दीपक तांबोळी
भाग – 2
नाना यात्रेला गेल्यावर तिन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांची आपसांत खलबतं होऊ लागली. सध्याच्या वादावर काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक होतं. एक दिवस त्यांना तशी संधी चालून आली. प्रसादच्या बायकोचा भाऊ आपल्या आर्किटेक्ट मित्रासोबत भेटीला आला. तो प्रशस्त बंगला आणि ती बाग बघून तो खूश झाला. गेल्या सहा-सात महिन्यांपासून त्याच्याकडे काही काम नव्हतं. बंगल्याकडे पाहून त्याला एक कल्पना सुचली… त्याने ती प्रसादला सांगितली. प्रसादला ती कल्पना जाम आवडली. त्याने ती आपल्या दोन्ही भावांना सांगितली. ती ऐकून अंकीतने आनंदाने उडीच मारली. विवेक मात्र फारसा समाधानी दिसला नाही.
“कल्पना चांगली आहे. पण नानांचं काय? ते तयार होतील का? शेवटी जागा त्यांच्या नावावर आहे?” तो म्हणाला.
“दादा, आपल्याला त्यांना तयार करावंच लागेल. एवढी सुवर्णसंधी चालून आलीय आपल्यासाठी…” अंकीत म्हणाला.
“हो ना! सध्या आपलं दुकानही व्यवस्थित सुरू नाहिये. आपल्याला एका झटक्यात करोडपती व्हायचं असेल तर, आपल्याला दुसरा पर्यायच काय आहे?” प्रसादने विचारलं. दोघांनाही ते पटलं. काहीही करून ही योजना नानांच्या गळी उतरवायचीच… याची तिघांनीही जणू प्रतिज्ञाच केली. विवेकच्या बायकोला ही योजना आवडली नाही. प्रसाद आणि अंकीतच्या बायकांना मात्र सुखसमृद्धीची स्वप्नं पडू लागली.
नाना आले. वीस दिवसांच्या आपल्या अनुपस्थितीत दुकानाचा व्यवसाय फारच कमी झालेला त्यांना दिसला. ते अस्वस्थ झाले; पण मुलांना बोलून तरी किती बोलणार? समजून सांगायला ती लहान थोडीच होती!
तिसऱ्या दिवशी रात्री जेवणं झाल्यावर नाना बैठकीत बसले असताना तिघांनी अखेर तो विषय काढला…
“नाना जरा बोलायचं होतं,” विवेक धीर धरुन म्हणाला. तिघा भावांच्या बायका आपली कामं सोडून हळूच बैठकीत आल्या. मामला काहीतरी विशेष आहे, याचा नानांना अंदाज आला.
“बोल ना!”
“नाना, प्रसादच्या ओळखीचा एक आर्किटेक्ट आपल्या घरी आला होता. त्यानं एक खूप छान प्रपोजल आपल्याला दिलंय…”
“कसलं प्रपोजल?”
“या बंगल्याच्या जागेवर एक सहा मजली अपार्टमेंट बांधायचं. प्रत्येक मजल्यावर चार, असे 24 फ्लॅट तयार होतील. या फ्लॅट्सच्या खाली साधारण 24 दुकानं निघतील. दुकानांच्या खाली बेसमेंटमध्ये पार्किंग राहील. या 24 फ्लॅटपैकी तीन फ्लॅट आपल्यासाठी असतील. बाकी २१ फ्लॅट आपण प्रत्येकी 60 लाखाने विकून टाकू. खालची दुकानं आपण प्रत्येकी 25 लाखाने विकू. म्हणजे, एकूण आपल्याला अठरा ते एकोणीस कोटी मिळतील. बांधकामाचा खर्च वजा जाता आपल्याला अंदाजे 12 ते 14 कोटींचं प्रॉफिट होईल. शिवाय, तिघा भावांना वेगवेगळी प्रशस्त घरं मिळतील. आजकाल प्रायव्हसी सगळ्यांना हवी असते… तीही सगळ्यांना मिळेल.”
