Saturday, March 14, 2026

banner 468x60

Homeललितसुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ!

सुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ!

डॉ. विवेक वैद्य

खूप जुनी गोष्ट आहे. मी लहान होतो… आम्ही चाळीत राहायचो तेव्हा. साधारण दहा-बारा घरे असतील. दोन-तीन घरांचा अपवाद वगळता सर्व कौलारू घरे. समोर एक पटांगण. पटांगणाच्या एका कोपऱ्यात छोटेसे देवीचे मंदिर. त्याच्याच बाजूला भलेमोठे वडाचे झाड. त्याच्या जाड पारंब्या थेट जमिनीला भिडलेल्या. आम्ही मुलेमुली त्यावर झोके घ्यायचो. मी चौथीत असेन. शाळा सकाळची. दुपारी जेवण, अभ्यास, थोडी झोप काढली की, चार साडेचारच्या सुमारास पटांगणात खेळायचे वेध लागायचे. कब्बडी, विटीदांडू, भोवरा, आबाधाबी असे खेळ खेळायचो. मुलीही आमच्यातच खेळायच्या. आमचा कॉमन खेळ असायचा काचापाणी. मुली क्वचित त्यांचे वेगळे खेळ खेळायच्या…

सुमी चाळीतल्या शेवटच्या घरात राहायची. तीही चौथीत आणि आमची शाळा एकच. त्यामुळे ती आणि मी सोबत शाळेत जायचो. संध्याकाळी तीही आमच्याबरोबर खेळायची. काळीसावळी चुणचुणीत सुमी सारखी बडबड करायची. हसली की, तिचे शुभ्र दात लक्ष वेधून घ्यायचे.

माझे नाव घेऊन बोलायची… “चारू आज हे झाले…”, “चारू आज ते झाले…”

चौथीची परीक्षा झाली. उन्हाळ्यात मी मामाकडे जायचो. सुटी संपली, परत आलो. पाचवीत दुपारची शाळा. तयार होऊन नेहमीप्रमाणे सुमीला बोलवायला गेलो तर, काकू म्हणाल्या, “सुमीने सोडली रे शाळा. येणार नाही ती आता!”

“का?” हा शब्द ओठावर आला, पण बोललो नाही. वाईट वाटले थोडेसे. जाता-येता तिची सोबत होती. ‘चारू…’ ‘चारू…’ म्हणून तिच्या बडबडीची सवय झाली होती. पण त्याकाळी मुलींनी शाळा सोडणे कॉमन होते. चाळीतील कदम काकूंच्या अनूने आणि उमा भातखंडेने अगोदरच शाळा सोडली होती.

सुमीने शाळा सोडली असली तरी, संध्याकाळी आम्ही पटांगणात खेळायला यायाचो, तेव्हा ती खेळायला यायची. खासकरून काचापाणी खेळायचो तेव्हा. पण सुमी आता पूर्वीसारखी खेळायची नाही. एक-दोन डाव झाले की, तिला धाप लागायची. एकदा ती खेळायला आली आणि लगोलग काकू मागून आल्या…

“सुमे… तुला सांगितले ना खेळायचे नाही म्हणून? तब्येत जास्त बिघडेल… चल आधी घरात!”

त्यानंतर सुमी खेळायला यायाची बंद झाली. पण आम्ही खेळायला आलो की, ती तिच्या घराच्या ओट्यावर बसून राहायची. तिथूनच आमचे खेळ बघायची. ती पहिल्यापेक्षा बारीकही झाली. केव्हातरी ती ओट्यावर दिसायची बंद झाली. खेळण्याच्या नादात ते आमच्या लक्षात आले नाही. पाचवीत गेल्यामुळे शाळा पाच वाजता सुटायची. खेळायला वेळ कमी मिळायचा…

एकदा शाळेतून आलो तर, आई छान तुपातला शिरा करत होती. मी आनंदाने ओरडलो… “अरे वा, शिरा!”

“तुला नंतर… अगोदर हातपाय धुऊन कपडे बदल आणि माझ्याबरोबर चल सुमीकडे,”आई म्हणाली तसा मी झटपट तयार झालो. एका मोठ्या वाटीत शिरा घालून त्यावर वर्तमानपत्राचा तुकडा ठेऊन आई निघाली… तिच्यामागे मीही.

हेही वाचा – वाचनसंस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तात्या अन् माधवची गोष्ट

एका खाटेवर सुमी झोपली होती. हातापायाच्या काड्या, खोल गेलेले डोळे आणि खप्पड चेहरा… आई तिच्या डोक्याजवळ तर मी पायाशी बसलो. तिचे पाय मात्र खूप सुजलेले. तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत आई म्हणाली, “काय म्हणते सुमन?”

“बरी आहे काकू…” खोल आवाजात सुमी म्हणाली.

“बघं. तुला आवडतो म्हणून तुपातला शिरा केला आहे.”

आईने दोन घास शिरा सुमीला भरवला. पण तिसऱ्या घासालाच सुमी मानेने नाही म्हणाली.

“का गं आवडला नाही का?”

“छान झाला आहे. पण पुरे…”

आईने उरललेला शिरा काकूंजवळ दिला आणि त्या दोघी मधल्या खोलीत गेल्या… त्यांच्या गप्पात ऑपरेशन… मुंबई… हृदय… असे शब्द कानावर येत होते. तेवढयात सुमी म्हणाली “तुम्ही खेळता का अजून?”

