भाग – 2
रविवारी सकाळी 8 वाजता निनाद डॉ. पाटील यांच्या सदाशिव नगरमधील घरी पोहोचला. काल रात्री डॉ. अंजलीने स्वतः फोन करून रविवारी सकाळी 8 वाजता येण्याची आठवण करून दिली. तसेच व्हॉट्सअॅपवर लोकेशन मॅप पाठविला. निनादला डॉ. अंजलीचे कौतुक वाटले.
निनादला पाहून डॉ. अंजली म्हणल्या, ‘गुड मॉर्निंग आजगांवकर.’ तो पटकन म्हणाला, ‘गुड मॉर्निंग डॉक्टर.’
‘‘नाही नाही, रविवारी आम्ही कुटुंबीय डॉक्टर नसतो. रोजच्या व्यापातून वेगळे होण्यासाठी हा रविवार असतो. आज मी फक्त अंजली. या दिवशी आम्ही तिघे भरपूर गप्पा मारतो. रोज आम्ही तिघेजण एवढे घाईत असतो की, एकत्र जेवण किंवा गप्पा शक्यच नसतात… बसा ना. पप्पा एवढ्यात येतील. तो पर्यंत आपण कॉफी घेऊ.’’
कॉफी पिता पिता दोघांच्या गप्पा अंजली निनादची माहिती घेत होती. तेवढ्यात तिचे आईवडील, डॉक्टर पाटील पती-पत्नी बाहेर आली. त्यांना आदर दाखविण्यासाठी निनाद खुर्चीतून उठला.
डॉ. पाटील यांनी त्याला पाहिले. ते म्हणाले –
‘‘अरे बस बस, रविवार आम्ही कोण डॉक्टर वगैरे नसतो. आमच्याकडे जो येतो तो आमचा पाहुणा. पण मी तुला ओळखलं नाही.’’
‘‘पप्पा, हा निनाद आजगांवकर. एम.आर. आहे. मला हॉस्पिटलमध्ये नेहमी भेटतो.’’
‘‘अरे व्वा! आजगांवकर. मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह हा मेडिकल प्रोफेशनमधील महत्त्वाचा घटक आहे. तो औषध कंपन्या आणि डॉक्टर्स यामधील दुवा असतो. त्याच्याकडून औषध कंपनीमध्ये नवीन काय तसेच औषधांमधील नवीन नवीन शोध समजतात. नाहीतर मेडिकल जर्नल्स वाचतंय कोण?’’
‘‘पण पप्पा, आज मी निनादला मुद्दाम बोलावलयं. त्याच्यापण काही तक्रारी आहेत.’’
एवढ्यात गॅसजवळ जाऊन पॅनवर डोसे करणाऱ्या मिसेस पाटील पटकन म्हणाल्या, “डॉक्टरांबद्दल खूपच तक्रारी असतात समाजात. आम्हालापण आवडेल अशा तक्रारी समजल्यावर.”
“तसं नाही आई. याची तक्रार आहे की, याच्या सारख्या अनेक औषध कंपन्यांचे प्रॉडक्टस् आपल्या हॉस्पिटलमधील केमिस्टकडे उपलब्ध नसतात याबाबत.”
“अगं, मग ते सातपुतेंच्या कानावर घालायला हवं. मी लिहिलेली कित्येक औषधे ते बदलून देतात. मी आपलाच केमिस्ट म्हणून गप्प बसते.”
“अग आई, मी सातपुतेंना विचारलं त्याबद्दल. त्यांचे म्हणणे, डॉक्टर साहेबांनी सांगितले त्याच कंपन्यांची औषधे ठेवतो आपण. तुम्ही काहीही प्रॉडक्ट लिहिला तरी, आमच्याकडील कंपन्यांची औषधे देतो. पप्पा! हे काय चालले आहे? परवा हा निनाद माझ्याशी वाद घालू लागला. तो मला दर महिन्याला नियमित भेटतो. त्याचे प्रॉडक्टस् खरोखरच चांगले आहेत, काही प्रॉडक्टस् रिसर्च आहेत, दर सर्वांपेक्षा कमी आहेत. असे असून मी का लिहित नाही म्हणून तो विचारत होता. त्याचे बरोबर आहे. मी त्याला म्हटले, मी त्याच्या कंपनीचे प्रॉडक्टस् लिहिते, पण ते उपलब्ध नसतात. म्हणून सातपुतेंना बोलावून विचारलं तर, त्यांनी तुमचं नाव सांगितलं… असं का होतं?”
