Monday, March 2, 2026

banner 468x60

Homeललितत्याची अन् माझी शेवटची इच्छा…!

त्याची अन् माझी शेवटची इच्छा…!

सतीश बर्वे

खरंतर, आजकाल अनोळखी क्रमांकावरून आलेले फोन उचलण्याचे मी कटाक्षाने टाळतो. पण का कोण जाणे, गेल्या आठवड्यात असाच अवेळी आलेला एक फोन मी उचलला आणि आजवर मनाच्या गाभाऱ्यात खोलवर दडलेल्या एका गोष्टीचा शेवट गोड झाला. त्याचं असं झालं…

समोरून आवाज आला…

“मी कौस्तुभ सावरकर बोलतोय. महत्प्रयासाने तुमचा नंबर मिळाला काल रात्री उशिराने. म्हणून आज सकाळी जरा लवकरच फोन केला आहे मी…”

पुढे कौस्तुभने जे सांगितले ते सगळं अविश्वसनीय होते… त्याचा सासरा निनाद अभ्यंकर आणि मी बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईला एका नामांकित औषधी कंपनीत नोकरी करत होतो, जी नोकरी निनादला काही वर्षांनी नाईलाजाने सोडायला लागली होती. निनादला कॅन्सर झाला होता. तो वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी आल्यावर त्याने त्याच्या कुटुंबीयांकडे शेवटची इच्छा म्हणून मला भेटण्याचा आग्रह धरला होता.

“ठीक आहे, मी येईन त्याला भेटायला. तुमचा पुण्याचा पत्ता मला पाठव. मी जमेल तेवढे लगेच निघायचा प्रयत्न करतो…” मी कबूल तर करून बसलो होतो, पण निनाद भेटल्यावर काय बोलायचं, हे समजत नव्हते मला.

हेही वाचा – मातृत्वाची दिवाळी!

फोन ठेवल्यावर आंघोळ आणि पूजा उरकून मी कॅबने पुण्याला जायला निघालो. माझ्या कॅबचं लोकेशन कौस्तुभला शेअर केलं. एक्स्प्रेस-वे सुरू झाला आणि कॅब सुसाट वेगाने पुढे आणि माझं मन त्याच वेगाने मागे गेलं…

तो सगळा प्रकार घडल्यावर माझं चित्त थाऱ्यावर नव्हते आणि अचानक निनाद माझ्या प्रशस्त केबिनमध्ये आला आणि उभा राहिला.

“अरे बस ना तू उभा का?”

“नको. मी एवढंच सांगायला आलो आहे की, तुझ्या एका शिफारशीवर माझ्यावरील संकट टळेल. अरे, डोक्यावर भलं मोठं कर्ज आहे घराचं. मोठा मुलगा संतोष नुकताच परदेशी गेला आहे शिकायला. लेकीचं मेडिकलचे शिक्षण सुरू आहे. सगळ्या बाजूंनी खर्चाचा डोंगर उभा आहे. बघ काही करता आलं तर…” असं म्हणून दोन मिनिटांतच निनाद केबिनबाहेर पडला. झालं असं होतं की, निनाद मार्केटिंग हेड होता आणि मी फायनान्स हेड. निनादच्या डिपार्टमेंटमधील कामात काहीतरी नियमबाह्य पद्धतीने होत असल्याची शंका मला पेमेंट व्हाऊचर्स तपासताना लक्षात आलं होतं. थोडी खोलात चौकशी करता एक मोठा घोटाळा उघडकीस आला होता. मी आमच्या डायरेक्टरना ताबडतोब ही गोष्ट कळवली होती. त्यांनी मला सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. नेहमीच्याच पुरवठादारांकडून चढ्या भावाने खरेदी केल्याची बनावट बिलं जमा करून चढा भाव आणि खरा भाव यातला फरक मधल्यामध्ये हडप करण्याचा सपाटा सुरू होता. यासाठी पुरवठादाराच्या कंत्राटातील दरांमध्ये संगणकामार्फत बेमालूमपणे फेरफार करण्यात आला होता.

खरेदीच्या खर्चात अचानकपणे झालेली वाढ संशयाचं कारण ठरली आणि अधिक चौकशी अंती सगळा प्रकार उघडकीस आला. त्यातली रक्कम लाखोंच्या घरात होती. नक्की कोणाला आणि किती रकमेचा लाभ झाला हे जरी कळणं कठीण होते तरी खात्याचा प्रमुख या नात्याने निनाद सगळ्या प्रकरणाची नैतिक जबाबदारी होती. निनाद आणि मी खरंतर खूप जुने मित्र होतो. मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आम्ही दोघांनी निव्वळ मेहनत करून वरिष्ठ पातळीवर पोहोचण्याचा पराक्रम केला होता.

निनाद निघून गेला खरा, पण मला धर्मसंकटात टाकलं त्याने. पण आईवडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे आमची मैत्री आणि माझं कर्तव्य यात मी कर्तव्याची निवड करून माझा अहवाल आणि त्यावरच्या संभाव्य कारवाईचे पर्याय डायरेक्टरना सादर केला.

