Wednesday, July 30, 2025

banner 468x60

Homeललितमुलांच्या मनात ठसवा, ‘आम्ही आहोत’

मुलांच्या मनात ठसवा, ‘आम्ही आहोत’

आराधना जोशी

अशीच एकदा फेसबुकवरील पोस्ट वाचनात आली. मानसिक आरोग्याशी संबंधित आणि मुख्य म्हणजे borderline personality संदर्भात असणारी ती पोस्ट वाचून पायाखालची जमीन सरकली. किती प्रकारच्या छुप्या मानसिक तणावांशी आणि आजारांशी आपण नकळतपणे झुंजत असतो, ते लक्षात आलं. मुख्य म्हणजे असे ताण घेऊन एखादी व्यक्ती समाजात वावरत असताना तिच्या पालकांना किंवा जवळच्या व्यक्तींना याची साधी माहिती होऊ नये, यासारखे दुर्दैव नाही.

अर्थात, याला जबाबदार नेमकं कोण? याचं उत्तर मिळालं तरी, जाणाऱ्या व्यक्ती परत येणार नसतात. तणावात असताना अनेकदा पालकांकडून दुर्लक्ष केलं जातं. शारीरिक दुखण्यातून आराम मिळावा यासाठी आकाशपाताळ एक करणारे पालक मानसिक आजाराबाबत संवेदनशील का नसतात? मानसिक आजाराचा संबंध कायम वेडेपणाशीच का जोडला जातो? ‘डीअर जिंदगी’ या हिंदी चित्रपटात शाहरुख खानने जहांगीर खान या मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका साकारली आहे. आपण मानसोपचार तज्ज्ञ आहोत, ही गोष्ट आपल्याच पालकांना पसंत नसल्यामुळे ते इतरांना आपला मुलगा स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचे सांगतात, असा एक संवाद त्या चित्रपटात आहे. म्हणजे चित्रपटातला हा प्रसंग असला तरी आपल्या समाजाबद्दलच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणार आहे.

पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत तणाव असले तरी, ते शेअर करता येत होते. प्रत्येकाला मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस अशा एकत्र कुटुंबात सहज उपलब्ध होत असे. मग कधी ती आजी होती, आजोबा होते, काका, काकू, चुलत, सख्खी भावंडे असे अनेक पर्याय होते. मात्र हल्लीच्या विभक्त कुटुंबात माणसं कमी झाली, तसं एकमेकांसाठी द्यायला वेळही कमी झाला. त्यातून व्हर्च्युअल अर्थात आभासी जगात वावरण्याचं प्रमाण वाढलं आहे. खऱ्या खोट्यातला फरक दाखवणारी अतिशय बारीक रेघ आज पुसट झाली आहे. म्हणूनच मानसिक आजारांमध्येही वाढ झाली आहे. हातात स्मार्ट फोन आले, पण आपण मात्र मानसिक आरोग्याबाबत मागासच राहिलो.

मी आणि माझा नवरा प्रसारमाध्यमात काम करणारे. मुलगी होईपर्यंत शिफ्ट ड्यूटी आणि माध्यमांमधील स्पर्धेत टिकण्यासाठी आटापिटा करत होतो. मुलगी झाल्यावरही या रुटीनमध्ये फार बदल झाला नव्हता. आजी-आजोबांकडेच तर असते आपली मुलगी, मग काहीच प्रश्न नाही, असं मी मानत होते. आई मात्र सतत मुलीला तुमची गरज आहे, हे बोलून दाखवत होती. करिअरच्या नादात तिच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत होते. पण एकदा केवळ तीन वर्षांच्या माझ्या मुलीने मला, ‘नोकरी सोडून दे. मला तुझी गरज आहे. मी कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करणार नाही. बाबाला मिळणाऱ्या पगारात आपण भागवू,’ हे सांगितलं तेव्हा, मात्र तिच्या मनातल्या भावनिक आंदोलनाची जाणीव झाली.

याबाबत मी नंतर काही मानसोपचार तज्ज्ञांशी बोलले. त्यांनी ‘सावध, ऐका पुढल्या हाका’ असाच सल्ला दिला. एवढ्या लहान वयात जर मुलीला आपल्याला काय हवं आहे याची स्पष्ट जाणीव असेल तर, त्याकडे दुर्लक्ष नको, असेच त्यांचे मत होते. नोकरी सोडणे खरंतर त्यावेळी मला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. पण मुलीच्या भल्यासाठी नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला आणि आजपर्यंत मला त्या निर्णयाचा कोणत्याही प्रकारे पश्चाताप करण्याची वेळ आली नाही. उलट हल्ली आई आणि मुलीपेक्षा मैत्रिणी म्हणून आमच्यात एक छान नाते तयार झाले आहे. कॉलेजवयीन माझी मुलगी प्रत्येक लहानात लहान गोष्टही आता मला सांगते. यावरून तिचे बाकीचे मित्रमैत्रिणी तिला चिडवतात; पण अजून तरी प्रत्येक गोष्ट मला सांगितल्याशिवाय तिला जेवण जात नाही.

अर्थात, मला करिअरच्याबाबतीत तडजोड करावी लागली, तशी प्रत्येकाने करावी किंवा केलीच पाहिजे असं नाही. पण, आपल्या पाल्यांना ‘आम्ही आहोत’ ही जाणीव करून देत असतानाच त्याला भक्कम मानसिक आधार देणं ही आताची गरज बनली आहे, एवढं नक्की.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Mental health should never be ignored.Slowly this awareness is increasing in our society. If we know 100 years back people were not going to gynaecologist for delivery and other problems but now visiting gynaecologist is a general practice amongst all the strata in the society. Similarly after few years taking help from counselor or physiologist will be normal.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!