती.
हेही वाचा – आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
काही वर्षापूर्वी एका कॅमेरा कंपनीने जागतिक पातळीवर मैत्रीसंदर्भात एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात परस्परांशी मैत्री करण्यामध्ये आणि ती निभावण्यामध्ये भारतीय आघाडीवर असल्याचं दिसून आलं. या सर्वेक्षणानुसार भारतात ‘मैत्री’ हे सर्वाधिक लोकप्रिय नातं आहे. भारतीयांच्या मते मैत्री सजवायची नसते, मिरवायची नसते, तर ती फक्त रुजवायची असते.
म्हणजेच –
शक्कर की मिठास थोडी देर जुबानपर रहती है,
मगर दोस्ती की मिठास जिंदगीभर दिल में रहती है…
चला तर मग या फ्रेंडशिप डेला ‘दिखावू’ नको, तर ‘टिकाऊ’ फ्रेंडशीप करण्याची संधी साधू.