हेही वाचा – नाना आणि तीन मुलांच्या निराळ्या तऱ्हा
“व्वा, छान आयडिया आहे…” नाना म्हणाले, तसे सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले.
“मला एक सांग. मी कुठे रहायचं?”
“कुठे म्हणजे? अहो, तीन मुलं आहेत. तुम्हाला आवडेल त्याच्याकडे रहा!” प्रसाद म्हणाला, “माझ्याकडे रहा. मी तयार आहे.”
“…आणि तुझ्या बायकोला माझा कंटाळा आला तर तू मला विवेककडे जायला सांगणार. विवेकला कंटाळा आला की, तो मला अंकीतकडे जायला सांगणार आणि अंकीतला कंटाळा आला तर मी कुठं जायचं? वृद्धाश्रमात?”
एकदम शांतता पसरली. मग अंकीत एकदम म्हणाला, “त्यापेक्षा असं करूया नाना, तुम्ही सगळ्यांकडे 4-4 महिने राहा, म्हणजे कंटाळ्याचा प्रश्नच नाही!”
“याचा अर्थ तुम्ही माझा फुटबाँल बनवणार. चार महिने झाले की, लाथाडा दुसरीकडे. यात कसलं आलं रे प्रेम आणि आपलेपणा?”
विवेकने प्रसादकडे पाहिलं आणि त्याच्या कानात कुजबूजला. प्रसादने मान हलवली आणि म्हणाला, “ते राहू द्या नाना आपण तुमच्यासाठी एक वेगळा फ्लॅट ठेवू. म्हणजे तुम्हाला हक्काचं घर होऊन जाईल.”
“ते तर अजूनच वाईट. मग मी चहानाश्ता कुणाकडे करायचा? जेवायचं कुठं? त्यावरूनही तुमच्यात भांडणं होणार आणि त्या फ्लॅटमध्ये मी एकटा राहून काय करू? मी तिथं मरून पडलो तरी तुम्हाला समजायचं नाही… आणि समजलं तरी तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही.”
“नाना, तुम्ही माझ्याकडे रहा कायमचं. मी तुम्हाला कुठंही पाठवणार नाही…” विवेकची बायको सुलभा अस्वस्थ होऊन मधेच बोलली. सुलभा नानांची सगळ्यात आवडती सून होती. खेड्यातली आणि गरीबाघरची होती म्हणून नव्हे तर, ती सगळ्यात समजदार होती. तिचं माहेर एकत्र कुटुंबातील असल्यामुळे तिला माणसांची आवड होती. सुलभाच्या बोलण्यावर नानांनी विवेककडे पाहिलं. त्याच्या कपाळावर नापसंतीच्या आठ्यांनी गर्दी केली होती!
अचानक काहीतरी सुचून नानांनी विचारलं, “हे सगळं ठीक आहे. पण बागेचं काय करणार आहात?”
“काय करणार आहात म्हणजे? अहो, नाना बाग तोडल्याशिवाय अपार्टमेंट कसं उभं रहाणार?” अंकीत हसत म्हणाला.
“अजिबात नाही. बागेला हातसुद्धा लावायचा नाही” नाना ओरडले.
“अरे तुमच्या जन्माअगोदरपासूनची झाडं आहेत ती! मी प्लॉट घेतला आणि मागच्या बाजूला ती झाडं लावून घेतली. पोटच्या पोरांसारखं किंबहुना त्यापेक्षाही जास्त सांभाळलंय मी त्यांना. झाडांचा बळी देऊन होणारा विकास मला नकोय!”
“पण नाना त्या झाडांचा उपयोग तरी काय? फळं देतात म्हणून? आपल्याजवळच फळांचं दुकान आहे. वाटेल तेवढी फळं पन्नास-साठ रुपयांत मिळतात. एवढ्याशासाठी आपलं ड्रीम प्रोजेक्ट थांबवायचं का?” प्रसाद थोडा रागानेच बोलला.