“हो”

“काचापाणी पण खेळता का?”

“खेळतो कधी-कधी”

“मलापण खेळायचे आहे रे, पण मला चालताच येत नाही.”

“तू बरी झाली की, आपण दोघे खेळू…” मी म्हणालो

“नक्की?”

“नक्की!” मी म्हणालो आणि सुमीच्या हातावार हात ठेवला. आम्ही परत आलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर, सुमीच्या घरासमोर ही गर्दी. मी घाईघाईने स्वयंपाकघरात गेलो, तर आई डोळ्यातील अश्रू पुसत होती.

“काय झाले आई? सुमीच्या घरासमोर गर्दी कशाची?”

“अरे सुमी गेली.”

“गेली? कुठे?”

“अरे… गेली म्हणजे वारली.”

वारणे म्हणजे परत कधीही न दिसणे, एवढा अर्थ मला माहीत होता. माझे मन उदास झाले…

“आई, मी सुमीला पाहून येऊ?”

“काही नको, तुझी वार्षिक परीक्षा जवळ आली आहे. तू शाळेत जा. बाबा तिथेच आहेत सकाळपासून…”

मी निमूटपणे शाळेत गेलो. शाळेतून आलो तर तिच्या घरासमोर गर्दी नव्हती. परीक्षा, अभ्यास गडबडीत मी सुमीला विसरून गेलो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी नेहमी मामाकडे जायचो. पण आजीची तब्येत बरी नसल्याने त्यावर्षी आईने मला पाठवले नाही.

मे महिन्यात खूप गरम व्हायला लागले. काही लोक खाट टाकून बाहेर झोपायचे तर, काही गच्चीत. चाळीत  दोनतीन जणांचेच स्लॅबचे घर होते. त्यापैकी अक्षय म्हणून एक माझा वर्गमित्र होता. तोच म्हणाला, “अरे, आमच्या गच्चीत मस्त हवा येते. येत जा झोपायला. आम्ही दोन-तीन जण तयार झालो. त्याचा मोठा झोऱ्या होता. येताना फक्त ज्याने त्याने आपले पांघरूण आणायचे.

गच्चीत खरचं मस्त हवा येत होती. गप्पा मारतामारता केव्हा झोप लागली कळलेच नाही. अचानक मला जाग आली. सगळीकडे नि:शब्द शांतता होती. शेजारी अक्षू गाढ झोपला होता. पण समोरील पटांगणात काहीतरी आवाज येत होता. मी उठलो आणि गच्चीच्या कठड्यापाशी आलो. समोर पटांगणावर कोणीतरी काचापाणी खेळत होते. व्यवस्थित आखलेले चौकोन होते आणि एक फ्रॉक घातलेली मुलगी लंगडी खेळत होती. अचानक तिने माझ्याकडे पाहिले आणि मी सुन्न झालो… ती सुमीच होती! चौथीतली धडधाकट सुमन!! इतक्या दूरूनही ती मला ओळखायला आली. ती माझ्याकडे पाहात हसली… म्हणाली, “बघ आता मला पुन्हा पहिल्यासारखे खेळता येतयं. चल, येतोय ना खेळायला? तू म्हणाला होता ना की, मी बरी झाली की, तू नक्की खेळशील माझ्याशी?”

मी दहा-अकरा वर्षांचाच असेन, पण हे जे काही मी पाहतोय, हे वेगळे काहीतरी आहे. नेहमीच्या जगातले नाही, एवढे मला निश्चित समजले. मी घाईगडबडीत परत आलो आणि अक्षूला अगदी चिटकून झोपलो. ह्दय धडधडत होते. खूप घाम आलेला होता. मी बराच वेळ पडून राहीलो. कसलाही आवाज झाला तरी, वाटायचे सुमी जिना चढून गच्चीवर येत आहे. एक मिनिट एक तासासारखा वाटत होता. किती वेळ गेला कुणास ठाऊक? पण आकाशात लाल छटा दिसू लागली, तेव्हा जीवात जीव आला. तरीही उठायची हिम्मत होत नव्हती. अखेर चाळीतल्या बायांनी अंगणात सडे टाकणे सुरू केले आणि मी तडक उठून घरी आलो. त्यानंतर मी पुन्हा गच्चीत झोपायला गेलो नाही!

हेही वाचा – अनिता… भूतकाळ अन् वास्तव!

पुढे वडिलांनी चाळीतले भाड्याचे घर सोडले आणि स्वतःचे छोटेसे घर बांधले. मी कमावता झाल्यावर त्या घराचे रुपांतर मोठ्या दुमजली बंगल्यात केले. वरती खूप मोठी गच्ची आहे. छान टाइल्स वगैरे लावल्या आहेत, पण मी कधीच गच्चीत झोपायला गेलो नाही. कोणत्याच उन्हाळ्यात नाही! परवा पत्नी वैतागाने म्हणाली, “काय त्या फॅन आणि कूलरचा कृत्रिम थंडावा घेता… गच्चीत या, किती मस्त हवा असते. झोपले की, वरती चांदणे किती छान दिसतं. एकदातरी झोपून पाहा गच्चीत!”

आता तिला कसे सांगणार की, सुमी काचापाणी खेळण्यासाठी अजून माझी वाट पहात आहे…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

माधवी माहुलकर avaantar.com on Poetry : अपूर्ण अन् रातराणी…
डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!