चंद्रकांत पाटील
यंदाचा उन्हाळा काही वेगळाच होता. उन्हानं जमीन पार भाजून निघाली होती. जनावरं होरपळत होती, माणसं पार किरवांजली होती. आड, विहीरी आटायला लागल्या होत्या, नदीचं पाणी आटून वाळू दिसायला लागली होती. धरणातल्या पाण्याचा साठा कमी झाल्याच्या बातम्या येत होत्या. अजून पावसाला अवकाश होता. नुकत्याच रोहिण्या निघाल्या होत्या, पण जुन्या परंपरेनुसार वाळल्या मातीत भात पेरायचं धाडस कोण करीत नव्हतं. हिरव्यागार आमराईत बसून पावशा पक्षी शेतकर्याना “पेरते व्हा!” “पेरते व्हा!!” म्हणून साद घालीत होता. सुनीलनेही यंदा रानं तयार ठेवली होती. सर्या सोडून ठेवल्या होत्या पहिला पाऊस झाला की, भोंड्यावर सोयाबीन, भुईमुग आणि मोकळ्या वावरात भात पेरायचा त्याचा विचार होता…
सुनील हा धोंडीरामदादा पाटलांचा एकलुता एक मुलगा दिसायला उंचापुरा, एकदम राजबिंडा… चार मुलींनंतर झालेलं हे शेंडेफळ एकदम लाडात वाढलेला त्यामुळे फारसा शिकला नाही; पण दादांच्या बरोबर शेतामाळात हिंडून चांगली शेती करायला मात्र शिकला होता. दादांकडे तशी बर्यापैकी जमीन होती. खाऊन-पिऊन सुखी असणारं कुटुंब. चार मुलींची लग्ने होऊन त्या आपापल्या घरी सुखाने नांदत होत्या. सुनील स्वभावाने अतिशय शांत, मनमिळाऊ असल्याने सर्व बहिणी आणि आत्यांच्या मधे लाडका होता. सुनीलला पण आता स्थळे येत होती, एक चांगली मुलगी बघून त्याचे लग्न केले की, दादा पंढरीला जायला मोकळे होणार होते.
सुनील सगळ्या भाच्यांचा आवडता मामा होता. भाचे मंडळी आली की, कुणाला पोहायला शिकवायचं तर, कुणाला सायकल शिकवायची, मळ्यात जाऊन झाडावरचे आंबे, जांभळे काढायची यातच त्याचा उन्हाळा निघून जात असे. त्यात भावकीत कुणाचं लग्नकार्य असू दे, नाहीतर मयतकार्य असू दे, त्यात सुनील नाही असे कधी व्हायचे नाही… असा हा सुनील सगळ्यांचा खास आणि सर्वांना हवाहवा वाटणारा मुलगा.
सुनील शेती बघायला लागल्यापासून दादा निवांत झाले होते. सुनीलला प्रत्येक गोष्ट स्वत: करायची दांडगी हौस… धारा काढणे, शेणघाण, मोटारदुरूस्ती करण्यापासून टॅक्टर चालविण्यापर्यतची सगळी कामे तो हिरिरीने करीत असे. काम करीत असताना बोटाला, पायाला अवजारे लागत असत. एखादेवेळी हातापायाला लागले, जखम झाली तर चटकन डॉक्टरला दाखवावे इंजेक्शन, औषध घ्यावे, याकडे मात्र तो दुर्लक्ष करी. दादांनी किंवा आईने विचारले की, तो शिवकाळातील मावळ्याचे उदाहरण देई…
“पूर्वी मावळे लढाई करून आल्यावर त्यासनी असंख्य जखमा होत होत्या, मग तवा काय इंजेक्शनं हुती का? आणि मला तर वाईचच लागलंय!” असं म्हणून वेळ मारून नेई.
संध्याकाळी जेवण झाल्यावर पारावर जाऊन मित्रांच्यात पान खात खात गप्पा मारण्याचा छंद सुनीलला होता. दोन-तीन महिन्यामागं असंच एकदा सुनील नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर सुपारी कातरत कातरत पाराकडे चालला होता… आज मुलीकडील लोक त्याला बघायला आले होते, त्यामुळे तो भलताच खुशीत होता आणि आपल्याच तंद्रीत चालला होता. त्या तंद्रीतच त्याने पाटील मामाचे दुकान ओलांडले आणि लगतच्या बोळकांडातून एक कुत्रे भेलकांडत सुनीलच्या पायात येऊन पडले. लक्षात येईपर्यत सुनीलचा पाय त्याच्या तोंडावरच पडला आणि त्याने त्याच्या डाव्या पायाला चावा घेतला आणि पळाले.