ते ऐकून विवेकही पुढे सरसावला, “आता तुम्ही म्हणाल, भाज्या ताज्या मिळतात. माझे कितीतरी शेतकरी मित्र आहेत, जे तुम्हाला सेंद्रिय भाज्या आणून देतील. ते मला नेहमी विचारतात, पण आपल्याचकडे नको तेवढ्या भाज्या पडलेल्या असतात. मला तर कंटाळा आणलाय त्या भाज्यांनी!”
“हो ना! आणि त्या झाडांवरचे पक्षी किती घाण करतात. शीss मला तर त्या बागेत पाऊल टाकावसं वाटत नाही,” प्रसादच्या बायको बोलण्याची संधी वाया थोडीच जाऊ देणार होती.
“ते सगळं ठीक आहे, पण एवढा अफाट पैसा आपल्याला मिळतोय तर, त्या फालतू झाडांना काय कवटाळून बसायचं?” आता बोलायची पाळी अंकीतच्या बायकोची होती.
“बस करा,” नाना संतापून ओरडले, “हे घर माझं आहे. ही जागा माझी आहे आणि ती झाडंही माझी आहेत. त्यांचं काय करायचं ते मी बघेन. तुमच्यात धमक असेल तर दुसरीकडे प्लॉट घ्या आणि बांधा हवं तसं अपार्टमेंट! अरे, ज्या दुकानाच्या जोरावर मी हे वैभव उभं केलं ते दुकान तर तुम्हाला व्यवस्थित सांभाळता आलं नाही. चाललेत घर तोडायला! अगोदर जोडायला शिका!”
नाना उठून त्यांच्या बेडरूमकडे जायला निघाले. तसे प्रसाद आणि अंकीत त्यांच्याकडे धावले.
“नाना ऐका ना जरा… थांबा ना… याच्यातूनही काही मार्ग निघेल…”
नानांनी त्यांना हातानेच थांबवलं आणि ते बेडरूममध्ये निघून गेले.
“मी म्हटलं ना, म्हातारा ऐकणार नाही आपलं…” विवेक संतापून म्हणाला, “गेलं आपलं ड्रीम प्रोजेक्ट पाण्यात… आणि कशासाठी तर त्या फडतूस झाडांसाठी! असं वाटतं कुऱ्हाड घ्यावी आणि खपाखप तोडून टाकावी ती झाडं.”
आपल्या बापाचं बोलणं ऐकून मुग्धा घाबरून आपल्या आईला बिलगली.
“दादा, अशी हिंमत हरून कसं चालेल. आपण सगळीकडून त्यांच्यावर प्रेशर आणू. आपले नातेवाईक, नानांचे मित्र, नानांना ओळखणारी काही बडी धेंडं, सगळ्यांना सांगू… मी माझ्या सासऱ्यांनाही सांगतो. नाना त्यांचं नक्की ऐकतील,” प्रसाद विवेकला धीर देत म्हणाला खरा, पण त्यालाही मनातून शंका वाटत होती.
झालंही तसंच! महिनाभर अनेक लोकांनी नानांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण नाना आपल्या निर्णयापासून तसूभरही हलले नाहीत. तिघं भाऊ बिल्डरला भेटले. फक्त बंगल्याच्या जागेवर अपार्टमेंट उभं करता येऊ शकेल का, याची विचारणा केली. अडचण ही होती की, बंगल्याच्या चारही बाजूला झाडं होती. कितीही वाचवायची म्हटली तरीही पाच-सहा झाडांचा बळी ठरलेला होता आणि नाना तर एकही झाड तोडू देणार नव्हते. तिघा भावांची तडफड वाढली होती. उपाय सुचत नव्हता.
एक दिवस नाना बाहेरगावी गेले असताना अंकीत विवेकला म्हणाला, “दादा किती दिवस हे दुकान दुकान करणार आहोत आपण? आपलं अपार्टमेंट झालं असतं तर, एव्हाना मी तिथे वाइल्डलाइफ टुरिझमचं ऑफिस सुरू केलं असतं.”
“हो ना! मीसुद्धा ऑटोमोबाइल स्पेअरपार्ट्सचं दुकान सुरू करणार होतो.”
