Friday, January 16, 2026

banner 468x60

Homeअवांतरस्कॉटलंडमधलं मोहक खेडं… न्यूटनमोर

स्कॉटलंडमधलं मोहक खेडं… न्यूटनमोर

गजानन देवधर

स्कॉटलंडच्या हायलंड भागातील Cairngorms National Park मध्ये वसलेलं न्यूटनमोर हे छोटंसं पण मोहक खेडं आम्ही 2015 साली पाहिलं. आम्ही दोघं, सोबत माझा धाकटा भाऊ दीपक आणि भावजय ज्योती,  चौघांनी मिळून या गावात दोन दिवस घालवले. दुपारी साधारण 12 वाजता आम्ही एडिंबरोहून कारने न्यूटनमोरला पोहोचलो. स्कॉटलंडच्या केंद्रस्थानी असलेलं जेमतेम हजार लोकवस्तीचं हे गाव. तिथं राहण्यासाठी निवडलेला आमचा Eagle’s View हा होम स्टे अगदी गावाच्या वेशीजवळच होता. Eagle’s View हा छोटेखानी बंगला अजूनही आमच्या छान लक्षात आहे, तो त्याच्या लाकडी सजावट, आजूबाजूचं शांत वातावरण आणि उबदार आदरातिथ्य यामुळे! प्रवासाची सुरुवातच मनात आपलेपणाची भावना मनात निर्माण झाली.

दुपारनंतर बाहेर पडून, Eagle’s View च्या उजव्या बाजूला वळून आम्ही गावातल्या मुख्य रस्त्यावरून, Kingussie road वरुन गावाच्या अगदी शेवटापर्यंत फेरफटका मारला. रस्ता साधारण दोन किमी असावा. रस्त्याच्या उजव्या हाताला दिसलेली स्कॉटलंडमधील प्रख्यात Harris Tweed ची शोरूम आकर्षक होती. स्कॉटलंडमधल्या पारंपरिक कापडनिर्मितीचा तो मानबिंदू. तिथं थांबून कपड्यांचे रंग, पोत आणि इतिहास याबद्दल थोडं जाणून घेण्याचा योग आला. पुढे चालता चालता एक जुनं, दगडी बांधकाम असलेलं हॉटेल दिसलं. एकेकाळी न्यूटनमोरचा सॅनिटोरियम म्हणून लौकिक असताना ही इमारत उभारली गेली होती, असं कळलं.

त्याच रस्त्यावरचं सुपरमार्केट गावाच्या साध्या दैनंदिन जीवनाची झलक दाखवत होतं. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते गावभर पसरलेल्या मांजरांच्या शिल्पांनी! कधी खिडकीपाशी, कधी पायवाटेवर, तर कधी दुकानाच्या पायरीवर ठेवलेल्या विविध रंगांच्या, काही लाकडी, काही सिरॅमिक तरी काही दगडी सुद्धा… मांजरांच्या अनेक रंगीबेरंगी लाडीक मूर्ती पाहताना आम्ही प्रत्येक वेळी थबकत होतो. शेकडो शिल्पांचा हा खेळकर संग्रह गावाची वेगळी ओळख निर्माण करतो.

गाव इतकं लहान की, तिथलं रेल्वे स्टेशन देखील अगदी छोटंच, परंतु सौदर्यपूर्ण मांडणी असलेलं, तिकीट खिडकी नसलेलं! प्रवाशांना थेट गाडीत तिकीट देण्याची तिथली प्रथा पाहून गंमत वाटली. दुसरे दिवशी आम्ही रेल्वेने ॲव्हीमोरला जाऊन आलो.

स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका बाजूला स्टड फार्म दिसलं तर, दुसर्‍या बाजूला दूरवर पसरलेलं मेढ्यांचं कुरण, निवांत चरणार्‍या मेंढ्या आणि रस्त्याच्या दुतर्फा डुलणारी फुलं… एका कुशल चित्रकारानं चित्र काढावं असं ते दृष्य होतं.

छोटं गाव असूनही इथे गोल्फ कोर्स दिसला, हे विशेषच. संध्याकाळी जेवणासाठी आम्ही गावातल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथं भारतीय डिशेस मिळत असल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले अन् आनंदही झाला. एवढ्या दूरवरच्या हायलंडमधील गावातही आपली व्यंजनं पोहोचली आहेत, हे पाहून छान वाटलं.