हेही वाचा – निनादच्या कंपनीची औषधं कोहिनूर हॉस्पिटलकडे का नव्हती?
डॉ. पाटील – “अंजली आम्हा डॉक्टर्स लोकांचा एक ग्रुप आहे. ग्रुपमधील काही डॉक्टर्स भारतातील एका राज्यात ही औषधे बनवून घेतात. त्या राज्यात टॅक्स कमी आहे. त्याचे 10-15 टक्के वाचतात. शिवाय मार्केटिंग वगैरे काही नसल्यामुळे त्याचे जवळ जवळ 20 टक्के वाचतात.”
निनाद – “आणि ते 20 टक्के तुम्हा डॉक्टर्समध्ये वाटतात, हे खरे ना?”
डॉ. पाटील – “खरे आहे. आपण जी औषधे वापरतो त्यातील 70 टक्के औषधे वारंवार आणि सतत लागणारी असतात. अशी औषधे या कंपन्या बनवतात.”
निनाद – “डॉक्टर साहेब, आता मी बोलतो. या कंपन्या रॉ मटेरियल बी ग्रेड मॅन्युफॅक्चरर्सकडून खरेदी करतात. कदाचित, त्यात भेसळ असू शकेल…”
अंजली – “पप्पा, हे भयानक आहे. पेशंट बिचारे पैसे देऊन औषधे खरेदी करतात. कारण डॉक्टर्स ते लिहितात म्हणून. सामान्य जनता डॉक्टर्सना देव मानते आणि तो देव पैशासाठी पेशंटच्या जीवाशी खेळतो?”
डॉ. पाटील – “पण आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला औषधामुळे त्रास झालेला नाही.”
डॉ. मिसेस पाटील – “नाही कसा? हल्ली जो लहान मुलांचा डायरीया आलाय तो आपल्या हॉस्पिटलमधील औषधांनी बराच होत नाही. मग त्या मुलांना अॅडमिट कराव लागतं. सलाइनमधून औषधं दिल्यावर मुलं कसबशी बरी होतात. मला फार टेंशन येतं.”
निनाद – “स्टँडर्ड कंपनीच्या एका बाटलीत म्हणजे, साधारण 80 रुपयांच्या औषधाने जे बाळ बरं होणार असतं, त्यासाठी सात-आठ हजार रुपये विनाकारण खर्च होतात.”
अंजली – “माझ्या पण लक्षात येतंय. माझ्या स्त्री पेशंटना मी अॅनिमियासाठी जे आर्यन गोळ्या लिहून देते त्याने त्यांचं हिमोग्लोबीन समाधानकारक वाढत नाही. या बायका औषधाचा कोर्स व्यवस्थित करत नाहीत, असं समजून त्यांना मी बोलते… पप्पा, हे बंद करता येत नाही का?”
डॉ. पाटील – “अंजली, कसं असतं, आपण डॉक्टर्स लोक एकमेकांवर अवलंबून असतो. या शहरातील आणि लहान गावातील अनेक डॉक्टर्स आपल्याकडे पेशंट पाठवत असतात. त्यामुळे या डॉक्टर्सना आपण दुखवू शकत नाही. त्यांच्याबरोबरच रहावं लागतं.”
अंजली – “पप्पा, आपल्या हॉस्पिटलला 30 वर्षे झाली, या जिल्ह्यात स्त्रियांच्या आजाराबाबत नंबर 1 चं हॉस्पिटल आहे. शिवाय, लहान मुलांसाठी, आईचे हॉस्पिटल आहे. मी गेली पाच वर्षे इथे पेशंट तपासते. आता आपल्याला झेपत नाहीत एवढी ऑपरेशन्स करतो आपण. सायंकाळी तुम्ही थकून जाता. जेवणाच्या वेळा पाळता येत नाहीत. कशाला हवेत अजून पेशंट. स्वेच्छेने येतील तेवढे बस. इतर नवीन डॉक्टर्स आलेत त्यांच्याकडे जातील पेशंट!”
