माधवी जोशी माहुलकर
नवरात्रीच्या निमित्त ‘साबुदाणा बर्फी’ या रेसिपीची माहिती पाहुयात. साबुदाणा बर्फी हा एक पारंपरिक भारतीय मिठाईचा प्रकार आहे. यामध्ये साबुदाणा, तूप, नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किस, साखर, दूध तसेच काजू, बदाम, पिस्ता या सुक्यामेव्यांचा उपयोग केला जातो.
साहित्य
- साबुदाणा – 1 वाटी
- मलाईसह दूध – 1 कप
- सुक्या किंवा ओल्या नारळाचा किस – अर्धी वाटी
- साखर – 3-4 कप (किंवा चवीनुसार अंदाजे घ्यावी)
- तूप – 2 ते 3 चमचे
- वेलची पावडर – 1 चमचा
- केसराच्या – काड्या (आवडीनुसार)
एकूण कालवाधी – साधारण पाऊण तास
हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे!
कृती
- प्रथम साबुदाणा कोरडाच सोनेरी रंगावर भाजून घ्यावा
- थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक वाटून घ्यावा.
- हे पिठ गरम तुपामध्ये मुरत ठेवावे. नंतर एका मोठ्या कढईत दूध गरम करायला ठेवावे, दुधाला उकळी आल्यावर गॅस मंद आचेचा करावा.
- या दुधामध्ये भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ हळूहळू टाकावे आणि एका हाताने घोटत जावे. दुधामध्ये साबुदाणा पिठाच्या गुठळ्या होता कामा नये.
- जोपर्यंत साबुदाणा दुधामध्ये पूर्णपणे मुरुन ते मिश्रण दाटसर होत नाही तोपर्यंत गॅसच्या मध्यम आचेवर ते घोटत रहावे.
- नंतर या मिश्रणात खोबऱ्याचा किस टाकावा आणि हे मिश्रण परत एकदा एकजीव करावे.
- जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा कढईला चिटकणे बंद होत नाही, तोपर्यंत घोटत राहावे.
- त्यानंतर त्यात तीन-चार कप साखर टाकावी. साखरेमुळे हे मिश्रण परत पातळ होईल. परंतु जसे जसे मिश्रण आटत जाईल, तसा याचा घट्ट गोळा तयार होईल.
- मिश्रण परत दाटसर झाले की, यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून सुका मेवा टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे.
- एका थाळीला तूप लावून त्यावर हे मिश्रण समान पसरवावे आणि त्यावर चांदीचा वर्ख लावून वरून पिस्त्याचे काप लावावेत.
- थंड झाल्यावर त्याचे आपल्या आवडीनुसार तुकडे कापून वड्या पाडाव्यात.
हेही वाचा – Recipe : नागपूरची खासियत… तर्री पोहे
टीप
- या वड्या एयर-टाइट डब्यात ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.
- दुधात बनवलेली ही साबुदाणा बर्फी मलाईदार आणि खूप स्वादिष्ट लागते.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.
या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