हेही वाचा – टी मेकिंग विथ गेशा

न्यूटनमोरची खरी ओळख मात्र तिथल्या संग्रहालयांमधून होते. Highland Folk Museum मध्ये जुन्या हायलंड जीवनाचा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष मिळाला. माती आणि गवताच्या छपरांची घरं, जुन्या शाळेतील वर्ग, खडू फळा, वेताची छडी हे सगळं पाहून आपल्याकडच्या शाळा आठवल्या. इथल्या शंभर वर्षापूर्वीच्या शाळेतील वर्ग होता तो! तिथं लोखंडी मोठं चक्र आणि त्याला अडकवलेली सळी पाहिली. मी ती लगेच हातात घेऊन पळवून दावली. तिथल्या शिक्षकाना आश्चर्य वाटलं… म्हटलं आमचं लहानपण असे खेळ खेळण्यातच गेलंय! तिथं भेटलेले वृद्ध शिक्षक आणि त्यांच्या गप्पांनी तिथला अनुभव अजून संस्मरणीय झाला.

याच संग्रहालयातील एका सेवाभावी स्थानिक वृद्ध महिलेशी आमची ओळख झाली. तिने आम्हाला प्रेमाने बसवून घेतलं. आम्ही भारतातून आलो हे कळल्यावर तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. कारण तिची मुलगी काही काळ बंगलोरमध्ये राहिली होती. बंगलोरचं हवामान, तिथल्या लोकांची झालेली मैत्री आणि तेथील अनुभव ती आठवून आठवून सांगत होती. त्या गप्पांमुळे परदेशातही आपुलकीचा एक बंध तयार झाला. ती तिथल्या scottish Gaelic भाषेबद्दलही अभिमानानं सांगत होती.

आमच्या होम स्टेजवळ असलेलं गावातलं Clan Macpherson Museum हे हायलंड्सच्या इतिहासाचं आणखी एक आकर्षण. मॅकफर्सन या सुप्रसिद्ध क्लॅनचा वारसा, त्यांची शस्त्रास्त्रं, पोशाख, दस्तऐवज आणि शौर्यकथा इथे जतन केल्या आहेत. त्या संग्रहालयातून बाहेर पडताना हायलंड क्लॅन संस्कृतीबद्दल मिळालेल्या माहितीमुळे त्या क्लॅनबद्दल मनात आदर निर्माण झाला.

न्यूटनमोरची आणखी एक आकर्षण म्हणजे River Spey. स्वच्छ, निळसर पाण्याची ही नदी गावाला वेगळंच सौंदर्य बहाल करते. या नदीच्या पाण्याचा वापर करूनच Speyside single malt Scotch whiskies तयार केल्या जातात आणि त्याचा स्थानिकांना सार्थ अभिमान असल्याचे जाणवले.

हेही वाचा – गाडी बुला रही हैं…

न्यूटनमोर गावात दरवर्षी काही क्रीडा स्पर्धा होतात, असं कळलं. स्कॉटिश परंपरेतल्या हायलंड गेम्सच्या स्पर्धा इथे होतात. आमच्या मुक्कामाच्या काळात तो अनुभव घेता आला नाही, पण स्थानिक लोकांच्या बोलण्यातून त्याचं महत्त्व जाणवलं.

हे सगळं अनुभवताना दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. न्यूटनमोरची खासियत म्हणजे इथल्या लोकांचा साधेपणा,  मदतीचा हात पुढे करणारे आणि निसर्गावर प्रेम करणारे कडवे परंपरावादी, स्वाभिमानी स्कॉटीश. इथे इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम झाला आहे असे जाणवले.

स्कॉटलंडच्या प्रवासातलं दोन दिवसांच्या मुक्कामाचं हे जेमतेम एक हजार लोकसंख्या असलेलं छोटंसं आणि अतिशय स्वच्छ खेडेगाव तिथं असलेली दोन म्युझिअम्स, तिथला गोल्फ कोर्स, तिथल्या नागरिकांचं गावावरचं प्रेम, कॅट ट्रेल्स् अशा वैशिष्टांमुळे आमच्यासाठी एक अविस्मरणीय ठिकाण ठरलं.


dscvpt@gmail.com / मोबाइल – 9820284859

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!