शेवटी नको असलेली बातमी कानांवर पडली. निनाद आणि त्याच्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांना नुसता राजीनामा द्यायला लागला नाही तर, कंपनीचं झालेलं आर्थिक नुकसान देखील भरून देण्यासाठी कंपनीने त्या तिघांविरूध्द पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली. अहवाल सादर केल्यानंतर पुढचे दोन-चार दिवस मी कंपनीत जायचं टाळलं, पण त्यानंतर माझ्या कानांवर असं आलं की, निनादने राजीनामा देण्याआधी माझ्या केबिनबाहेर उभं राहून खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ भाषेत माझ्यावर टीका-टिप्पणी केली.

आणि आज निनादची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पुण्यात पोहोचलो.

“सर आप का डेस्टिनेशन आ गया…”

कॅब ड्रायव्हरच्या बोलण्याने मी भानावर आलो. त्याचे पैसे चुकते करून मी कॅब बाहेर आलो. समोरच्या बंगल्याबाहेर उभा असलेला मुलगा पुढे येत मला म्हणाला,सर,” मी कौस्तुभ “. त्याच्या खांद्यावर थोपटत मी निनादच्या बंगल्यात शिरलो. पोर्चमध्ये लिहिलेले बंगल्याचं नाव ‘मृगजळ’ बघून मी उगाचच आश्चर्यचकीत झालो.

मुख्य दरवाजा उघडला गेला…. दारात मृणाल उभी होती… निनादची बायको. तिच्या डोळ्यांतली काळजी आणि भीती दोन्हीही बघवल्या नाहीत मला.

“मला थेट निनादच्या खोलीत घेऊन चल कौस्तुभ ” माझा कापरा स्वर.

“चला…” असं म्हणून आम्ही जिन्याने वर गेलो आणि एका खोलीचा दरवाजा कौस्तुभने उघडला आणि समोरच्या पलंगावर झोपलेला निनाद ओळखण्यापलीकडे गेला होता… मी सावकाश पावलं टाकत पुढे गेलो आणि शांतपणे उभा राहिलो. आमची चाहूल लागताच निनादने डोळे किलकिले करत मला बघितले… डावा हात किंचितसा उंचावून तो मला म्हणाला, ” वाटलं नव्हतं मला तू येशील म्हणून!”

इतके सगळे शरीराचे हाल होऊन देखील निनादच्या मनातून शत्रूत्व डोकावत होतं, याचं मला आश्चर्य वाटले. त्याचा हात हातात घेऊन मी म्हणालो, “तेव्हा मी मैत्रीवर फुली मारून कंपनीचा अधिकारी या नात्याने माझं कर्तव्य बजावले. पण आज कर्तव्यापेक्षा मैत्री अधिक जवळची समजून इथे आलो आहे. इतकी वर्षे आपण दुरावलो होतो, पण आज तू माझ्या भेटीची इच्छा व्यक्त करून त्या कर्तव्यापोटी केलेल्या गोष्टीमुळे मनात आजवर खोल रुतलेला नैराश्येचा सल दूर करण्यासाठी मदत केलीस…”

हेही वाचा – लढाई… व्यवहार की भावना?

निनाद हळू आवाजात बोलायला लागला, “त्यावेळी तुझ्यावर काय बेतलं असेल याचा विचार न करता तुझ्या केबिनबाहेर उभा राहून मी बरंच काही अर्वाच्य बोललो, त्याबद्दल मला नंतर खूप पश्चात्ताप झाला. पुढे मला भरायची होती तेवढी रक्कम कंपनीत जमा करून मी राजीनामा दिला आणि पुण्यात स्थायिक झालो. वर्षभरात नवीन नोकरी मिळाली. तिथूनच हल्ली निवृत्त देखील झालो. सगळं मार्गी लागणार होते, इतक्यात हे भयंकर दुखणं मागे लागले. त्या नोकरीत जशी झटपट पैशाची हाव, आईवडिलांनी दिलेली शिकवण आणि नीतिमत्ता पोखरत गेली, तसाच कॅन्सर कधी हे शरीर पोखरत गेला ते माझे मलाच कळलं नाही. आता परतीचा प्रवास सुरू करून दिवस मोजायला सुरुवात केली आणि तू अचानक आठवलास आणि म्हणूनच…” इतकं बोलून निनादने माझे दोन्ही हात त्याच्या हातात जेमतेम प्रयत्नपूर्वक पकडून रडायला सुरुवात केली. आमच्यातील कटूता एव्हाना त्याच्या डोळ्यांतून खाली ओघळलेल्या अश्रूत वाहून गेली. त्याचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवून मी त्याला थोपटायला सुरवात केली.

“निनाद माझी पण एक अखेरची इच्छा आहे ती करशील पूर्ण?”

निनादने डोळे वर करून माझ्याकडे बघितले.

“पुढच्या जन्मी जर का आपली भेट झाली तर आपण एकाच कंपनीत नोकरी करायची. पण फरक इतकाच की, मी मार्केटिंग हेड होणार आणि तू फायनान्स हेड. बोल आहे कबूल?”

निनादच्या डोळ्यांतल्या गोठून गेलेल्या सागरात मी त्याच्या उत्तराची होडी शोधायला लागलो. इतक्यात मोठ्या मुश्किलीने निनाद अंगठा उंचावून मला म्हणाला, “कबूल आहे मला.” आम्हा दोघांच्याही मनांतल्या अखेरच्या इच्छा मांडल्या, त्याची पूर्ण झाली होती अन् माझी… हे आमच्या जिद्दी मैत्रीचे द्योतक होते, एवढं मात्र निश्चित.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!