सुनीलला अंधारात कितपत जखम झाली वगैरे काही लक्षात आले नाही. तसाच तो पुढे पारावर गेला गप्पा झाल्या आणि घरी परत आला आणि झोपला. सकाळी उठल्यावर पॅन्टला रक्त लागलं होतं म्हणून त्यानं जखम बघितली तर, वाळून गेली होती. त्यामुळे तो विषय डोक्यातून निघून गेला.
हळूहळू उन्हाळी वातावरण बदलू लागले… वरतीकडचा वारा सुटला आणि हवेत बदल जाणवू लागला तापमान कमी झाले. केरळात मान्सून आल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि बघता बघता पाऊस सुरू झाला… मातीचा हवा हवा वाटणारा गंध सुटला, बारकी पोरं पहिल्या पावसात भिजू लागली, डबक्यात नाचू लागली, एकमेकाच्या अंगावर पाणी उडवू लागली… पोरांच्या शाळा सुरु झाल्या, शेतकरी लोकांची अवजारे दुरूस्त करायची घाई सुरू झाली, सुनीलनेही कुरी दुरुस्त करून घेतली आणि पावसाने उघडीप दिल्यावर दुसरे दिवशी भात पेरायची जुळणी केली…
हेही वाचा – दोन बायकांचा दादला… रंगा कारभारी
ठरल्याप्रमाणे भात पेरणी झाली सुद्धा पण शेवटची दोन, तीन मुरडाणं राहिल्यावर पाऊस आला. मग सुनील पेरेकर्याला म्हणाला…
“अरं पांडू…. पाऊस आलाय, वाईच थांबूया काय?”
त्यावर पांडु म्हणाला.. “अरं सुन्या! आपण थांबलो आणि पाऊस जास्त लागला तर वावार तसचं राहील की!”
मग दोघानी पावसातच कुरी चालवून भात पेरणी पुरी केली.
संध्याकाळी घरी आल्यावर सुनीलला जरा कणकण आल्यागत वाटलं तर आई म्हणाली… “आज पावसात भिजल्यामुळं झालं असंल जरा पडून रहा…” तशीच संध्याकाळ गेली दुसर्या दिवशी सुनीलला चांगलाच ताप भरला, अंग दुखायला लागले कसंतरीच वाटायला लागले.
मग त्याला गावातल्या डॉक्टरांकडे नेला, उपचार केले… पण गुण येईना. शेवटी इस्लामपूरला खासगी दवाखान्यात नेण्याचा निर्णय झाला. तोपर्यत सुनीलचा आजार वाढला होता. त्याच्या वागण्यात फरक जाणवू लागला होता.
डॉक्टरांनी सुनीलला तपासणी टेबलावर घेतला आणि विचारले, “तुम्हाला काय होतंय?”
“थंडी वाजतंय, सगळ अंग दुखतंय!” सुनील अडखळत बोलला!
सुनीलचा आवाज आणि बोलणे सामान्य माणसासारखे नव्हते, त्यामुळे डॉक्टरना शंका आली त्यानी त्याचं बीपी चेक करीत विचारले… “तुम्हाला काय लागले, चावले वगैरे होते का?”
त्यावर सुनील म्हणाला… “तसं काही आठवत नाही…”
तो घशात काहीतरी अडकल्यासारखं बोलत होता
डॉक्टर म्हणाले.. “नीट आठवा, तुम्हाला कुत्रे वगैरे चावले होते का?”
त्यावर सुनील ‘नाय’ म्हणाला!
पुन्हा आठवून “व्हय, चावलं होत त्या पाटलाच्या बोळात… पण फार मोठी जखम वगैरे नव्हती!” असे तो म्हणाला…
त्यावर “किती दिवस झाले?” म्हणून डॉक्टरानी विचारल्यावर “महिना दीडमहिना झाला असेल…” म्हणून त्यानं माहिती दिली.
त्यावर डॉक्टर गंभीर झाले. त्यांनी गळ्यातला स्टेथोस्कोप काढला आणि खुर्चीत जाऊन बसले. बाहेर बसलेल्या दादांना त्यानी आत बोलावले आणि सांगितले… “दादा, सुनीलला ताबडतोब सांगलीला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जावा, मला वेगळीच शंका येतेय. त्याला कदाचित ‘रेबीज’ झाला आहे!”