डॉ. पाटील – “अगं, हॉस्पिटलचा खर्चही प्रचंड असतो. एवढ्या स्टाफचे पगार, मेन्टेनन्स…”
अंजली – “मला कल्पना आहे त्याची. मी फार्मसीकडे पाहते. आता स्टॅण्डर्ड कंपन्यांची औषधे आपण वापरणार.”
डॉ. अंजलीने दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमधील फार्मसीमध्ये जाऊन औषधे चेक केली. सातपुतेंना सांगून चांगल्या कंपन्याची औषधे, सलाईन्स ठेवायला लावली. कित्येक कंपन्यांची औषधे या फार्मसीमध्ये मिळायची नाहीत, त्या सर्व कंपन्यांनी डॉ. अंजलीचे आणि त्याकरिता धडपडणाऱ्या निनादचे आभार मानले.
अंजली निनादला म्हणाली, “आपल्या हॉस्पिटलमधून सुरुवात झाली हे खरे, पण हे पुरेसे नाही. आपण या शहरात आणि जिल्ह्यात अजून प्रयत्न करू.” निनादने अंजलीच्या निदर्शनास आणले की, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने 2002 साली व्यवसाय निष्ठा, शिष्टाचार आणि नैतिक बंधने या अंतर्गत व्यक्तिगत डॉक्टरांवर कोणत्याही औषध कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचा लाभ आणि लाच घेण्यास प्रतिबंध केला आहे. असे केल्याचे लक्षात आल्यास त्या डॉक्टरांचा परवाना रद्द होऊ शकतो. असा प्रतिबंध असूनही अनेक फार्मा कंपन्या डॉक्टरना प्रलोभने दाखवतात आणि काही डॉक्टर्स प्रलोभने स्वीकारतात.
हेही वाचा – चॅलेंज.. अहंकार मोडून काढणारं!
अंजली निनादला म्हणाली, “मी डॉक्टर्स असोसिएशनची मेंबर असून या असोसिएशन तर्फे या शहरातील डॉक्टर्सना आमंत्रित करते. मात्र, तू माझ्या मदतीला हवास… किंबहुना तू या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी घे.” निनादने आनंदाने जबाबदारी स्वीकारली.
डॉक्टर्स असोसिएशन तर्फे एका सायंकाळी एका हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला गेला. डॉक्टर अजंलीने प्रत्येक डॉक्टरने इथिकल प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे, हे पटवून दिले. एकेकाळी डॉक्टरला देव मानले जाते होते. परंतु आता समाजात जागृती झाली आहे… डॉक्टर पैशांच्या मागे लागून गरज नसलेल्या तपासण्या आणि गरज नसलेली औषधे पेशंटच्या माथी मारत आहेत. काही कंपन्या आपली दर्जाहिन औषधे लिहावीत म्हणून डॉक्टर्सना कमिशन देत आहेत. डॉक्टर्स ते कमिशन तसेच महागडे मोबाइल, लॅपटॉप, कार, फॉरेन ट्रीप, गोल्डन कॉईन्स आणि पैसे इत्यादी स्वीकारुन दर्जाहीन औषधे लिहित आहेत. या संबंधी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने डॉक्टर्सवर कडक बंधने घालूनही आपल्यातील काही डॉक्टर्स त्याचे उल्लंघन करीत आहेत. तेव्हा पेशंटच्या मनातून डॉक्टर पूर्णपणे उतरण्यापूर्वी तसेच कायदेशीर कारवाई होऊन परवाना रद्द होण्याआधी आपण पेशंटच्या हितासाठी सर्व काही करण्याची गरज आहे…
डॉ. अंजलीच्या बोलण्याचा बराच परिणाम झाला. काही डॉक्टर्स जे औषध कंपन्यांकडून कमिशन किंवा भेटवस्तू घेत होते, ते बंद झालं. डॉ. अंजलीने मग मेडिकल जर्नल्समधून हा विषय पोटतिडकीने मांडायला सुरुवात केली. ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन जर्नल्सच्या संपादिका डॉ. शीला मेहता यांनी तिचे कौतुक केले. हा विषय भारतभर गाजला. अनेक वृत्तपत्रात, टीव्ही चॅनेल्सवर याबाबत चर्चा घडल्या. कलकत्त्याच्या खासदार डॉ. बॅनर्जी यांनी राज्यसभेत हा प्रश्न विचारला. अनेक खासदारांनी या चर्चेत भाग घेतला. आरोग्य मंत्र्यांनी याची नोंद घेतली आणि सरकार याबाबत कडक कायदे करील, असे आश्वासन दिले.
