दिलीप कजगांवकर, पुणे
बायकोसाठी साडी आणायला मी, बायको आणि तिच्या दोन मैत्रिणी दुकानात गेलो. मैत्रिणी साडी सिलेक्शनसाठी आणि मी बिल भरणे, चपला नि पर्स सांभाळणे आणि पिशव्या उचलण्यासाठी!
“मॅडम बजेट किती?”
बायको उत्तरली, “दोन-अडीच हजार रुपये.”
मी खूश! खिशाला परवडणार होते.
सेल्समन मन लावून साड्या दाखवत होता, पण सिलेक्शन पॅनलला काही साड्या पसंत पडत नव्हत्या. ही पाहा एकदम लेटेस्ट… साडी खरंच सुंदर होती, मी हळूच किंमत बघितली, 2900 रुपये! लगेच म्हणालो, “छानच आहे साडी, पाहा आवडते का?”
हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!
बायको म्हणाली, “सुंदर वाटते, कलर कॉम्बिनेशन उत्तम, बॉर्डर नाजूक, पोत छान…” पण किंमत बघून ‘नाही’ म्हणाली. माझा माझ्याच बायकोबद्दलचा आदर द्विगुणित झाला… “साडी बाजूला ठेवूया” मी निर्णय दिला.
जरा चांगली, अजून चांगली, लेटेस्ट, न्यूली लाँच्ड… किंमत वाढत चालली, काही मिनिटांत किमतीचा पारा 20 हजारांवर आणि माझे ब्लडप्रेशर 200 वर गेले.
हेही वाचा – लग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम
माझे लक्ष विचलित झाले, समोर साड्या बघण्यात मग्न असलेल्या तीन सुंदर मुली आणि त्यातली एक माझ्या ऑफिसमधली, मुग्धा! मी पटकन तिकडे गेलो, मुग्धाच्या कानात कुजबुजलो, अगदी हळूवारपणे…
पाच मिनिटांनी मुग्धा आली.
“अय्या! कित्ती कित्ती छान साडी…” 2900 रुपयांची साडी हातात घेत ती म्हणाली.
“दादा, अगदी अशीच अजून एक साडी आहे का?”
मी दादाला हळूच खुणावले…
“नाही ताई, एकच पीस, एक्सक्ल्युझिव फॉर यंग ॲण्ड ब्युटीफुल गर्ल्स! तुमच्यावर खुलून दिसेल. घेऊन टाका.”
“मॅम, तुम्ही घेणार नसाल तर मी घेते. भाऊ लगेचच पॅक करा.”
“थांSSSब, आम्ही घेतली आहे,” बायको आणि तिच्या दोन्ही मैत्रिणी एक सुरात किंचाळल्या.
माझे काम झाले होते. निघताना मुग्धाला “थँक्स” नि सेल्समन भाऊला 100 रुपये द्यायला मी विसरलो नाही.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