“मलाही होजिअरीची एजन्सी सुरू करायची होती. नानांच्या त्या मूर्खपणामुळे सगळंच बोंबललं!”
“नाना जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत काहीच होणार नाही. मरतही नाही लवकर म्हातारा!” अंकीत बेशरमपणे म्हणाला.
“कसा मरेल? मरायला काही रोग तर पाहिजे! 65 वर्षांचे होऊनही नानांना अजून चष्मा लागलेला नाही. औषधाची एक गोळी घेतलेली नाही त्यांनी. रोज 5 किमी चालणं, प्राणायाम, योगासनं करतात ते. कशाला तब्येत बिघडेल त्यांची?” प्रसाद हताशपणे म्हणाला.
हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा
“घाबरू नका. एक ना एक दिवस देव ऐकेल आणि म्हाताऱ्याला लवकर वर बोलावून घेईल!” विवेक त्याच्या हातावर थोपटत म्हणाला.
“अरे पण कधी? आपण म्हातारे झाल्यावर?”
विवेकने खांदे उडवले.
“आपण एक काम करूया. आपण दुकानात कामच नाही करायचं. फक्त टाइमपास करत रहायचा… काहीतरी बहाणे सांगून नानांनाच कामाला लावायचं. शेवटी ते कंटाळून आपण म्हणू ते करायला तयार होतील,” प्रसादने युक्ती सांगितली. बाकीच्या दोघांनाही ती पटली. अर्थात, तो आणि अंकीत असेही काम करत नसतं. विवेकच थोडाफार काम करायचा. आता त्यालाही काम न करण्याचं जणू लायसन्स मिळून गेलं.
तिघं मुलं जाणूनबुजून टाईमपास करताहेत हे नानांच्या लगेच लक्षात आलं. त्यांनी एक जुना सेल्समन सोडून बाकी सगळे सेल्समन काढून टाकले. नाईलाजास्तव तिघं परत कामाला जुंपले. मग ग्राहक आला की, त्याला लवकर कसं बाहेर पिटाळायचं यासाठी तिघं प्रयत्न करू लागले. नानांच्या तेही लक्षात आलं. ग्राहक निघायला लागला की, नाना त्याला बसवून घ्यायचे आणि मुलांना ग्राहकाला नवीन कपडे दाखवायच्या ऑर्डर सोडायचे!
मुलांच्या वागण्याने नाना चांगलेच दुःखी झाले. एका बाहेरच्या माणसाने येऊन विचित्र खुळ मुलांच्या डोक्यात घालून दिलं होतं आणि मुलं घराचे तुकडे करायला निघाली होती. नानांना हे पसंत नव्हतं. आपण असेपर्यंत तरी मुलांनी एकत्र रहावं, आपल्याला नातवंडात रमू द्यावं, असं त्यांना वाटत होतं.
या घटनेला आता एक वर्ष होऊन गेलं. व्यवसायाची स्थिती अजूनच खालावली.
एक दिवस सकाळी सकाळी सात वाजताच घरातला फोन खणखणला. सुलभाने तो घेतला. बोलताबोलताच तिचे डोळे विस्फारले. जोराने ओरडतच तिने विवेकला हाका मारायला सुरुवात केली. विवेक धावतच आला.
“काय झालं? का ओरडतेस?”
“अहो नानांचा ॲक्सिडंट झालाय… त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलंय…”
“ओ माय गॉड! पण हे झालं कसं?”
“ते सकाळी नेहमीच्या रस्त्याने फिरायला गेले होते. एका वाळूच्या डंपरने त्यांना धक्का दिला. नाना डोक्यावरच आपटले आणि बेशुद्ध झाले. त्यांच्यासोबतच्या लोकांनी त्यांना ॲडमिट केलंय. पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केलीय…” सुलभा रडतरडत सांगत होती. विवेकने दोघा भावांना उठवलं. त्यांच्या बायकांना उठवण्याच्या भानगडीत न पडता विवेक आणि सुलभा बाहेर पडले.
क्रमश:
मोबाइल – 9209763049