डॉ. अंजलीची अनेक चॅनेल्सनी मुलाखती घेतल्या. त्यामुळे घराघरात या विषयी जागृती झाली. अंजलीला माहीत होतं की, आपण एवढा लढा लढू शकलो, कारण निनाद सोबत होता. निनाद भेटला नसता तर, तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये तसेच एकंदर डॉक्टर व्यवसायात काय चाललंय याची कल्पना पण नसती. हल्ली वेळ मिळेल तेव्हा अंजली निनादच्या घरी जाऊ लागली होती. जन्मापासून अंजलीने श्रीमंतीच पाहिली. घरी, मामाकडे, मावशीकडे मोठे मोठे बंगले, गाड्या, नोकरचाकर… निनादच्या घरी तिने मध्यमवर्गीय राहणीमान पाहिले. निनादची आई करायची ते मालवणी जेवण तिला आवडू लागले. कुळीथाची पिठी, काळ्या वाटाण्याची उसळ, तांदळाच्या शेवया, मालवणी मसाला घालून केलेले माशाचे कालवण तिला फार आवडायचे.
खूप वर्षांनी अंजलीला लग्नाची ओढ लागू लागली. कॉलेज काळात उमेश बरोबर प्रेम केलं. लग्नाच्या आणाभाका घेतल्या, पण एमबीबीएस झाल्यानंतर वरच्या जातीच्या उमेशला आईवडीलांनी आपल्यासोबत लग्नाला कडकडून विरोध केला आणि केवळ परजातीतील म्हणून अंजलीला स्वीकारले नाही. उमेशचे त्याच्याच जातीतील मुलीशी लग्न लावून टाकले. ती भळभळती जखम सांभाळत अंजली एवढी वर्षे राहिली. आईबाबांनी अनेक डॉक्टर्सची स्थळे सुचविली. पण अंजलीने इंटरेस्ट दाखविला नाही. कोणी मनासारखे मिळेपर्यंत ती लग्न करणार नव्हती.
गेले सहा महिने निनादचा सहवास मिळाला. निनाद तिच्या मानाने कमी शिकलेला, मध्यमवर्गीय असला तरी त्याचा ती फारसा विचार करत नव्हती. त्याच्यातील धडाडी, स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकता आणि राष्ट्रप्रेम तिला आकर्षित करत होतं. हे असलं तरी निनादच्या मनाचा ठाव तिला लागत नव्हता. परंतु आत निनाद समोर आपलं मन मोकळ करायचं तिने ठरवलं…
दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सोनं देण्याच्या निमित्ताने अंजली निनादच्या घरी गेली. निनादला आणि निनादच्या आईला तिनं सोनं दिलं. बोलता बोलता ती निनादच्या आईने तिच्या घरच्यांची चौकशी केली. अंजली म्हणाली, “आईबाबा बरे आहेत. त्यांचं नेहमीप्रमाणे चाललंय… रोजचे पेशंट, ऑपरेशन्स चालू आहेत. पण हल्ली आई माझ्यामागे लग्नासाठी लागलीय. कुठली कुठली स्थळं मला आणून दाखवत असते.”
“अगं बरोबर, मुलीच्या लग्नाची काळजी आईवडिलांना असणारच. आता वेळ काढू नकोस बाई. कुठ काही ठरलयं का?” आई म्हणाली.
