सतीश बर्वे
“काका तुम्ही वेळ कसा घालवता रोज?”
माझ्या एका तरुण मित्राने मला विचारले होते मेसेज करून. मी त्याला माझ्या भाषेत उत्तर देऊन टाकले.
“मित्रा, ‘काय करायचं?’ हा प्रश्न मी आजवर विचारायची संधी स्वतःला दिली नाही. मी निवृत्त जरूर झालोय. पण तो फक्त नोकरीतून. जगण्यातून नाही, वागण्यातून नाही… आणि विचारातून तर नाहीच नाही!”
“घरातील तुझं कपाट आवरायला घेतलं तरी, त्यातील प्रत्येक खण आणि त्यातील सांभाळून ठेवलेल्या वस्तू तुला पार भूतकाळात घेऊन जातात. त्या प्रत्येक वस्तूची अशी एक गोष्ट असते. त्यावर आपल्या कितीतरी आठवणी दुधाच्या सायीसारख्या चिकटलेल्या असतात. तरुणपणीच्या त्या मखमली कालखंडाची तुम्हाला अगदी घरबसल्या सैर घडवून आणतात. माझ्या आईवडिलांचे काही कपडे अजूनही माझ्या घरी हॅंगरला लावलेले आहेत… ज्यांना नुसता हात लावला तरी आईवडिलांच्या अस्तित्वाने माझं घर पहिल्यासारखे गजबजलेलं होते. अधूनमधून मी ते कपडे मशिनमधून धुतो तेव्हा आईवडिलांच्या प्रेमळ सहवासाची जणू मला ऊब मिळते…”
“पंचावन्नाव्या वर्षी मी घरच्या जबाबदाऱ्यांतून पूर्णपणे बाहेर पडलो. त्यानंतर मी माझी बकेट लिस्ट बनवली. हळूहळू जमेल तशी त्यातील गोष्टी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतो…”
लिखाणाची आवड मी आईकडून घेतली. तिच्या दीर्घकाळ चाललेल्या आजारपणात लिखाण हेच तिचं दुःख हलकं करण्याचं रामबाण औषध होते. आज जे थोडेफार लिखाण मी करतो सोशल मीडियावर, ही सगळी माझ्या आईचीच पुण्याई आहे. काटकसरीने पण तरीसुद्धा सुखात कसं रहायचं आणि आपल्या आनंदात इतरांना सामावून कसं घ्यायचं, हे वडिलांनी त्यांच्या अखेरच्या काही दिवसांत मला समजावून सांगितले. आज त्या दोघांच्याही सिद्धांताच्या, शिकवणीच्या आणि संस्कारांच्या शिदोरीच्या जोरावर मी माझं आयुष्य छानपैकी जगतोय…”
“फेसबुकवर वैविध्यपूर्ण लिखाण करतो मी बहुतेक रोजच. वाचकांची पसंती आणि अभिप्राय हीच माझी लिहिण्याची ऊर्जा आहे. आयुष्य जगताना दोन्ही कान आणि दोन्ही डोळे उघडे ठेवून जगलो. आलेल्या आणि ऐकलेल्या अशा सगळ्या अनुभवावरून सुंदर सुंदर मनाचा ठाव घेणारं लिखाण मी करतो. जोपर्यंत माझ्या रसिक वाचकांना माझं लिखाण आवडतं, तोपर्यंत मी लिहीत रहाणार. फेसबुक जरी आभासी जग असलं तरी, त्यातील मित्रमैत्रिणींसोबत खरीखुरी मैत्री आपल्याला करता येते, हे मला अगदी सुरवातीलाच समजले. म्हणूनच फेसबुक काका या नावाने मी महाराष्ट्रातील घराघरात आज पोहोचलो आहे. यातील बऱ्याच जणांना त्यांच्या शहरात जाऊन भेटायला मी सुरुवात केली आहे.”
हेही वाचा – Mother and motherhood : बेअरर चेक
“तुमच्या पिढीला सगळं कसं झटपट हवं असतं. सहनशीलता, सोशिकपणा, वाट बघणं या गोष्टी आजकाल तुमच्या आकलनशक्तीच्या पलिकडच्या झाल्या आहेत. आवश्यकता आणि चैन यातला फरक तुमची पिढी बहुतेक ठिकाणी विसरलेली मी बघतो. उद्याच्या भविष्याची तरतूद आज बचत करून करायची, हे तुम्हाला रुचत नाही. नपेक्षा आजचा दिवस भरभरून कसा जगायचा याकडे तुमचा ओढा आहे. सुरवातीला अशी उधळपट्टी करून जगण्याची गंमत वाढते. क्षणभराचा आनंद जरूर मिळतो तुम्हाला. पण जेव्हा क्रेडिट कार्डचे पेमेंट करायची वेळ येते, तेव्हा सगळी समीकरणं क्षणांत बदलून जातात. यातूनच नवरा-बायकोमध्ये दीर्घकाळ ताणतणाव सुरू होऊन, त्याचा शेवट घटस्फोट घेण्यावर येऊन पोहोचतो…”
“प्रत्येक गोष्ट करताना थांबायचं कुठे, हेच लक्षात न घेतल्याने तुमची आयुष्य कायमची थांबतात. याच सगळ्या समस्या घेऊन नवीन पिढी मला ऑनलाइन भेटायला लागली, तेव्हा त्याचे गांभीर्य माझ्या लक्षात आले. इथूनच माझ्यासाठी अजून एक व्यासपीठ सोशल मीडियावर उपलब्ध झाले आणि ते म्हणजे समुपदेशन म्हणजेच काऊन्सलिंग. आज कितीतरी तरुण-तरुणींच्या आयुष्याचा दिशादर्शक म्हणून मी नि:स्वार्थीपणे काम करतो, समुद्रात पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या दीपगृहाप्रमाणे!”
“तुझं काय किंवा माझं काय, आपलं आयुष्य एक वाहता प्रवाह आहे. तो सतत वाहता ठेवायची जबाबदारी आपली आहे. जसं पाणी एकाच जागी साचून राहिले की, ते गढूळ होते. त्यावर शेवाळं जमा होऊन ते पिण्यायोग्य रहात नाही. आयुष्याचं ही तसंच आहे… मी ते कायम प्रवाही कसं राहील, याचा मनापासून प्रयत्न करून ते जगण्यायोग्य ठेवतो. तू देखील कायम ही गोष्ट लक्षात ठेवशील अशी अपेक्षा आणि इच्छा आहे माझी.”
माझं उत्तर माझ्या तरुण मित्राने वाचलं आणि त्यानं मला मेसेज केला –
“काका माझ्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी तुमचं उत्तर अपलोड केले. पुष्कळ मित्रमैत्रिणींना ते आवडले. प्रकरण इथेच थांबलं नाही तर, ते आता कॉलेजच्या प्रोफेसर रूममध्ये चर्चेचा विषय बनले आहे. भविष्यात कदाचित तुम्हाला याच विषयावर व्याख्यान द्यायला कॉलेजमध्ये बोलवतील देखील!”
हेही वाचा – Mother and son : आईची कहाणी
बघूया काय होतं ते. तरूण पिढीला आयुष्य प्रवाही ठेवण्यासाठी काय करायला हवं हे सांगायची संधी मला मिळाली तर माझ्यासारख्या नशिबवान मीच असेन.