“म्हंजी डॉक्टर, सुनीलला बरं वाटंल का नाही?” असे दादांनी घाबरत विचारले त्यावर डॉक्टर काहीच बोलले नाहीत. “पहिल्यांदा तुम्ही सांगली गाठा कदाचित तिथे चांगले उपचार होतील!” असे म्हणून त्यांनी पेशंट पुढे पाठविला. दादांचं टेंशन खूप वाढले.
हेही वाचा – बदनामी… आतून उद्ध्वस्त करणारी!
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने पेशंटची माहिती घेतली आणि त्याला सरळ पिंजर्याच्या खोलीत टाकला. “असं का करता?” म्हणून दादांनी डॉक्टरना विचारले, पण त्यानी काहीच उत्तर दिले नाही.
दादा बैचैन झाले… दादांनी गावाकडे भीमराव सरपंचाना फोन लावला. सुनीलची कंडिशन त्यांना सांगितली. दुसरे दिवशी सगळीजण जीप भरून आले ते डायरेक्ट मुख्य डॉक्टरकडे गेले आणि विचारू लागले… “अहो, पेशंटला झालंय तरी काय?”
मुख्य डॉक्टरने लोकांचा मूड ओळखला आणि सगळ्याना हॉलमध्ये बसवले आणि रोगाची पार्श्वभूमी आणि सुनीलची सद्यस्थिती कथन केली. ते म्हणाले…
“हे पहा सुनीलला कुत्रे चावल्यामुळे रेबीज हा गंभीर आजार झाला आहे या आजारात साधारणपणे 2 ते 4 आठवडे ताप किंवा तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे असतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो आणि जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. अशा माणसाला जनरल वार्डात ठेवता येत नाही. शेवटी हार्ट आणि किडनीवर परिणाम होतो अन् पेशंट दगावतो. या स्टेजला औषधाचा फारसा उपयोग होत नाही. तरी पण आम्ही प्रयत्न करीत आहोत!”
डॉक्टरचे हे बोलणं ऐकून, आलेले सर्वजण दु:खी, कष्टी झाले. दादा पार कोलमडून गेले. सर्वजण पेशंटला बघण्याकरिता तळमजल्यावर गेले. सुनीलला एक खिडकी असलेल्या तुरूंगवजा खोलीत ठेवले होते. भिंतीजवळ असणार्या कॉटवर तो झोपला होता. माणसांच्या आवाजाने तो सावध झाला आणि हळूहळू खिडकीजवळ आला… तशी माणसे खिडकीजवळून लांब सरकली तसं खरखरत्या आवाजात तो म्हणाला, “घाबरू नका, मी काय चावत नाही तुम्हाला!”
गर्दीतून कुणीतरी विचारले “तुला काय होतंय?” त्यावर तो म्हणाला “सगळ अंग दुखतया, झोप नाय, भूक नाय!” नंतर कुणीतरी त्याला पाणी द्यायचा प्रयत्न केला तर तो “नको” म्हणाला. त्यातूनही बळजबरीने “दोन घोट घे!” म्हणून एकाने बाटली दिली तर ओंजळीत ओतून कुत्र्यासारखं तो जिभेनी पाणी प्याला. आता मात्र लोकाना पुरते कळून चुकले होते की, हा ‘पिसाळला’ आहे आणि रोग पुरता त्याच्या शरीरात भिनला आहे… त्याच्या वागण्यावरचा कंट्रोल सुटत चालला आहे. डॉक्टर म्हणत्यात तसे त्याला बाहेर सोडणं अतिशय धोकादायक आहे. हे सगळं बघून सुनीलचा चुलता मटकन खाली बसला आणि धाय मोकलून रडू लागला “अरं माझ्या देवा काय परसंग आनलास रंss बाबा! त्याच्या आधी मला का नेलं नाहीस…” असे म्हणू लागला.
बघता बघता ही बातमी गावभर पसरली… पै-पावने गोळा व्हायला लागले… सगळेजण सिव्हिलकडे धावू लागले… पण त्याचा काय फारसा उपयोग झाला नाही. तिसरे दिवशी सुनील कोमात गेला आणि डॉक्टरांनी पेशंटला भेटण्यास मनाई केली.