“खरं सांगायला हरकत नाही, पण कॉलेजच्या काळात म्हणजे सात वर्षांपूर्वी मी वर्गातील एका मुलाच्या प्रेमात होते. आम्ही खूप स्वप्ने बघितली होती. कॉलेज काळात आम्ही सतत सोबत असायचो. तो फिजिशिअन होणार होता आणि मी गायनॉकॉलॉजिस्ट होणार होते. परंतु त्याचे आईवडील फार कर्मठ होते. वर्गातील कुणीतरी मुलाने आमच्या मैत्रीविषयी त्याच्या आईवडीलांकडे चुगली केली… त्याच्या आईवडीलांच्या शब्दाबाहेर तो गेला नाही. नात्यातल्या आणि जातीतल्या मुलीशी लग्न करून मोकळा झाला! खरंतर, मी उद्ध्वस्त झाले. काही काळ झोपेच्या गोळ्यापण घेत होते. पण नंतर आईबाबांचा विचार आला आणि मी सावरले. व्यवस्थित अभ्यास केला. एम.डी. झाले. अनेक डॉक्टर्सनी माझ्याशी लग्न करायची तयारी दाखविली. पण खरं सांगू मला कुणातच इंटरेस्ट वाटला नाही. एकदा मन पोळलं होतं, त्यामुळे लग्न करायचंच नाही, असं ठरवलं होत, पण…”
“पण काय गं?” आई म्हणाली.
“गेल्या सहा महिन्यांपासून पुन्हा माझ्या जीवनात हिरवळ आल्यासारखी वाटू लागलंय. मी चक्क प्रेमात पडलेय. फक्त माझ्या प्रियकराच्या मनातले निश्चित काही कळत नाहीय. त्याला मला आता विचारायचे आहे.”
“अंग, मग त्याला विचार, वेळ कशाला काढतेस? कुठे असतो तो?” आईने विचारलं.
“हा काय माझ्या समोरच बसलाय!” निनादकडे बोट दाखवून अंजली म्हणाली.
“कोण मी? छे! छे!” निनाद उडालाच.
“निनाद, मला कल्पना आहे, तू तुझ शिक्षण, माझं शिक्षण किंवा श्रीमंती गरीबी असा विचार करत असशील तर, तुला माहिती आहे इतर मुलींसारखी मी नाही. गेल्या सहा महिन्यांपासून तू मला जवळून पाहतो आहेस. दोघांची मन जुळावी लागतात रे.”
“अंजली, आपल्यात शिक्षण, श्रीमंती यात मोठा फरक आहे, हे खरेच… पण याबद्दल मला काही फरक पडला नसता. तुझ्यासारखी उच्चशिक्षित, श्रीमंत मुलीचे पाय किती जमिनीवर आहेत, हे मी पाहतोय. तू किती साधी सरळ मुलगी आहेस, याची मला पूर्ण कल्पना आहे. माझ्या आईला पण तू फार आवडतेस, हे मला माहिती आहे. पण अंजली मॅडम मी संघाचा कार्यकर्ता आहे. पाच वर्षे नागालँडमध्ये आदिवासी भागातील काम अर्धवट ठेवून मी आलो आहे माझ्या आईसाठी. ज्या दिवशी माझ्या आईचा हात माझ्या हातातून सुटेल, त्या दिवशी मी माझे अर्धवट काम पुरे करण्यासाठी जाईन. मॅडम, तुम्ही पुढे केलेला हात न स्वीकारणारा मी करंटा असेन कदाचित. पण सॉरी मॅडम… आम्ही कार्यकर्ते वेडे असतो. आमचे आयुष्य आम्ही संघटनेसाठी दिलेले असते. आमची संघटना सांगेल तेथे आम्ही काम करतो. अशा वेळी कुठलेही पाश आमच्याभोवती नको असतात. सॉरी मॅडम…”
खोलीत शांतता पसरली. आईचे, अंजलीचे डोळे भरून आले होते. दोन मिनिटं त्या खोलीत स्तब्धता पसरली. मग ‘‘येते’’ म्हणत अंजली बाहेर पडली. अंजली गेलेल्या दिशेकडे आई शून्य नजरेने पाहात राहिली….
समाप्त
मोबाइल – 9422381299


