Sunday, September 21, 2025

banner 468x60

Homeललितनवी दिशा

नवी दिशा

चंद्रशेखर माधव

मध्यान्ह उलटून बराच वेळ झाला होता. नदीकाठी वाळवंटात एक लहान मुलगी एकटीच, एकटक वाहत्या पाण्याकडे पाहात बसली होती, विमनस्क अवस्थेत. किती वेळ बसली होती कुणास ठाऊक! कदाचित, तिलाही माहीत नव्हतं. अशाच एकटेपणात अजून थोडा वेळ गेला. दुपार सरता-सरता अचानकच कुठूनशी एक नाव आली. लांबूनच नावाड्याने त्या मुलीला पाहिले आणि नाव किनाऱ्याच्या दिशेने वळवली. ती मुलगीही उठून नदीकाठाकडे धावत गेली.

“मलाही घेऊन चला. मला यायचं आहे तुमच्याबरोबर…” नावाड्याला ती म्हणाली.

“कुठे जायचं आहे तुला?” त्याने विचारलं.

“नाही माहीत, पण मला इथे नाही थांबायचं!” ती म्हणाली.

नावाडी क्षणभर विचारात पडला अन् म्हणाला, “ठीक आहे, बस.”

तो असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्याने विचार केला की, ‘फिरवून आणू अन् सोडू परत इथेच थोड्या वेळाने.’ सकाळपासून उन्हातान्हात नाव हाकून नावाडीही त्रासला होता. पण तिच्या चेहऱ्यावर हास्य पाहून तोही जरा सुखावला.

हेही वाचा – फासा

“चल माझ्यासोबत, जाऊया आपण दोघं…” असं म्हणून त्याने नेहमीच्याच आत्मविश्वासाने वल्हं हातात घेतली अन् नावेने वाळवंटी किनारा सोडला. ती मुलगी हरखून पल्याडचा हिरवागार किनारा न्याहाळू लागली. तिच्या चेहऱ्यावर कुतुहलयुक्त आनंद उमटला.

निघताना क्षणभरच वल्हं सैल पडली आणि नाव जराशी डळमळली. लगेचच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

नावाडी म्हणाला “नको घाबरूस, मी आहे ना!”

हळूहळू नावाडी तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करू लागला.

“एकटीच इथे काय करत होतीस? काही हवं आहे का तुला?” त्याने विचारलं.

“नाही माहीत मला, मी काय करतेय ते. मला कुणाचीच सोबत नाही…” मुलगी उत्तरली.

त्याला तिच्या बोलण्यातून एकटेपणा जाणवला. “मला ना सोबत हवी आहे. देता का आणून मला दोन-तीन मित्र-मैत्रिणी?” तिच्या या प्रश्नावर नावाडी निरुत्तर झाला. पुन्हा एकदा पलीकडच्या किनाऱ्याकडे पाहात नाव वल्हवू लागला. कदाचित, गेल्या अनेक वर्षांत त्यालाही असं निरुत्तर करणारा प्रश्न कुणी विचारला नसावा.

आता मात्र नावाडी तिचं बोलणं अगदी गंभीरपणे ऐकू लागला. तिच्याकडे पाहात एक स्मित हास्य करून तो म्हणाला, “आहे माझ्याकडे वेळ.” थोडावेळ गप्पा झाल्यावर त्याने तिला परत त्याच वाळवंटी किनाऱ्यावर सोडलं आणि आपल्या मार्गाने निघून गेला.

हेही वाचा – अनाहूत सल्ला

काही दिवसांनी पुन्हा एकदा त्याच किनाऱ्याजवळून जाताना त्याने तिला तिथेच बसलेलं पाहिलं. ती जणूकाही वाट पाहत थांबली आहे, असं त्याला वाटलं. नाव किनाऱ्याजवळ पोहोचताच “कुठे होतात दोन-तीन दिवस? कित्ती कित्ती वाट पाहिली मी तुमची, माहितीये?” ती थोडंसं रागावून म्हणाली.

“बरं, जाऊ दे! बस, आपण चक्कर मारून येऊ…” तो म्हणाला. हे ऐकल्यावर ती आनंदून पटकन त्याच्या नावेत बसली.

क्रम तोच…! ती मुलगी बोलणार, खूप काही मनातलं, वेगळंस बोलणार आणि नावाडी ते शांतपणे ऐकणार. परत वाळवंटी किनाऱ्यावर आणून सोडताना ती म्हणाली “उद्या या हं! मला असं एकटीला सोडून निघून जात जाऊ नका. मला भीती वाटते.” त्या वाक्याने नावाडी एकदम विचारात पडला. असेच अनेक दिवस गेले. नावाडी रोज संध्याकाळी त्या वाळवंटी किनाऱ्यावर येत असे अन् तिला भेटत असे, तिचं मनोगत ऐकत असे. हळूहळू त्यालाही त्या लहानग्या मुलीची सवय झाली. एखाद्या संध्याकाळी ती नसली की, नौका रिकामी-रिकामी वाटू लागली.

पण रोजच्या संवादादरम्यान कधीकधी तिला समजावून सांगताना नावाडी वैतागून जायचा, रागवायचा. एक दिवस असंच काही क्षुल्लक कारणाने नावाडी चिडून निघून गेला आणि तीन-चार दिवस आलाच नाही. पण त्यालाही सवय झाली होती. परत जेव्हा तिथे गेला आणि तिला भेटला, तेव्हा ती त्याला म्हणाली “असं रुसून जात जाऊ नका. गुण-दोष सगळ्यांमध्ये असतात; पण माणूस महत्त्वाचा असतो. तुमची ही नावच बघा ना! याला आहेत भोक, काही भेगाही आहेत. पण तरीही आपल्याला पलीकडच्या किनाऱ्यावर नेतेच ना? रोज फिरवून आणतेच ना? तसंच आहे आपलं. मी तुमच्याशी मैत्री केली आहे, तुमच्यातल्या दोषांशी नाही.” त्याला ते वाक्य मनापासून पटलं.

असं करत करत अनेक महिने सरले. भेटीचा क्रम सुरू राहिला. दोघांच्या मैत्रीचे धागे घट्ट होत गेले. मुलगी आनंदात राहू लागली.

असंच एक दिवस नेहमीप्रमाणेच नावाडी नाव घेऊन किनाऱ्यावर आला. नाव नव्याने रंगवली होती. नावेतून उतरला आणि तिला म्हणाला, “घे ती वल्हं हातात. आजपासून ही नाव तू चालवणार आहेस. जा, तो बघ पलीकडे सुंदर किनारा आहे, त्यादिशेने घेऊन जा नाव.” असं म्हणून तिथेच वाळवंटी किनाऱ्यावर उभा राहिला. मुलीने हळूहळू नाव किनाऱ्यापासून दूर न्यायला सुरवात केली अन् थोड्याच वेळात दिसेनाशी झाली.

नावाडी काही वेळ समाधानाने त्या रिकाम्या नदीपात्राकडे पाहत राहिला. ती मुलगी त्याच्यातील सगळे दोष काढून घेत नदीत विसर्जन करायला घेऊन जात आहे, असं क्षणभर त्याला भासलं. थोड्यावेळाने भानावर येऊन तिथून निघाला. जवळच अजून एक नाव उभी होती, त्यात बसला. याही वेळी त्याने नेहमीच्या आत्मविश्वासाने वल्हं आपल्या ताब्यात घेतली आणि नावेने नव्या दिशेने आपला प्रवास सुरू केला.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!