सुनीलच्या घरात सगळ्या बहिणी, आत्यांनी, पै-पावण्यांनी घर भरले होते. तासा-तासाला हॉस्पिटलमधून फोन येत होते… पण सुनील शुद्धीवर येत नव्हता. घरात सगळी चिंताग्रस्त होती. कुणाला झोप लागत नव्हती. मधेच एखादी टिटवी आक्रोश करून रात्रीच्या नीरव शांततेचा भंग करीत होती आणि पोटात गोळा येत होता. घरभर अपशकूनी पाली चुकचुकत होत्या. अशा वातावरणामुळे सुनीलच्या आईचा काळजाचा ठोका चुकत होता. त्या घाबरून गेल्या होत्या… रात्रभर शंभू महादेवाला हात जोडत होत्या, साकडं घालीत होत्या. पण म्हणतात ना नियती कठोर असते ती आपल्या कामात कसूर करीत नाही, त्याचे प्रत्यंतर पुढील चार दिवसांत दिसून आले आणि जी धाकधूक होती तेच घडले… एका सकाळी सुनील गेल्याची धक्कादायक बातमी गावात पोहचली अन् दादा पाटलाच्या वाड्यावर दु:खाचा डोंगर कोसळला….
रेबीजची केस असल्याने हॉस्पिटलने सर्व काळजी घेऊन बॉडी पांढर्या कपड्यात बांधली होती. बॉडी डायरेक्ट स्मशानात नेण्याची सूचना ॲम्बुलन्स चालकाला आणि नातेवाईकांना देण्यात आली होती. सोबतीला दोन पोलीस देऊन गाडी गावाकडे पाठविण्यात आली…
दिवस मावळतीला चालला होता आणि सुनीलची बॉडी घेऊन ॲम्बुलन्स दादा पाटलाच्या घराकडे यायला लागली… सगळा गाव दुपारपासूनच वेशीच्या तोंडाला येऊन उभा राहिला होता. एका फालतू गोष्टीमुळे तरण्याबांड पोराचा जीव जावा, ही गोष्ट प्रत्येकाच्या मनाला न पटणारी, वेदनादायी होती. सगळेजण हळहळत होते. हळूहळू गाडी घरासमोर येऊन उभी राहिली. सोबत असलेल्या पोलिसांनी बॉडी घरी उतरण्यास परवानगी नाही म्हणून सांगितलं. मग सगळा परिवार आत्या, मावशा, भाचे मंडळी गल्लीतील मित्रांनी गाडीला गराडा घातला, टाssहो फोडला लोकांनी खिडकीतून बॉडी बघण्याचा प्रयत्न केला, पण पायाच्या बोटाशिवाय काहीही उघडे दिसत नव्हते.
‘सुनील…’, ‘सुनीलमामाss’ या नावाने चाललेला आक्रोश, अक्षरश: हृदय पिळवटून टाकणारा होता. शेवटी आम्हाला तोंड तरी दाखवा म्हणून मागणी सुरू झाली, पण पोलिसांना तसे करता येत नव्हते. गर्दी कंट्रोल झाली नाही तर ॲम्बुलन्सचे दार मोडेले या भीतीने दादा पाटील आणि सरपंच पुढे आले आणि त्यानी साश्रू नयनांनी सगळ्यांना हात जोडले, समजावून सांगितले आणि मागे सरकण्याची विनंती केली. दु:खाचा दगड छातीवर ठेऊन लोक बाजूला झाले. सुनील गेला त्याचे दु:खतर त्याच्या आईवडिलांना झालेच होते, ते शब्दांत मांडता येत नाही; पण चार बहिणीचा एकुलता एक भाऊ गेला होता. त्याचं दु:ख वेगळे होते. त्या म्हणत होत्या… “वाईट हेचचं वाटतंया की, त्याचं शेवटचे दर्शन घेता आले नाही, त्याला आंघोळ घालता आली नाही की, ओवळता आले नाही… त्याची शेवटची छबी डोळ्यात साठविता आली नाही, की तोंडावरून हात फिरविता आला नाही… जगात काय माणसं मरत्यात का नाही? पण आमच्या सुनीलला असलं कसलं वो मराण आल असंल? कुठल्या जन्माचं पाप वो आमच्या वाट्याला आलं असलं?” असे सर्व कुटुंब आक्रोश करीत होत
शेवटी कशीतरी गाडी स्मशानभूमीकडे अंत्यसंस्कारासाठी रवाना झाली. त्यामागून सर्वजण नदीकडे गेले. अखेर सूर्य नजरेआड झाला होता… सगळा गाव दु:खाच्या खाईत बुडाला होता… दादा पाटलाचा वंशदीप विझला होता, अंधार झाला होता…
एक उगवता तारा कायमचा डोंगराआड गेला आणि अंधारी रात्र मोठी होत होती…
(सत्य घटनेवर आधारित हृदयस्पर्शी कथा)
मोबाइल – 9881307856


