सौरभ वैशंपायन
इतिहास अभ्यासक
मानवी मनाला कायमच इतिहासाची आवड असते. मराठी मातीला तर श्री शिवछत्रपती, शंभूछत्रपती, बाजीराव पेशवे अशा अनेक महापुरुषांचा इतिहास लाभलेला आहे. हा इतिहास जपायला हवा. पण तो जपायचा कसा? महापुरुषांची जयंती- पुण्यतिथी साजरी करण्याच्या नावाखाली चंद्रकोर, टॅटू, बाइक रॅली, घोषणा, मंडप घालून मोठमोठ्यांनी लावलेली गाणी, घशाच्या नसा ताणून भावनिक आणि तर्कशून्य, संदर्भहीन भाषण देणारे वक्ते… याने हा इतिहास जपला जाईल का?
इतिहास जपण्यासाठी तीन गोष्टींची सर्वाधिक गरज आहे – संशोधन, संवर्धन आणि मांडणी. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी कुणीतरी दारोदार वणवण भटकून, अर्धपोटी राहून इतिहासाची प्रचंड साधने शोधली, त्यांच्यावरची धूळ – वाळवी झटकली, वर्षानुवर्षे मेहनत करून ती संगतवार लावली. अत्यंत काटेकोर, तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध अभ्यासाअंती त्या ढिगातून नकली साधने बाजूला काढून अगदी थोडी पण अस्सल साधने मिळाली, ती स्वतःच्या खिशाला खार लावून प्रकाशित केली. म्हणून आज आपण इतिहास-इतिहास म्हणून उड्या मारू शकतो आहे.
बघायला गेले तर, काय गरज होती त्यांना हे उद्योग करायची? तुमच्या-माझ्यासारखे ते देखील बसू शकले असते की, घरात स्वस्थपणे! नोकरी-धंदा करून केला असता संसार राहिले असते सुखी. पण त्यांनी इतिहासाचे संशोधन आणि / किंवा मांडणी ते जीवित कार्य बनवलं. कुणी नव्याने संसार थाटला नाही, कुणी संसारच केला नाही, एखाद्याने आपल्या कामावर कॉपीराइट ठेवला नाही, एखाद्या अभ्यासकाने रोज दिवसातून एकदा दूध-पाव खाऊन वर्ष-वर्ष अभ्यास केला, दंगलीत घर जळू लागले तेव्हा फक्त घरातले देव आणि शक्य तितकी कागदपत्रे घेऊन घर सोडणारी लोकं होती. काहींचे नशीब तुलनेने चांगले होते, त्यांना थेट राजघराण्याचे दफ्तरखाने खुले झाले, मग त्यांनीही मान मोडून आपल्या अखेरच्या दिवसांपर्यंत लिखाण केले, नवीन संदर्भ हाती लागले, तेव्हा आधी केलेले सगळे काम एका झटक्यात बाद ठरवून नव्याने मांडणी केली. पुन्हा तोच प्रश्न, काय गरज इतकी उरफोड करायची?
हेही वाचा – इतिहासाशी जडले नाते…
लक्षात घ्या, आपण इतिहासातील एखादी घटना जेव्हा संदर्भ सोडून सांगतो, मांडतो तेव्हा या सगळ्यांच्या मेहनतीला आपण नाकारत असतो. कादंबरी-चित्रपट जेव्हा आपल्या इतिहासाची साधने बनतात, तेव्हा राष्ट्राचा इतिहास ढासळू लागतो. गल्लोगल्ली जेव्हा तथाकथित इतिहासकार आणि संदर्भहीन भावनिक भाषण देणारे व्याख्याते तयार होतात, तेव्हा इतिहास ढासळू लागतो.
मग इतिहास जपण्यासाठी आपण काय करायला हवं? आपणही घरदार सोडून असाच इतिहास शोधत गावोगावी, दऱ्याखोऱ्यातून हिंडायला हवं का? तर, शक्य असेल त्यांनी निश्चित ते करावं. ढासळणारे दुर्ग पुन्हा उभे करण्याचे काम अनेक संस्थांनी हाती घेतलं आहे… ही आश्वासक गोष्ट आहे. जुन्या वास्तू जपणे, त्या अत्यंत स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाने करायलाच हवे. पण त्यापलीकडे काय करायचं? तर, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, समाज माध्यमांवर आलेला संदेश कितीही स्फुरण देणारा असेल अथवा कुणावर टीका करणारा असेल तर, त्यासोबत वाहून न जाता “याचे मूळ संदर्भ काय?” हा उलट मेसेज करून विचारायला सुरुवात करा.
दुसरी गोष्ट ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी मोडी-ब्राह्मी अशा लिपी, फारसी, पोर्तुगीज, फ्रेंच, इत्यादी भाषा आत्मसात करा. मूळ लिखाण अथवा संदर्भ यांचा आधार घेऊन इतिहास वाचायला आणि लिहायला लागा. संदर्भांशिवाय इतिहास नाही म्हणजे नाही! हे मनात पक्के ठसवून घ्या.
हेही वाचा – छोटी सी बात!
जगातले कुठलेही महानायक/नायिका अथवा खलनायक/नायिका ही देखील माणसे होती, त्यांचा काळ वेगळा होता, सामाजिक-धार्मिक-आर्थिक परिस्थिती वेगळी होती, त्यांचे बालपण वा तारुण्य भल्या-बुऱ्या अनुभवातून गेले होते… ज्यातील अर्ध्या गोष्टींची आपल्याला माहिती देखील नाही, याची जाणीव आपल्याला कायम हवी. इतिहासातील घटनेबाबत आपल्याला काय वाटतं, याला अर्थ नसतो कुठल्याही व्यक्तीने अमुक केलं होतं किंवा तमुक वागले असतील, अशा मुद्द्यांना इतिहासात अर्थ नसतो. संदर्भहीन किंवा अमानवी तर्क इतिहासाला मारक ठरतात.
लक्षात घ्या, आपला इतिहास म्हणजे आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे! ती सजग होऊन प्राणपणाने जपायची की, आंधळेपणाने आणि जातीयतेने नासवायची, हे आपल्या हातात आहे… इतिहासात चंदनही आहे आणि कोळसाही… काय उगाळायचे हे अखेर आपल्या हातात आहे.


